
संगीत ही कला अशी आहे की, ती अवगत नसतानाही त्यातला आनंद घेता येतो. एखादे गाणे ऐकताना कान टवकारले जातात. त्यातील शब्द, चाल, गेयता आवडते. काही रसिकांना हे गाणे कोणत्या रागात बांधले आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. ही उत्सुकता डॉ. विठ्ठल श्री. ठाकूर यांच्या ‘संगीत सरिता- राग कसे ओळखावेत’मधील पुस्तकातून शमविता येते.
गाणे ऐकून त्याचा राग ओळखण्याची कला यात सांगितली आहे. शास्त्रीय रागदरबारीतून आपण ऐकत असलेल्या गाण्याचा राग ओळखता आला, की ते ऐकण्याचा आनंद दुणावतो. या पुस्तकात १२३ राग व त्यावर आधारित दोन हजार ६००च्या वर मराठी व हिंदी गाणी यांची माहिती दिली आहे.
त्यांच्यासोबत आरोह व अवरोहही आहेत. राग व गाणी याचे क्रम अकारविल्हे ठेवले आहेत. शिवाय, गाण्यांची सूचीही शेवटी दिली आहे. अडणा, अभोगी, अलैय्या, बिलावल, कलिंगडा, किरवाणी, गारा, गुजरी तोडी, चारुकेशी, छायानट, पूर्वी, बिहागडा, भूप, भैरवी अशा विविध रागांची नावेही यातून समजतात.
पुस्तक : संगीत सरिता- राग कसे ओळखावेत
लेखक : डॉ. विठ्ठल ठाकूर
प्रकाशक : तन्मय प्रकाशन
पाने : २१६
किंमत : २६० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)