अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल... ............
प्रत्येक श्रावणाच्या महिन्यात आमचे श्रोते मंगळागौरीच्या गाण्याची फर्माईश करतात. याशिवाय मंगळवारी आम्हीसुद्धा चित्रपटसंगीताच्या कार्यक्रमात मराठी चित्रपटातील मंगळागौरीचं गाणं हमखास लावतोच. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटातील ‘नाच ग घुमा’ हे गाणं मी लावलं. मंगळागौरीचे हर्षोल्हासात खेळले जाणारे खेळ डोळ्यापुढे येत होते... गाणं सुरू होतं... पुढं पुढं गाण्यात पिंगा सुरू झाला... तुझ्या पिंग्यानं मला जागवलं... पोरी पिंगा... पिंग्यातले गमतीदार संवाद अगदी ठसक्यात उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऐकताना मजा येत होती. श्रावण हा स्त्रीजीवनाच्या सांस्कृतिक वैभवाचाही एक भाग आहे, असा विचार चमकून गेला. कार्यक्रम संपला; पण माझ्या मनानं मात्र वेगळाच पिंगा घालायला सुरुवात केली... तो पिंगा होता माहेरच्या आठवणींचा...
माहेरी जा सुवासाची कर बरसात...
कृ. ब. निकुंब यांची ही कविता किती वेळा ऐकावी? पुन्हा पुन्हा पुन्हा... माझ्या आकाशवाणीच्या सुमारे तीस वर्षांच्या सेवेत जेव्हा जेव्हा मी हे गीत लावायचे, तेव्हा तेव्हा कंठ दाटून आलेला असायचा. उद्घोषणा देणं अवघड व्हायचं... मग मी युक्ती शोधून काढली. गाणं सुरू होण्याआधीच गाण्याबद्दल बोलायचं. गीतकार, संगीतकार, गायक सगळं सांगायचं आणि मग गाणं सुरू करायचं... गाण्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा... अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची... गाणं संपलं की जाहिरात लावून टाकायची... म्हणजे बोलायचा प्रश्न उरत नाही... जाहिरात वाजतेय तोपर्यंत स्वत:ला सावरायचं, मनाला हळुवार थोपटत पुढच्या गाण्याच्या उद्घोषणेसाठी सज्ज व्हायचं... माहेरची आठवण सांगणारी कितीतरी गाणी आहेत... गंमत म्हणजे त्यातली बहुतेककरून पुरुषांनी लिहिली आहेत. राजा बढे, जगदीश खेबूडकर, ग. दि. माडगूळकर आणि अशाच कितीतरी कवींपैकी कृ. ब. निकुंब यांनी लिहिलेली ही कविता माझ्या मर्मबंधातली ठेव आहे.
कृ. ब. निकुंब बेळगावला मराठीचे प्राध्यापक होते. लिंगराज महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख होते. त्यांचा ‘उज्ज्वला’ हा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ‘ऊर्मिला’ हा काव्यसंग्रह अतिशय लोकप्रिय झाला. त्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या. सायसाखर आणि अनुबंध या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने ‘कृ. ब. निकुंब यांच्या उत्कृष्ट, रेखीव आणि गोड-गूढ अशा काव्यरचनेचं एक चंदनी लेणं मराठी रसिकांना मिळालं,’ असा त्यांचा गौरव करण्यात आला.
आजूबाजूच्या शांतीला मुळी नावच नसावे
एकांताच्या कानामध्ये फूल मौनाचे असावे।
अशा शब्दांमध्ये त्यांच्या कवितेनं मराठी मनाला अंतर्मुख केलं होतं. त्यांची ‘अनुबंध’मधली ‘नाते’ ही कविता निसर्गाशी एकरूपत्व दाखवणारी...
नाते माझे मंथर, श्याम घनाशी
कडकडत्या गगनाशी
जडलेले अनुबंध जिवाचे झरत्या जल-तारांशी
कोसळत्या धारांशी
आषाढाच्या सतत झडीशी
श्रावणातल्या उडत्या सोन-सरीशी...
या कवितेतल्या शेवटच्या ओळी तर निकुंबांच्या काव्यप्रतिभेचा अद्भुत साक्षात्कार घडवणाऱ्या...
जलतांडवी ज्याच्या विरघळते ब्रह्मांड
ज्यातून फुटते वटपर्णावर
मधुर स्मित करणारे
नवजीवन लडिवाळ...
निसर्गातलं नवचैतन्य अनुभवायला देणारं कृ. ब. निकुंब यांचं काव्य! कुठे मिळेल तिथे निकुंबांची कविता वाचली. अर्थात त्यांच्या कवितांकडे घेऊन जाण्याचं श्रेय ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ या कवितेलाच आहे.
‘सुखी आहे पोर’ सांग आईच्या कानात
आई-भाऊसाठी परि मन खंतावतं।
विसरली का ग भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं...
माहेराला आसुसलेली सासुरवाशिण वाऱ्याच्या कानात काहीतरी सांगते ही कल्पनाच किती सुरम्य! मुलींची वयंही लहान असत... अंगणातलं रोपटं काढून दुसरीकडं दूरवर लावायचं, अगदी तस्संच मुलीचं सासरी जाणं असायचं... अश्रूंची शिंपण त्या रोपट्याला मिळे. आईसाठी, लाडक्या भावासाठी झुरत झुरत ते रोपटं रुजायचा प्रयत्न करी... सासरच्या मायेची ओल शोधत मुळं घट्ट करण्याचा प्रयत्न करी...अशा काळात हे गाणं कृ. ब. निकुंब यांनी लिहिलं...
फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो...
किती आठवणी माहेराच्या, प्रत्येक आठवणीबरोबर एकेक अश्रूंची सर, पुसायच्या तरी किती, पदर ओलाचिंब, वेडावलेला जीव पुन्हा पुन्हा एकेक गोष्ट आठवतच राहतो... आठवतो तिला पारिजातकाचा सडा, काळ्या कपिलेची खोडकर नंदा, कपिलेच्या दुधावरची मऊ दाट साय अगदी आईच्या मायेसारखीच... सगळं सगळं आठवतंय... आठवता आठवता डोळे पुन्हा भरून येताहेत... माउलीच्या भेटीसाठी व्याकुळ होणाऱ्या सासुरवाशिणीचं मनोगत कवीला कसं कळतं? प्रश्न पडतो ना! पुरुषहृदयातसुद्धा एक माउली दडलेली असते, मुलगी दडलेली असते. पुरुषहृदयातसुद्धा ममत्व दडलेलं असतं ते असं कवितेच्या रूपातून प्रकट होतं... कवीच्या मनीचं गूज संगीतकाराला जेव्हा नीटपणे समजतं तेव्हा असं सुरेख गीत जन्माला येतं...
कृ. ब. निकुंब यांच्या या कवितेचं हळवेपण कमलाकर भागवत यांच्यासारख्या संगीतकाराला भावलं, शब्दांना स्वरांमध्ये गुंफण्यासाठी त्यांनी रेशीमधागा घेतला तो सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजाचा. असं वाटतं, हे गीत सुमनताईंच्या गोड गळ्यासाठीच जन्माला आलंय... गाणं आपण ऐकत राहतो, वाद्यांचा कल्लोळ नसलेलं, शांत लयीतलं हे गाणं शेवटाला आल्यावर एक वेगळीच लय, एक वेगळंच वळण घेतं...अवघ्या चराचरातली व्याकुळता जणू स्वरांमध्ये, शब्दांमध्ये गोळा होते...
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला...
इतका वेळ समंजसपणे वाऱ्याला सगळी खुशाली सांगता सांगता, आठवणींचे झोके घेता घेता एकदम आईसाठी ती रडवेली होते... गळा दाटून येतो... आईची भेट आता व्हायलाच हवी इतकी ती व्याकूळ होऊन जाते... ‘माहेरी जा, सुवासाची बरसात कर, मी सुखात आहे हे सांग पण हे वाऱ्या, मला आईला भेटायचय रे हेही सांग...’
कृ. ब. निकुंब आज आपल्यात नाहीत... उद्या, म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी त्यांचा जन्मदिन. त्यांच्या स्मृतीला वंदन करताना, श्रावणातले सण साजरे करताना, सुमन कल्याणपूर यांच्या कोमल हळव्या स्वरांची बरसात करणारं त्यांचं गाणं नक्की ऐकू या...
माहेरी जा सुवासाची कर बरसात...
- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४
(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)
(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)