जीवन आनंद या सामाजिक संस्थेमार्फत पणदूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे संविता आश्रम चालविला जातो. समाजातील असहाय, निराधार, मतिमंद अशा समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी तो एक भक्कम आधार ठरला आहे. राजाश्रयाविना केवळ लोकाश्रयावर ही संस्था खऱ्या अर्थाने चालविली जाते. या संस्थेच्या मदतीसाठी रत्नागिरीतील माया फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सहा ऑगस्ट रोजी सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्ताने संविता आश्रम या संस्थेचा परिचय.
........

लक्ष्मी मोतीराम गवस. वय तब्बल नव्वद वर्षं. ठिकाण दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. एक मुलगा आणि तीन मुली जग सोडून गेलेल्या. पतीचंही काही वर्षांपूर्वीच निधन झालं. आता आधार होता केवळ चंद्रमौळी झोपडीचा. चंद्र आणि सूर्य तर झोपडीत नेहमीच प्रवेश करत. आता पावसाळा सुरू झाल्यानं पाऊसही थेट घरात. अशा स्थितीत ही वृद्धा जीवन कंठत होती. प्रतीक्षा करत होती केवळ मृत्यूचीच. कारण तिचा सांभाळ करणारं या जगात कुणीच उरलं नव्हतं. शेजारीपाजारी तिला जेवण देत असत; पण असं किती दिवस चालणार? पुढे काय? हा प्रश्नच होता. अशा वेळी तिला गेल्याच आठवड्यात अचानक एक घर लाभलं. अगदी भरलेलं घर. तब्बल पाऊणशे माणसांचा राबता असलेलं. त्या घराचं नाव संविता आश्रम. तिच्या दोडामार्गमधल्या घराजवळचे तिचे शेजारी, ग्रामस्थ आणि दोडामार्गच्या पोलिसांनी तिला तिच्या या नव्या घरापर्यंत पोहोचवलं. आता ती अखेरच्या श्वासापर्यंत तिथंच राहणार आहे. अगदी सुखानं.
चार वर्षांपूर्वी एका तरुणीलाही हेच घर मिळालं आणि ‘सेवा’ हे नावही मिळालं. कारण मूकबधिर असल्यानं तेव्हा तिला तिचं नावही सांगता येत नव्हतं. त्यामुळे गाव आणि आई-वडील वगैरे तर लांबचीच गोष्ट. पेण (जि. रायगड) रेल्वेस्थानकाच्या जवळ रेल्वेच्या रुळांवर पडलेल्या या मुलीला पोलिसांनी मुंबईत शीव रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या समाजसेवकांनी पेणच्या पोलिसांच्या मदतीनं संविता आश्रमाशी म्हणजेच जीवन आनंद संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे प्रमुख संदीप परब यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली आणि मुंबईतून तिला पणदूरच्या संविता आश्रमात दाखल केलं. २०१३पासून ती तिथं आनंदात आहे. पेणपासून पणदूरपर्यंतचा आपला प्रवास कसा झाला, हे हातवारे करून सांगायचा प्रयत्न करते.
याच शीव रुग्णालयातला असाच आणखी एक बेवारस रुग्ण संविता आश्रमात दाखल झाला. राजा यादव असं त्याचं नाव. तो एका हॉटेलमध्ये कामाला होता. दिवसभर काम करून तिथंच राहत होता. एकदा पाय घसरून पडला आणि त्याच्या कमरेला मोठी दुखापत झाली. हॉटेलच्या मालकानं त्याला शीवच्या रुग्णालयात दाखल केलं आणि तो निघून गेला. त्याची जबाबदारी कुणी घ्यायची, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा जीवन आनंद संस्थेनं तिथल्या समाजसेवकांच्या मदतीनं त्याच्यासाठी पुढाकार घेतला. वर्गणीतून पैसे जमवून त्याच्यावर चार शस्त्रक्रिया केल्या. नंतर त्याचं २०१४च्या जुलैमध्ये पणदूरच्या संविता आश्रमात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आलं.
समाजानं टाकून दिलेल्या अशा असंख्य बेवारस माणसांचा संविता आश्रम हाच कायमस्वरूपी आधार झाला आहे. त्यात लहान मुलं आहेत, तरुण-तरुणी आहेत, तसंच वृद्ध महिला आणि पुरुषही आहेत. अपंग आहेत. धडधाकट असलेले मतिमंदही आहेत. बेवारस स्थितीत रस्त्याच्या कडेला पडलेले, टाकून दिलेले, वृद्ध झाल्यानं हतबल झालेले, रेल्वेमार्गाजवळ पडलेले अशा तब्बल ७५ जणांना आश्रमानं आधार दिला आहे. संदीप परब नावाच्या कोकणातल्या तरुणानं जीवन आनंद या संस्थेच्या माध्यमातून हा आधार निर्माण केला आहे.
संदीप परब हा पणदूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) इथला तरुण. बालपणापासूनच त्याला इतरांना मदत करायला आवडायचं. बेघर झालेल्या ज्येष्ठ नागरिकांविषय त्याला विशेष कळकळ वाटायची. कोकणातल्या रूढीप्रमाणेच चोविसाव्या वर्षी त्यानं मुंबई गाठली; पण इतर तरुणांप्रमाणे नोकरीसाठी नव्हे, तर समाजकार्यासाठी. मुंबईत त्यांनी परळमधल्या सोशल सर्व्हिस लीगमधून समाजसेवेविषयीचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर अखिल भारतीय महिला परिषद, गृहनिर्माण हक्क समिती आणि जुहू-सांताक्रूझमधील लोटस आय हॉस्पिटल अशा अनेक संस्थांमध्ये त्यानं काम केलं. हॉस्पिटलमध्ये तो प्रोजेक्ट मॅनेजर होता. या काळात झोपडपट्टीत समाजसेवेचंही काम सुरू होतं. झोपडपट्टीतल्या नागरिकांना पाण्याची जोडणी आणि स्वच्छताविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी त्यानं मदत केली. त्या भागात फिरताना एड्सचे बळी आणि बळी गेलेल्यांची बेवारस मुलं पाहिली. त्यातल्या पाच जणांना आश्रय आश्रमात प्रवेश मिळवून दिला आणि त्यांचं पालकत्व स्वीकारलं. २००४मध्ये खार इथं अखिल भारतीय महिला परिषदेच्या श्रद्धा केंद्राच्या एका प्रकल्पात सहभागी व्हायची संधी परब यांना मिळाली. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बेघर झाल्यानं रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या तसंच अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांचं सर्वेक्षण केलं आणि या मुलांसाठी डे केअर सेंटर चालविलं. अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम समजावेत, म्हणून अनेक पथनाट्यं सादर केली. अशा मुलांना आधार दिला. त्यांचं समुपदेशन केलं. हे सारं करत असतानाच एक गोष्ट परब यांच्या लक्षात आली, ती म्हणजे मुलं आणि महिलांकरिता अनेक संस्था काम करत असल्या, तरी रस्त्याच्या बाजूला निराधार आयुष्य जगणारे ज्येष्ठ नागरिक, औषधोपचारांच्या अभावी मरणासन्न अवस्थेत राहणारी निराधार माणसं, कोणत्याही आधाराअभावी व्यसनाधीन होणारी तरुण मुलं यांच्यासाठी काम करणारी कोणतीही संस्था नव्हती. हेच काम आपण हाती घ्यायचं, असं परब यांनी ठरविलं आणि ते कामाला लागले. त्यातूनच त्यांनी जीवन आनंद ही संस्था २००७ साली त्यांनी सुरू केली. पणदूर या आपल्या मूळ गावी त्यांनी संविता आश्रम सुरू केला. मुंबईत किंवा कोकणात सापडणाऱ्या अनाथांना आधार देण्याचं काम ही संस्था २०१३ सालापासून करत आहे.

संस्थेचं काम वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे. मुंबईत खार इथं डे केअर सेंटर चालविलं जातं. तिथं रस्त्यावरच्या बेवारसांची औषधोपचारांसह दिवसभराची व्यवस्था केली जाते. रस्त्यालगतच्या रुग्णांना सेवा देणं, उपचार करणं, स्वच्छ करणं, आंघोळ घालणं, गंभीर आजारानं त्रस्त असलेल्यांना रुग्णालयात दाखल करणं, निराधारांना मानसिक आधार देणं अशा स्वरूपाचं हे काम आहे. मुंबईत महापालिकेच्या रुग्णालयात अपघातग्रस्त आणि इतर अनेक बेदखल रुग्ण दाखल होत असतात. त्यांना मानसिक आधार देणं, तसंच पोलिसांना त्यांच्या मानसिक अवस्थेविषयी माहिती देणं, रुग्णाचा पूर्वेतिहास शोधून काढणं, त्यांच्या ज्ञात नातेवाईकांशी संपर्क साधणं, रुग्णांना त्यांच्या ताब्यात देणं, तसंच निराधार रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं कामही संस्था करते. महापालिका रुग्णालयात दाखल केलेल्या अज्ञात रुग्णांना सेवा पुरविली जाते. मुंबईतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दर वर्षी सरासरी साडेतीनशे रुग्णांवर असे उपचार केले जातात. संविता आश्रम ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, त्या जिल्ह्यातही दर वर्षी सरासरी १५० गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारांची सुविधा संस्थेतर्फे पुरविली जाते. संस्था बेवारस आणि निराश्रित वृद्धांसाठी काम करते, हे समजल्यानंतर संस्थेशी मुंबईसह राज्यभरातून दररोज किमान पाच जणांकडून संपर्क साधला जातो. प्रामुख्यानं रस्त्याच्या कडेला जीवन कंठणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांविषयी फोन येतात. फोन आल्यानंतर संस्था प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका चमूसह संस्थेला देणगी रूपानंच मिळालेल्या रुग्णवाहिकेसह त्या ठिकाणी रवाना होते. शक्य असेल, तिथं अशा एकाकी पडलेल्या वृद्धांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं जातं. सात वर्षांत संस्थेनं सुमारे दीड हजार ज्येष्ठ नागरिकांचं यशस्वीरीत्या पुनर्वसन केलं आहे. ज्यांना कुटुंबच नाही, अशा जगण्याची उमेदच गमावलेल्या, असहाय, अनाथ, मनोरुग्ण, अपंग आणि निराधार मुलं आणि प्रौढांची कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था विरार (पूर्व) इथं संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या समर्थ आश्रमात किंवा पणदूरच्या संविता आश्रमात केली जाते. निराधारांसाठी वैद्यकीय शिबिरंही संस्थेतर्फे आयोजित केली जातात. गरीब मुलांच्या हृद्रोगांसारख्या शस्त्रक्रियांसाठी संस्था मदत करते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी बरीच लहान मुलं आहेत, ज्यांना जन्मत: हृदयविकाराचा त्रास असतो. त्यांचे पालक आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं आपल्या मुलांवर उपचार करू शकत नाहीत. अशा सुमारे १५ मुलांवर आतापर्यंत उपचार करण्यात आले आहेत.

संविता आश्रमात सध्या दाखल असलेल्या ७५ रुग्णांना दैनंदिन जीवन सुकर व्हावं, यासाठी शक्य त्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. प्रकृती चांगली असलेले रुग्ण कागदापासून पिशव्या तयार करण्यासारख्या विविध कामात आपापल्या परीनं सहभाग घेतात. आश्रमात दुधासाठी गुरं पाळण्यात आली आहेत. गांडूळखताचा प्रकल्पही राबविण्यात आला आहे. लहान मुलांसाठी बालवाडीसारखी व्यवस्था करण्यात आली आहे. गरजेनुसार रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविली जाते. जिल्हा रुग्णालयात त्यांना नेलं जातं. तातडीच्या वैद्यकीय सुविधाही त्यांना पुरविल्या जातात.

हे सारं कार्य कोणत्याही सरकारी मदतीविना चालतं. लोकांकडून आलेल्या मदतीवरच सारं काही सुरू आहे. अनेक देणगीदार आपापल्या परीनं मदत करतात. अशाच देणग्यांमधून पणदूर इथं संस्थेनं सुमारे एक हेक्टर जागा खरेदी केली आहे. या जागेवर विविध इमारतींचं बांधकाम सुरू आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदारांना आश्रमवासीयांचा लळा लागला आहे. तेही अधूनमधून कार्यक्रमांच्या निमित्तानं त्यांच्यासाठी खास भोजनाची व्यवस्था करतात. आश्रमाची माहिती समजल्यानंतर अनेक जण आश्रम पाहायला येतात आणि मदत करून जातात. अलीकडेच विकास आमटे यांनीही आश्रमाला भेट दिली होती. कुडाळचे विजय प्रभुतेंडोलकर आपल्या दोन लहान मुलींसह आश्रमात आले होते. नेहा आणि निकिता या त्या अल्पवयीन मुलींनी आश्रम पाहिला. संस्थेसाठी आपणही काही तरी केलं पाहिजे, असं त्यांच्या बालमनानं घेतलं. त्यातून त्या दोघींनी संपूर्ण तालुक्यात फिरून वर्गणी गोळा करून आश्रमाला दिली. त्यातून आश्रमात विहीर बांधण्यात आली. देणग्यांमधून अशी कामं पार पडत असली, तरी संस्थेला अजून अनेक प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी संस्थेला मदतीची गरज आहे.
ही गरज ओळखूनच रत्नागिरीतल्या माया फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं त्या संस्थेच्या मदतीसाठी रत्नागिरीत रविवारी, सहा ऑगस्ट रोजी एका सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. माया फाउंडेशन ही सामाजिक संस्था रोटेरियन वेदा मुकादम, जाहिरात क्षेत्रातल्या ईशा वाडिये, विवेक वाडिये, श्री. नाखवा, वैभव खेडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सात जणांनी सामाजिक भावनेतून एकत्र येऊन स्थापन केली आहे. गेल्या वर्षी संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमातून सिंधुताई सपकाळ यांना दीड लाखाचा निधी मिळवून दिला. या वर्षी संविता आश्रमासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यालाही नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
कार्यक्रमाविषयी संपर्क :
वेदा मुकादम : ९२२५१ ४०००७, ईशा वाडिये : ९४०४९ ०६९६८
‘जीवन आनंद’ संस्थेला मदत करण्यासाठी संपर्क :
अध्यक्ष संदीप परब : ९८२०२ ३२७६५, देवू सावंत : ८००७६ ५१११३, उदय कामत : ९२७०७ २७३२२
- प्रमोद कोनकर
मोबाइल : ९८२२२ ५५६२१
ई-मेल : pramodkonkar@yahoo.com
(लेखक रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार असून, ‘साप्ताहिक कोकण मीडिया’चे संपादक आहेत.)