संगीतकार इक्बाल कुरेशी यांचा २१ मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज पाहू या, त्यांनी संगीत दिलेले ‘वो हम न थे, वो तुम न थे...’ हे गीत... ............
शंकर-जयकिशन, नौशाद, सी. रामचंद्र, ओ. पी. नय्यर असे एकेक दिग्गज आपल्या संगीताने रसिकांवर स्वरांची बरसात करत होते. त्या सुवर्णकाळातच ‘तो’ चित्रपटसृष्टीत दाखल झाला. ओघानेच अल्पशी लोकप्रियता आणि अल्पशी प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आली. १९६० साल संपले आणि त्याची गाणी लोकांना चांगली वाटू लागली. आज मात्र ‘त्याच्या’बद्दल चार ओळी लिहायच्या, तर ‘त्याची’ माहिती पटकन उपलब्ध होऊ शकली नाही.
मुंबईचे जफर अबीद आणि अमरावतीचे दीपक चौधरी मदतीला धावले आणि त्यामुळेच ‘सुनहरे गीत’मध्ये ‘त्यांच्या’बद्दल अर्थात संगीतकार इक्बाल कुरेशींबदल मी लिहू शकलो. २१ मार्च हा इक्बाल कुरेशींचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांच्या चित्रपटविषयक कारकिर्दीची माहिती घेतली.
औरंगाबाद येथे जन्मलेल्या कुरेशींचा कल पहिल्यापासूनच भारतीय संगीताकडे होता. त्यामुळे औरंगाबादच्या रेडिओ स्टेशनवरील लहान मुलांच्या कार्यक्रमात त्यांचा समावेश होऊ शकला होता; पण पुढे तारुण्यात प्रवेश केल्यावर ते काही काळ निराशावादी विचारांचे बनले होते. तथापि एकदा रेडिओ स्टेशनच्या अधिकाऱ्यांची व त्यांची ‘आकाशवाणी’च्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर भेट झाली असता त्यांनी बोलता बोलता एक गाणे तेथेच त्या अधिकाऱ्यांना गाऊन दाखवले. ते ऐकून त्या अधिकाऱ्यांनी त्यांना ‘आकाशवाणी’वरून गाण्याची संधी दिली. परंतु कुरेशी त्यावर खूश नव्हते. त्यामुळे अल्प काळातच ते तेथून हैदराबादला गेले. तेथे त्यांनी फाइन आर्ट अकादमीत नोकरी स्वीकारली. आपल्या गाण्याचा व संगीताचा षौक कायम ठेवला.
नंतर ते मुंबईत आल्यावर अभिनेत्री नर्गिस यांनी त्यांचे संगीत व काही गैरफिल्मी गज़ला ऐकून काही चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांशी त्यांची भेट घडवून आणली. त्यामधूनच त्यांना ‘पंचायत’ या चित्रपटास स्वतंत्ररीत्या संगीत देण्याची संधी मिळाली. या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाकरिता कुरेशींनी
‘ता थैया करते आना.. ’ हे गीत संगीतबद्ध केले आणि ते लता मंगेशकर व गीता दत्त यांच्याकडून गाऊन घेण्याचे ठरवले; पण त्या काळात लता मंगेशकर नवीन संगीतकारांकडे सहजासहजी गात नसत! इक्बाल कुरेशींचा तर तो पहिलाच चित्रपट होता. त्या वेळी नर्गिस यांच्या सांगण्यावरून लता मंगेशकर गायला तयार झाल्या! आणि ते गीत लोकांना खूप आवडले. या चित्रपटाकरिता कुरेशी यांनी दहा गीते तयार केली होती. परंतु त्यातील
‘मैं यह सोचकर उस के दर से उठा था...’ हे कैफी आझमी यांनी लिहिलेले गीत चित्रपट प्रदर्शित होत असताना वगळण्यात आले होते. तेच गीत पुढे १९६४मध्ये ‘हकीकत’ चित्रपटात घेण्यात आले व तेथे मदनमोहन यांनी ते संगीतबद्ध केले होते.
इक्बाल कुरेशींनी कोणत्याही संगीतकाराकडे सहायक म्हणून काम केले नव्हते. १९५८पासून त्यांची चित्रपटसृष्टीतील संगीतकार म्हणून स्वतंत्र वाटचाल सुरू झाली. संगीत या दृष्टीने यशस्वी ठरलेला कुरेशी यांचा पहिला चित्रपट म्हणजे १९६०चा ‘बिंदिया’ हा चित्रपट होय! या चित्रपटातील प्रचंड लोकप्रिय ठरलेले गीत म्हणजे मोहम्मद रफी यांनी गायलेले
‘मैं अपने आप से घबरा गया हूँ...!’
१९६०मध्येच अभिनेत्री साधना व अभिनेता जॉय मुखर्जी यांचा नायक-नायिका म्हणून असलेला ‘लव्ह इन सिमला’ हा पहिला चित्रपट पडद्यावर आला. त्यालाही कुरेशी यांनी संगीत दिले होते. यानंतर आलेल्या १९६१च्या ‘उमर कैद’मधील कुरेशी यांच्या संगीतातील मुकेश यांनी गायलेले,
‘मुझे रात दिन ये खयाल है...’ हे गीत आजही श्रवणीय आहे. नंतर १९६२मध्ये कुरेशींच्या संगीतातील ‘बनारसी ठग’ हा चित्रपट पडद्यावर आला. यामधील
‘एक बात पूँछता हूँ...’ हे मुकेश आणि उषा मंगेशकर यांनी गायलेले मधुर द्वंदगीत उलेखनीय होतेच; पण त्याशिवाय या चित्रपटातील मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांनी गायलेल्या
‘आज मौसम की मस्ती में गाए पवन...’ या गीताची चाल व संगीत सुंदर होते; पण हा ‘बनारसी ठग’ चित्रपट फारसा न चालल्यामुळे त्या गीताचीच चाल पुढे कुरेशी यांनी ‘चा चा चा’ चित्रपटाकरिता वापरली आणि ते गीत म्हणजे
‘एक चमेली के मंडवे तले...’ हे खूप लोकप्रिय ठरले.
पुढील काळात कवाली की रात, सरहदी लुटेरा, मोहब्बत और जंग, दो ठग अशा काही ‘सी ग्रेड’ चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. काही भोजपुरी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. संगीतामधून दिसणारा हा संगीतकार आपल्याला १९६३च्या ‘ये दिल किसको दू’ या चित्रपटात पडद्यावरही पाहायला मिळतो. शशी कपूर व रागिणी हे या चित्रपटाचे नायक-नायिका होते. या चित्रपटात आशा भोसले आणि मुबारक बेगम यांनी गायलेले
‘हमे दम दई के सौतन घर जाना...’ हे गीत पडद्यावर मराठी अभिनेत्री जयश्री गडकर आणि अभिनेत्री मधुमती सादर करतात. हे मुजरा गीत सादर होत असताना जे काही लोक हा मुजरा पाहायला आलेले असतात, त्यांच्यामध्ये इक्बाल कुरेशी आपल्याला बसलेले दिसतात.
१९६५नंतर मात्र त्यांनी काही गैरफिल्मी गाणीही गायली. कारण संकोची स्वभावामुळे चित्रपटसृष्टीत ते मोठ्या निर्मात्यांकडे गेले नाहीत. चीन आक्रमणाच्या वेळी त्यांनी वीरश्रीचे एक गैरफिल्मी गीत संगीतबद्ध केले होते. ते लोकांना आवडले; पण ते गीत त्या काळापुरतेच उत्तम ठरले. १९७१ ते १९८० या काळात त्यांनी काही मुस्लीम धर्मिक व सामाजिक चित्रपटांना संगीत दिले होते. ख्वाजा की दिवानी (१९८१), सौतेला पती (१९८५), बिस्मिल्लाह की बरकत (१९८३), मेरा नसीब (१९८९) जिने की सजा (१९९०), प्यार दो प्यार लो (१९९५) अशा काही चित्रपटांमधून संगीतकार इक्बाल कुरेशी हे नाव वाचण्यात आले होते; पण आता ते चित्रपट व त्यातील गीते विस्मरणात गेली आहेत. २१ मार्च १९९८ रोजी इक्बाल कुरेशींचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
आज इक्बाल कुरेशी म्हटले, की सर्वप्रथम आठवतो तो १९६४चा चित्रपट ‘चा चा चा!’ अभिनेता चंद्रशेखर या चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक होता. चित्रपट तसा खास नव्हता, पण
‘एक चमेली के मंडवे तले...’ आणि
‘सुबह न आयी, श्याम न आयी...’ ही गीते आजही आवर्जून ऐकावीत अशी आहेत. आशा भोसले व मोहम्मद रफी यांनी इक्बाल कुरेशींनी दिलेल्या संगीतात ही गीते अप्रतिमरीत्या गायली आहेत.
याच चित्रपटाकरिता कवी नीरज यांचे एक सुंदर काव्य उपयोगात आणले होते. इक्बाल कुरेशींनी ते संगीतबद्ध केले होते आणि त्याचे मोहम्मद रफींनी अप्रतिमरीत्या गाऊन त्याचे सौंदर्य, प्रभाव वाढवला होता. आजचे सुनहरे गीत तेच आहे -
दोन प्रेमिक एकत्र येतात. दोघांचे छान जमून जाते. सौख्याचा काही काळ जातो. आपल्यावर तो/ती भरभरून प्रेम करत आहे, हे लक्षात येते. त्या सौख्याने मन सुखावते आणि पुढील काही काळातच दोघे दुरावतात. नेमके काय घडते, चूक कोणाची असते, हे प्रश्न त्रस्त करतात; पण विरहाचा वणवा चटके देतो, हे मात्र सत्य असते. भविष्यात पुन्हा समेट होईल, एकत्र येऊ अशी आशा वाटत नाही आणि अशा उदास, निराश मनाने आपली तगमग व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घेतला जातो. उपमा अलंकारांनी नटवून ती दु:खी प्रियकराची भावना कागदावर उतरवताना कवी नीरज लिहितात -
वो रहे गुजर थी प्यार की
लुटी जहाँ पे बेवजह पालकी बहार की
(मी आज हे काय बघतो आहे? खरेच की) प्रीतीच्या मार्गावरून जाणारे ते आम्ही नव्हतो (आणि) त्या तुम्हीही नव्हता! (मग कोण होते? आपणच ते असतो, तर हे जे आज घडले आहे, ते घडले असते का? म्हणूनच मला वाटते, की प्रीतीच्या मार्गावरची आपली ती वाटचाल आपली नव्हतीच. तो एक भास असावा. तसे नसेल, तर बघा की) कोणतेही कारण नसताना (बेवजह) आपल्या प्रेमाने बहरलेली पालखी लुटली गेली.
या ठिकाणी कवी ‘पालकी’ हा शब्द वापरतो तो एवढ्यासाठीच, की पालखीमधून असामान्य कर्तृत्वाचे, महत्त्वाचे असेच कोणी येते-जाते. आपले प्रेम हे असेच असामान्य होते. म्हणून ते पालखीतून आले होते. प्रेमाचा वसंत ऋतू आणणारी ती पालखी होती, असाही अर्थ येथे अभिप्रेत असावा. हीच ओळ संपूर्ण गीतात वारंवार घेतली आहे. प्रेमाची शोकांतिका सांगणारे हे गीत पुढे काय सांगते बघा!
ये खेल था नसीब का, न हँस सके न रो सके
न तूर पर पहुँच सके, न दार पर ही सो सके
कहानी किससे ये कहे, चढाव की उतार की
लुटी जहाँ पे बेवजह पालकी बहार की
(प्रिये, हे तुझ्याबरोबरचे प्रेम आणि आता हा विरह! हे सगळे पाहिले, की वाटते, की) हा माझ्या नशिबाचा खेळ होता (ज्यामध्ये) (आम्ही) हसलो नाही व अश्रूही ढाळू शकलो नाही. प्रेमातील एका दिव्य उंचीवर पोहोचू शकलो नाही आणि आहे त्या स्थानी शांतपणे झोपूही शकलो नाही. प्रेमातील या चढ-उताराची गोष्ट कोणाला सांगणार?(माझ्या दु:खाशी कोणालाही घेणे-देणे नाही. म्हणून गप्प बसलेलेच चांगले.)
या कडव्यात ‘तूर’ हा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ असा आहे, की सीरियामधील एक पवित्र पर्वत, जेथे मोझेसने दैवी प्रकाश बघितला. अशा दिव्यत्वाच्या शिखरावर आमचे प्रेम पोहोचू शकले नाही, अशा आशयाने तूर शब्दाचा वापर केला आहे.
आपल्या प्रियेला तो पुढच्या कडव्यात सांगतो -
तुम ही थे मेरे रहनुमा, तुम ही थे मेरे हमसफर
तुम ही थे मेरी रोशनी, तुम ही ने मुझको दी नजर
बिना तुम्हारे जिंदगी शमा है एक मजार की
लुटी जहाँ पे बेवजह पालकी बहार की
माझ्या वाटचालीत तुम्हीच माझे मार्गदर्शक-पथदर्शक (रहनुमा) होतात व माझ्यासोबत चालणारे सहचर होतात. माझा प्रकाश, मला मार्ग दाखवणारा उजेड तुम्हीच होतात. (आणि ही वाटचाल करण्यासाठी) तुम्हीच मला दृष्टी दिलीत. (अशा या) तुमच्याशिवाय माझे जीवन म्हणजे समाधीवर जळणारी एक ज्योत आहे. (जीवन असून नसल्यासारखे आहे.)
प्रियतमेपासून दुरावलेला हा दु:खी प्रियकर जीवनाच्या अशा दु:खद टप्प्यावर आहे, की जेथे त्याला प्रश्न पडतो, की हे कसले जीवन आहे, जीवनाची वाटचाल करत आपण कोठे आलो? म्हणूनच तो म्हणतो -
ये कौनसा मुकाम है, फलक नहीं, जमीं नहीं
के शब नहीं, सहर नहीं, के गम नहीं, खुशी नहीं
कहाँ ये लेके आ गयी हवा तेरे दयार की
लुटी जहाँ पे बेवजह पालकी बहार की
हे कोणते मुक्कामाचे ठिकाण आहे? हे आकाशही (फलक) नाही आणि ही जमीनही नाही. रात्रही नाही, सकाळही नाही. (या ठिकणी आता माझ्या मनाची अवस्था अशी आहे, की मला कशातही) आनंद वाटत नाही आणि दु:खही होत नाही. तुझ्या घरातील, प्रदेशातील हवा (अर्थात तुझ्या प्राप्तीची भावना/आस) मला कोठे घेऊन आली आहे?
खरेच की हो, काही कारण नसताना माझ्या प्रेमाची पालखी लुटली गेली, हे पुन्हा पुन्हा सांगून तो अखेरच्या कडव्यात म्हणतो -
गुजर रही है तुम पे क्या, बना के हम को दर-बदर
ये सोचकर उदास हूँ, ये सोचकर है चश्मतर
ना चोट है ये फूल की, ना खलीश है ये खारकी
लुटी जहाँपे बेवजह पालकी बहार की
मला दारोदार (दरबदर) फिरायला लावून तुझ्यावर काय प्रसंग आला असेल, या विचाराने मी उदास होतो, (तुझ्यावर आलेल्या प्रसंगाचे चित्र डोळ्यांपुढे उभे राहून माझे) डोळे ओलावतात. (खरेच, आपल्या प्रेमाच्या वाटचालीत आलेली ही परिस्थिती म्हणजे) ही फुलाने केलेली जखम नाही आणि काट्यामुळे प्राप्त झालेली टोचणीही (खलिश) नाही. (मनाची अशी काही तरी विक्षिप्त अवस्था झाली आहे.) खरेच विनाकारण आपल्या प्रेमाची पालखी लुटली गेली!
कवी नीरज यांचे हे अप्रतिम काव्य संगीतात गुंफताना इक्बाल कुरेशींनी अत्यंत प्रभावी अशी चाल आणि संगीतरचना करून हे गीत ‘सुनहरे’ बनवले आहे. सुप्रसिद्ध नर्तिका हेलन या चित्रपटाची नायिका आहे. चंद्रशेखर हा प्रभावी अभिनेता नव्हता; पण प्रभावी संगीतकार, गीतकार व गायक यांच्यामुळे हे गीत प्रभावी बनले आहे आणि ‘सुनहरे’ही बनले आहे.