Ad will apear here
Next
गाण्यांमधून संस्कृत शिकवणाऱ्या ‘प्रज्ञा’वंत
बेंगळुरू : संस्कृत ही जगातील एक प्राचीन भाषा आहे. संगीत, नृत्य, शिल्पकला, योग, वैद्यक, रसायनशास्त्र, धातुशास्त्र, गणित, अंतराळ विज्ञान अशा अनेक विषयांच्या ज्ञानाचा खजिना या भाषेत आहे. दुर्दैवाने, या भाषेचे सौंदर्य समजणारे फार थोडे जण आहेत. बहुसंख्य जणांसाठी ती एक अवघड भाषा आहे. या पार्श्वभूमीवर, साध्या-सोप्या पद्धतीने संस्कृत शिकवून ती लोकप्रिय करण्याचा उपक्रम बेंगळुरूतील अभ्यासक डॉ. प्रज्ञा जेरे-अंजल राबवत आहेत. 

शालेय अभ्यासक्रमात एक भाषा म्हणून संस्कृतचा समावेश असतो. विद्यार्थ्यांना शाळेतच या भाषेबद्दल नावड निर्माण होते. परीक्षेपुरता अभ्यास करून ते या भाषेला रामराम ठोकतात. वरून अवघड वाटत असली तरी शिकण्यास ही भाषा सोपी आहे हे त्यांना माहीत नसते. अभ्यासक्रमाची रचना आणि शिकविण्याची पद्धत यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत शिकणे अवघड वाटते. या भाषेच्या वापरापेक्षा तिच्या व्याकरणावरच जास्त भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी कंटाळतात. संस्कृतचे सौंदर्यच त्यांना कळत नाही, असे डॉ. प्रज्ञा यांना वाटते. 

डॉ. प्रज्ञात्यांनी अलीकडेच संस्कृतसह भारतीय भाषा, कला आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी वेदिका (http://www.vedika.online/) हे ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले. प्रज्ञा यांचे शिक्षण सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीत झाले. त्यांच्या शिक्षिकेमुळे त्या शाळेत असतानाच संस्कृतकडे आकर्षित झाल्या. त्यांची संस्कृतची आवड वाढतच गेली. पदव्युत्तर परीक्षेत त्यांना संस्कृतमध्ये सुवर्णपदक मिळाले. नंतर बेंगळुरू विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट केली. शाळांमधून संस्कृत ज्या कंटाळवाण्या पद्धतीने शिकविले जाते, ती पद्धत प्रज्ञा यांना मोडून काढायची होती. संस्कृत हसतखेळत शिकवायचे हेच त्यांच्या आयुष्याचे मिशन बनले. ‘इन्स्ट्रक्शनल डिझायनर’चे प्रशिक्षण घेऊन त्यांनी ‘विप्रो’सारख्या कंपन्यांमध्ये काही काळ नोकरी केली. काही कौशल्ये आत्मसात केल्यावर त्यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात आणायचे ठरविले. 

एके दिवशी प्रज्ञा यांची मुलगी कन्नड गाणे गुणगुणत असताना त्यांनी ऐकले. मराठी मातृभाषा असूनही ती सहजतेने कन्नड गाणे म्हणत होती हे पाहून त्यांना गंमत वाटली. यातूनच त्यांना संस्कृत लोकप्रिय करण्याचे सूत्र सापडले. गाण्याचा आधार घेत संस्कृत शिकविण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यांनी नोकरी सोडली आणि संस्कृत गाणी रचण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी १५ संस्कृत गाणी लिहिली आहेत. या गाण्यांच्या अॅनिमेशन फिल्म तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. या फिल्म यू-ट्यूब चॅनेलवरून प्रसारित करायलाही त्यांनी सुरुवात केली आहे. संस्कृत स्वर शिकवणाऱ्या त्यांच्या पहिल्याच गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी संस्कृत व्यंजने, संख्या, रंग शिकविणाऱ्या गाण्यांचे अॅनिमेटेड व्हिडिओ यू-ट्यूबवरून प्रसारित केले. त्यांच्या या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

वेदिका या व्यासपीठाद्वारे अत्यंत दर्जेदार, नवे साहित्य तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात अॅनिमेटेड गाण्यांसह, अॅनिमेटेड कथा, कॉमिक स्ट्रिप्स, चित्रांच्या माध्यमातून चरित्रे, ई-लर्निंग मोड्युल्स, गेम्स, इन्फोग्राफ्स, व्हिडिओ लेक्चर्स आदींचा समावेश असेल, असे डॉ. प्रज्ञा यांनी त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. आपण केवळ संस्कृतपुरतेच नव्हे, तर भारतीय भाषा, संस्कृती, कला या विषयांसंदर्भात काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

क्राउडफंडिंगही...
या उपक्रमासाठी निधी गोळा करण्याकरिता त्यांनी मिलाप या ‘क्राउडफंडिंग’ साइटवरून आवाहनही केले आहे. त्यांना आर्थिक मदत करण्यासंदर्भातील अधिक माहिती https://milaap.org/fundraisers/vedika या लिंकवर उपलब्ध आहे. त्यांना साडेसात लाख रुपये निधीची आवश्यकता असून, आतापर्यंत सुमारे दोन लाख ८६ हजार रुपये त्यांना मिळाले आहेत.

(‘वेदिका’च्या यू-ट्यूब चॅनेलवरचा संस्कृत शिक्षणासंदर्भातील एक अॅनिमेटेड व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SYVZBF
Similar Posts
रेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू नाशिक : गीर्वाणवाणी अर्थात देवभाषा संस्कृत शिकण्यात रस घेणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत चालली आहे. श्रवण हा भाषाशिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. ही गोष्ट लक्षात घेऊन १६ ऑगस्ट २०१९ रोजी ‘रेडिओ संस्कृत भारती’ या जगातील पहिल्या संस्कृत इंटरनेट रेडिओचे मोफत प्रसारण सुरू करण्यात आले आहे. विविध भाषांचे
इंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय रत्नागिरी : ‘संस्कृत ही पुरातन भाषा सध्या लोकव्यवहारातून मागे पडली असली, तरी इंटरनेटमुळे संस्कृतचे पुनरुज्जीवन होण्यास मोठा हातभार लागतो आहे. ऑनलाइन पोर्टल्स, वेबसाइट, टीव्ही चॅनेल्स, ऑनलाइन रेडिओ अशा विविध माध्यमांतून संस्कृत पत्रकारिता बहरू लागली आहे. सध्या देशभरात ११०हून अधिक संस्कृत नियतकालिके सुरू
आजचे सुभाषित उत्तमा आत्मना ख्याताः पितुः ख्याताश्च मध्यमाः। अधमा मातुलात्ख्याताः श्वशुराच्चाधमाधमाः॥ या सुभाषिताचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून जाणून घ्या..
संस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा रत्नागिरी : ‘संस्कृतमध्ये सर्व शास्त्रांवर ग्रंथ आहेत. संस्कृतमधील तत्त्वज्ञान आणि विचार उदार आणि विश्वबंधुत्वाचे आहेत. भारताचा तिरंगा ध्वज भारतीयांना एकत्र आणतो, त्याप्रमाणे संस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संस्कृत शिकले पाहिजे,’ असे प्रतिपादन गोदूताई जांभेकर विद्यालयातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language