पुणे : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गीतांनी मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे कलावंत म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी. कृष्णराव रामचंद्र टेंबे यांनी संपादित केलेला ‘एक धागा सुखाचा’ हा बाबूजींच्या सांगीतिक कारकिर्दीविषयीचा पहिला गीतकोश २००१ साली बाबूजींच्या हयातीत प्रकाशित झाला होता. आता हा गीतकोश ‘बुकगंगा’ने ई-बुक स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. सध्या २५ टक्के सवलतीच्या दरात हे ई-बुक उपलब्ध आहे.
२००१ साली नितीन पब्लिकेशन्सने हा गीतकोश प्रसिद्ध केला होता. कृष्णराव टेंबे यांच्यासह वसंत वाळुंजकर यांनी त्याचे संपादन केले होते. त्या गीतकोशाला बाबूजींकडून दाद मिळाली होती. तसेच रसिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. तो गीतकोश आता ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’ने ई-बुक स्वरूपात प्रकाशित केला आहे. बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षात बाबूजीप्रेमींसाठी ही एक अनोखी भेट ठरणार आहे.
या पुस्तकात बाबूजींची सांगीतिक कारकीर्द उलगडण्यात आली आहे. संगीतकार व गायक (मराठी व हिंदी चित्रपटगीते, भावगीते व इतर गीते); संगीतकार (मराठी व हिंदी चित्रपटगीते, भावगीते व इतर गीते); गायक (मराठी व हिंदी चित्रपटगीते, भावगीते व इतर गीते); आकाशवाणीवर सादर झालेल्या गीत रामायणातील मूळ गायक-गायिका; बाबूजींनी संगीत दिलेल्या चित्रपटांचे वर्ष, गीतकार, गायक-गायिका, त्याची निर्मिती संस्था, निर्माता, दिग्दर्शक, व कलाकार आणि सर्व गाण्यांची अकारविल्हे (अल्फाबेटिकल) सूची अशा पद्धतीने या कोशात माहिती दिली आहे. त्यामुळे ही सूची अभ्यासक, संशोधक, निवेदक यांना उपयुक्त ठरणार आहे.
या कोशामुळे संगीतकार, संगीतकार व गायक व गायक बाबूजींच्या हिंदी, मराठी फिल्मी, गैरफिल्मी सांगीतिक कार्याविषयीची साद्यंत माहिती उपलब्ध झाली आहे. बाबूजींनी संगीत दिलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांची संपूर्ण यादीही यात देण्यात आली आहे. अकारविल्हे गीतसूचीमुळे कोणतेही गीत शोधणे सोयीचे आहे. संशोधक, अभ्यासक, गायक निवेदक व रसिक या सर्वांना हा गीतकोश एक उपयुक्त संदर्भग्रंथ म्हणून संग्रही ठेवता येईल. ई-बुकमुळे तो कमी जागेत सुरक्षितरीत्या ठेवता येईल आणि पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे (मोबाइल, लॅपटॉप) वापरता येईल.
यात बाबूजींचे छोटे जीवनचरित्र, बहुमोल आठवणी अशी माहितीही देण्यात आली आहे. पुस्तकाच्या प्रथमावृत्तीनंतर बाबूजींची आणखी काही गाणी उपलब्ध झाली, तीही परिशिष्टात दिली आहेत.
या गीतकोशाच्या ई-बुकची किंमत २५० रुपये असून, सध्या हे ई-बुक २५ टक्के सवलतीत म्हणजेच १८८ रुपयांत उपलब्ध आहे.
(‘एक धागा सुखाचा’ हे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. बाबूजींबद्दलचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)