Ad will apear here
Next
उत्पल दत्त, जगदीप, भार्गवी चिरमुले, धुमाळ


हिंदी, बंगाली सिनेमातील अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, नाटककार उत्पल दत्त, सूरमा भोपाली या नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेले अभिनेते आणि विनोदवीर जगदीप, मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी आणि चरित्र कलाकार म्हणून ओळखले जाणारे मराठमोळे अभिनेते धुमाळ यांचा २९ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.......
उत्पल दत्त
२९ मार्च १९२९ रोजी उत्पल दत्त यांचा जन्म झाला. उत्पल दत्त हे उच्च दर्जाचे अभिनेते, दिग्दर्शक आणि नाटककार होते. त्यांनी बंगाली आणि हिंदी चित्रपटांवर आपली छाप उमटवली. गंभीरपासून विनोदीपर्यंत प्रत्येक भूमिका त्यांनी अतिशय उत्तमपणे केली. उत्पल दत्त यांचे शेक्सपियर साहित्यावर खूप प्रेम. 

१९४०मध्ये एका थिएटर कंपनीतून अभिनयास सुरुवात केली. थिएटर कंपनीतर्फे अनेक नाटके भारत आणि पाकिस्तानात आयोजित केली. १९५० पासून त्यांची बंगाली चित्रपट कारकीर्द सुरू झाली. अनेक बंगाली नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. १९५० मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधू बोस यांनी माइकल मधुसूदन या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका दिली. उत्पल दत्त यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांतही अभिनय केला आहे. 

त्यांनी अनेक लघुपटातही कामे केली आहेत. गुड्डी, गोलमाल, नरम-गरम, रंग बिरंगी व शौ‌कीन या चित्रपटांत उत्पल दत्त यांनी कमाल केली आहे. त्यांची सर्वांत गाजलेली विनोदी भूमिका ‘गोलमाल’मधील होती. त्यांना त्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. १९६० साली चित्रपट अभिनेत्री शोभा सेन यांच्याशी उत्पल दत्त यांनी विवाह केला. उत्पल दत्त हे मार्क्सवादी नेतेही होते. उत्पल दत्त यांचे निधन १९ ऑगस्ट १९९३ रोजी झाले.
.......


जगदीप
२९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात जगदीप यांचा जन्म झाला. सय्यद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. जगदीप अभिनयास सुरुवात बालकलाकार म्हणून बी. आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बालकलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट - अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरुवात केली. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची मजबूत छाप उमटवली. ‘शोले’ सिनेमातील भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना सूरमा भोपाली म्हणून ओळखण्यात आले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शनदेखील केले. 

जगदीप यांनी मच्छर इन पुराना मंदिर, अंदाज अपना अपना, फिर वही रात, कुर्बानी, शहेनशाह यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. जगदीप यांनी हिंदी सिनेमात अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. अभिनेता जावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांचा दुसरा पुत्र नावेद जाफरी आहे. नावेद व जावेद जाफरी यांनी ‘बुगी वुगी’ची निर्मिती केली आहे. ८ जुलै २०२० रोजी त्यांचा मृत्यू झाला.
..........
भार्गवी चिरमुले
२९ मार्च १९७८ रोजी मुंबईत गिरगावमध्ये भार्गवीचा जन्म झाला. भार्गवी चिरमुलेने मराठी चित्रपट व मालिका यातून आपल्या अभिनयाचा स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे. भार्गवीचे शालेय शिक्षण राजा शिवाजी विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण रूपारेल कॉलेजमध्ये झाले. भार्गवीने भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले आहे. रूपारेल कॉलेजला शिकत असताना नाटकांमधून तिने अभिनय केला. पुढे विश्वविनायक या चित्रपटातून तिला मोठ्या पडद्यावर झळकण्याची प्रथम संधी मिळाली. 

सचिन, महेश कोठारे व अशोक सराफ या सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर आयडियाची कल्पना या चित्रपटातून अभिनय करण्याची संधी तिला मिळाली. भार्गवी नेहमी म्हणते की तिला ‘स्टार’ म्हणून नाही तर एक ‘अभिनेत्री’ म्हणूनच आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे आणि स्वत:ची तशी ओळख निर्माण करण्यात ती यशस्वीदेखील ठरली आहे. कस, वन रुम किचन या चित्रपटांतून गंभीर भूमिका समर्थपणे साकारल्यानंतर ‘फू बाई फू’मधून कॉमेडीही तितक्याच ताकदीने केली आहे. 

हिमालयाची सावली, झोपी गेलेला जागा झाला या नाटकांबरोबरच ओली की सुकी, संदूक, इश्क़वाला लव, सासूचं स्वयंवर, शर्यत, नवरा माझा भवरा, गोळाबेरीज, महागुरू, धागेदोरे यांसारख्या चित्रपटांतून भार्गवीने भूमिका केलेल्या आहेत. स्टारप्रवाह वाहिनीवरील सुवासिनी व स्टारप्लस वाहिनीवरील सिया के राम या मालिकांमधूनही तिने काम केले आहे. 

अभिनयाबरोबरच भार्गवी एक योग-चिकित्सकदेखील आहे. चैत्राली ही तिची बहीणदेखील एक अभिनेत्री आहे.
........


धुमाळ 
२९ मार्च १९१४ रोजी मुंबईत धुमाळ यांचा जन्म झाला. त्यांच्या काळात हिंदीमध्ये भरपूर कामे करणाऱ्या मोजक्या मराठी अभिनेत्यांपैकी एक धुमाळ हे अभिनेते होते. बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शकांना या कलाकाराने दखल घ्यायला लावण्यास भाग पाडले होते.

धुमाळ यांचे पूर्ण नाव अनिल बळवंत धुमाळ. धुमाळ यांचे वडील व्यवसायाने वकील होते. परंतु ते १० वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घरची सर्व जबाबदारी अनिल यांच्यावरच येऊन पडली. त्यामुळे त्यांनी नाटक कंपनीत छोटी मोठी कामे मिळवली. इथे मिळेल ती कामे त्यांनी केली. यातूनच कधीकधी नाटकांतून छोट्या भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली. यातून धुमाळ यांची प्र. के. अत्रे आणि नानासाहेब फाटक या नाट्य क्षेत्रातील दिग्गजांशी ओळख झाली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली. 

पुढे मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीप्रमाणेच त्यांनी हिंदी चित्रपटांतून विनोदी भूमिका गाजवून आपल्या सजग अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटात धुमाळ यांनी मद्रासी संगीत शिक्षकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे ते चित्रपटसृष्टीत नावारूपाला आले. त्यावरून करदार यांनी हिंदीत ‘चाचा चौधरी’ चित्रपट बनवला. तेव्हा धुमाळ यांना तीच भूमिका दिली. ४० ते ८०च्या दशकात त्यांनी आयत्या बिळावर नागोबा, खानदान, अंजाम, बेशरम, कश्मीर की कली, गुमनाम, आरजू, लव्ह इन टोकियो, देवता, हावडा ब्रिज सारखे अनेक मराठी-हिंदी चित्रपट गाजवले. लग्नाची बेडी, घराबाहेर या मराठी नाटकांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. शुभा खोटे, मेहमूद यांच्यासोबत चित्रपटांतून त्यांची छान केमिस्ट्री जुळून आली होती. अनेक चित्रपटांत धुमाळ यांनी शुभा खोटेंच्या वडिलांचा रोल केला होता. 

त्या वेळी त्यांचे कुटुंब चेंबूरला स्थायिक होते. मुंबई ते चेंबूर या प्रवास त्यावेळी खूप बिकट होता. घरी फोन नसल्याने अनेक निर्मात्यांना धुमाळ यांनी आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून त्यांच्या घरी जावे लागत असे. या कारणामुळे बहुतेक चांगल्या भूमिकांपासून ते वंचितदेखील राहिले. परंतु काम मिळावे म्हणून त्यांनी कोणापुढे हात पसरले नाही. राज खोसला, बप्पी सोनी, प्रमोद चक्रवर्ती आणि मराठीतील कमलाकर तोरणे, वसंत जोगळेकर यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी कामे केली. धुमाळ यांचे निधन १४ फेब्रुवारी १९८७ रोजी झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZLWCK
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
पं. प्रभुदेव सरदार, पं. रमेश मिश्र, विलायत खाँ ज्येष्ठ गायक पंडित प्रभुदेव सरदार, प्रख्यात सारंगीवादक पंडित रमेश मिश्र आणि ज्येष्ठ सतारवादक विलायत खाँ यांचा १३ मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
पद्मा गोळे, भक्ती बर्वे, दत्ता मारुलकर मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे, नामवंत अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार आणि संगीत समीक्षक-लेखक दत्ता मारुलकर यांचा १२ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language