Ad will apear here
Next
स्वामी दयानंद सरस्वती
आर्य समाजाचे संस्थापक आणि थोर समाजसुधारक स्वामी दयानंद सरस्वती यांचा ३० ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दलचा हा लेख... 
........
स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म २० सप्टेंबर १८२४ या दिवशी सौराष्ट्रात असणाऱ्या मोरवी संस्थानातील टंकारा या गावी झाला. दयानंदांचे पाळण्यातले नाव मूलशंकर असे होते. वयाच्या पाचव्या वर्षी दयानंदांनी विद्यार्जनारंभ केला. आठव्या वर्षी त्यांची मुंज झाली. बालपण संपण्यापूर्वीच या कुशाग्र बुद्धीच्या मुलाने वेदांचा अभ्यास आरंभ केला. व्याकरण, तर्कशास्त्र आणि साहित्य शास्त्र यांचाही परिचय करून घेतला. व्यासंगामुळे बुद्धीला प्राप्त होणारी प्रगल्भता त्यांच्या वाट्याला तुलनेने लवकर आली. ते अकाली प्रौढ झाले. प्रौढपणी तर ते सर्वज्ञ होतील, अशी चिन्हे दिसू लागली. 

दयानंदांनी केवळ पुस्तकी विद्या घेतली नाही, तर समाजाच्या बांधणीसाठी व राष्ट्राच्या उभारणीसाठी लोकांपुढे एक विधायक कार्यक्रम ठेवला. भारतीयांनी स्वदेशी वस्तू वापराव्यात; स्वदेशी शासनाचा अट्टाहास बाळगावा; स्वधर्माचे रक्षण करावे; शासनव्यवस्थेत विद्वान, चारित्र्यवान आणि आर्थिक पावित्र्याचे तत्त्वपालन करणारी माणसे असावीत; समाज सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांपासून मुक्त व्हावा; कोणी मूर्तिपूजा करू नये; वडा-पिंपळाला भजू नये; भूत, प्रेत, नाग, पीर यांना पूजाविषय करू नये; स्त्रियांनी वेदाध्ययन करावे; प्रसंगी युद्धशास्त्रही शिकावे; शिक्षणाशिवाय समाजाचा उत्कर्ष होणार नाही; पण शिक्षण हे भाडोत्री विद्यालयात देऊ नये. ते आचार्य कुलात किंवा गुरुकुलात द्यावे; निसर्गरम्य आणि निर्मळ वातावरणात मुला-मुलींवर व्रतस्थ जीवनाचा संस्कार करावा; विवाहयोग्य होण्यासाठी मुला-मुलींच्या बाबतीत वयाचे बंधन असावे. मुलीचे वय किमान १७ वर्षे व मुलाचे वय २५ वर्षे असावे, असे विचार त्यांनी मांडले. 

दयानंद यांनी सामाजिक दुष्कृत्ये, अंधश्रद्धा, रूढीवादी व वाईट गोष्टींचा प्रतिकार केला. या सर्वांना त्यांनी विरोध केला म्हणूनच त्यांना संतयुद्ध म्हटले गेले. दयानंद हे दलितांचे समर्थक होते. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जोरदार चळवळ सुरू केली. बालविवाह आणि सती जाण्यास मनाई केली. विधवाविवाहास पाठिंबा दर्शवला. महर्षी दयानंद सर्व धर्मगुरूंना एकाच व्यासपीठावर आणून एकता स्थापित करण्याचा प्रयत्न करीत होते. राष्ट्रीय प्रबोधनाच्या दिशेने त्यांनी सामाजिक क्रांती आणि आध्यात्मिक पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग स्वीकारला. 

महर्षी दयानंद हे केवळ समाजसुधारक आणि धार्मिक पुनर्जागरणाचे प्रणेते नव्हते, तर ते एक महान राष्ट्रवादी आणि राजकीय आदर्शवादी होते. स्वामी दयानंद यांचा आर्य समाजाचे संस्थापक आणि समाज सुधारक म्हणून उल्लेख केला जातो. १८८५ला हरिद्वारमध्ये कुंभमेळा होता. त्यात सामील होण्यासाठी स्वामीजींनी अबू पर्वत येथून हरिद्वारपर्यंत पायी प्रवास केला. वाटेत त्यांनी ठिकठिकाणी उपदेशपर भाषणे केली आणि देशवासीयांची नाडी शोधून काढली. त्यांच्या हे लक्षात आले, की आता ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले आहेत आणि देशाच्या राजकारणासाठी, स्वातंत्र्यासाठी लढा देण्यास उत्सुक आहेत. 

स्वामी दयानंद हरिद्वारला पोहोचले, त्या वेळी ते नानासाहेब, अजीमुल्लाखान, बाळासाहेब, तात्या टोपे आणि बाबू कुवरसिंह या पाच व्यक्तींना भेटले. तेथे फिरंगी सरकारविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे मैदान तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ठरावीक दिवशी संपूर्ण देशात क्रांतीचे रणशिंग एकत्र वाजवले गेले. स्वामीजींनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली अनेक साधूंनी संपूर्ण देशात क्रांतीची जागृती केली. 

स्वामीजींचे सेवक क्रांतिकारकांचे संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असत. त्यांना ते प्रोत्साहन देत आणि गरज पडल्यास ते स्वतः शस्त्र हाती घेत आणि इंग्रजांविरुद्ध लढा देत होते. १८५७च्या क्रांतीच्या संपूर्ण काळात राष्ट्रीय नेते स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सतत संपर्कात होते. 

स्वातंत्र्यलढ्यात झालेल्या अपयशामुळे दयानंद स्वामी निराश झाले नाहीत. केवळ एकदा प्रयत्न करून स्वातंत्र्य मिळू शकत नाही, त्यासाठी संघर्षाची प्रदीर्घ प्रक्रिया पार पाडावी लागेल, त्यासाठी मुक्त संघर्ष अपेक्षित आहे. भारताच्या स्वातंत्र्यात बरेच मौल्यवान बळी जातील, हा स्वामीजींचा अंदाज अचूक ठरला. 

स्वातंत्र्यलढ्यात अपयश आल्यानंतर तात्या टोपे, नानासाहेब आणि इतर राष्ट्रीय नेत्यांनी स्वामीजींची भेट घेतली, तेव्हा त्यांनी ‘निराश होऊ नका, योग्य वेळेची वाट पाहा’ असा सल्ला दिला. 

झंझावाताच्या गतीने आर्यधर्माचा प्रसार करणाऱ्या दयानंदांना अनेक अनुयायी भेटले. राव आणि रंक, स्त्री आणि पुरुष, हरिजन व गिरिजन, विरक्त आणि प्रापंचिक अशी नाना प्रकारची माणसे स्वामींच्या आश्रयास आली. अनेक संस्थानिकांनी त्यांचा अनुग्रह घेतला. अनेक नगरांतून त्यांची व्याख्याने होऊ लागली. त्यांनी घेतलेल्या सत्याचा ध्यास आणि लिहिलेले ‘सत्यार्थप्रकाश’ ही नव्या युगाची नांदी ठरली. त्यांच्या या दिग्विजयाने देशबांधव दिपून गेले. 

पुणे हे संस्कृत विद्येचे माहेरघर! विद्वानांच्या या नगरात स्वामीजींनी ५० व्याख्याने दिली. दिनांक २० जून १८७५ रोजी स्वामीजी पुण्यात आले. त्यानंतर सुमारे तीन महिने ते प्रसंगपरत्वे बोलत राहिले. बुधवार पेठेतील तांबड्या जोगेश्वतरीजवळच्या भिडे वाड्यात स्वामींनी सलग पंधरा व्याख्याने दिली. दिनांक पाच सप्टेंबर १८७५ या दिवशी स्वामीजींच्या सन्मानार्थ भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले अग्रभागी होते. या शोभायात्रेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न काही कर्मठांकडून घडेल, अशी भीती सर्वांना वाटत होती म्हणून न्यायमूर्ती रानडे महात्मा फुले यांना आदल्या दिवशी भेटले व त्यांना मिरवणुकीत सहभागी होण्याची विनंती केली. महात्मा जोतिबा फुले यांच्या तालमीत तयार झालेली तगडी आणि धट्टीकट्टी मुले पाहून सनातनी घाबरले. कोणीही नंतर पुढे आले नाही. 

महाराष्ट्राप्रमाणे पंजाब आणि राजपुताना या प्रांतातही स्वामींनी शास्त्रार्थाच्या सभा घेतल्या व ज्ञानयज्ञ केले. अनेक रजपूत राजे त्यांचे भक्त झाले. त्यांचा कायापालट झाला. हळूहळू ते लक्ष्मीपुत्र आसक्तीकडून विरक्तीकडे व विरक्तीकडून देशभक्तीकडे वळले. हे सामाजिक स्थित्यंतर अनेकांना खपले नाही. जोधपूरचे नरेश जयवंतसिंह हे एक मदिरासक्त व स्वैराचारी राजे होते. त्यांच्या गैरवर्तनाला आवर घालावा म्हणून त्यांचे दोघे बंधू प्रतापसिंह आणि तेजसिंह यांनी स्वामीजींना प्रार्थना केली, की जोधपूर राज्यास त्यांचा चरणस्पर्श घडावा. वातावरण निवळेल, राजा सुधारेल व प्रजा सुखावेल. त्यांचा अंदाज खरा ठरण्याची वेळ आली. एवढ्यात एका महिलेचा मायावीपणा मार्गात आला. जयवंतसिंहांची रखेली नन्ही भगत आणि तिचा कावेबाज गुरू गणेशपुरी हे दोघे महाराजांच्या स्वभावातील बदलामुळे कावरेबावरे झाले. त्यांची भ्रष्टता जगाच्या नजरेस पडेल, अशी भीती त्यांना वाटली. या दोघांनी डाव रचला. स्वामीजींचा आचारी बलदेव यास वश करून घेतले, त्याला मोठे इनाम देऊ केले आणि मोठ्या कुशलतेने स्वामीजींवर विषप्रयोग केला. स्वामीजी या प्रयोगास बळी पडले. 

त्याआधी दोन वेळेला स्वामींना विषबाधा घडली होती. काही योग प्रक्रियांनी शरीर शुद्ध करून त्यांनी मृत्यूला सीमेवरून परतवले होते. या वेळी मात्र स्वामींनी तसे काही केले नाही. दिनांक ३० ऑक्टोबर १८८३. मंगळवारचा दिवस! दिवाळीची आमावस्या! स्वामीजींनी आनंद नावाच्या आपल्या शिष्याला जवळ बोलावले. त्याच्या मस्तकावर हात ठेवून स्वामी म्हणाले, ‘आनंदात राहा.’ नंतर काही वेळ त्यांनी गायत्रीचा जप केला आणि ‘विश्वानी देव’ हा आपला आवडता वेदमंत्र म्हटला. मग थोडा वेळ स्वामींनी ध्यान केले. ध्यान संपले. त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि नंतर स्वामीजी पहुडले. त्यांच्या चिरविश्रांतीचा तो क्षण ठरला. 

स्वामीजी गेले; पण मागे विचारवंतांची, कार्यकर्त्यांची, समाजसेवकांची व राष्ट्रनिष्ठांची मांदियाळी ठेवून गेले. ‘आर्य समाज’ या संकल्पनेचा पुरस्कार करणारे असंख्य आबालवृद्ध स्वामीजींचे पाईक झाले. लाला लजपतराय, लाला मुन्शीराम, लालबहादूरशास्त्री, लाला हंसराज, पंडित श्यामजी कृष्णवर्मा या सर्वांनी स्फूर्ती घेतली ती महर्षी दयानंदांपासून. कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे स्वामीजींचे भक्त व आर्य समाजाचे अभिमानी होते. 

जनसामान्यांना स्फूर्ती देण्याचे काम स्वामीजींनी देहत्यागानंतरही केले. रझाकारांनी मराठवाड्यातील गावेच्या गावे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पायबंद घालण्याचा पराक्रम केला तो दयानंदांच्या दूतांनी. ‘भारताच्या बौद्धिक आणि नैतिक विकसनात दयानंद यांचा मोठा वाटा होता.’ श्री. अरविंद दयानंदांना ‘मंत्रदाता ऋषी’ म्हणत. लोकमान्यांनी दयानंदांचा उल्लेख ‘स्वराज्याचे पहिले संदेशवाहक व मानवतेचे महान उपासक’ या शब्दांत केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असे म्हटले आहे, की ‘सत्यार्थप्रकाश हा अमर ग्रंथ आहे.’ 

डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपल्या एका भाषणात हे स्पष्ट केले होते, की भारताच्या राज्यघटनेत सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यवस्था दयानंदांच्या उपदेशातून स्फुरलेल्या आहेत. 

निकटतम व्यक्तीच्या निधनाने अंतर्मुख झालेले दयानंद आजन्म अमरत्वाचा शोध घेत राहिले. जीवनाला लागलेले ग्रहण सुटावे म्हणून त्यांनी योगसाधना केली, अखंड तपश्चर्या केली. आपल्या साधनेने ते अजरामर झाले. कृतार्थ जीवनाच्या शेवटी येणारे मरण हे अमरपणाचेच एक रूप असते, हे जगाला कळले ते महर्षींमुळेच. 

अशा या थोर स्वामी दयानंद सरस्वती यांना विनम्र अभिवादन.


- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर

(इतिहास अभ्यासक, पुणे)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XWFXCR
Similar Posts
शिवपत्नी महाराणी सईबाई पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
लोककल्याणकारी राजे सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे लोककल्याणकारी महाराज सयाजीराव गायकवाड यांचा सहा फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडिक स्वराज्य उभारण्याच्या कामी ज्या असंख्य वीरांनी पराक्रम गाजविला, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडिक. २९ सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दल ही माहिती...
जिवाजी महाले स्वराज्याची धुरा ज्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन वेळप्रसंगी मृत्यूलाही जे सामोरे गेले, अशा अनेक मावळ्यांच्या कर्तृत्वातून शिवरायांनी भूमिपुत्रांचे स्वराज्य उभे केले. त्यापैकीच एक वीर योद्धा म्हणजे शूरवीर जिवाजी महाले होय. नऊ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन. .....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language