Ad will apear here
Next
महेंद्र कपूर, पं. सत्यशील देशपांडे, फरहान अख्तर, फराह खान
महान गायक महेंद्र कपूर, ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं. सत्यशील देशपांडे, बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर, अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक फराह खान आणि लेखक, दिग्दर्शक सय्यद अली रझा यांचा नऊ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
.......
महेंद्र कपूर
नऊ जानेवारी १९३४ रोजी महेंद्र कपूर यांचा जन्म झाला. मनोज कुमार यांच्या ‘उपकार’ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्र्यदिनी अन्‌ प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं ‘मेरे देश की धरती...’ हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने.

महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला; पण त्यांना या व्यवसायात रुची नव्हती, तर गीत-संगीताकडे त्यांचा ओढा होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले, तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. शालेय स्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद, तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. ‘मदमस्त’ या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.

गीत, गझल, भजन, कव्वालीसारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अनेक अभिनेत्यांना त्यांनी आवाज दिला. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना संधी कमी मिळाली. एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. बी. आर. चोप्रा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते दिली. चोप्रा यांची धूल का फूल, वक्त, हमराज, धुँध यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले. उपकार, पूरब और पश्चिम, क्रांती यांसारखे मनोज कुमार यांचे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. ‘मेरे देश की धरती’ या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे.

हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. ‘अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान’ हे त्यांनी गायलेलं गाणं प्रसिद्ध आहे. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत राष्ट्रीय पुरस्कार, तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. मिळाले. २७ सप्टेंबर २००८ रोजी त्यांचे निधन झाले.
..........
पं. सत्यशील देशपांडे
नऊ जानेवारी १९५१ रोजी पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म झाला. शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं. सत्यशील देशपांडे यांचे गुरू! लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढ्याच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वर्ज्य स्वराला हळुवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले.

विशेष म्हणजे, कुमारजींप्रमाणेच पं. सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायन केले, त्याच तन्मयतेने त्यांनी लेकीन किंवा विजेता अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाउंडेशनसाठी पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत असा एक तुकडा तयार केला होता.

संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू. शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसून अनुभवण्याचादेखील विषय आहे हे पं. सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जिवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरू कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करून दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे. कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदीश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहिती आहे. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवूनच नाही, तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजूनही तो चालूच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकीने चांगले होते ही सौंदर्यदृष्टीसुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करून त्या आत्मसात केल्यात. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक अभ्यास करणं त्यांना शक्य झालंय. उच्च व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.

तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं. सत्यशील देशपांडे यांचे शिष्य. कौशल इनामदार आपल्या गुरूबद्दल सांगताना म्हणतात, ‘गुरू अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही, तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं, की तुमचे खड्डे तुम्ही खणा! थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्यासारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरू आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरू पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो. कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली, तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात, ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं, की प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरू म्हणजे वाटाड्या नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरूचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. १६हून अधिक वर्षे मी त्यांच्याकडे शिकतोय; पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरू होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे. ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गायले. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली. त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय. त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्या! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे.’
.........
फरहान अख्तर
नऊ जानेवारी १९७४ रोजी फरहान अख्तरचा जन्म झाला. सुप्रसिद्ध पटकथालेखक, गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा अशी फरहान अख्तरची ओळख करून देणे म्हणजे त्याच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. ‘दिल चाहता है’ या पहिल्याच चित्रपटाने त्याने आपल्या आगमनाची द्वाही फिरवली. २००१मध्ये आलेल्या या चित्रपटाने अवघ्या तरुणाईला वेड लावले. त्यातील गाणी, तरुणांची जगण्याची पद्धत, त्यांच्या फॅशन यांचे मोठ्या प्रमाणात अनुकरण झाले आणि फरहान अख्तरचे नाव देशभरातील तरुणाईच्या तोंडावर आले. वेग व वेळेला त्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आले. तरुणांची मानसिकता, त्यांच्या अंतर्मनात चालणारी वादळे, आधुनिकतेच्या रेट्यात होणारी संस्कृतीची गोची, त्यातून होणारी घुसमट, या सगळ्यांमुळे निर्माण झालेली जनरेशन गॅप, हे सगळं टिपून ते फरहानने ‘दिल चाहता है’मध्ये दाखवलं. तोपर्यंतचे चित्रपट केवळ वरवरचा बदल दाखवत होते. फरहानने याच्या आत घुसून ते विश्व लोकांपुढे आणलं.

चाळिशीतील विधवेच्या प्रेमात पडणारा तरुण ही एरव्ही अशक्यप्राय वाटणारी कल्पना त्याने त्यात दाखवली. विशेष म्हणजे ती पाहणाऱ्यांनाही खटकली नाही. अन्यथा चित्रपट एवढा चाललाच नसता. पहिलाच चित्रपट असूनही फरहानने दाखवलेली समज त्याच्यातील विचारी दिग्दर्शकाची ओळख करून देणारी आहे. त्याच्या ‘लक्ष्य’ या चित्रपटात त्याने आयुष्यात ध्येयाची जाणीव नसल्याने आळशीपणाने व्यर्थ जीवन घालणाऱ्या तरुणास ध्येयाची जाणीव झाल्यानंतर ते साध्य करतानापर्यंतचा प्रवास दाखविला आहे. त्यानंतर शाहरूख खानला घेऊन केलेला ‘डॉन’ या चित्रपटाचा रिमेकही त्याच्या वेगळेपणाने गाजला. एकूणात फरहान अख्तर हा वेगळ्या वाटेचा प्रवासी आहे. त्याने आपल्या वेगळ्या हाताळणीने ठसा उमटविला आहे. त्यामुळे भविष्यात या सर्जनशील दिग्दर्शकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
......
फराह खान
नऊ जानेवारी १९६५ रोजी फराह खानचा जन्म झाला. तिने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले असून, चार चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील केले आहे. २०१२ सालच्या ‘शिरीन फरहाद की तो निकल पडी’ ह्या चित्रपटामध्ये तिने नायिकेची भूमिका केली होती.
......
सय्यद अली रझा
नऊ जानेवारी १९२५ रोजी सय्यद अली रझा यांचा जन्म झाला. आन, अंदाज, मदर इंडिया, रेश्मा और शेरा, राजा जानी आणि दस नंबरी यांसारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. १९६८मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संवादलेखक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७५मध्ये त्यांनी ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. उडनखटोला, बरसात, दीदार, अमर, आन, राजधानी, शम्मा, पूजा के फूल, मेरे मेहबूब या चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्री निम्मीशी त्यांचे लग्न झाले होते. सय्यद अली रझा यांचे एक नोव्हेंबर २००७ रोजी निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZTTCI
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language