Ad will apear here
Next
बिटवीन द लाइन्स


चंद्रमोहन कुलकर्णी या कलाकाराला नेमकं कोणतं विशेषण द्यावं (म्हणजे त्याच्या कलेचं बिनचूक वर्णन करणारं) हे कोडं मला त्याची ओळख झाल्यापासूनच्या गेल्या २५ वर्षांत उलगडलेलं नाही. अर्थ एकच, की ह्या गृहस्थाची कला ही कुठल्याही प्रकारच्या वर्णनात बसणारी नाहीये किंवा तिचं वर्णन करायची माझी कुवत नाहीये! मग मी आपलं त्याच्याशी साध्या सोप्या ‘काय आर्टिस्ट’ या संबोधनाने बोलतो!

माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने, माझा संगीत, चित्रकला, नाट्य, सिनेमा, लेखक अश्या सगळ्या प्रकारच्या कलाकारांशी नियमित संबंध येतो. बहुतेक कलाकार हे ‘फास्ट फूड’ - ऑर्डरप्रमाणे काम करून देणारे असतात. चंद्रमोहनशी मात्र कधीही कामाचं बोलायचं असेल, तर अतिशय जपून बोलावं लागतं. कारण सरळ ‘नाही जमणार’ असं उत्तर यायची शक्यता असते! (बऱ्याच प्रकाशकांना याचा अनुभव असणारच आहे!)

एकदा एका टीव्ही चॅनेलचा लोगो मला त्याच्याकडून डिझाइन करून घ्यायचा होता.

‘मी एकच करून देईन’ – चंद्रमोहन.

‘अरे लोकांना थोडे तरी ऑप्शन्स द्यायला पाहिजेत ना?’ - माझ्या विनवण्या.

दुसऱ्या दिवशी मेलवर या महाभागाने १४ लोगो करून पाठवले आणि मला फोन केला, ‘तुला ऑप्शन्स पाहिजेत ना? घे. शेवटी एक डालडाचा डबापण करून पाठवलाय! बहुतेक तोच वापरशील!’

इतक्या वर्षांनंतर आता मला या संवादांची सवय झाली आहे!

कित्येक वर्षे अत्यंत सजगपणे, अगदी व्यावसायिक कामसुद्धा, त्यात स्वतःचा ठसा ठेवूनच करणारा हा कलाकार निराळा आहे!

त्याची कला गेली कित्येक वर्षे जवळून बघतोय. त्या निर्मितीच्या बाबतीत मला खूप कुतूहलही नेहमीच असतं. त्याचं कुठलंही चित्र इतकं नैसर्गिक कंपोझिशन, रेषा, रंग घेऊन कसं अवतरतं? ‘बिटवीन द लाइन्स’ या पुस्तकातून चंद्रमोहनने माझ्यासारख्या त्याच्या कलेच्या बऱ्याच चाहत्यांच्या उत्सुकतेला त्या बाबतीत प्रत्यक्ष काहीही न लिहिता बरीच उत्तरं दिलेली आहेत. हे पुस्तक वाचताना जागोजागी जयवंत दळवींच्या ‘आत्मचरित्राऐवजी’ची आठवण होते. एका अर्थानी हे चंद्रमोहनचे आत्मचरित्रच आहे; पण त्याच बरोबर ते त्याने पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या जगातल्या अनेक ‘नमुन्यां’चे ही चित्रण आहे.

अगदी लहानपणापासून त्याला भेटलेली माणसे, काही विशेष जाणीव असण्याचं वय नसतानासुद्धा त्याला समजत होती. त्या वेळचं फारसं न फोफावलेलं पुणं, मध्यमवर्गीय घरातले संस्कार, लहानपणातले काही कडू-गोड अनुभव, तिथून एकदम ‘अभिनव’सारख्या ‘रिबेल’ कॉलेजात (हो रिबेलच - आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी इतर कॉलेजं होती!) प्रवेश घेतल्यानंतर त्या तरुण वयात बदललेल्या जाणिवा आणि नंतरच्या कला जीवनातल्या आयुष्यात अनेक खऱ्या अर्थानी मोठ्या असलेल्या कलाकारांच्या जवळच्या सहवासाने अतिशय जाणीवपूर्वक समृद्ध करून घेतलेलं स्वतःच पुढचं आयुष्य, अशा अनेक पातळ्यांवरचा चंद्रमोहन आपल्याला या त्याच्या पुस्तकात भेटतो!

गमतीचा भाग म्हणजे यात त्याने जाणीवपूर्वक अनेक थेट नामोल्लेख टाळलेत; पण मीही शनिवार पेठेत राहणारा असल्याने त्या बहुतेक सगळ्या व्यक्ती परिचयाच्या होत्या किंवा आहेत! भैयासाहेब, त्याचे मित्र, शिक्षक, रेगे सर, कॅप्टन रो, शिंदे अशा अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध व्यक्ती किंवा पुलं, शांताबाई, शर्वरीराय चौधरी, ग्रेस यांच्यासारख्या मोठ्या माणसांबद्दलचे त्याचे अनुभव अफाट आहेत; पण त्याच्या लेखनात कुठलेही लेबल न लावता ह्या व्यक्ती ‘माणसे’ म्हणून आपल्याला भेटतात.
मला नेहमी वाटतं, की कलाकाराच्या आयुष्यात त्याला जगाचा अनुभव जितका जास्त येतो तितकी त्याची कला श्रीमंत होत जाते. चंद्रमोहन त्याच्या कलेच्या बाबतीत खरोखर फार श्रीमंत आहे. त्याची पेंटिंग्स असतील, शिल्पं असतील किंवा लेखन असेल हे सगळं एकप्रकारचं पूर्णत्व घेऊन येतं.

अनेक कलाकारांना मी न थकता विचारत असतो, की ‘तुमची निर्मिती नेमकी होते कशी?’ फार कमी कलाकार याचं समाधानकारक उत्तर देऊ शकतात. काही वर्षांपूर्वी एका अशाच महान कलाकाराची मुलाखत मी घेतली होती. त्या वेळी चंद्रमोहन माझ्याबरोबर होता. हाच प्रश्न मी अनेक वेळा निरनिराळ्या पद्धतीने त्यांना विचारला; पण त्यांना ही निर्मितीची प्रक्रिया काही सांगता येईना! तेव्हा शेवटी त्यांनी ‘ह्यालाच कदाचित प्रतिभा म्हणत असावेत’ असं चांगलं; पण मोघम उत्तर दिलं होतं.

‘बिटवीन द लाइन्स’ या पुस्तकामधून चंद्रमोहनने काही अंशी ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या कलेच्या बाबतीत दिलं आहे. जो प्रयत्न करेल त्याला ते सापडेल; पण त्या उत्तराचा बराचसा भाग आणि माझ्यासारख्या त्याच्या कलाप्रेमींची खूप मोठी उत्सुकता अजूनही शिल्लक आहे. कदाचित आणखीन काही वर्षांनी त्याच्याच एखाद्या नव्या पुस्तकात या उत्सुकतेचं पूर्ण समाधान होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही!

(P. S. याच पुस्तकात आमच्या दोघांच्या, डायरेक्ट वॉल्ट डिस्नेला खुन्नस देणाऱ्या, पण फसलेल्या एका प्रयोगाची गोष्टपण आहे!!)

- संजय दाबके


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZVJJCT
Similar Posts
कोचीनचा सर्वोत्कृष्ट विमानतळ काल कोचीनला होतो. पहिल्यांदाच तिथे गेलो होतो. भारतातल्या बहुतेक विमानतळांवर (अगदी छोट्यासुद्धा) आतापर्यंत प्रवास झाला आहे. सगळे विमानतळ हे एकाच साच्यातले आहेत. तशाच गोल शेड्स आणि काचेचे स्ट्रक्चर. तशाच लिफ्ट्स, तसेच एस्केलेटर, तशीच रंगसंगती. हल्ली विमानतळाचे बरेचसे भाग प्री-फॅब्रिकेटेड मिळत असणार, म्हणून जगभरचे विमानतळ एकसारखेच दिसतात
देवाची खुर्ची! मी हितेनदांना विचारलं, की ही एकच खुर्ची अशी का? ते म्हणाले, की ‘वो अन्नासाब की कुर्सी है.’ मी १००० व्होल्टचा शॉक बसल्यासारखा तिथून उठलोच. पुढे अनेक वेळा तिथे मिक्सिंग केलं; पण जाणीवपूर्वक लक्ष ठेवून पुन्हा तिथे बसायची हिंमत कधीही केली नाही! देवाची खुर्ची ती!
लंडनच्या आजीबाई ‘बेळगाव, निपाणी, कारवार आणि लंडनसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालाच पाहिजे अशी घोषणा आता द्यायला हरकत नाही,’ असे आचार्य अत्रे ह्यांनी एकदा गमतीने म्हटले होते.
हरित द्वीपाचा राजा नुकत्याच होऊन गेलेल्या बालदिनी सकाळी सकाळी पं. नेहरूंची अनेक भाषणं वाचली. लिखाणाची महत्त्वाची कामं आटोपली आणि मग ‘मनोविकास’निर्मित ‘हरित द्वीपाचा राजा’ हे सुनील गंगोपाध्याय या प्रख्यात बंगाली लेखकाचं पुस्तक वाचायला घेतलं.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language