Ad will apear here
Next
गंगाधर गाडगीळ, बी. रघुनाथ
...‘नवकथेचे अध्वर्यू’ मानले जाणारे विद्वान लेखक गंगाधर गाडगीळ आणि परभणीसारख्या ठिकाणी राहून निजामी राजवटीतल्या वेगळ्या कथांमधून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवणारे बी. रघुनाथ यांचा २५ ऑगस्ट हा जन्मदिन. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मधून त्यांचा अल्प परिचय.....  
..........................
गंगाधर गाडगीळ

२५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबईत जन्मलेले गंगाधर गाडगीळ हे लेखक, विचारवंत, अर्थशास्त्राचे प्राध्यापक, कुशल प्रशासक, नामवंत आर्थिक सल्लागार, उत्तम समीक्षक असे अनेकविध पैलू असणारं अत्यंत विद्वान व्यक्तिमत्त्व. त्यांनी जवळजवळ पन्नास वर्षं नवकथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, विनोदी कथा, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींसंबंधी टिप्पणी असं चतुरस्र लेखन सातत्यानं केलं होतं.

त्यांच्या वयाच्या १८व्या वर्षीच त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती आणि नंतर पुढे पन्नास वर्षं ते लिहिते राहिले. मराठीमध्ये नवकथेचा प्रवाह आणण्याचा मान गोखले, भावे, माडगूळकर यांच्या बरोबरीनं गाडगीळ यांच्याकडे जातो. त्यांना ‘नवकथेचे अध्वर्यू’च मानलं जातं. १९८१ साली रायपूरमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना साहित्य अकादमी, तसंच जनस्थान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

अमृत, आठवण, ऊन आणि पाऊस, कडू आणि गोड, काजवा असे २३ कथासंग्रह, दुर्दम्य, मन्वंतर यांसारख्या सहा कादंबऱ्या, गोपुरांच्या प्रदेशात, साता समुद्रापलीकडे अशी सहा प्रवासवर्णनं, रहस्य आणि तरुणी, मुले चोर पकडतात अशी सहा नाटकं आणि खडक आणि पाणी, पाण्यावरची अक्षरे यांसारखे सात समीक्षा ग्रंथ, मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र आणि याखेरीज इतर चाळीसेक कथा अशी विपुल आणि लोकप्रिय साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. त्यांचं बंडू हे पात्र आणि त्याच्या कथा हे उत्तम विनोदाचे नमुने आहेत.

१५ सप्टेंबर २००८ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं.   
......................
भगवान रघुनाथ कुलकर्णी

२५ ऑगस्ट १९१३ रोजी सातोनासारख्या एका खेड्यात कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात भगवान रघुनाथ कुलकर्णी उर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म झाला. परभणीमध्ये आयुष्यभर कारकुनी करत असताना, त्यांनी अतिशय सुंदर कविता केल्या, वास्तववादी कथा लिहिल्या आणि प्रत्ययकारी कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांच्या सात कादंबऱ्या, सुमारे दीडशेहून अधिक कविता आणि अनेक ललित निबंध प्रसिद्ध आहेत.

ते अवघे ४० वर्षंच जगले; पण त्या अल्पायुष्यात त्यांनी मराठवाड्यामधलं निजामी राजवटीतलं जीवन आपल्या प्रत्ययकारी शैलीत लोकांसमोर मांडलं. ते फडके आणि खांडेकर यांचे समकालीन होते. स्वतःची ओळख ते कथाकार म्हणूनच करून देत असत.

आलाप आणि विलाप, पुन्हा नभाच्या लाल कडा, साकी, फकीराची कांबळी, छागल, काळी राधा, आकाश, अलकेचा प्रवासी, हिरवे गुलाब, बाबू दडके, उत्पात, म्हणे लढाई संपली, जगाला कळलं पाहिजे, आडगावचे चौधरी असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

सात सप्टेंबर १९५३ रोजी त्यांचं निधन झालं.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZBJBF
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language