Ad will apear here
Next
हवी नवी पेरणी...
‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ हा वाद नेहमीच चर्चिला जातो. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘ज्ञानासाठी कला’ हा वेगळा विचार लोकांपुढे ठेवला. त्या दृष्टीनं बोधी नाट्य परिषदही त्यांनी सुरू केली. त्या माध्यमातून नव्या विचारांची पेरणी सुरू आहे. आपल्या या प्रयत्नांबद्दल त्यांनी ‘रंगवाचा’मध्ये लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
............
मराठी वाङ्मयाच्या प्रांगणात पाय ठेवला तेव्हापासून ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ हा वाद नेहमीच कानावर पडत आला, आजही पडतो; पण मी पूर्ण दुर्लक्ष करीत आलो आणि या वादातील फोलपणा लक्षात येताच ‘ज्ञानासाठी कला’ (आर्ट फॉर नॉलेज) हे नवं तंत्र वाङ्मयकारांसमोर ठेवलं. ...आणि हे सूत्र रुजलं पाहिजे, तर काही एक काम करणं आवश्यक होतं. त्यासाठी नवतरुणांना हाताशी घेऊन एक नाट्यसंस्था स्थापन करणं गरजेचं होतं. अशोक हंडोरे, राज बाळदकर, डॉ. सुरेश मेश्राम आणि मी - आम्ही ‘बोधी नाट्य परिषद’ स्थापन केली, २२ नोव्हेंबर २००३ रोजी कल्याणला डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या उपस्थितीत.

संस्था स्थापन करणं सोपं; पण ती कार्यरत ठेवणं मोठं जिकिरीचं; पण इच्छा तिथं मार्ग... नवे नाटककार घडवण्याचं उद्दिष्ट मनाशी धरून (सत्यदेव दुबे किंवा पुण्यातल्या थिएटर अॅकॅडमीनं उत्तम प्रकारे पार पाडल्याचं आपण जाणतोच) पहिली ‘बोधी नाट्यलेखन कार्यशाळा’ मुंबईत, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत घेतली. हे शक्य झालं केवळ डॉ. जब्बार पटेल यांच्यामुळं. 

अकादमीची सुरुवातच या कार्यशाळेनं झाली. १० आणि ११ एप्रिल २००४ असे दोन दिवस ही कार्यशाळा झाली. कार्यशाळेचं उद्घाटन करायला सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे आणि नाटकं वाचणारे - प्रा. दत्ता भगत (औरंगाबाद), डॉ. भगवान ठाकूर (धुळे), अशोक हंडोरे (कल्याण), भि. शि. शिंदे (पुणे), उर्मिला पवार, रूपेश आनंद, प्रेमानंद गज्वी (मुंबई) आणि चर्चेला तज्ज्ञ - नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी, डॉ. कुमार अनिल, डॉ. विजयकुमार माहुरे, चारुशीला ओक, रवींद्र पाथरे, गिरीश पतके, विजय केंकरे, सुलभा देशपांडे, नीलकंठ कदम, शफाअत खान, डॉ. हेमू अधिकारी, डॉ. सुरेश मेश्राम, डॉ. जब्बार पटेल.

पहिलीच कार्यशाळा उत्तम तऱ्हेनं पार पडली आणि या कार्यशाळेचं फलित म्हणजे ‘काळोखाची लेक’ हे नाटक ‘शुद्ध बीजापोटी’ या नावानं व्यावसायिक रंगभूमीवर आलं. यात प्रमुख भूमिका केली होती गिरीश ओक यांनी. एका दिवसात सलग सहा प्रयोग असा अपूर्व विक्रम या नाटकानं केला. ‘भारतीय रंगभूमी’ या संस्थेचं हे पहिलंच पदार्पण रंगभूमीवरचं. दिग्दर्शक होते राम दौंड नि लेखक मी स्वत:. ही नोंद करण्याचं कारण म्हणजे पहिल्याच कार्यशाळेचं यश; पण हे नाटक व्यावसायिक गणितातलं नव्हतं. हल्ली प्रयोगशील नाटकं सादर करायला थिएटरच नाही. परिणामी व्यावसायिक नाटकासाठी असलेली थिएटर्सच वापरावी लागतात. अ. भा. मराठी नाट्य परिषदेनं प्रायोगिक नाटकांसाठी थिएटर बांधावं म्हणून दामू केंकरे, विजय तेंडुलकर आदींच्या बरोबर आम्ही निदर्शनं केली होती मुंबईत, यशवंत थिएटरवर; पण अजूनही १०-१२ वर्षे उलटून गेली तरी प्रायोगिक नाटकांसाठी थिएटर बांधावं याचा दूरवर मागमूस नाही आणि तरीही मराठी रंगभूमीवर नवी प्रयोगशील नाटकं लिहिली जात आहेत. त्यामुळंच १६-१७ फेब्रुवारी २०१३पर्यंत केवळ नऊ वर्षांच्या काळात बोधी नाट्य परिषद पंचवीस बोधी नाट्यलेखक कार्यशाळा घेऊ शकली.

‘बोधी’ नाट्यलेखन कार्यशाळा घेते म्हणजे काय करते? वृत्तपत्रातून आवाहन करते. नव्यानं लेखन करणाऱ्यांकडून संहिता मागवते. तिचं तज्ज्ञ वाचन करतात. किमान नाट्यगुण असणारी संहिता कार्यशाळेसाठी निवडली जाते. कार्यशाळा दोन दिवसांची असते. चार नाटकं वाचली जातात. वाचन स्वतः लेखकानं करायचं असतं. मग निमंत्रित तज्ज्ञ त्या नाट्यसंहितेतील गुण-दोषांवर चर्चा करतात. लेखक वाटलंच तर आपल्या संहितेत सुधारणा करू शकतो. पुढं निवडक अशा पाच नाटकांचा ‘बोधी नाट्यमहोत्सव’ संपन्न होतो. नव्या नाटककाराला एक ‘प्लॅटफार्म’ उपलब्ध होतो, जो त्या नाटककाराला पुढच्या प्रवासाला उपकारक ठरतो.

पंचवीस कार्यशाळांतून १२१ नवीन नाट्यसंहिता वाचल्या गेल्या आणि पाच नाट्यमहोत्सवांतून २५ नवी नाटकं सादर झाली. या नव्या नाटककारांना प्रोत्साहन म्हणून ‘अश्वघोष बोधी नाट्यलेखन’ पुरस्कारही दिला जातो. प्रा. सिद्धार्थ तांबे (जाता नाही नाही), वामन तावडे (माऊली), स्वप्नील गांगुर्डे (कॅनव्हास), आशुतोष पोतदार (एफ १-१०५) यांना पुरस्कार दिलेले आहेत. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या या रौप्यमहोत्सवी नाट्यमहोत्सवात सादर होणारं ‘एफ १-१०५’ हे नाटक बोधी रौप्यमहोत्सवी कार्यशाळेत वाचलं गेलेलं आहेच; पण या नाटकाला २० ते २४ मे २०१३ या कालावधीत महाराष्ट्र कला अकादमीत झालेल्या पाचव्या बोधी नाट्यमहोत्सवात ‘अश्वघोष बोधी नाट्यलेखन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. असे पुरस्कार कला आणि कलावंताच्या विकासासाठी आवश्यकच असतात.

महाराष्ट्राच्या विविध भागांत ‘बोधी’नं नाट्यलेखन कार्यशाळा घेतल्या. मुंबईबरोबरच ‘कल्चरल असोसिएशन’च्या मदतीनं नांदेड, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सहकार्यानं पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सहयोगानं औरंगाबाद, प्रज्ञा प्रबोधिनीच्या मदतीनं नाशिक, विदर्भ साहित्य संघाच्या सहकार्यानं नागपूर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं रत्नागिरी अशा कितीतरी ठिकाणी आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सहकार्यानं कणकवली येथे. तिचं सारं श्रेय वामन पंडित यांचं.

कणकवलीची कार्यशाळा अकरावी होती आणि विशेष होती. स्त्री नाटककारांसाठी होती. मराठी रंगभूमीवर ‘स्त्री’ नाटककारांची वानवा नेहमीच राहिली आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रात काव्यकार, कथाकार, कादंबरीकार यांच्यात चार-चारच्या जोड्या लावण्याची सवय नाही; पण नाटककारांच्या जोड्या लावण्याची मात्र आहे... उदा. कानेटकर, पुलं, दळवी, तेंडुलकर... यांच्या मागील काळात जा किंवा पुढील काळत जा.. जोड्यांत एकाही ‘स्त्री’ नाटककाराचा समावेश केला जात नाही. स्त्री नाटककाराच नाहीत किंवा उल्लेख करावा एवढं नाट्यकर्तृत्व नाही आणि हीच स्थिती लक्षात घेऊन स्त्री नाटककारांची कार्यशाळा २७-२८ ऑक्टोबर २००७ अशी दोन दिवस झाली. सर्व स्त्री लेखिका कोकणातीलच होत्या. उषा परब, प्रा. प्रगती नाईक-अमृते, प्रज्ञा राणे, कल्पना बांदेकर, सुजाता आचरेकर. कार्यक्रमाचं उद्घाटन केलं भाई बेळेकर यांनी आणि चर्चेला तज्ज्ञ होते गिरीश पतके, रवींद्र पाथरे, अजय कांडर, जयवंत देसाई, अरुण मिरजकर, वामन पंडित, डॉ. सुरेश मेश्राम, अशोक हंडोरे आदी.

चर्चेतून एक-दोन सूत्रं हाती आली. ‘स्त्री’ मुळातच नाट्यलेखन करताना विषयानुसार अनुभव घेऊन तो व्यक्त करण्यात कमी पडते आणि याचं कारण अनुभव घेण्यासाठी लागणारं मुक्त वातावरण तिला नाही. ही मर्यादा अर्थातच सामाजिक असते. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अनुभव स्त्री मुक्तपणे घेऊ शकत नाही. शहरी स्त्री घेऊ शकते; पण त्यालाही मर्यादा पडतात. गुंड मवाली-भाग किंवा वेश्यांची वस्ती... नाही फिरू शकत ती मुक्तपणे.

आणखी एक गोष्ट कळली. कोकण म्हणजे दशावतारी लोककलेची जन्मभूमी. या दशावतारात संकासुर वेद पळवतो व समुद्राच्या तळाशी जाऊन लपतो; पण हा संकासुर हे का करतो, हेच मुळी इथल्या दशावतार सादर करणाऱ्यांना माहीत नव्हतं. वेदांविषयी संकासुराला शंका होती म्हणून... बहुजनांना ते वाचण्याची बंदी होती म्हणून... की नेमकं काय लिहिलं आहे, हे वाचण्याची इच्छा झाली म्हणून? शेवटी समुद्राच्या तळाशी लपून बसलेल्या संकासुराशी विष्णू युद्ध करतो. वेद परत मिळवतो आणि ब्रह्मदेवाकडे देतो. मुद्दा असा, की लोककला सादर करणारे कलेतून जे सादर करतात ते का नि कशासाठी हेच मुळी माहीत नसतं. ‘पीएचडी’चा प्रबंध लिहिणाऱ्यांनादेखील हे नीटसं माहीत नसतं, अशीही चर्चा त्या कार्यशाळेत झाली होती.

कला कुठलीही असो, ती आपण का नि कशासाठी करतो, हे संबंधित कलावंतांना नीटपणे माहीत असणं गरजेचं आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचं किंवा प्रबोधनाचं साधन नाही, तर आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं माध्यमही आहे आणि म्हणून नाट्यलेखन करणं हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे आणि ती जबाबदारी काय नि कशी पेलावी याचं ज्ञान अशा कार्यशाळांमधून अपेक्षित असतं.

बोधी नाट्यलेखन कार्यशाळा... बोधी म्हणजे ज्ञान-(नॉलेज) पण नुसतं ज्ञान नाही तर साधक ज्ञान...जगण्याच्या कसोटीला उतरणारं ज्ञान. बोधी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत... जाणीव, समजूत, बुद्धी, ग्रह, सर्वज्ञता, स्पष्टीकरण, विशदीकरण, उपदेश, सूचना, जागृती, प्रज्ञा, करुणा.

‘बोधी’... वाङ्मयाचे तीन प्रकार मानते... रंजनात्मक वाङ्मय, प्रयोगशील वाङ्मय, बोधी वाङ्मय. वाङ्मयानं रंजनशरणता स्वीकारू नये असं आमचं मत असलं, तरी जगातील वाङ्मयकार (नाटक हे वाङ्मयाचाच एक घटक आहे) थोडंच ऐकणार आहेत. आजवर रंजनपर वाङ्मयाचीच चलती राहिली आहे. पुढंही राहणार. नाटक हे मनोरंजनाचं मोठं साधन मानलं गेलंय. म्हणून तर विनोदी नाटकं भरमसाट संख्येने रंगभूमीवर येत असतात.

प्रयोगशील वाङ्मयाची तऱ्हा थोडी वेगळी आहे. लेखनात विविध प्रयोग हे या वाङ्मयप्रकाराचं वैशिष्ट्य. कधी भाषेचा प्रयोग तर कधी रचनेचा... वाचकाला, प्रेक्षकाला कळो वा न कळो... मात्र वाङ्मयात नवनवे प्रयोग करणं गरजेचं असतं. अर्थात आशयाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे घेऊन जाणारे हे प्रयोग असतील तर या वाङ्मयाचं महत्त्व. बोधी वाङ्मयानं वाचणाऱ्याला/पाहणाऱ्याला ज्ञान दिलं पाहिजेच; पण जगणं सुखकर करण्याचे सर्व मार्ग उलगडून दाखवले पाहिजेत. माणूस दु:खमुक्त होईल आणि जगणं सुंदर होईल असं ज्ञान (बोधी) माणसाला दिलं पाहिजे. काळ नित्य बदलतो आहे. काल, आज नसतो नि आज, उद्या नसतो. प्रत्येक दिवस, नव्हे, प्रत्येक क्षण नवा. त्या प्रत्येक नव्या क्षणात माणूस नवाच असला पाहिजे. कदाचित आपल्या बुद्धिमत्तेनं तो काळाच्याही पुढं असला पाहिजे. तरच भविष्यातील प्रश्नांची सोडवणूक माणसाला करता येईल.

कविता, कथा, कादंबरी वा नाटक हे सगळे प्रकार शब्दप्रधान आहेत. त्यामुळं त्यांना ‘शब्दकला’देखील म्हणता येईल. कवितेविषयी काव्यकाराला... कथेविषयी कथाकाराला... कादंबरीविषयी कादंबरीकाराला नि नाटकाविषयी नाटककाराला ‘त्या त्या’ कलेविषयीची नीट जाण असणं गरजेचं असतं; पण नाटक हा वेगळा ‘घाट’ असल्यामुळं अनेक घटकांची माहिती नाटक लिहिणाऱ्याला असावी लागते.

नाटक ही इतर कलांच्या आश्रयानं जगणारी कला आहे, असं मानलं जातं नि वरवर पाहता ते खरंही वाटतं; पण आम्ही तसं मानत नाही. खरं तर नाट्यकला जगातील सर्व कलांना आपल्या हृदयात स्थान देते. कविता, कथा, कादंबरी या साऱ्या प्रकारांना नाट्यकला स्वत:त असं काही बेमालूम समाविष्ट करून घेते, की नाटकात कथा असते, कादंबरीचा विशाल आवाका असतो नि संवादातून प्रकटत राहते काव्यात्मकता. शिवाय नेपथ्य म्हणजे स्थापत्यकला, प्रकाशकला, संगीतकला, रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, दिग्दर्शन असे अनेक घटक. शिवाय नृत्यकला, शिल्पकला, चित्रकला यांचं भान असेल तर परिपूर्ण नाटककार व्हायला साहाय्यच होईल.

नाटककार कोणाला म्हणावं/मानावं हा एक प्रश्न आहेच. नाट्यसंहितेत पात्रांची नावं लिहून कंसात दिग्दर्शकानं काय करावं अशा सूचना देणाऱ्याला, की चमकदार, चटकदार संवादाची फोडणी देऊन मनसोक्त मनोरंजनी मन रिझवणाऱ्याला, की बोजड अनाकलनीय मेंदू शिणवणाऱ्याला? चाललंय ते चालू द्या, असं मानणाऱ्यांनी नाटक लिहितो तो नाटककार असं मानल्यामुळं नाटककार होणंच मारलं गेलंय. परिणामी नाटककार होणंच कुणी मनावर घेत नाही. ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ या भ्रमवादामुळं आणि ‘ज्ञानासाठी कला’ हे मूल्यच जीवनातून हद्दपार केल्यामुळं नाटक/नाटककारांना अवकळा आलेली आहे. भ्रमवाद आणि अवकळा असं आम्ही जे म्हणालो ते अनेकांना रुचणार नि पचणार नाही, हे आम्ही जाणून आहोत; पण जे सतत नवं काही करू पाहतात त्यांना आमचं म्हणणं योग्यच वाटेल.

कलावाद्यांच्या मते, ‘प्रश्न मांडा - उपाय सुचवू नका’ नि जीवनवादी म्हणणार, ‘नुसते प्रश्न नको. उपाय सुचवा’; पण घराला आग लागली असताना कलावादी सूत्रानुसार, ‘आग लागली, आग लागली’ असं ओरडणार नि जीवनवादी सूत्रानुसार, ‘आग विझवा. आग विझवा’ असं सांगणार! अरे पण आग कशी विझवायची घराला आग लागली आहे हे कलेनं सांगितलं पाहिजेच; पण पाणी मारा नि ती विझवा हे सांगून ती कशी विझवावी हेही सांगितलं पाहिजे. आग लागली. पाणीही आहे; पण ती आग कशी विझवावी याचंच ज्ञान नसेल तर...? कला सर्वार्थानं ज्ञानपूर्ण असली पाहिजे.

जीवन प्रवाही आहे. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं! पारदर्शी! कला कुणाचीही बटीक नसते आणि बटीक असते ती कला नसते आणि म्हणूनच ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ यात काहीही अर्थ नसतो. कारण कला कलेसाठीही नसते नि नसते जीवनासाठीही. तर ती असते ज्ञानासाठी. ज्ञानात्मक कलाच कलेची नि जीवनाची वृद्धी करीत असतात.

नाटक सादर करीत असताना भरतानं नाट्यशास्त्रात अभिनय करण्यासाठी चार घटक महत्त्वाचे मानले आहेत. कायिक, वाचिक, आहार्य, सात्त्विक. त्यामुळे नाट्यशास्त्राचा अभ्यास करताना या चार घटकांविषयी सांगितलं जातं; पण आणखी एक घटक आहे पाचवा... तो कुणालाच माहीत नसल्यामुळे कुणी शिकवतच नाही. हा पाचवा घटक असतो नाट्याशयात आणि तो असतो.... तात्त्विक.

नाटक किंवा कुठलीही वाङ्मयीन कलाकृती उभी असते तात्त्विक पायावर. तात्त्विक पाया नसेल तर ती कलाकृती पोकळ असते आणि म्हणूनच कलाकृतीतील तात्त्विकतेचा विचार प्रथम केला पाहिजे. कलाकृतीतील तात्त्विकता उपकारक की अपकारक हेही तपासून पाहायला हवे. अपकारक तत्त्व असणारी कलाकृती बाद ठरवायला हवी. खरं म्हणजे ती आपोआपच बाद ठरते.

आणखी एक - अभिनय करणाऱ्या नटाविषयी म्हटलं जातं की, ‘You are the instrument and you are the player.’  म्हणजे वाद्यही तूच आहेस नि वाजवणाराही तूच. अर्थात साधनही तूच नि साधकही तूच आणि हे सिद्ध व्हायचं तर नट हा ‘Athlete philosopher’ हवा. अॅथलीट म्हणजे ऑलिंपिकमधला कसरतपटू नव्हे, तर तो नट वर निर्देशित केलेल्या कायिक, वाचिक, आहार्य, सात्त्विक नि कलाकृतीच्या आशयात दडलेला तात्त्विक... हे पाचही घटक लीलया पेलू शकला पाहिजे. तो ते पेलू शकला, की मगच तो भूमिकेतील सात्त्विकता नि तात्त्विकता सिद्ध करू शकेल आणि हे सिद्ध व्हायचं तर तो नट नुसता ‘अॅथलीट’ असून उपयोगाचा नाही, तर तो तत्त्वचिंतकही (Philosopher) हवा, असं म्हटलं आहे.

आणि हे खरं असेल तर एखाद्या नाटकातील एखादी भूमिका, जी सत्त्व आणि तत्त्वानं परिपूर्ण आहे आणि रंगमंचावर साकार करणारा तो नट अॅथलीट फिलॉसॉफर हवा असेल, तर मग संपूर्ण नाटक लिहिणारा... विविध भूमिकांसह... शिवाय नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, तर खरेच पण दिग्दर्शकीय सूचनांसह Pause (विराम) सूचित करणारा लेखक कोणत्या गुणांनी युक्त हवा? अगदी उघड आहे. तो तत्त्वचिंतकच (Philosopher) हवा आणि तो तत्त्वचिंतकही मानवाचं, समाजाचं, राष्ट्राचंच नव्हे, तर जगाचं समग्र भान ठेवून मेंदू-मेंदूत साचलेली कुरूपता नष्ट करून मानवी मेंदू सुंदर करण्याच्या ध्यासानं झपाटलेला हवा. एकुणात हे जग सुंदर करण्याच्या ध्यासानं झपाटलेला तत्त्वचिंतक चिंतातुर जंतू हवा. खरं तर नाट्यकलाच का... सर्वच कलेतील वाङ्मयकारांसह स्थापत्यकार, शिल्पकार, चित्रकार, नृत्यकार, संगीतकार, सारेच तत्त्वचिंतक चिंतातुर जंतू हवेत. तरच कलेतील अंगीभूत सात्त्विकता आणि तात्त्विकता कलेच्या ठायी आविष्कृत होईल.

वरील सर्व गोष्टी नव्या नाट्यलेखकांना... रंगकर्मींना शिकवल्या/ सांगितल्या पाहिजेत. बोधी नाट्यलेखन कार्याशाळांमधून हा प्रयत्न होत असतो. पेरणी सुरू आहे... पेरणी सुरूच असली पाहिजे... शेत बोधिपीकानं (ज्ञानपीक) बहरून येईपर्यंत...हे जग सुंदर होईपर्यंत...

- प्रेमानंद गज्वी
(लेखक ज्येष्ठ नाटककार आहेत.)
..................
रंगवाचा त्रैमासिक
हा लेख ‘रंगवाचा’ या केवळ रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या फेब्रुवारी २०१७च्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘रंगवाचा’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. रंगभूमीशी संबंधित वैविध्यपूर्ण विषय या अंकात समाविष्ट असतात. एक हजार रुपये भरून या अंकाचे आजीव पालक होता येते. 

संपर्क : वामन पंडित, संपादक (रंगवाचा) - ९४२२० ५४७४४. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZLVCH
Similar Posts
दशावतार आणि यक्षगान दशावतार आणि यक्षगान या दोन्हीही लोककला आहेत; मात्र कर्नाटकातील यक्षगान ही कला जोपासण्यासाठी, बहरण्यासाठी जितके अभ्यासपूर्ण प्रयत्न झाले, तितके महाराष्ट्रातील दशावताराच्या बाबतीत फारसे झालेले नाहीत. या दोन्ही कलांच्या गुणवैशिष्ट्यांचा आढावा घेणारा आणि दशावताराच्या भविष्याबद्दल चिंतन करणारा हा ‘रंगवाचा’मधील लेख
मराठी टिकवण्यासाठी एवढं करू याच! आज मराठी राजभाषा दिन सर्वत्र उत्साहात साजरा होतो आहे. त्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छांचे संदेश पाठवले जात आहेत. फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर तर अशा संदेशांना इतका ऊत आला आहे, की ते पाहिल्यावर मातृभाषेच्या प्रेमानं ऊर अगदी भरूनच यावा. भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीनं हा शुभसंकेतच म्हणायला हवा
ग. दि. माडगूळकर ‘अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव; बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी, ‘मम प्रीति आहे जडली तुजवर राणी’ अशी अत्यंत तरल हळुवार प्रेमभावना आपल्या ‘जोगिया’ या विलक्षण कवितेतून मांडणारे आणि जणू साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले महाराष्ट्राचे अत्यंत महान कवी आणि गीतकार गजानन दिगंबर माडगूळकर यांचा १४ डिसेंबर रोजी स्मृतिदिन
पर्ल बक, शंकर रामाणी, कमलाबाई टिळक साहित्याचं नोबेल मिळवणारी पहिली अमेरिकन लेखिका पर्ल बक, गोव्याच्या मातीतले कवी शंकर रामाणी आणि कथाकार कमलाबाई टिळक यांचा २६ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language