Ad will apear here
Next
विशिष्ट व्याख्येत बसण्याचे स्त्रियांनी स्वतःच नाकारले पाहिजे
प्रतिभावंत अभिनेत्री, संवेदनशील लेखिका नंदिता दास यांचे प्रतिपादन

पुणे : ‘स्त्रीला रंगरूपाच्या, सौंदर्याच्या आणि अन्य घटकांच्या विशिष्ट व्याख्येत बसवले जाते. आपण समाजाच्या सौंदर्याच्या व्याख्येत बसत नाही, या न्यूनगंडामुळे अनेक स्त्रिया आपल्यातील कौशल्ये, सुप्त गुण यांकडे दुर्लक्ष करतात. जोपर्यंत स्त्री यातून बाहेर पडून, या ठरावीक व्याख्येत स्वतःला बसवण्याचे नाकारत नाही, तोपर्यंत समाजही ती संधी देणार नाही. ज्या वेळी स्त्री स्वतः या व्याख्येत बसण्याचे नाकारील, त्या वेळी आपोआप समाज तिला त्यात बसवणे सोडून देईल. अशा विचाराच्या स्त्रियांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यांनी एकमेकींना ताकद दिली पाहिजे. त्यातून सामूहिक ताकद निर्माण होईल आणि बदल घडेल,’ असे प्रतिपादन प्रतिभावंत अभिनेत्री, संवेदनशील लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या नंदिता दास यांनी केले.

‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचा तिसावा वाढदिवस १७ ऑगस्ट रोजी पुण्यात झाला. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांना विविध विषयांवर बोलते केले.

‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या प्रकाशनप्रसंगी तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सोनाली दळवी, सरीता आवाड, आशा बर्वे,संपादिका गीताली वि. म., सुनील सुकथनकर, नंदिता दास आणि संस्थापिका विद्या बाळ.

कोथरूडमधील बालशिक्षण शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘मिळून साऱ्याजणी’च्या ताज्या अंकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन झाले. ‘मिळून साऱ्याजणी’च्या पहिल्या अर्थात ऑगस्ट १९८९पासूनच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन करण्याचे काम ‘बुकगंगा डॉट कॉम’ने हाती घेतले आहे. डिसेंबर १९९७पर्यंतच्या अंकांच्या ई-बुकचे अनावरण या कार्यक्रमात करण्यात आले. पुढील सर्व अंकही लवकरच ई-बुक स्वरूपात उपलब्ध होणार असून, हे सर्व अंक मोफत वाचता येणार आहेत. (डाउनलोड लिंक शेवटी दिली आहे.) सरिता आवाड यांनी लिहिलेल्या ‘हमरस्ता नाकारताना’ या पुस्तकाचेही प्रकाशन या वेळी झाले. (हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘मिळून साऱ्याजणी’च्या ई-बुकचे प्रकाशन करताना ‘बुकगंगा’चे  मंदार जोगळेकर, सुप्रिया लिमये, सोनाली दळवी, गीताली वि. म., सुनील सुकथनकर, नंदिता दास आणि विद्या बाळ.

‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या संस्थापिका विद्या बाळ, संपादिका गीताली वि. म., तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सोनाली दळवी, ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये व गौरी बापट यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

विद्या बाळ
‘‘मिळून साऱ्याजणी’च्या वाटचालीचा आनंद!’
‘तंत्रज्ञानाचा वेग आणि उपलब्धता यांमुळे अनेक कामे खूप सोपी झाली आहेत. ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकदेखील तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि ‘बुकगंगा’चे मंदार जोगळेकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. पुण्या-मुंबईपर्यंत मर्यादित न राहता ‘मिळून साऱ्याजणी’ने अगदी दिल्लीपर्यंत धडक मारली आहे. तीस वर्षे अखंडपणे अंक निघत राहिला आहे, याचा खूप आनंद आणि समाधान आहे,’ अशा शब्दांत संस्थापिका विद्या बाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे. बाजारकेंद्री व्यवस्था सर्वत्र वेढून राहिली आहे. जग जवळ आले आहे; पण माणसांमधील संवाद तुटत चालला आहे. या पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याची गरज आहे. समविचारी लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे,’ अशी गरजही विद्या बाळ यांनी व्यक्त केली. सरिता आवाड आणि सोनाली दळवी यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. 

नंदिता दास यांनी मुलाखतीदरम्यान विविध मुद्द्यांवर मांडलेली मते :

स्त्रीवाद अर्थात फेमिनिझम म्हणजे...
स्त्रीवादाबद्दल बोलताना नंदिता दास म्हणाल्या, ‘फेमिनिझम अर्थात स्त्रीवादाची व्याख्या प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने वेगवेगळी करू शकतो; पण समानतेकडे, माणूसपणाकडे टाकले जाणारे एक पुढचे पाऊल म्हणजे स्त्रीवाद आहे, असे मला वाटते. जेव्हा सर्वत्र समानता येईल, तेव्हा स्त्रीवादाची व्याख्या निश्चित करता येईल. प्रत्येकाने स्त्रीवादाची आपली व्याख्या ठरवली पाहिजे. एखाद्या स्त्रीने स्त्री म्हणून नाकारली जाणारी गोष्ट साध्य केली, तर तिचा आत्मविश्वास वाढेल, ती आणखी काही गोष्टींसाठी, हक्कांसाठी संघर्ष करील. त्यामुळे साध्य बदलत जाईल, तसतशी समानतेची व्याख्या बदलत जाईल. एकच एक व्याख्या निश्चित केली, तर त्यानुसार वागू शकणाऱ्या स्त्रिया आत्मविश्वास गमावण्याचा धोका आहे.’ 

‘आजही मी कॉलेजात व्याख्यानासाठी गेले तर मुली विचारतात, की ‘मी जीन्स का घालू शकत नाही? आई-वडिलांना कसे समजावू?’ इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचे स्वातंत्र्य, आत्मविश्वास अडकला आहे. हळूहळू यात बदल होईल. स्त्रीला एका काळात कैद करून चालणार नाही. बदलाची प्रक्रिया निरंतर चालणारी आहे, असे मला वाटते,’ असे त्या म्हणाल्या.

‘रंगरूप, लग्न आणि मुले म्हणजे स्त्री’ अशी व्याख्या केली जाते, याबाबतही त्यांनी ठाम मत व्यक्त केले. ‘आपण स्त्री आहोत, हे हा समाज कधी विसरूच देत नाही. सौंदर्याला इतके महत्त्व दिले जात असल्यामुळे अनेक मुली आपला आत्मविश्वास गमावून बसतात. जोपर्यंत स्त्री यातून बाहेर पडून, या ठरावीक व्याख्येत स्वतःला बसवण्याचे नाकारत नाही, तोपर्यंत समाजही ती संधी देणार नाही,’ असे त्या म्हणाल्या. 

‘कशा प्रकारचा समाज आपण निर्माण करतोय?’
‘आज समाजात सामूहिक हिंसेच्या घटना वरचेवर घडत आहेत. गौरी लंकेश, कलबुर्गी, डॉ. दाभोळकर यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्येनंतरही आपण रोजचे सामान्य आयुष्य जगत आहोत. काहीही करू शकत नाही. भीती, असुरक्षिततेसह रोजचे आयुष्य जगणे हे त्रासदायक आहे. यातून कशा प्रकारचा समाज आपण निर्माण करत आहोत? जिथे लोकांना मारणाऱ्यांना काही बोलले जात नाही; मात्र प्रेम करणाऱ्याला रोखले जात आहे,’ असा सवाल दास यांनी उपस्थित केला. 

‘समूह म्हणून आपण कसे वागतो, याचा विचार हवा’
‘खरे तर आता डावे-उजवे असे काही राहिलेले नाही. एखाद्या विशिष्ट समाजाचा भाग असणे याचा विसर पडू दिला जात नाही. मी स्त्री आहे, हे मला विसरता येत नाही. सामूहिक हिंसा करणारे वैयक्तिक पातळीवर उत्तमपणे नाती जोपासत असतील कदाचित; पण समूह म्हणून आपण असे का वागतो, याचा विचार त्यांच्या मनामध्ये सुरू झाला पाहिजे. उदारमतवादी म्हणून आपल्याच विचारी लोकांचा वर्ग करून जगणे योग्य नाही. स्वत:ला उदारमतवादी म्हणत असलो, तरी आपणही किती परंपरावादी आहोत याचाही विचार केला पाहिजे,’ असे मत दास यांनी मांडले.

‘इतिहासाच्या आडून सद्यस्थितीवर बोलण्यासाठी चित्रपट काढले’
‘सफदर हाश्मी यांचा खून झाला, तेव्हा लेखक, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक असे समाजाच्या सर्व स्तरांतील लोक रस्त्यावर उतरले; पण आजकाल तसे दिसत नाही. त्यामुळे इतिहासाच्या आडून आजच्या परिस्थितीवर बोलता येईल असे वाटून ‘मंटो’ आणि ‘फिराक’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली. मंटो यांना केवळ धर्माच्या आधारावर पाकिस्तानात जावे लागले. ते आजच्या काळातही लागू होत आहे. धर्म, भाषा अशी वेगवेगळ्या प्रकारची आपली ओळख असते; पण जेव्हा तुम्हाला एकच ओळख घेऊन, त्या ओळखीचा एक तर अभिमान बाळगा किंवा त्याची शरम माना, असे जगण्यासाठी दबाव आणला जातो, जी ओळख आपण कधीच मानली नाही, तीच आपल्यावर लादली जाते, तेव्हा खूप त्रास होतो. हे सगळे मांडण्यासाठी या चित्रपटांची निर्मिती केली,’ अशा शब्दांत दास यांनी आपली भूमिका मांडली.

‘माझ्यासाठी भूमिकेपेक्षा कथा महत्त्वाची’
‘माझ्यासाठी माझ्या भूमिकेपेक्षा चित्रपटाची कथा महत्त्वाची आहे. प्रत्येक कथा काही तरी सांगते. त्यामुळे दमदार संहिता असलेल्या चित्रपटांमधील वेगवेगळ्या भूमिका करण्यावर मी भर दिला. अभिनय येत असेल तर कोणतीही भूमिका करता आली पाहिजे यापेक्षा चित्रपटाची कथा काय सांगते हे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे माझ्या वाट्याला एकसारख्या भूमिका आल्या असल्या, तरी कथा चांगल्या असलेले सर्व चित्रपट मी केले. असे चित्रपट करणे ही माझ्यासाठी एक प्रकारची चळवळ आहे,’ असे दास यांनी सांगितले. 

‘व्यावसायिक चित्रपटांच्या चित्रीकरणावेळी असणारी असमानता आणि वेगळी वागणूक त्रासदायक असते. त्यामुळे मी व्यावसायिक चित्रपट फार कमी केले,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. 

‘कलम ३७०बद्दल स्थानिकांशी चर्चा करायला हवी होती’
‘काश्मीरमधील ३७० कलम हा खूप किचकट मुद्दा आहे. कलम ३७० हटवल्यामुळे आपल्या दिल्ली, पुण्या-मुंबईतील लोकांच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही; पण ज्या लोकांच्या आयुष्यात  फरक पडणार आहे, त्यांच्याशी चर्चा न करताच हा निर्णय घेण्यात आला, ही लोकशाही नाही,’ असे दास म्हणाल्या.

‘उरी चित्रपट पाहिला नाही’
‘आजकाल पुरस्कार कोणत्या चित्रपटांना मिळतात हे सर्वांनाच माहिती आहे; पण उरी चित्रपटालाही पुरस्कार मिळाला, तो नक्कीच चांगला चित्रपट असेल; पण मी अजून तो बघितलेला नाही,’ अशी टिप्पणी नंदिता दास यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान केली.

(‘मिळून साऱ्याजणी’चे ऑगस्ट १९८९पासून डिसेंबर १९९७पर्यंतचे सर्व अंक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. १९९८पासून आतापर्यंतचे अंकही लवकरच ई-बुक स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. )

(
‘मिळून साऱ्याजणी’च्या वेगळ्या मुखपृष्ठांची विद्या बाळ यांनी सांगितलेली गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(नंदिता दास यांच्या मुलाखतीचा काही भाग पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZTNCD
Similar Posts
‘मिळून साऱ्याजणी’च्या वेगळ्या मुखपृष्ठांची कहाणी... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका विद्या बाळ यांचं ३० जानेवारी २०२० रोजी निधन झालं. स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. ‘मिळून साऱ्याजणी’ हे त्यांनी चालविलेलं मासिक हा त्याच कार्याचा एक भाग होता. या
आधुनिक माध्यमे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पूरक पुणे : ‘माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला आपल्या भावना, मते समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचवायला आवडते. आधुनिक काळात इंटरनेटच्या साह्याने चालणाऱ्या विविध माध्यमांद्वारे कोणत्याही अभिव्यक्ती संकोचाविना आपल्या भावना, मते, विचार एका क्षणात जगभरात पोहोचवणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाचा हा आविष्कार म्हणजे
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे
गजेंद्र अहिरे यांचा हिंदी कवितासंग्रह लवकरच; ‘बुकगंगा’तर्फे होणार प्रकाशित पुणे : संवेदनशील दिग्दर्शक म्हणून परिचित असलेले गजेंद्र अहिरे हे उत्तम लेखक, कवी, गीतकारही आहेत. त्यांनी लिहिलेल्या हिंदी कविता, गझल यांचे ‘आधा पागल’ हे पुस्तक ‘बुकगंगा’तर्फे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language