Ad will apear here
Next
गीता बाली, मृणालिनी साराभाई, व्लादिमीर लेनिन
हिंदी चित्रपटातील जुन्या काळातील अभिनेत्री गीता बाली, प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई आणि रशियातील क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा २१ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
..........
गीता बाली
१९३० साली गीता बाली यांचा जन्म झाला. गीता बाली यांचे नाव हरकीर्तन कौर. त्यांनी वयाच्या १२व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५०च्या दशकात त्या स्टारसुद्धा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत शम्मी कपूर यांचेही नाव होते. १९५५मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपल्या घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भीती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते. परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 

शम्मी कपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यासोबत काम केले होते. राज कपूर यांच्यासोबत त्या ‘बांवरे नैन’ आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत ‘आनंदमठ’ सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सुनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता बाली यांनी शम्मी कपूर यांच्यासोबत लग्न केल्यानंतरही सिनेमांत काम चालू ठेवले. गीता बाली यांचे भगवान यांच्यासोबतचे खूप चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा सिनेमा १९६३मध्ये आलेला ‘जब से तुमको देखा है’ हा होता. बोनी कपूर, अनिल कपूर व संजय कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर गीता बाली यांचे सेक्रेटरी होते. गीता बाली यांचे २१ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.
............


मृणालिनी साराभाई
११ मे १९१८ रोजी मृणालिनी साराभाई यांचा जन्म झाला. भरतनाट्यमला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या ‘कलाक्षेत्र’ने चेन्नईतून केले होते, तर दाक्षिणात्य अभिजात नृत्यप्रकारांना वर्तमानाचे भान देण्याचे मोठे काम मृणालिनी साराभाई यांनी केले. मृणालिनी साराभाई यांचा जन्म चेन्नईतील प्रतिष्ठित स्वामिनाथन कुटुंबात झाला. मीनाक्षी सुंदरम पिल्लै यांच्याकडून भरतनाट्यम्, ताकाळी कुंचु कुरुप यांच्याकडून कथकली आणि कल्याणीकुट्टी अम्मन यांच्याकडून मोहिनीअट्टम शिकल्यावर त्या शांतिनिकेतनात शिकल्या आणि त्याही आधी वयाच्या १२-१३व्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये बॅलेचेही धडे त्यांनी गिरवले होते. 

अंतराळशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या पत्नी म्हणून त्या १९४२ला अहमदाबादेत आल्या. हे घराणे कापड उद्योगात स्थिरावलेले आणि गांधीजींच्या चळवळीत रस घेणारे, तर मृणालिनी स्वामिनाथन यांचे वडील बॅरिस्टर, आई स्वातंत्र्यसैनिक आणि सख्खी बहीण कॅप्टन लक्ष्मी सहगल! आझाद हिंद फौजेतील ‘कॅप्टन लक्ष्मीं’प्रमाणे धाकट्या मृणालिनी रणरागिणी नव्हत्या; पण नृत्यातून मानवमुक्तीची लढाई त्या अखेरपर्यंत लढल्या. 

नृत्यनाट्ये भारतात आधीही केली जात, आनंदशंकर तर त्यासाठी प्रसिद्धच होते; मात्र पौराणिक वा भावुक कथांवर आधारित नृत्यनाट्यांना सामाजिक जाणीव दिली ती मृणालिनी यांनी. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या नृत्यनाट्यांत दिसतो. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण देऊन गौरव केला. 

त्यांना १९९४ साली संगीत नाटक अकादमीची फेलोशिप व अनेक देशी-विदेशी सन्मान मिळाले. त्यांनी दर्पण अकादमी स्थापली. मल्लिका साराभाई ही त्यांची कन्या. मृमालिनी साराभाई यांचे जगभरात १८ हजारांवर शिष्य आहेत. त्यांनी ३००पेक्षा जास्त नृत्य-नाट्यांत नृत्यदिग्दर्शन केले. मृणालिनी साराभाई यांचे २१ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.
......
व्लादिमीर लेनिन
२२ एप्रिल १८७० रोजी वोल्गा नदीच्या काठी वसलेल्या सिम्ब्रिस्क शहरात व्लादिमीर लेनिन यांचा जन्म झाला. रशियाच नव्हे तर जगाच्या इतिहासात लेनिन यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. जागतिक राजकारणाला त्यांनी एक नवा रंग दिला. रशियाला क्रांतीचा मार्ग दाखवून सत्तेपर्यंत पोहोचवण्यात व्लादिमीर लेनिन यांचा सिंहाचा वाटा होता. व्लादिमीर इलीइच उल्यानोव हे त्यांचे खरे नाव होते. व्लादिमीर इलीइच उल्यानोव नंतर जगभरात लेनिन नावाने प्रसिद्ध झाले. सोव्हिएत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोव्हिएत सोशालिस्ट बोल्शेविक पार्टीचे (नंतरच्या सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. लेनिन कुशाग्र बुद्धिमत्तेचे साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात अतुलनीय व नेत्रदीपक आहे.

त्यांचे वडील इल्या निकोलायेविच उल्यानोव्ह हे आधी शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते. नंतर ते शाळा तपासनीस झाले, तर आई मारिया अलेक्सांद्रोव्हना या एका सुविद्य घराण्यातील होत्या. लेनिन सहा भावंडांतील तिसरे अपत्य होते. उल्यानोव्ह कुटुंब सुसंस्कृत, सुखी कुटुंब म्हणून परिचित होते. इल्या निकोलायेविच यांना खूप मान होता. तत्कालीन उमराव वर्गात त्यांची गणना होत होती. लेनिनच्या बालपणीचा काळ आरामात गेला. इतर भावंडांप्रमाणेच लेनिनही हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात होते. शिक्षणातील शेवटच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. 
१८८६ साली वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांचे दिवस पालटले. १८८७मध्ये त्सार (मराठी झार) तिसरा अलेक्सांद्र याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून लेनिन यांचा मोठा भाऊ अलेक्सांद्र याला फाशीची शिक्षा झाली आणि मोठी बहीण अॅना हिला तुरुंगवासाची शिक्षा झाली. या घटनेचा मोठा आघात लेनिनवर झाला.

शालेय शिक्षणानंतर लेनिन कायदा व अर्थशास्त्र शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दाखल झाले; पण तेथील मुलांनी लेनिनच्या भावाच्या फाशीविरोधात केलेल्या निदर्शनाच्या आरोपामुळे लेनिनसह ४५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून लेनिनकडे पाहण्यात येऊ लागले. त्यामुळे इतर विद्यापीठांतही लेनिन यांना प्रवेश नाकारण्यात आला. वयाच्या १८व्या वर्षी लेनिन आपल्या आई आणि भावंडांसह समारा येथे राहिले.

समारा येथील वास्तव्यात लेनिन यांना पुस्तके मिळवून वाचून काढण्याचा नाद लागला. याच काळात कार्ल मार्क्स यांचे दास कपिताल वाचण्यात आल्याने समाजवादच रशियाच्या समस्यांवर तोडगा असल्याचे त्यांचे मत झाले. कायदा, तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, सामाजिक व राजकीय समस्या, मार्क्सवाद अशा विविध विषयांवर चौफेर वाचन आणि प्रभावी भाषणशैली यामुळे लेनिन समाजवादी गटाचे प्रमुख कार्यकर्ते बनले. दुसरीकडे लेनिन यांच्या आईच्या प्रयत्नांमुळे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून परीक्षा देण्याची मुभा लेनिन यांना देण्यात आली. चार वर्षांचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करीत लेनिन ही परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे हे लेनिन यांचे ध्येयच बनले. त्यांनी समाजवादाचा प्रसार करण्यास सुरुवात केली. आपल्या समर्थनासाठी समविचारी लोकांच्या शोधात लेनिन काही महिने युरोपमध्ये इतरत्र राहिले. १८९३पासून त्यांनी लेखनास आरंभ केला. हळूहळू त्यांचे लेख जहाल होऊ लागले. १८९५मध्ये लेनिन रशियात परतल्यावर एक वृत्तपत्र काढण्याचे व त्याचे गुप्तपणे वाटप करण्याचे त्यांनी ठरविले. 

जेमतेम पहिला अंक निघाला आणि गुप्तहेरांनी लेनिन यांना अटक केली. लेनिनवर राजद्रोहाचे आरोप ठेवण्यात आल्याने त्यांना १८९७ साली सायबेरियात तीन वर्षांच्या शिक्षेसाठी पाठविण्यात आले. त्या काळी सायबेरियाची शिक्षा जुलमाची नव्हती. लेनिन यांनी या काळात भरपूर वाचन, लेखन केले व अन्य कैद्यांशी चर्चा करण्यात वेळ घालविला. १८९८ साली लेनिन यांची जुनी सहकारी नादेझ्दा कृपस्काया हिलाही सायबेरियात शिक्षेसाठी पाठविण्यात आले. लेनिन यांनी नादेझ्दाशी तेथेच विवाह केला. सायबेरियात असतांनाच लेनिन यांनी रशियातील भांडवलशाहीचा विकास नावाचा ग्रंथ लिहिला. 
शिक्षा संपल्यानंतर लेनिन यांनी रशियाबाहेर राहण्याचे ठरविले. रशियाच्या बाहेर राहून एखादे वृत्तपत्र काढून त्याचे वाटप गुप्तपणे व प्रभावीपणे व्हावे असे लेनिन यांना वाटत होते. त्याप्रमाणे डिसेंबर १९००मध्ये सुप्रसिद्ध इस्क्रा (रशियन - ठिणगी) नावाचे नियतकालिक लेनिन यांनी सुरू केले. यामुळे समाजवादी गटात लेनिनचे महत्त्व वाढतच गेले. मार्क्सवादाला जोड देत आणि त्यात सुधारणा करत लेनिन यांनी लेनिनवादावर पुस्तक लिहिले. १९०३ साली रशियन सोशल डेमोक्रेटिक पक्षाचे दुसरे अधिवेशन लंडन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात लेनिन आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षातील ज्येष्ठ नेते प्लेखानोव्ह, मार्तोव्ह यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्यामुळे पक्षात फूट पडली. लेनिन यांना पाठिंबा देणारे बहुमतवाले बोल्शेविक, तर उरलेले अल्पमतवाले मेन्शेविक म्हणून ओळखले जाऊ लागले. तेव्हा आपला पक्ष कडक शिस्तीने चालवावा असे आदेश लेनिन यांनी आपल्या पाठिराख्यांना दिले. 

१९०५ साली लेनिन रशियात परतले. त्याच वर्षी त्सारने ऑक्टोबर घोषणा करून जनतेच्या काही मागण्यांना मान्यता दिली. लेनिनसारख्या नेत्यांना रशियात राहणे कठीण जात असल्याने त्यांनी १९०६ साली रशिया पुन्हा सोडले. १९०६ ते एप्रिल १९१७ या काळात लेनिन रशियाबाहेरच राहिले. १९१७ साली समाजवाद्यांनी २४-२५ ऑक्टोबरला क्रांती घडवून आणली. त्या क्रांतीचे मुख्य नेते लेनिन होते. इतिहासात या क्रांतीस ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते. मार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले. क्रांती घडवून आणली, त्सारला संपविले. नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित केली. नव्या सरकारचे कामकाज कसे असावे याची रूपरेषा आखली. 

लेनिन यांनी १९१७ आणि १९१८मध्ये रशियन प्रजासत्ताकाचे अध्यक्षपद, १९१८ ते १९२४ या काळात रशियन सोव्हिएत फेडरेटिव्ह सोशलिस्ट रिपब्लिकचे अध्यक्षपद आणि १९२२ ते १९२४ या काळात सोव्हिएत युनियनचे अध्यक्षपद भूषविले. लेनिन यांना मार्च १९२२मध्ये पहिल्यांदा पक्षाघाताचा झटका आला. यातून सावरत असतानाच त्यांना डिसेंबरमध्ये दुसरा झटका आला. यामुळे लेनिनचे डाव्या बाजूचे शरीर निकामी झाले. सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच लेनिन यांना पक्षाघाताचा तिसरा झटका आला आणि त्यातच २१ जानेवारी १९२४ रोजी लेनिन यांचे निधन झाले. सोव्हिएत रशियन सरकारने येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळत राहावी यासाठी लेनिन यांचा मृतदेह संरक्षित करण्याचा निर्णय घेतला. म्हणून लेनिन यांना आधुनिक जगातील पहिली ‘ममी’ म्हणून ओळखले जाते. यासाठी त्यांच्या शरीरावर केमिकलने नियमित प्रक्रिया केली जाते व इंजेक्शनही दिले जाते. यामुळे आजही लेनिन यांचे शरीर जिवंत असल्याचे भासते.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZNCCI
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language