Ad will apear here
Next
‘श्रद्धा आणि विश्वासामुळेच कलेला अस्तित्व’

‘शिल्पकार डी. एस. खटावकरांचा मुलगा’ ते ‘शिल्पकार विवेक खटावकर’ इथपर्यंतचा विवेक खटावकरांचा प्रवास वेगळा, रंजक आहे. ‘मला स्वत:चं अस्तित्व मिळवून देणं, विवेक खटावकर म्हणून माझी स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण करून देणं हे वडिलांचं सर्वांत मोठं काम आहे,’ असं त्यांना वाटतं. ‘वटवृक्षाच्या छायेत’ या सदरात आज या शिल्पकार पिता-पुत्राबद्दल...
............
डी. एस. खटावकरशिल्प काय, नृत्य काय अगर संगीत काय, या कलाकामिनी मोठ्या मानिनी आहेत. त्यांना प्रसन्न करून घ्यायचं, तर जिवापाड तपश्चर्या करावी लागते. प्रसंगी तहानभूकच काय, पण स्वत:लाही विसरावं लागतं, असं म्हणतात. कलावंतानं असं शंभर टक्के सर्वस्व ओतून केलेली कलाकृती रसिकांना मंत्रमुग्ध करते. पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सजावट असो, अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेशाचा विसर्जन मिरवणुकीतला चित्ररथ असो, ‘सिम्बायोसिस’मधला ‘कॉमन मॅन’चा पुतळा असो किंवा पुण्यातल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बॅकड्रॉप असो, या सर्व कलाकृतींचं रसिकांनी मनमुराद कौतुक केलं. काहीतरी अद्वितीय बघितल्याचा आनंद त्यांना मिळाला. ही किमया आहे शिल्पकार विवेक खटावकर यांच्या जादुई बोटांची! काहीतरी वेगळं, अलौकिक घडविण्याच्या त्यांच्या ध्यासानं, ठिकठिकाणी सौंदर्य टिपणाऱ्या त्यांच्या दृष्टीनं ही किमया घडवून आणखी आहे. शिल्पकलेच्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वाचं पितृछत्र लाभलेलं असतानाही, स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या विवेक खटावकर यांची वाटचाल म्हणूनच लक्षणीय आहे. ते म्हणतात, ‘स्वत:वर विश्वास असेल आणि कामावर श्रद्धा असेल, तर सुरुवातीला कठीण वाटणारी कामं नंतर लीलया जमून जातात, याची जाणीव काकांनी वेळोवेळी करून दिली. ती जाणीव मनात घट्ट असली तर त्यापाठोपाठ यश आपोआप येतं, याचा अनुभव मी नेहमीच घेत असतो.’

विवेक खटावकरशिल्पकार डी. एस. खटावकर यांच्या या मुलाला शिल्पकलेचं बाळकडू घरातच मिळालं. वडील अनेक वर्षं तुळशीबाग सार्वजनिक मंडळाच्या गणपतीची सजावट करत होते. त्यांच्या वास्तववादी देखाव्यांमुळे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये एक नवा ट्रेंड निर्माण झाला. वडिलांची ही कलासाधना पाहताना विवेक खटावकरही अनेक गोष्टी आपोआप शिकत गेले. ‘नूमवि’मध्ये शिकत असताना प्रत्येक वर्गाचा स्वतंत्र गणपती असायचा. शाडूची माती, प्लास्टरपासून सजावटीचं सगळं सामान खटावकरांकडून जायचं आणि विवेक खटावकरांच्या हातातून साकारलेला गणपती शाळेत बसायचा. १९७५-७६च्या दरम्यान त्यांनी वडिलांबरोबर काम करायला सुरुवात केली, तेव्हा शिल्पकार खटावकर अभिनव कला महाविद्यालयात शिकवत होते. ‘फाइन आर्टस्’चे विभागप्रमुख होते. नंतरच्या काळात चित्रकार, शिल्पकार म्हणून नावाजलेली मुकंद केळकर, मुरली लाहोटी, रमाकांत कवठेकर, सुदाम डोके, श्याम भुतकर, विजय दीक्षित, अशोक ताम्हणकर ही मंडळी त्या वेळी खटावकर सरांचे विद्यार्थी होते. त्यांच्याबरोबर वावरताना, त्यांची कामं जवळून पाहताना विवेक खटावकरांची गोडी आणखी वाढत गेली. आपणही याच क्षेत्रात काम करावं, वडिलांसारखं नाव कमवावं असं वाटायला लागलं. त्यांनी तसं जवळजवळ निश्चित करून टाकलं होतं. पण एक अनपेक्षित गोष्ट घडली. विवेक खटावकर म्हणतात, ‘मी पक्कं ठरवलं होतं, की मॅट्रिकनंतर ‘अभिनव’मध्येच प्रवेश घ्यायचा; पण वडिलांनी - ज्यांना आम्ही ‘काका’ म्हणतो, त्यांनी या गोष्टीला पूर्णपणे विरोध केला. मला ते अनपेक्षित होतं; पण त्या वेळी कलाकार म्हणून व्यावसायिकदृष्ट्या स्थिरावणं ही कठीण गोष्ट होती. कामं फारशी मिळत नसत, पैसेही कमीच मिळायचे. असे धोके पत्करायला लागू नयेत म्हणून काकांनी विरोध केला आणि मी स. प. महाविद्यालयात अकरावीत, आर्टस् शाखेला प्रवेश घेतला.’

बीए झाल्यानंतरही कलेची आवड स्वस्थ बसू देईना. म्हणून न राहवून खटावकरांनी अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. आता सगळं मनासारखं होणार असं वाटत होतं. प्रकाश तेलंग, सुधाकर चव्हाणांसारखे प्रसिद्ध कलावंत शिकवायला होते; पण प्रत्येक ठिकाणी खटावकर सरांचा मुलगा म्हणून मिळणारी वागणूक विवेक खटावकरांच्या लक्षात येत होती, जाणवत होती आणि त्यांनी ‘अभिनव’ला रामराम ठोकला नि तडक जाऊन प्रवेश घेतला तो ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’मध्ये! या वेळी मात्र वडिलांनी विरोध केला नाही. मुलाला स्वस्थ बसू न देणारी कलेची ओढ त्यांनाही जाणवली असावी. तिथं प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप आणि पुरस्कार मिळवून खटावकर बाहेर पडले. आता त्यांना बाहेरची क्षितिजं खुणावत होती. 

खटावकर म्हणाले, ‘जीडी आर्टस् होऊन पुण्यात आल्यावर प्रत्यक्ष व्यवसायात उतरायचं होतं. गणपती मंडळांची लहानमोठी कामं मी पूर्वी केली होती; पण त्या वेळी त्यावर माझी रोजीरोटी अवलंबून नव्हती. त्यामुळे आता कलेचा व्यवसाय म्हणून स्वीकार करताना ते एक मोठं आव्हान माझ्यापुढे होतं. वडिलांनी कलेकडे कधी व्यवसाय म्हणून बघितलं नाही. त्यांनी कलेमध्ये सर्वस्व ओतलं. कधीच पैशाचा विचार केला नाही. मला आठवतं, तुळशीबागेच्या गणपतीसमोर एका वर्षी ‘चलो मच्छिंद्र गोरख आया’ हा देखावा केला होता. त्यामध्ये स्त्रियांच्या अनेक मूर्ती होत्या. त्यातल्या दोन मूर्तींना साड्या कमी पडत होत्या. तेव्हा काकांनी मागचा-पुढचा विचार न करता चटकन घरात जाऊन आईचा लग्नातला शालू आणली आणि त्याचे दोन भाग करून दोन मूर्तींना त्याच्या साड्या नेसवल्या. त्यामुळे त्यांचे देखावे, कायम वास्तववादी, सजीव वाटतात. कलेत जीव ओतायचा, झोकून द्यायचं म्हणजे काय, हे त्यांच्याकडून शिकलो. उत्सव हा व्यवसायाचा भाग होऊ शकत नाही. त्यामध्ये धंदेवाईक दृष्टिकोन ठेवू नये. तुमच्या कलेचं, क्षमतांचं ते प्रदर्शन असतं. हौस, परिपूर्णता यांच्या जोडीला श्रद्धा नसेल तर ती कला अर्धवट राहते, हे काकांचं सांगणं. त्यामुळे या गोष्टींची कास न सोडता मी व्यवसायात उतरलो.’

‘कॉमन मॅन’चा पुतळा साकारताना विवेक खटावकर. सोबत ‘कॉमन मॅन’चे जन्मदाते आर. के. लक्ष्मण.अत्यंत पारदर्शी दृष्टिकोन घेऊन या क्षेत्रात आलेल्या खटावकरांना नंतर कधी मागे वळून बघावंच लागलं नाही. दिल्लीत २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यासाठी त्यांनी शिल्पकार सुहास भूमकरांना मदत केली होती. तो अनुभव लक्षात घेऊन १९८९मध्ये त्यांना अखिल मंडई मंडळानं विसर्जन मिरवणुकीसाठी चित्ररथ बनवायला सांगितलं. गरुडावर बसलेल्या गणेशाच्या या कामाकडे केवळ सजावट म्हणून न पाहता त्यांनी सर्व बाजूंनी व्यवस्थित पाहता येणारं मोबाइल शिल्प म्हणून बघितलं आणि ती कलाकृती प्रचंड गाजली. त्या वेळेपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत चित्ररथांची परंपरा सुरू झाली ती आजतागायत आणि या मंडळाच्या सजावटीचं काम खटावकरांकडे आहे तेही आजतागायत! दरम्यानच्या काळात प्राचीन शिल्पं, मूर्ती याविषयीचं औत्सुक्य मनात असल्यानं खटावकरांनी पुरातत्त्वशास्त्र विषयात एमए केलं आणि त्याच उत्साहात याच विषयात संशोधनाला सुरुवात केली. त्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक आहेत डॉ. गो. बं. देगलूरकर आणि विषय आहे, ‘टूल्स, टेक्निक्स, मेथड्स अँड मटेरियल विथ स्पेशल रेफरन्स टू कैलास टेंपल इन वेरुळ केव्हज.’ पुढे दगडूशेठ हलवाई मंडळाची सजावटही खटावकर करायला लागले. अनेक प्रकल्प, कंपन्या, क्लब्ज यांच्यासाठीची म्युरल्स, अनेक समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सजावटी, विविध ठिकाणाचे व्यक्तींचे किंवा प्रतीकात्मक पुतळे अशी विविध प्रकारची काम आज खटावकर फार कौशल्यपूर्ण रीतीनं हाताळतायत. या सगळ्यामध्ये काका ठामपणे त्यांच्या पाठीशी होते. खटावकर म्हणाले, ‘माझं स्पेशलायझेशन खरं तर शिल्पकलेमधलं; पण जीडी आर्टस् झाल्यापासून त्या अर्थानं ब्राँझचा पुतळा बनविण्याचं काम मी केलं नव्हतं; पण तपश्चर्येचं एक तप पूर्ण झाल्यावर त्याचं फळ मिळतं असं म्हणतात ना, तसंच माझ्याबाबतीत झालं. मंडई मंडळाची सलग बारा वर्षं सजावट केल्यानंतर अचानक मला संधी मिळाली ती ‘सिम्बायोसिस’साठी ‘कॉमन मॅन’चा पुतळा करण्याची! त्यासाठी ‘कॉमन मॅन’चे जन्मदाते आर. के. लक्ष्मण सलग सहा महिने आमच्याकडे येत होते. या शिल्पातील बारकावे, त्याच्या गरजा याविषयी आम्हाला मार्गदर्शन करीत होते. आठ मॉडेल्स केल्यावर नववं मॉडेल त्यांच्या मनासारखं उतरलं आणि तो ‘कॉमन मॅन’ आता संस्थेत विराजमान झालेला आहे. हा अनुभव बरंच काही शिकवून गेला.’

‘गणपतीचे सजावटकार’ हा खटावकरांवरचा शिक्का या झळझळीत कामगिरीमुळे पुसला गेला. ‘मायेची सावली’ चित्रपटाचे कलादिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केलं; पण ते मुंबईत फार काळ थांबू शकले नाहीत. ‘तिथं पैसा भरपूर मिळतो; पण मन रमत नाही’ असं याबाबत खटावकरांचं म्हणणं! कुठलंही काम करताना वडिलांचा भक्कम आधार हे त्यांचं पाठबळ. खटावकर म्हणाले, ‘काकांचा प्रत्येक गोष्टीत हातभार, पाठिंबा असतोच. काम काय चाललंय, कसं चाललंय याकडे लक्षही असतं; पण ते त्यात कधी हस्तक्षेप करत नाहीत. विरोध तर नाहीच. शिल्पकार, कलावंत म्हणून माझी बुद्धिमत्ता वापरायला, प्रतिभेचा मुक्त वापर करायला त्यांनी मुभा दिली, प्रोत्साहन दिलं. ‘आमच्या वेळी असं होतं’ या चौकटीत गुंतून पडणारा त्यांचा स्वभाव नाही; पण नावीन्याची कास धरली तेव्हा त्यांनी मनमुराद कौतुक केलं. स्वतंत्रपणे वाढायला प्रवृत्त केलं. पाठीशी उभे राहिले; पण मला पूर्णपणे स्वतंत्र व्यासपीठ दिलं. कुठेही कसलीही आडकाठी केली नाही. माझ्या मते मला स्वत:चं अस्तित्व मिळवून देणं, विवेक खटावकर म्हणून माझी स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण करून देणं हे त्यांचं सर्वांत मोठं काम आहे.’

वडिलांच्या या प्रोत्साहनानं स्वत:चे पाय खंबीर रोवल्यानंतर विवेक खटावकरांच्या मनात त्यांनी रुजवलेले संस्कार घट्टपणे रुजले आहेत. त्यांच्याशी तडजोड करणं कदापि शक्य नाही, अशी त्यांची धारणा आहे. आपलं ज्ञान जेवढं इतरांना देऊ तेवढं वाढत जातं, हे काकांचं सांगणं! त्यामुळे शिकणाऱ्या, कलाप्रेमी मंडळींचं खटावकरांकडे स्वागत असतं. स्वत:च्या कामाची माहिती देतील तीही हातचं काही न राखता! खटावकर म्हणतात, ‘काका सांगतात, काम कुठलंही असो, नाही म्हणायचं नाही नि जीव ओतून करायचं. आजही मी पाच इंची मूर्ती असो, नाही तर पंधरा फुटांची असो, दोन्ही कामं तितक्याच आवडीनं करतो. स्वत:वर आणि कामावर विश्वास हवा. आपलं ज्ञान इतरांना द्यायला हवं असा त्यांचा आग्रह असतो. शिल्पकलेची आवड निर्माण व्हावी म्हणून पूर्वी मी अनेक शाळांमध्ये शाडूची माती घेऊन जायचो आणि मुलांना त्याच्या वस्तू बनवायला शिकवायचो. सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अपमान सहन करता आला पाहिजे, राग गिळता आला पाहिजे, हे काकांनी मनावर बिंबवलं. त्यामुळं कायम डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करायला शिकलो. काम कितीही उत्तम झालं तरी त्यासाठी केला गेलेला सत्कार डोक्यात शिरू द्यायचा नाही, कामावर टीका करतात तेच खरे जवळचे लोक असं समजावं आणि रसिक, टीकाकार आणि समीक्षक यांचा कायम सन्मान करावा. कारण त्यांच्याशिवाय कलाकृतीला अस्तित्व मिळत नाही, हे काकांचे विचार मी संस्कार समजून जपले आहेत. शिकवण समजून आचरणात आणले आहेत.’

‘शिल्पकार खटावकरांचा मुलगा’ ते ‘शिल्पकार विवेक खटावकर’ इथपर्यंतचा विवेक खटावकरांचा हा प्रवास म्हणूनच वेगळा, रंजक आहे. अनेक मोठमोठ्या कलाकृती निर्मिल्यानंतर स्वत:ची नाममुद्रा या क्षेत्रात उमटविल्यानंतर आजही त्यांच्या मनात असते प्रत्येक कामाबद्दल तीच निष्ठा आणि श्रद्धा! हाही त्यांना शिल्पकलेप्रमाणेच काकांकडून मिळालेला वारसा आहे आणि तेच खऱ्या अर्थानं बळ आहे त्यांच्या देखणी निर्मिती करणाऱ्या हातांचं! खटावकरांना तंतोतंत लागू पडाव्यात अशा बोरकरांच्या ओळी इथं आठवल्यावाचून राहत नाहीत. त्या अशा - ‘देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे। सुंदराचे सोहळे॥’ 

- स्वाती महाळंक
संपर्क : ८८८८१ ०२२०७

(लेखिका पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आहेत.)
(‘वटवृक्षाच्या छायेत’  ही लेखमाला दर रविवारी प्रसिद्ध होते.)

(पूर्वप्रसिद्धी : समाज प्रतिबिंब दिवाळी अंक २०११.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZPGBF
Similar Posts
‘लोकांसाठी काम करणं हाच बाबांचा संस्कार’ सध्या राज्याच्या महिला-बालकल्याणमंत्री असलेल्या पंकजा मुंडे-पालवे आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करत आहेत. ‘वटवृक्षाच्या छायेत’ या लेखमालेत आज पंकजा मुंडे-पालवे आणि त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्यातील नात्यावर प्रकाश टाकणारा पूर्वप्रकाशित लेख...
‘दुसऱ्याची प्रतिष्ठा जपणं महत्त्वाचं!’ दुसऱ्याची प्रतिष्ठा जपणं, हे ना. सी. फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य होतं आणि तो संस्कार आमच्यावरही झाला, असं त्यांची कन्या सांगते. ‘वटवृक्षाच्या छायेत’ या लेखमालेत आज साहित्यिक ना. सी. फडके आणि त्यांची कन्या गीतांजली जोशी यांच्यातील नात्यावर प्रकाश टाकणारा लेख...
वटवृक्षाच्या छायेत... आज जून महिन्याचा तिसरा रविवार, अर्थात फादर्स डे. आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याची सुरुवात प्रामुख्याने पाश्चात्य देशांत झाली असली, तरी आज जगभरात अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो आणि त्याला भारतही अपवाद नाही. या दिनाचे औचित्य साधून ‘वटवृक्षाच्या छायेत’ ही विशेष लेखमाला ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर सुरू करत आहोत
‘सच्च्या दिलाचा माणूस’ ‘अभिनय क्षेत्रात काम करताना वडिलांचा वारसा आणि त्यांनी या क्षेत्रात व्यतीत केलेले भलेबुरे क्षण एखाद्या पुस्तकासारखे सोबत होतेच. ते वेळोवेळी यात दिशा दाखवत राहिले. माझे वडील अत्यंत सच्च्या दिलाचे होते,’ हे म्हणणं आहे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं. ‘वटवृक्षाच्या छायेत’ या सदरात आज ज्येष्ठ अभिनेते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language