Ad will apear here
Next
‘संगमेश्वरी’ला पुन्हा लोकाश्रय मिळवून देणारं नाटक


संगमेश्वरी ही रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांश भागांत बोलली जाणारी बोली. काळानुसार तिचा वापर कमी होऊ लागला आहे. म्हणूनच तिच्या संवर्धनासाठी रत्नागिरीतील काही तरुणांनी एकत्र येऊन ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याची निर्मिती केली आहे. अवघ्या दोन वर्षांत सुमारे १५० प्रयोगांचा टप्पा या नाटकानं गाठला आहे. आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षानिमित्त, या वेगळ्या प्रयोगाचा आढावा घेणारा हा लेख...
..........
बारा कोसांवर भाषा बदलते, असं म्हटलं जातं. ती जी बदलणारी भाषा असते, तीच बोलीभाषा. एखादी बोलीभाषा म्हणजे नेमकं काय असतं? त्या भागातला अभिव्यक्तीचा अस्सल नमुना म्हणजे बोलीभाषा. लिखित स्वरूपातल्या भाषेपेक्षा बोलीभाषा मोकळी, भावना थेट व्यक्त करणारी आणि रांगडी असते. त्या भागातले सारे लोकव्यवहारच त्या बोलीत होत असल्यानं कला, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती, उत्सव अशा विविध बाबींशी निगडित मोठा खजिनाच बोलीभाषेत असतो. गेल्या काही वर्षांत जागतिकीकरणामुळे इंग्रजीचा प्रभाव वाढल्यानं म्हणा किंवा बोलीभाषेत बोलणं म्हणजे गावंढळपणा असं लोकांना वाटू लागल्यामुळे म्हणा, बोलीभाषांचा वापर घटला. त्यामुळेच अनेक भाषा अस्तंगत झाल्या, तर काही भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. 

या पार्श्वभूमीवर, एखादी बोलीभाषा जपण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी काही उपक्रम आणि तेही पुढील पिढीकडून राबविले जातात, तेव्हा ते नक्कीच खूप मोठं पाऊल असतं. ‘कोकणचा साज आणि संगमेश्वरी बाज’ हे लोकनाट्य हा असाच एक कौतुकास्पद उपक्रम. नावातल्या उल्लेखाप्रमाणेच संगमेश्वरी बोलीतला हा नाट्यप्रयोग अत्यंत लोकप्रिय ठरला असून, गेल्या दोन वर्षांत या नाटकाचे १४८ प्रयोग झाले आहेत. येत्या दोन महिन्यांत होणार असलेल्या प्रयोगांच्या तारखा निश्चित झाल्या असून, त्यामुळे ही संख्या १६०वर पोहोचणार आहे. मुलुंडला झालेल्या ९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात नाट्यक्षेत्रातील दिग्गजांकडूनही या नाटकाचं कौतुक झालं. तसंच, काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेला या नाटकाचा व्यावसायिक प्रयोगही हाउसफुल झाला. या उपक्रमाचा अनुभव नेमका कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी या नाटकाचे सूत्रधार तात्या गावकार म्हणजेच सुनील बेंडखळे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा अनेक गोष्टी उलगडल्या.



या नाटकाबद्दल सांगण्याआधी थोडंसं या बोलीबद्दल... रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी (शेतकरी) समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पूर्वीपासून या जिल्ह्याच्या बहुतांश भागांत बोलली जाणारी बोली म्हणजे तिलोरी-कुणबी. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष अरुण इंगवले यांनी या बोलीच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. या बोलीतले सुमारे नऊ हजार शब्द, सुमारे साठ गाणी, काही म्हणी असं साहित्य त्यांनी संकलित केलंय. अजूनही त्यात बरंच काम करण्यासारखं आहे, असं ते म्हणतात. ‘१९०३ साली जॉर्ज ग्रिअर्सनने भारताचं भार्षिक सर्वेक्षण केलं, तेव्हा तिलोरी-कुणबी ही बोली बोलणारे सुमारे १३ लाख लोक होते; पण १९६१मध्ये पुन्हा भाषिक सर्वेक्षण झालं, तेव्हा केवळ तीन लोकांची नोंद झाली. याचा अर्थ असा, की केवळ तीनच जणांनी ती आपली मातृभाषा असल्याचं सांगितलं. ही बोली बोलणं कमीपणाचं, अडाणीपणाचं लक्षण असल्याची भावना वाढीला लागली असल्याचं हे द्योतक होतं,’ असं अरुण इंगवले यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या खेड-चिपळूणपासून दक्षिणेकडच्या राजापूरपर्यंत ही बोली बोलली जाते. प्रत्येक भागात या बोलीतल्या काही शब्दांत फरक पडतो; पण एकंदर बोली एकच आहे. संगमेश्वर परिसरात ही बोली बोलण्याचं प्रमाण जास्त असल्यानं या बोलीला संगमेश्वरी असं नाव दिलं गेलं. काही वर्षांपूर्वी आनंद बोंद्रे यांनी या बोलीतले एकपात्री प्रयोग केले. तसंच, त्यांचे बंधू गिरीश बोंद्रे यांनी या बोलीत लेखन केलं. त्यातून ती संगमेश्वरी बोली हेच तिचं नाव अधिक रूढ होत गेलं. 



नाटकाचं स्वरूप आणि कलाकार
‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हा लोकनाट्याच्या स्वरूपात सादर केला जाणारा प्रयोग आहे. त्याची निर्मिती समर्थकृपा प्रॉडक्शनने केली आहे. गावाला आलेल्या मुंबईकर चाकरमान्याला कोकणातल्या विविध सांस्कृतिक गोष्टी, इकडची माणसं यांचं दर्शन घडविणं, कोकणातल्या वैभवाची आठवण करून देणं आणि त्यातून शेवटी काही संदेश देणं, असं त्याचं स्वरूप आहे. मुख्य सूत्रधार सुनील बेंडखळे आणि प्रभाकर डाऊल, सचिन काळे, योगेश बांडागळे, रवींद्र गोनबरे हे कलाकार कोकणात विविध ठिकाणी भेटणारे एकेक इरसाल नमुने सादर करतात. पिंट्या चव्हाण ‘मुंबईकरा’ची भूमिका सादर करतात. विश्वास सनगरे, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, अनिकेत गोनबरे, राहुल कापडी, राज आणि केतन शिंदे, अभिषेक सावंत हे कलाकारही विनोदी संवादांची पखरण करतात. रुद्र बांडागळे हा बालकलाकार साकारत असलेला ‘बाळकृष्ण’ लोकांना भावतो. जाखडी, नमन हे कोकणातले पारंपरिक कलाप्रकार रसिकांना ठेका धरायला लावतात. त्यातील पारंपरिक गाण्यांना मंगेश मोरे (सिंथेसायझर), मंगेश चव्हाण (ढोलकी-पखवाज) आणि अभिषेक भालेकर (तबला) हे कलाकार संगीतसाज चढवतात. सुरेंद्र गुडेकर (ध्वनिसंयोजन), अनिकेत गानू (प्रकाशयोजना) आणि नरेश पांचाळ (रंगभूषा) यांचीही त्यांना उत्तम साथ लाभते. एकंदरीतच तरुणांची ही टीम या धमाल नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अंतर्मुखही करते. पारंपरिक कला, बोली, संस्कृती यांच्या संवर्धनासह नव्या कलाकारांमधलं ‘टॅलेंट’ पुढे आणण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे. 

...अशी सुचली कल्पना
या लोकनाट्याची कल्पना कशी सुचली, असं विचारलं असता, सुनील बेंडखळे म्हणाले, ‘लहानपणापासूनच उत्सवात असलेल्या नमन, खेळे वगैरे स्थानिक लोककला पाहायचो. त्या आवडायच्या. जसजसे मोठे होत होतो, तसतसं या उत्सवांचं, कलांचंही स्वरूप बदलत जात असल्याचं लक्षात येत होतं. हळूहळू त्यातली पारंपरिकता लोप पावत चालल्याचं जाणवत होतं.’ 

‘मध्यंतरी एकदा एके ठिकाणी नमनाची स्पर्धा पाहण्यात आली. तिथे मोठ्यांचा एक गट होता आणि लहानांचाही एक गट होता. त्यातल्या नाचासाठी मोठ्यांचे पाय जितक्या प्रमाणात उचलले जात होते (पदलालित्य) त्याच्या काही अंशानेसुद्धा लहानांचे पाय उचलले जात नव्हते, असं दिसलं. आताच्या पिढीला अशा काही प्रकारांची सवयच नाहीये आणि त्यातही मैदानावरच्या खेळांची जागा मोबाइलवरच्या खेळांनी घेतलीय, हेही एक कारण. त्यामुळे त्यांचा चपळपणा खूपच कमी झालाय. हे बघितलं आणि जाणवलं की हे पारंपरिक कलाप्रकार जोपासायला हवेत. त्यात मनोरंजन आहेच; पण व्यायाम आणि शारीरिक स्वास्थ्यासाठीही ते आवश्यक आहे. शिवाय आपल्या संस्कृतीचा हा खूप मोठा ठेवा आहे. त्याच दरम्यान आम्ही आनंद आणि गिरीश बोंद्रेंच्या संगमेश्वरी बोलीसंदर्भातील कार्यक्रमांशीही निगडित होतो. तो कार्यक्रम एकपात्री असायचा. आपल्या भागातल्या संस्कृतीचं प्रातिनिधिक चित्र तरी उभं राहावं, नव्या पिढीची त्यातली ‘इन्व्हॉल्व्हमेंट’ वाढावी, या उद्देशानं आम्ही लोकनाट्याची निर्मिती करायचं ठरवलं,’ सुनील बेंडखळे सांगत होते. 

‘लोकजीवन, संस्कृती, इथल्या लोकांच्या सवयी, तिरकस बोलणं, प्रवृत्ती, लोककला या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी लोकनाट्याचा फॉर्म योग्य वाटला,’ असं सुनील बेंडखळेंनी सांगितलं. बदलत्या जगामुळे अगदी गावातल्या लोकांच्या सवयीही कशा बदलल्यात, याचं एक उत्तम उदाहरण बेंडखळेंनी नमूद केलं. ‘पूर्वी कोकणात कोणत्याही गावात कोणी नवा माणूस आला आणि त्याने कुणाच्या घराचा पत्ता विचारला, तर त्याला पत्ता सांगितला जायचाच; पण तो माणूस कोण आहे, कशाला आलाय, कुठून आलाय, वगैरे सगळ्या चौकश्याही आपुलकीनं केल्या जायच्या. गावातल्या माणसांची प्रवृत्तीच तशी होती. अशा एकदम मोकळ्या वातावरणामुळे गावात कोणाकडे कोण पाहुणा आलाय, याची माहिती जवळपास अख्ख्या गावाला व्हायची. आता असल्या ‘नसत्या चौकश्या’ केल्या जात नाहीत. अगदी शेजारच्या फ्लॅटमध्येही काही दुर्घटना घडली, तरी कोणाला काही कळत नाही, हे शहरांमधलं लोण गावांमध्येही पसरू लागलंय....’ बेंडखळे सांगत होते. विकासाच्या नादात ही जुनी संस्कृती आपण विसरत चाललोय, तर तिची आठवण करून द्यायला हवी. म्हणूनच या लोकनाट्यात तसे पंचेस, तसे संवाद लिहिण्यात आले आहेत आणि अर्थातच हे सारं इथल्या स्थानिक बोलीत असल्याशिवाय त्याला अस्सलपणा येणार नाही. म्हणूनच संगमेश्वरी बोलीतच या नाट्याची निर्मिती केल्याचं बेंडखळेंनी नमूद केलं. 



कलाकारांची निवड अभ्यासपूर्वक
नाटक लिहिण्याबरोबरच कलाकारांची निवडही अभ्यासपूर्वक करण्यात आली आहे. कारण प्रत्यक्ष सादरीकरण कसं होणार, हे त्यांच्यावरच अवलंबून असतं ना! प्रभाकर डाऊल, योगेश बांडागळे यांचा नमनावर अभ्यास आहे. गावातल्या इरसाल व्यक्तिरेखांचा अभ्यास करण्यात, त्यांची लकब हेरण्यात आणि ते सादर करण्यात सचिन काळे माहीर आहे. असंच यातल्या प्रत्येक कलाकाराचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. शिवाय हे कलाकार जयगड, पांगरी, चिपळूण अशा रत्नागिरीच्या वेगवेगळ्या भागांतले आहेत. त्यामुळे आपोआपच त्याच बोलीतलं जे काही वैविध्य आहे, तेही जपलं जातं. यातले सगळे वादक कलाकारही असे आहेत, की पारंपरिक कलांमधल्या वादनाचा ताल त्यांच्या नसानसांत भिनलेला आहे. शास्त्रीय संगीताची मजा वेगळी असते, तसंच या लोकसंगीताचीही मजा वेगळी असते आणि ते प्रकार आपापल्या पद्धतीनेच सादर केले गेले, तरच ती मजा येते. या टीममधले सगळे वादक कलाकार त्यात तरबेज आहेत. त्यामुळे लोकसंगीताचा वारसाही जपला जात आहे.

बोलीच्या भाषिक सौंदर्याचा आस्वाद
संगमेश्वरी बोलीच्या भाषिक सौंदर्याचा आस्वादही या नाटकातून प्रेक्षकांना घेता येतो. ‘बोलीभाषेचं सौंदर्य असतंच; पण ती बोलायला अलीकडे लोकांना कमीपणा वाटतो. बोली बोलत राहिली नाही, तर जिवंत राहणार कशी? पूर्वीच्या एकेक गोष्टी कमी होत चालल्यात (उदा. गोठे). त्यामुळे त्या अनुषंगाने वापरले जाणारे शब्दही आपोआप कमी होत चाललेत. म्हणूनच आम्ही जुने शब्द जिवंत ठेवण्यासाठी हमखास त्यांचा वापर नाटकात करतो. ‘म्हणणी’ नावाचा एक प्रकार यात सादर केला जातो, त्यातही हे जुने शब्द आपोआप येतात. कीर्तनकाराप्रमाणे नमनात खेळिया असतो, त्याच्या तोंडच्या वाक्यांमधूनही जुने शब्द वापरले जातात. अर्थात, हे कथानकानुसारच येतील, याची काळजी घेतली जाते,’ असं बेंडखळेंनी सांगितलं. 

वारसा
आता गावातल्या अगदी लग्नसमारंभांचं स्वरूपही बदलत चाललंय. त्यामुळे त्या अनुषंगाने काही गाणी वगैरे होती, तीही लुप्त होत चाललीयत. हळद लावणे, काढणे, आंघोळीला नेणे, मुलाला/मुलीला मंडपात घेऊन येणे, या सगळ्या विधींवेळी काही गाणी म्हटली जायची. ती स्थानिक बोलीतच होती. बेंडखळेंनी बावनदी गावातल्या एका आजीबाईंची भेट घेऊन त्यांच्याकडून ही गाणी म्हणून घेऊन त्यांचं रेकॉर्डिंग केलं. त्यातून, लिखित स्वरूपात नसलेला खूप मोठा ठेवा त्यांना मिळाला. साहजिकच अशा प्रकारचं खूप संशोधन करून मिळालेला ठेवा या नाटकाच्या माध्यमातून लोकांपुढे येत असल्यानं त्याचं महत्त्व खूप आहे. 



अंतर्मुख करणारं आवाहन
केवळ विनोदनिर्मिती एवढाच या नाटकाचा उद्देश नाही, लोकांना चांगला संदेशही दिला जातो. ‘कोकणातले अनेक लोक मुंबई-पुण्यासारख्या शहरांत आहेत. इथले लोक जमिनी विकायला लागलेत; पण जर बाहेरचे लोक इथे येऊन विकास करू शकतात, तर भूमिपुत्र काही नाही करू शकत? त्यांनी एकत्र येऊन काही केलं, तर नक्कीच ते साध्य होऊ शकतं. पैसे कायमस्वरूपी राहत नाहीत. शिवाय इथलं वैभव सोडून बाहेर जायचं, संघर्ष करून उभं राहायचं आणि पुढच्या पिढीलाही तो संघर्ष चुकत नाही. मग आपणच आपल्याला जमेल त्या माध्यमातून कोकणाचा विकास केला, तर थेट गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना कोकणातही नक्की यावंसं वाटेल. असं अंतर्मुख भावनिक आवाहन आम्ही शेवटी करतो,’ असं बेंडखळे सांगतात. 

‘सध्या शहरात असलेल्या ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी आमचा प्रयोग दाखवायला मुलांना आवर्जून आणलं होतं. त्यांनी अनुभवलेलं त्यांच्या लहानपणीचं चित्र त्यांच्या मुलांना दाखवणं हा त्यांचा उद्देश होता, असं त्यांनी स्वतः आम्हाला भेटून सांगितलं. हे पाहिल्यावर आमचं नाटक योग्य ट्रॅकवर चालल्याचा विश्वास वाटला,’ असं बेंडखळे म्हणाले. 

सामाजिक भान
या टीमला यातून होणारी आर्थिक प्राप्ती मोठी नाही. तरीही या टीमने सामाजिक भान जपलेलं आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून कार्यक्रम करून त्यांनी आशादीप या मतिमंदांसाठीच्या संस्थेला एक लाख रुपयांचा निधी उभा करून दिला. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका गरजू व होतकरू विद्यार्थ्याला  दिवंगत गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या नावाने शिष्यवृत्तीही या टीमने सुरू केली आहे. 

स्वतःची नोकरी/व्यवसाय सांभाळून हे सगळे जण हे काम करत आहेत. नाटकाचे प्रयोग साधारणतः रात्री उशिराच असतात आणि आता अगदी दूरवरूनही त्यांना बोलावणं येऊ लागलं आहे. आपले नेहमीचे व्याप सांभाळून हे सगळं करणं किती कठीण आहे, याची कल्पना यावरून येऊ शकते. ‘आम्ही सगळे जण हौशीने आणि आनंद घेऊन हे करतोय, त्यामुळे आम्हाला कष्ट होत नाहीत, तर नवी ऊर्जाच मिळते,’ अशी या कलाकारांची प्रातिनिधिक भावना आहे.

कोणत्याही बोलीभाषेचं महत्त्व त्या भागातल्या लोकांशिवाय अधिक कोणालाही कळणार नाही. म्हणूनच प्रत्येक बोलीभाषेला ‘संगमेश्वरी’सारखं भाग्य लाभो, अशी सदिच्छा आणि ‘संगमेश्वरी बाज’च्या टीमला शुभेच्छा! 

(बोलू ‘बोली’चे बोल! या विशेष उपक्रमाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZUZBY
Similar Posts
बोलू ‘बोली’चे बोल! मराठी राजभाषा दिन (२७ फेब्रुवारी) आणि आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष (२०१९) या निमित्तानं ‘बाइट्स ऑफ इंडिया’चा विशेष उपक्रम -‘बोलू ‘बोली’चे बोल!’ मराठीच्या विविध बोलीभाषांचा आस्वाद आपल्याला या उपक्रमातल्या व्हिडिओंमधून घेता येईल. मराठीच्या विविध बोलीभाषांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल सांगणारा हा लेख
बोलू ‘बोली’चे बोल! - वऱ्हाडी बोली - डॉ. विठ्ठल वाघ (ऑडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
बोलू ‘बोली’चे बोल! - वैदर्भीय बोली (व्हिडिओ) २०१९ हे संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते. त्या वर्षाचा आता समारोप होत आहे. या वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने महाराष्ट्रातील काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. त्या बोलीभाषांच्या व्हिडिओच्या मालिकेत आजचा व्हिडिओ वैदर्भीय बोलीचा
बोलू ‘बोली’चे बोल! - मराठवाडी बोली (ऑडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language