Ad will apear here
Next
गणेशोत्सव : वैभवशाली इतिहास, अस्वस्थ वर्तमान आणि आपण


जगभरातला माणूस हा कायद्यापेक्षा संकल्पनांच्या अधीन राहून जगत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बुद्धिप्रामाण्यवादाच्या नावाने श्रद्ध माणसाला कितीही अंधश्रद्ध ठरविण्याचा प्रयत्न झाला तरीही तो ऐकत नाही. कितीही त्रास झाला तरी कालानुरूप व्यवहार्य बदल स्वीकारून तो पुढे सरकत राहतो. यंदा कोरोना काळात कोकणात आपल्याला याचा अनुभव येतो आहे. यंदा ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर का होईना या लोकप्रिय लोकोत्सवात सक्तीनं आपला समाज स्वयंशासित झालेला बघायला मिळायला हवा आहे. सध्या देशाला, राज्याला याची मोठी गरज आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू, वैद्यकीय व्यवहार, आरोग्याचा व्यापार, प्रशासनाचा विस्कळीतपणा आणि सक्रिय कोरोना योद्धे असं चित्र असताना लोकांच्या कौटुंबिक भक्तीला कोणीही कुठेही विरोध केलेला नाही. त्यामुळे आता कुठे थांबायचे, हे समजून घेऊन आपण ‘लाभो सर्वां निरोगिता’ अशीच कृती करायला हवी आहे.
..........
गणेशोत्सवाशी कोकणवासीयांचे जिवाभावाचे नाते आहे. इथल्या माणसांना बाप्पा आपल्या घरातला वाटतो. ही माणसं बाप्पाची नुसती पूजाअर्चा नि आरत्या करत नाहीत, तर तो असेल तितके दिवस त्याच्याशी संवाद करत राहतात. त्याला आपली सुख-दु:खे सांगतात. नवस-सायास करतात. वर्षभराची ऊर्जा उरी साठवून आपलं जीवन जगायला सिद्ध होतात. येणाऱ्या संकटांवर मात करत राहतात. कदाचित म्हणून कोकणी माणसं आत्महत्या करत नाहीत. तीन जून २०२० ला कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळानं या माणसांच्या मागच्या पाच-२५ वर्षांच्या मेहनतीवर कुऱ्हाड फिरवलीय. त्यातच आलेलं ‘कोरोना’चं संकट वैश्विक आहे. शंभर वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या प्लेगच्या महामारीचं वर्णन, ‘एकाची तिरडी पोहोचवून परतलो की दुसऱ्याची बांधायला लागायची’ अशा शब्दांत केलेलं आहे. ‘कोरोना’ची भयावहताही काही कमी नव्हे! तरीही अनंत यातायात अडचणींना तोंड देऊन घराघरात पोहोचलेला कोकणी माणूस मर्यादित उपस्थितीत का होईना, ‘लाभो सर्वां निरोगिता’ असंच साकडं आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घालताना दिसेल!

जगभरातला माणूस हा कायद्यापेक्षा संकल्पनांच्या अधीन राहून जगत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बुद्धिप्रामाण्यवादाच्या नावाने श्रद्ध माणसाला कितीही अंधश्रद्ध ठरविण्याचा प्रयत्न झाला तरीही तो ऐकत नाही. कितीही त्रास झाला तरी कालानुरूप व्यवहार्य बदल स्वीकारून तो पुढे सरकत राहतो. यंदा कोरोना काळात कोकणात आपल्याला याचा अनुभव येतो आहे. कोकणातल्या माणसाची गणेशोत्सवाशी नाळ पारंपारिक जुळलेली असल्याने त्याचे या काळातले वर्तन निवळ कायद्याने नियंत्रित होऊ शकत नाही. असंख्य अडचणी असतानाही मनुष्य आपल्या ठरवलेल्या तत्त्वाने जगतो, वागतो कारण त्यात त्याचा आनंद सामावलेला असतो. तिकडे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा (पाच ऑगस्ट २०२०) जल्लोष देशभर साजरा होत असताना कोकणसह राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होऊन पूर आलेला. अशातच त्या दिवशी दुपारी रत्नागिरी तालुक्यातल्या तोणदे गावातील श्री सांब मंदिरातल्या श्रावण नामसप्ताहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. कौलारू मंदिरात छातीपर्यंत पाणी भरलेले असताना छताच्या आढ्यावर बसून भाविक श्रीनामाच्या गजरात दंग झालेले अनेकांनी पाहिले. कोकणातल्या उत्सवी उत्साहाची ही प्रातिनिधिक अनुभूती होती. हिंदू जीवनपद्धतीत मानवाला विष्णू चरित्र आवडल्यास त्याला वैष्णव होता येते. शिवाची उपासना केल्यास शैव होता येते. तसेच रामाची उपासना केल्यास रामभक्त, गणरायावर प्रेम केल्यास गाणपत्य होता येते. मूळ ‘हिंदू’ जीवनपद्धतीचा त्याग करावा लागत नाही. ही फार मोठी वैश्विक उपलब्धी यात सामावलेली आहे.

सन १८९३मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या मोठ्या दंग्यावर विचारविनिमय करण्यासाठी पुण्यात वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी भरलेल्या सभेत घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक करण्याची कल्पना पुढे आल्याची नोंद ‘गणेशोत्सवाची साठ वर्षे’ या ज. स. करंदीकर यांनी १९५३ साली संपादित केलेल्या ग्रंथात सापडते. लोकमान्यांनी २६ सप्टेंबरला दैनिक केसरीतून या कल्पनेचे कौतुक केले. १८९४मध्ये स्वत: राहत असलेल्या श्री. सं. विंचूरकर यांच्या वाड्यात त्यांनी १० दिवसांच्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. उत्सवातून धार्मिक समतोल राखण्याबरोबर लोकसंघटन आणि संघटनेतून सबळीकरण होईल या सामाजिक मानसशास्त्राचा विचार करून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेला व्यापक स्वरूप दिले. गणेशोत्सवाला ज्ञानसत्राची जोड दिल्याने ते चळवळीचे साधन ठरले. कोकणात मुरुड (रायगड) गावी श्रीमंत ताईसाहेब बाळ यांचे चिरंजीव बापूराव यांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. मेळे, मंत्रजागर, भजन, दूर्वांची सहस्रनामे असे कार्यक्रम होऊन समुद्रकिनारी बाप्पाचे विसर्जन होई. उत्सवातील मेळ्यांतून ज्ञान मिळे. मेळ्याच्या पदांनी सामाजिक आणि धार्मिक गोष्टी अंतकरणाला भिडत. ‘पैसाफंड’सारखी उपयुक्त संकल्पना कै. अंताजी दामोदर काळे यांनी १८९९च्या दुष्काळाच्या वेदना अनुभवल्यावर याच उत्सवात सुरू केली. त्या वर्षी देवगडला विठ्ठल मंदिरात खांबेटे, सदाशिवराव तांबे, रामभाऊ लेले वकील यांची व्याख्याने झाली होती. कर्जत, राजापूर, रत्नागिरीत सन १९००मध्ये, चिपळूण, पेणला सन १९०५पासून उत्सव सुरू झाला. आमचं मूळ गाव असलेल्या केळशीत (दापोली) प्लेगची साथ आली होती. तेव्हा ग्रामस्थांनी गावातील भैरीबुवाला गाऱ्हाणे घातले होते. देवळात सात दिवस ‘अखंड नामसप्ताह’ केला होता. प्लेगची साथ शमली आणि नामसप्ताहाची प्रथा सुरू झाली. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सन १९०८ साली मीठगवाणे (राजापूर) येथील उत्सवात, ‘आपापसातले कब्जे सरकारात न्यायचे नाहीत. गुरे कोंडवाड्यात पोचवायची नाहीत,’ अशा शपथा लोकांनी घेतल्या होत्या. मद्यपानाविरुद्ध चळवळ करण्याचे लोकांनी ठरविलेले होते. आपल्यातील राष्ट्रीय गुण लोप पावत चालले असताना निरुपद्रवी असणं हा राष्ट्रीय दुर्गुण असल्याची जाणीव करून देत राष्ट्राचे काम आपणच केले पाहिजे या विचाराचे राष्ट्रीय गुण लोकांच्यात यावेत असं शिक्षण उत्सवातून लोकांना दिलं जाऊ लागलेलं. सध्याच्या कोरोना महामारीचे मूळ समजून घेऊन यंदाच्या उत्सवातही लोकांनी मातृभूमी संरक्षण आणि संवर्धनाच्या अशाच शपथा घ्यायला हव्या आहेत.



सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानवी कार्यक्षमता डिस्चार्ज होऊन काही वेळ स्वतःला शटडाउन करण्याची वेळ येते, तेव्हा या बाप्पाचं येणं इथल्या माणसाला मानसिक बळ देत असतं. याची निश्चित जाणीव असल्यानं स्वतःच्या जिवाचे अतोनात हाल सहन करून चाकरमानी कोकणात पोहोचतात. यंदा या त्रासाला ‘कोरोना’ची दुर्दैवी किनार आहे. चाकरमान्यांनी गणपतीसाठी येण्यापूर्वी विचार करावा असं कितीही म्हटलं गेलं तरीही कोकणात लोकं आली आहेत. अर्थात त्यांच्या येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. दर वर्षी कोकणात जाण्यासाठी गाड्यांची बुकिंग ४/६ महिने अगोदर सुरू होतात. कितीही व्यवस्था केली तरी अपुरी पडते हे वास्तव माहीत असताना प्रवास करण्यासाठी आवश्यक ई-पास, वैद्यकीय तपासणी आदींबाबत वेळेत पुरेशी स्पष्टता मिळवून देण्यास सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अयशस्वी ठरल्याच्या तीव्र भावना चाकरमान्यांच्या मनात आहेत. कोकणात जाणारे बरेचसे चाकरमानी स्वतःच्या खर्चाने, गाड्या भाड्याने करून गेलेत. ट्रेन आणि एसटी बसच्या निम्याही न भरलेल्या सीट्स शासकीय निर्णयाला झालेली दिरंगाई बयाण करत होती. राज्यातल्या ज्या परप्रांतीयांना सरकारने पैसे खर्च करून त्यांच्या राज्यात सोडले ते तिकडचा पाहुणचार झोडून परतले. आम्ही कोकणवासीय मात्र अनेक आठवडे ई-पास कसा मिळवावा, एसटी सुरू होईल का, गावी किती दिवस क्वारंटाइन व्हायला लागेल, या विवंचनेत अडकून पडलो होतो. होळी आणि गणपतीला रजा नाही मिळाली तर नोकरीवर लाथ मारून जाणारा, असा आमचा इतिहास! पण कोरोना काळात गाववाले विरुद्ध चाकरमानी अशी आमच्यातच दुर्दैवी दरी निर्माण झाली. संपूर्ण चाकरमानी गावी न येण्याचे हेही एक कारण आहे. तरीही बाप्पा काळात हे निवळायला हवे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लॉकडाउनने देशाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, तिथे सामन्याची काय कथा? मध्यंतरी आम्ही एका आयुर्वेदीय उपचार केंद्रात गेलो होतो. तिथे आलेली एक महिला वैद्यांच्या तपासणी कक्षात जाताना हातातली पिशवी सोबत घेऊन जाऊ लागलेली. म्हणून सहजच तिला, ‘पिशवी राहू देत तिथं कोण नेत नाय ती!’ असं सांगण्याचा प्रयत्न वैद्यांनी केला. ‘पैसे-बैसे नाहीत ना तीत?’ असंही विचारलं. अर्थात पिशवीत पैशाचं पाकीट होतं. साहजिक ती बाई पिशवी स्वतःपासून सोडायला तयार नसावी. समोर बसून पाहणाऱ्या आम्हाला त्यात काही विशेष वाटलं नाही. हे सगळं स्वाभाविक! पण पिशवी उचलून वैद्यांच्या तपासणी कक्षात जाताना ती चटकन म्हणाली, ‘नको बाबा, पैसा भेटत नाय आता!’ तिच्या या वाक्यानं आम्हाला भलतंच प्रभावित केलं. कोकणच्या भूमीत जगाला समृद्ध करू शकणाऱ्या अर्थव्यवस्थेची मुळं लपलेली असतानाचं हे जिणं अस्वस्थ करणारं आहे. गणेशोत्सवकाळात ‘चाकरमान्यांना कोकणात येऊ नका!’ हे सांगणं जितकं सोपं आहे, तितकं त्या महिलेच्या वाक्यातल्या व्यथा समजून घेणं निश्चित सोपं नाही. दर वर्षी या काळात गल्लोगल्ली आपली पावडरलेली तोंडं घेऊन फ्लेक्स बॅनरवर दर्शन देणाऱ्यांनी आपापल्या भागातील चाकरमान्यांची घरपट जबाबदारी घेतली असती तर? जवळपास सत्ताधारी असलेल्या कोकणाला हे अवघड नव्हतं. तरीही नियोजनाचा पुरता दुष्काळ राहिला आहे. 

आपल्यावरील कोरोनाचे संकट पूर्णतः टळलेले नाही. ११ दिवसांचा गणेशोत्सव साजरा करताना याचे भान बाळगावे लागणार आहे. आजची स्थिती कायम राहणार नाही. हेही दिवस जातील. भविष्यात कित्येक गणेशोत्सव येतील. ह्या वर्षीची उणीव भरून काढता येईल; पण ह्या वर्षी संयमाची गरज आहे. आपलं प्रशासन म्हणजे माणसेच आहेत. कोरोना रुग्ण वाढले म्हणून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी आणि काही कलेक्टर, सीईओ यांना अनेक ठिकाणी वेठीस धरले गेले आहे. त्यातून मग ‘बदली करा’ प्रकरण सुरू झाले. सरकारच्या अपयशाची शिक्षा त्यांना काय व्हायची ती होईल; पण आपण नागरिकांनी हक्क मागताना कर्तव्य पालनाकडे पाहायला हवे आहे.



गणपतीबाप्पाचं रूपडं तसं विचित्र. सतत ज्ञान ग्रहण करायला सांगणारं ते हत्तीचं मोठालं मस्तक, सूक्ष्म निरीक्षण करायला सांगणारे लहान डोळे, लांबलचक सोंड, सारं सावधपणे ऐकायला सुचविणारे मोठाले कान, बाहेर आलेला दात, लोकांचे अपराध पोटात घालून क्षमाशील वृत्ती ठेवण्यास सांगणारे भलेमोठे पोट, सापाचे बंधन, अन्यायाचा प्रतिकार करायला सांगणारी आयुधं आणि वाहन काय तर उंदीर, तरीही बाप्पा आम्हाला परमप्रिय. कारण आमच्या मनातले त्याचे रूप वेगळे आहे. आमच्यासाठी तो सुखकर्ता, दुःखहर्ता आहे. ‘या वर्षी बाप्पाला आरास कोणती करायची?’ याचे काही महिने अगोदर सुरू होणारे नियोजन असो किंवा बाप्पाला मुक्यानी पोहोचविण्यात काय अर्थ? म्हणून त्याच्यासमोर एक तरी भजन झालंच पाहिजे अशा घराघरात होणाऱ्या प्रयत्नाला यंदा ब्रेक लागला आहे. तसा ब्रेक खंडणीचं दुर्दैवी स्वरूप येऊ पाहणाऱ्या वर्गणीला, कर्णकर्कश आवाज, अश्लील गाणी आणि गुलालाच्या अतिरेकी वापरालाही आला आहे. दर वर्षी कोकणवासीय बाप्पाच्या डोक्यावर पाने, फळे, फुले, वेली, कवंडाळं, आंब्याच्या डहाळ्याची जी ‘माटवी’ बांधतात, त्यामागे पर्यावरण संवर्धन संकल्पना आहे. पूर्वी रानावनात गुरांच्या मागनं फिरणारे गुराखी या कवंडाळाच्या वेली हेरून ठेवत असत. कोरोना असला तरी हे चित्र घराघरात दिसेल. आपल्या या उत्सवातील पर्यावरण रक्षणाचा संदेश समजून न घेता आम्ही बाप्पाच्याच तोंडावर ‘मास्क’ लावला तर अवघड होईल. गणपतीचा उत्सव हा सगळ्या पर्यावरणाला आणि परिसराला आनंद देणारा असला पाहिजे. गणेश पूजेसाठी लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक ही फुले तर मोगरा, माका, बेल, पांढऱ्या दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुन सादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मारवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्ती या २१ पत्री (पाने) शास्त्राने सांगितल्या आहेत. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन म्हणून आपल्या परसदारी किती वनस्पती आहेत? किती लावायच्या आहेत? त्यासाठी आपण काही करणार आहोत का? ज्या वनस्पती आहेत त्यांच्याविषयी आपण सोशल मीडियात पोस्ट करू शकतो का? असा साधासा कृतियुक्त पर्यावरणीय विचार करायला हरकत नाही. बाप्पाला निर्विवाद शाकाहारी भोजन प्रिय आहे; मात्र गौरीला मांसाहार कसा काय चालतो, हे आमच्यासारख्याला न समजलेले कोडे आहे. पडत्या पावसात रात्रीच्या वेळी जेवणावळी आटपल्यावर चिडीचूप झोपी जाणाऱ्या कोकणात या दिवसात वाड्या-वस्त्यांवर घराघरात आळीपाळीने कोणा बुवाची थाप अचानक ऐकू येते. भजनाचा साज ठीकठाक असल्याची खात्री झाली, की बुवांच्या आवाजाने भरून गेलेल्या वातावरणात सारे सखेसोबती बाप्पासमोर किंवा पडवीत जमा होतात. ‘पुंडलिका वर दे हरी विठ्ठल’चा आवाज रात्रीचा अंधार कापत वाड्या-वस्त्या घुमवून काढतो. गणपतीच्या दिवसातल्या या पायरवालाही यंदा ब्रेक लागलाय. विसर्जनवेळी बाप्पासोबत दहीभाताचा नैवेद्य दिला जातो. आपल्याकडे प्रवासाला निघणाऱ्या माणसाच्या हातावर चमचाभर दही देण्याची परंपरा आहे. पाहुण्याला विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या त्यामागे असलेल्या कारणाची आम्ही ‘कोरोना’काळात उजळणी करायला हवी आहे. महाकवी कालिदासानं ‘उत्सवप्रिय: खलु मनुष्य:’ असं उत्सवप्रिय माणसाचं वर्णन केलं आहे. देशातील लोकजीवनाला जीवनस्पर्शी सांस्कृतिक परंपरेची जोड लाभलेली आहे. हे सगळं खरं असलं तरी कोरोनाने जाखडी नृत्य परंपरेत म्हटलं जाणारं ‘गणा धाव रे...’ हे गीत म्हणण्याची भक्तांवर आणलेली आहे.

जगाच्या इतिहासात प्लेग महामारीच्या पाऊलखुणा आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. सन १३५०च्या सुमारास युरोपात झालेला प्लेगचा उद्रेक भीषण होता. तेव्हा एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकं मृत्युमुखी पडली होती. १५व्या शतकात उत्तर आणि दक्षिण अमेरिकन वसाहतींमध्ये इतक्या लोकांचा बळी गेला, की त्याचा परिणाम जगाच्या वातावरणावर झाला. सध्या Epidemic Diseases Act, 1897चा उल्लेख वारंवार होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेला हा कायदा ब्रिटिश सरकारने १८९७ साली प्लेगच्या नियंत्रणार्थ आणला होता. प्लेगच्या साथीच्या वेळी घरात उंदीर मरून पडलेला दिसला, की लोकं घर सोडून गावाबाहेर पळत. गावाबाहेर वाडीत वा शेतात तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून राहत. अनेक गावे ओस पडली होती. मृताचा शोक करायला, रडायला सोडा त्याच्या अंत्यसंस्कार करायला जाण्याची हिंमतही होत नसायची. काखेत किंवा जांघेत गाठ आली, की तो माणूस गेलाच म्हणून समजावे लागायचे. रोगावर औषध उपलब्ध नसल्याने बाधा झालेली व्यक्ती अगदी अल्पावधीची आपली साथीदार आहे, असे समजण्यात यायचे. १८९६—१९१७ या काळात एकट्या भारतात ९८ लाख ४१ हजार ३९६ (मराठी विश्वकोश) लोक प्लेग साथीच्या रोगाला बळी पडले. प्लेगच्या साथीच्या काळात अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करून त्याचे मांगल्य आणि पावित्र्य जपण्यात आले होते. आपल्या देशाने मागील काहीशे वर्षांत रोगांच्या साथी पाहिल्यात; पण आजसारखी रात्रंदिवस झोपा उडवणारी समाजमाध्यमे तेव्हा लोकांच्या हातात नव्हती. जसजसे विज्ञान प्रगत होत आहे, तसतसा नवनवीन रोगांचा जीवघेणा फैलाव होत आहे. भारत नावाच्या आपल्या एकाच देशात अनेक देश राहतात. त्यांचं जगणं परस्परविरोधी असतं. एका बाजूला कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू वाढतात. दुसरीकडे अधिक रुग्ण बरे झाल्याची बातमी येते. रुग्णांना दवाखाने अपुरे पडत असतानाही शहरी वस्त्यांमध्ये जमाव काबूत येत नाही. लाखो बेघर उपाशीपोटी आपल्या गावाला जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत निघतात. काही टँकरचा वापर करतात. जनजीवन सुरळीत होईल म्हणून काही जण समाजमाध्यमांवर खाण्यापिण्याचे पदार्थ झळकवतात. वाढदिवसाच्या जाहिराती सुरू राहतात. डॉक्टर आणि नर्सेससाठी सुरक्षासाधनांचा तुटवडा असताना काहींना दारू दुकानं उघडी हवी असतात. संकटकाळातही राजकारण दिसतं तेव्हा आपला छुपा अजेंडा पुढे रेटणाऱ्यांची कीव येते. तरीही आपण सध्याच्या काळात मन विषण्ण आणि उद्विग्न होऊ न देता निर्धाराने निरामय सूर जपायला हवा. गलबला कितीही वाढला, तरी आशावादी राहत खचून न जाता हेही दिवस जातील ही भावना जपायलाच हवी.

इतिहासाचार्य वि. के. राजवाड्यांच्या मते आपल्याकडला वैयक्तिक आणि घरगुती गणेशोत्सव प्राचीन आहे. सातवाहन, राष्ट्रकूट आणि चालुक्य आदी राजघराण्यांच्या काळात तो चालू होता. पेशवेकाळात त्याला महाराष्ट्रात अधिक महत्त्व प्राप्त झालं. टिळकांनी त्याला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप दिलं. राष्ट्रभक्ती साधली. गणेशोत्सव हे लोकसंवादाचं व्यासपीठ बनवलं. या गणेशोत्सवानं कार्यकर्ता निर्माण करणारा लोकविद्यापीठ म्हणूनही काम केलं; मात्र स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा विस्तार वाढला आणि वैचारिक खोली कमी होत गेली आहे. त्यामुळे ‘गणपती रत्यावर आणू नये’ हे महादेव गोविंद रानडे यांनी व्यक्त केलेलं मत नंतर अंशत: पटू लागलं. गेली काही वर्षे यावर लिहिलं बोललं जातंय. म्हणूनच यंदा ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर का होईना या लोकप्रिय लोकोत्सवात सक्तीनं आपला समाज स्वयंशासित झालेला बघायला मिळायला हवा आहे. सध्या देशाला, राज्याला याची मोठी गरज आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू, वैद्यकीय व्यवहार, आरोग्याचा व्यापार, प्रशासनाचा विस्कळीतपणा आणि सक्रिय कोरोना योद्धे असं चित्र असताना लोकांच्या कौटुंबिक भक्तीला कोणीही कुठेही विरोध केलेला नाही. त्यामुळे आता कुठे थांबायचे, हे समजून घेऊन आपण ‘लाभो सर्वां निरोगिता’ अशीच कृती करायला हवी आहे.

- धीरज वाटेकर, चिपळूण, जि. रत्नागिरी
ई-मेल : dheerajwatekar@gmail.com
मोबाइल : ९८६०३ ६०९४८

(लेखक ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील आठ पुस्तकांचे लेखक असून, कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत असलेले पत्रकार आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HXKBCP
Similar Posts
करोनानंतरच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी गौर गोपाल दास यांचे विचार (व्हिडिओ) करोनामुळे सध्या लॉकडाउनच्या स्थितीतून आपण जात आहोत. त्यानंतरच्या आपल्या आयुष्यात अनेक आव्हाने असणार आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी, त्यांवर मात करण्यासाठी काय करता येऊ शकेल, याबद्दल आध्यात्मिक गुरू आणि विचारवंत गौर गोपाल दास यांचे हे विचार...
मनोबोध - भाग १९४-१९५ : राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे मनाच्या श्लोकांवरील निरूपण (व्हिडिओ) समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केलेले निरूपण - व्हिडिओ क्रमांक १९४ आणि १९५...
दासबोधात सांगितलेली मूर्खलक्षणे : समीर लिमये यांचे निरूपण (व्हिडिओ - भाग २३) मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा हा २३वा भाग...
दासबोधात सांगितलेली मूर्खलक्षणे : समीर लिमये यांचे निरूपण (व्हिडिओ - भाग ५०) मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा हा ५०वा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language