Ad will apear here
Next
...पीड पराई जाने रे...!


‘वैष्णव जन तो..’ या भजनाचा शब्द न् शब्द जगणारा तरुण म्हणजे अब्दुललाट या कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा गावातला तरुण कुलभूषण बिरनाळे! खडतर परिस्थितीतून स्वतः इंजिनीअर होऊन अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करून या तरुणाने कर्तृत्व गाजवलं. त्याच वेळी समाजातील वंचितांचाही विचार त्याने केला. निराधार मुलांसाठी त्याने बालोद्यान नावाची संस्था सुरू केली आणि तीही लोकसहभागातून... आज या संस्थेनं मोठं नाव कमावलं आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज कुलभूषण बिरनाळे या तरुणाची प्रेरणादायी गोष्ट...
..........
१५व्या शतकात नरसी मेहता यांनी लिहिलेलं ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड पराई जाने रे...’ हे भजन आजही मनाला शांती देतं, इतरांबद्दलची माणुसकीची भावना जागी ठेवायला मदत करतं. या भजनाला आपल्या जगण्याचा भाग बनवणारे काही लोक असतात. खरं तर ते आपल्याच आसपास असतात. त्यांच्याकडे बघत असताना आपल्यातलीच वाटणारी ही माणसं किती असामान्य आणि वेगळी आहेत हे त्यांच्या कृतीमधून जाणवतं. या भजनाचा शब्द न् शब्द जगणारा तरुण म्हणजे अब्दुललाट या कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा गावातला तरुण कुलभूषण बिरनाळे!



कुलभूषण बिरनाळे हा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर आहे. उच्चशिक्षित असलेल्या या तरुणाची इथपर्यंत येण्याची वाट खडतरच होती; मात्र आई-वडील शिक्षक असल्यानं आणि सतत इतरांप्रति विचार करणाऱ्या आई-वडिलांचेच गुण अंगी आल्यानं कुलभूषणवरही तेच संस्कार झाले. दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून इंजिनीअरिंग करण्यासाठी कुलभूषणनं इचलकरंजी गावात प्रवेश केला. इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण होताच, कुलभूषणला मुंबईत आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. अब्दुललाटसारख्या इवल्याशा गावातला मुलगा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मुंबईसारख्या जगातल्या एका मोठ्या शहरात जाऊन पोहोचला होता. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह कुलभूषण बिरनाळे

मुंबईनंतर कुलभूषणनं पुणे शहरात काम केलं. इतकंच नाही, तर अमेरिका आणि युरोप खंडातील देशांमध्येही जाण्याची संधी त्याला मिळाली. बोइंग, मायक्रोसॉफ्ट, मर्सिडीज, टोयोटा, एअरबस, इन्फोसिस, जनरल मोटर्स अशा आघाडीच्या कंपन्यांमध्ये कुलभूषणनं काम केलं. कुलभूषणचं आपलं स्वतःचं आयुष्य चांगलंच स्थिरावलं होतं; पण मनात कुठेतरी अस्वस्थता होती. जे आपल्याला मिळालं ते अनेकांना मिळत नाही. बुद्धिमत्ता असूनही योग्य संधी, अनुकूल परिस्थिती न मिळाल्यानं अनेकांचं संपूर्ण आयुष्य केवळ गरिबीशी झगडण्यात जातं, या विचारानं कुलभूषण बेचैन होत असे. 



२००५ साली त्यानं आपल्या मनाचा निर्धार केला आणि आता विचार करण्याऐवजी कृती करायला हवी हे त्याच्या मनानं ठरवलं. त्यानं विद्यार्थी विकास प्रबोधिनी नावाच्या संस्थेची नोंदणी केली. ही संस्था स्थापन करण्यामागे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करण्याचा त्याचा उद्देश होता. शालेय वयापासून मुलं तयार झाली, आपल्या ज्ञानानं त्यांची स्पर्धेला तोंड देण्याची तयारी झाली, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला, तर ती जगाच्या पातळीवर कुठेही पोहोचू शकतील, याची कुलभूषणला खात्री होती. 

लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह कुलभूषण बिरनाळे

विद्यार्थी विकास प्रबोधिनीचं काम सुरू झालं. एकीकडे आपली नोकरी आणि एकीकडे संस्थेचं काम ही कसरत पेलत कुलभूषणचा प्रवास सुरू झाला. आपण चांगलं काम करायला लागलो, की अनेकांचे मदतीचे हात लाभतात, याचं प्रत्यंतर कुलभूषणला आलं. ‘इन्फोसिस’च्या सुधा मूर्तींशी संवाद झाल्यानं त्यांनी लगेचच पाच लाखांचा निधी तर दिलाच; पण त्याचबरोबर शाळांना कम्प्युटर्स पुरवले. १४ शाळांमध्ये कुलभूषणच्या पुढाकारानं वाचनालयं सुरू झाली. प्रयोगशाळांचं पुनरुज्जीवन झालं. या प्रयोगशाळांच्या उद्घाटनाला तत्कालीन जिल्हाधिकारी आणि विख्यात साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख स्वतः आले. २००५ ते २००८ अशी तीन वर्षं भुर्रकन कशी उडाली ते कुलभूषणला कळलंच नाही. या दरम्यान कुलभूषणचं लग्न झालं आणि त्याला गोडशी एक मुलगीही झाली होती. 

पुण्यातल्या सिंहगड रस्ता भागात राहत असताना एके दिवशी पहाटे कुलभूषणला जाग आली. त्यानं बाल्कनीतून बाहेर बघितलं, तर रस्त्यावरच्या त्या अंधुक प्रकाशात त्याला कडकलक्ष्मी आपल्या डोक्यावर पाटी घेऊन जाताना दिसली. तिच्याबरोबर तिचा आठ-१० वर्षांचा मुलगा होता आणि तो मुलगा चाबकानं स्वतःच्या अंगावर फटके मारून घेत होता. ते दृश्य पाहताना अंधश्रद्धा, अज्ञान, गरिबी आणि जातिव्यवस्था असे अनेक प्रश्न कुलभूषणच्या मनात फेर धरून नाचू लागले. आज भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाली, तरी आपण या प्रश्नांची सोडवणूक करू शकलो नाही, याची टोचणी त्याच्या मनाला लागली. त्या आसूड ओढणाऱ्या निरागस मुलाच्या जागी त्याला आपली मुलगी दिसू लागली. आपली मुलगी आणि तो मुलगा यांच्यात काय फरक आहे, असं त्याचं मन आक्रोश करत त्याला विचारू लागलं. त्यानंतरचे अनेक दिवस कुलभूषणला रात्री स्वप्नातदेखील चाबकाचे फटकारे आपल्या अंगावर मारून घेणारा तो मुलगा दिसायचा आणि जणू काही तो आपल्याला जाब विचारतोय, असंही त्याला वाटायचं. एके दिवशी कुलभूषणला उमगलं, आपण जे काम करतोय ते खूपच तुटपुंजं आहे. आपण अशा मुलांसाठी काही तरी करायला हवंय.



जात-धर्म सगळं काही बाजूला ठेवून आर्थिक निकष लक्षात घेऊन, ज्यांना कोणाचा आधार नाही अशा मुलांसाठी आपण निवासाची आणि शिक्षणाची व्यवस्था करायला हवी असं कुलभूषणला वाटलं. काम करणाऱ्याच्या समोर अनेक वाटा फुटायला लागतात. त्याचप्रमाणे कुलभूषणला या मुलांसाठी जागा कोणती उपलब्ध होणार, हा प्रश्न समोर येताच अब्दुललाट गावचे पाटील यांनी त्यांचं एक पडीक फार्महाउस कुलभूषणला देऊ केलं. ती वास्तू पडीक असल्यानं त्यात वीज, पाणी, डागडुजी असं सगळंच करावं लागणार होतं. मुळातच कुलभूषणचा स्वभाव तक्रार करण्याचा नसल्यानं त्यानं त्या वास्तूसाठी स्वतःच्या बचतीमधले ५० हजार रुपये खर्च करायचे ठरवले. वाढत वाढत खर्च अडीच लाखांपर्यंत पोहोचला; मात्र काम पूर्ण झालं. राहण्यायोग्य वास्तू तयार झाली. कुलभूषणननं वर्तमानपत्रांत जाहिरात दिली. 



२००९ सालच्या एप्रिल महिन्यापासून कामकाज सुरू झालं. पहिल्या वर्षी सगळा खर्च कुलभूषणनं स्वतःच उचलला. आपण सरकारकडून निधी घ्यायचा नाही, अशी सुरुवातीपासूनच कुलभूषणची भूमिका होती. सरकारी हस्तक्षेप आला, की कामाचा दर्जा काय होतो हे तो बघत होता. ही संस्था लोकसहभागातूनच उभी राहील हे त्यानं ठरवलं. ही संस्था आपली आहे असं लोकांना वाटलं पाहिजे, ही त्यामागची भावना होती. तसंच या संस्थेचं नाव ‘बालोद्यान’ असं ठेवण्यात आलं. बालोद्यान म्हणजे अनाथालय किंवा सहानुभूती दाखवत मुलांना सांभाळणारी संस्था असं न वाटता मुलांना ‘आपलं घर’ वाटलं पाहिजे, ही दक्षता कुलभूषणनं घेतली. या संस्थेत फक्त कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज, शिवाजी महाराज अशा थोरामोठ्यांचेच फोटो लागतील, कितीही काम केलं तरी संस्थाचालकांचे किंवा देणगीदारांचे फोटो लागणार नाहीत, अशीही भूमिका कुलभूषणनं घेतली. कुठल्याही प्रकारचं मानधन संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी घेणार नाहीत, हेही ठरलं; मात्र ‘बालोद्यान’मध्ये काम करणारे शिक्षक, कर्मचारी यांना योग्य पगार मिळालाच पाहिजे, या बाबतीत कुलभूषण आग्रही होता आणि आहे. 



पहिल्या वर्षी सात मुलं संस्थेत दाखल झाली. हळूहळू साताची पंधरा आणि पंधराची पंचवीस करत मुलांची संख्या वाढली. मुलींचेही प्रवेशासाठी अर्ज येऊ लागले. आता पाटलांनी दिलेली जागा अपुरी पडायला लागली होती. नवीन जागा मिळवणं गरजेचं होतं. या सगळ्या काळात कुलभूषणला आयटी क्षेत्रातली व्यग्र ठेवणारी नोकरी आणि ‘बालोद्यान’ची घडी बसवणं ही दोन्ही कामं करताना तारांबळ उडायला लागली. एके दिवशी कुलभूषणनं आपला प्राधान्यक्रम ठरवला आणि त्यात बालोद्यान हे प्रथम क्रमांकावर असल्यानं त्यानं नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या गलेलठ्ठ मिळकतीवर पाणी सोडलं. 



जागेचा प्रयत्न करताना जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी कुलभूषणचा संपर्क येत होता. कोल्हापूरमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी त्यांच्या भेटी होत. या भेटींमधूनच कुलभूषणनं दोन एकर जागेचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. कुलभूषणची कामाची कळकळ देशमुखांना दिसत होतीच. त्यांच्या प्रयत्नांमधून २०१२ साली शासनानं जागा मंजूर केली. याही कामात अनेक अडथळे आले; पण अखेर यश मिळालं. 

शिरीष बेरी यांनी साकारलेला बालोद्यान संस्थेचा आराखडा

कुलभूषणनं विख्यात आर्किटेक्ट शिरीष बेरी यांची भेट घेतली आणि आपलं ‘बालोद्यान’चं स्वप्न त्यांच्यासोबत शेअर केलं. शिरीष बेरींनी कुलभूषणला हवा तसा आराखडा तयार केला आणि इमारतीचं काम सुरू झालं. २५० मुलांसाठीच्या व्यवस्थेप्रमाणे प्रकल्प उभा करायचा ठरलं. सुरुवातीला ५० मुलं सामावली जातील अशा रीतीनं बांधकाम सुरू झालं. २५ डिसेंबर २०१२ रोजी इमारतीची पायाभरणी झाली आणि २०१४ साली इमारत बांधून पूर्ण झाली. या कामासाठी अनेकांचे हात पुढे आले. अनेक लोकांनी आपले आई-वडील हयात असतानाच त्यांच्या नावानं आर्थिक मदत केली. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना सुख आणि समाधान दिलं. काम सुरू असताना कोणी इमारतीचे सगळे लाइट्स देणगी म्हणून दिले, तर कोणी सॅनिटरी सामग्री देऊ केली, कोणी मुलांसाठीचे पलंग आणि टेबल-खुर्च्या दिल्या, तर कोणी आर्थिक बळ दिलं.

एकदा एक बिकट प्रसंग समोर उभा ठाकला. संस्थेवर कर्ज झालं होतं आणि अशा परिस्थितीत एका दानशूर व्यक्तीनं खूप मोठी रक्कम ‘बालोद्यान’ला देणगी म्हणून देण्याची तयारी दाखवली. या देणगीतून अनेक प्रश्न सुटणार होते. सगळं काही ठरलं आणि त्या दानशूर व्यक्तीनं आपल्या घरातल्या एका व्यक्तीचा मोठा फोटो ‘बालोद्यान’च्या दर्शनी भागात लावण्याची मागणी केली. आपल्या नियमांमध्ये ही गोष्ट बसणार नाही हे कळत होतं; पण त्याचबरोबर संस्थेचं कर्जही समोर दिसत होतं. अशा वेळी खूप मोठा पेच समोर होता. अखेर मूल्यांचा विजय झाला. कुलभूषण आणि इतर सहकाऱ्यांनी निर्णय घेतला, ती देणगी नाकारली आणि ‘बालोद्यान’मध्ये तो फोटो लागणार नाही, हे बघितलं. 

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं मार्गदर्शनही लाभतं.

आज ‘बालोद्यान’मध्ये राहणारी मुलं-मुली शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळवताहेत. आपलं घर समजून त्यांचं आपसातलं प्रेम वृद्धिंगत होताना बघायला मिळतं आहे. ‘बालोद्यान’ला बळकट करण्यासाठी आज शेकडो लोकांचे हात आणि शुभेच्छा आहेत. परराष्ट्र खात्याचे मुख्य सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे हेही अब्दुललाट गावचेच. त्यांचं मार्गदर्शन, पाठबळ आणि आधार ‘बालोद्यान’ला मिळतो. डॉ. ज्ञानेश्वर मुळेंबरोबरच अनेक उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार, सामाजिक कार्यकर्ते ‘बालोद्यान’चे हितचिंतक आहेत. 

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं पाठबळही संस्थेला मिळतं.

ड्रेस डिझायनिंगचं प्रशिक्षण असो, की नृत्यकलेचं शिक्षण असो, इथल्या मुलामुलींना लागणारी वैद्यकीय मदत असो किंवा शस्त्रक्रिया असोत, त्या त्या क्षेत्रातली मंडळी आजही इथल्या मुलामुलींना विनामूल्य सेवा पुरवतात आणि समाजाप्रति असलेलं आपलं कर्तव्य निभावतात. 

‘बालोद्यान’मध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक मुलामुलीची कथा हृदयद्रावक, अंतःकरणाला पाझर फोडणारी आहे. कधी संशयातून आपल्याच बायकोचा खून करून तुरुंगात गेलेला नवरा आणि रस्त्यावर आलेली चिमुकली मुलं, तर कधी दारूमुळे वाताहत झालेल्या कुटुंबातली मुलं... या मुलांना ‘बालोद्यान’चं घर मिळालं नसतं, तर ही मुलं कशी शिकली असती, की गुन्हेगारीकडे वळली असती ही कल्पनाच करवत नाही. 



‘बालोद्यान’मध्ये मनोज आणि महादेवी नावाची दोन गोड निरागस मुलं दाखल झाली. मनोज मन लावून शिकत होता आणि यशही मिळवत होता. ‘आयटीआय’चं शिक्षण घेतल्यानंतर मनोजला काम मिळालं. त्यानं आपल्या लहानग्या बहिणीसाठी पहिल्या पगारातून एक भेटवस्तू आणली. महादेवी आपले कान पुढे करून कुलभूषणला आपले कानातले कसे आहेत हे आनंदात विचारू लागली. कुलभूषणनं ‘छान आहेत, अगदी सोन्यासारखे,’ असं म्हणताच, ती ठसक्यात ‘हे सोन्याचेच आहेत’ असं म्हणाली. आणि खरोखरच ते सोन्याचे होते. मनोजचं याही परिस्थितीतलं आपल्या बहिणीबद्दलचं प्रेम त्या भेटवस्तूमधून डोकावत होतं. कुलभूषणचे डोळे भरून आले. 

अनोखी पायाभरणी

ज्या वेळी ‘बालोद्यान’चं पुढच्या टप्प्यातलं मुलींसाठीच्या नियोजित इमारतीचं काम सुरू करायचं ठरलं, तेव्हा या इमारतीची पायाभरणी करण्यासाठी कुलभूषणनं पूजा नावाच्या एका तरुण मुलीला बोलावलं. ही मुलगी कुठली मंत्री-खासदार नव्हती, की कुठल्या मोठ्या पदावर नोकरी करत नव्हती. दहावीत ९१ टक्के गुण मिळवणारी पूजा ही मसनजोगी समाजातली, अठरविश्वे दारिद्याण चा शाप भोगणारी, लोकांच्या दृष्टीनं भुताप्रेतांच्या संगतीत राहणारी, समाजानं अव्हेरलेली मुलगी होती. पूजानं अशा उपेक्षित अवस्थेत जळत्या प्रेतांच्या प्रकाशात अभ्यास करून दहावीत यश मिळवलं होतं. आपल्या इमारतीच्या पायाभरणीसाठी पूजाइतकी योग्य व्यक्ती दुसरी असूच शकत नाही, हे कुलभूषणला उमगलं होतं. अनेक मोठमोठे मान्यवर, हितचिंतक, प्रतिष्ठित मंडळी ‘बालोद्यान’च्या या कार्यक्रमासाठी आली होती. या वातावरणात पूजाच्या हस्ते पायाभरणी होताना बघून तिच्या पालकांचे डोळे मात्र अश्रूंनी काठोकाठ भरले होते. तो सन्मान ‘बालोद्यान’नं तिला आणि तिच्या आई-वडिलांना दिला होता. 



आज अनेक समस्यांना तोंड देत ‘बालोद्यान’ची वाटचाल अव्याहतपणे सुरू आहे. ‘बालोद्यान’नं आसपासच्या परिसरात चांगलं नाव कमावलं आहे. बालोद्यान हा शब्द ऐकताच मदतीचे हात आपोआप पुढे येतात. मुख्य म्हणजे या सगळ्यात ज्याच्या पुढाकारानं हे सगळं घडलं, त्या कुलभूषणचं विशेष कौतुक म्हणजे हे सगळं आपणच केलं असा टेंभा हा तरुण कधीही मिरवत नाही. तो या सगळ्या श्रेयापासून आणि प्रसिद्धीपासून चार हात लांब राहतो. आपला हेतू साध्य होतोय, त्यासाठी श्रेयासाठीची धडपड का करायची, असा त्याचा सवाल असतो. कुलभूषण समोर येत नसल्यानं अनेकदा अनेक लोक ‘बालोद्यान’च्या श्रेयात आपली पोळी भाजून घेतानाही बघायला मिळतात; पण त्यावरही कुलभूषण शांत असतो. आपलं काम करत चालत राहायचं, हेच त्याला ठाऊक आहे. ‘बालोद्यान’चं सगळं श्रेय तो या शेकडो/हजारो हातांना देत असतो. आपल्या उपजीविकेसाठी तो कन्सल्टन्सीचं काम करतोय.



आज कुलभूषण जे काम करतोय, ते काम सरकारनं करायला हवं; मात्र सरकारी यंत्रणेच्या हाती काम गेलं, की बहुतांशी वेळा त्यातून जे परिणाम मिळायला हवेत ते मिळत नाहीत. अनाथ मुलांना आणि रस्त्यावर सोडलेल्या बेवारस वृद्धांना, मानसिक विकारांनी ग्रस्त असणाऱ्यांना आणि वेडा म्हणून लेबल घेऊन रस्त्यानं फिरणाऱ्या असंख्य लोकांना सरकारनं, व्यवस्थेनं आपलं म्हणायला हवंय. त्यांना एक ऊबदार घरटं द्यायला हवंय; पण असं घडताना दिसत नाही. आणि म्हणूनच कुलभूषणसारखे तरुण या समाजात, अशा वंचितांना, दीनदुबळ्यांना, शोषितांना आपलं म्हणून आपल्या बरोबर घेऊन चालतात, तेव्हा ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जे.....’ या पंक्ती सत्यात उतरवणाऱ्या कुलभूषणला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.

संपर्क : कुलभूषण बिरनाळे 
मोबाइल : ९८८१२ ०१२३२
ई-मेल : kkbirnale@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZVVBU
Similar Posts
जिद्दीची वीण घालून ‘तिने’ साकारले स्वप्न! पुणे : मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा लढा सार्थ ठरवला आहे आणखी एका सावित्रीने. शेतमजुरी करून आयुष्य जगणाऱ्या, कुडाच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील सावित्री बाळासो ममदापुरे आज एका मोठ्या टेक्स्टाइल कंपनीत फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे. तिची जिद्द तिला इथपर्यंत घेऊन आली आहे
पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून १०० घरे उभारण्याचा ‘बालोद्यान’चा संकल्प पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून शंभर नवी घरे बांधण्याचा संकल्प मूळचे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचे आणि आता पुण्यात स्थायिक असणारे कुलभूषण बिरनाळे आणि अन्य समविचारी व्यक्तींनी केला आहे.
रुक जाना नहीं, तू कहीं हार के... बीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं
किताबें कुछ कहना चाहती हैं.... ‘मेक इंडिया रीड’ अर्थात अख्ख्या भारताला वाचनाची गोडी लावण्याचं स्वप्न घेऊन अमृत देशमुख नावाचा एक तरुण कार्यरत आहे. वाचलेल्या पुस्तकांचे सारांश तो ‘बुकलेट’ या अॅपद्वारे लाखो लोकांपर्यंत तो मोफत पोहोचवतो. हे सारांश ऑडिओ स्वरूपातही दिले जातात. वाचनामृताची गोडी लावणाऱ्या अमृतची गोष्ट पाहू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या आजच्या भागात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language