Ad will apear here
Next
हरिवंशराय बच्चन, कुंदनलाल सैगल, बेबी शकुंतला


नामवंत हिंदी कवी हरिवंशराय बच्चन, ख्यातनाम गायक कुंदनलाल सैगल आणि जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला यांचा १८ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
.........
हरिवंशराय बच्चन
२७ नोव्हेंबर १९०७ रोजी हरिवंशराय बच्चन यांचा जन्म झाला. हरिवंशराय बच्चन यांनी १९३८मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एमए केले आणि १९५२पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. १९५२मध्ये ते इंग्लंडमध्ये केम्ब्रिज विश्वविद्यालयात अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर त्यांना भारत सरकारने नियुक्त केले. १९२६मध्ये हरिवंशराय यांनी श्यामा यांच्याशी लग्न केले. त्यांच्या निधनानंतर १९४१मध्ये बच्चन यांनी सूरी यांच्याशी विवाह केला. हरिवंशराय बच्चन काही काळ राज्यसभेचे मानद सदस्य होते. हरिवंशराय यांना १९७६मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. १९६९मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

त्यांच्या सुरुवातीच्या काळातील ‘उमर खय्याम’ ही कविता खूप प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध ‘मधुशाला’ ही रचना त्यांनी ‘उमर खय्याम’नंतर प्रेरित होऊन लिहिलेली आहे. ‘मधुशाला’मुळे हरिवंशराय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. हरिवंशराय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ रोजी निधन झाले.
.........
कुंदनलाल सैगल
११ एप्रिल १९०४ रोजी कुंदनलाल सैगल यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. ती सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपारिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जालंधर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले.

गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सैगल यांना सलमान युसूफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले नाही. गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. अर्थार्जनासाठी त्यांनी काही काळ रेल्वेत टाइमकीपरची नोकरी केली. पुढे रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे काम त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. १९३१ साली कोलकात्यात असताना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायली.

त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन. सरकार यांनी सैगल यांना ‘न्यू थिएटर्स’साठी करारबद्ध केले. १९३२मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा व जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत; मात्र १९३३मध्ये पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर. सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेली भजने लोकप्रिय ठरली. चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी. सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका व गाणी अत्यंत गाजली व त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील ‘बालम आवो बसो मोरे मन में’ व ‘दुख के अब दिन बीतत नही’ यांसारखी त्यांची गाणी अजरामर ठरली.

सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व ‘न्यू थिएटर्स’निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या. तसेच तीस बंगाली गीते गाऊन बंगाली रसिकांची वाहवा मिळवली. ‘न्यू थिएटर्स’ची निर्मिती असलेले सैगल यांचे यशस्वी चित्रपट असे - दीदी (१९३७; हिंदी आवृत्ती प्रेसिडेंट); देशेर माटी (१९३८; हिंदी आवृत्ती धरती माता); साथी (१९३८; हिंदी - स्ट्रीट सिंगर); जीवनमृत्यू (१९३८; हिंदी - दुष्मन) इत्यादी. त्याचबरोबर ‘एक बंगला बने न्यारा’ (प्रेसिडेंट), ‘आस निरास भई’ (दुष्मन), ‘सो जा राजकुमारी सो जा’ (जिंदगी, १९४०), ‘बाबूल मोरा’ (स्ट्रीट सिंगर) इत्यादी गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली.

भारतीय चित्रपट-संगीताचा वारसा समृद्ध करणारी अनेक गीते सैगल यांनी गायली. १९४०पर्यंत सैगल ‘न्यू थिएटर्स’मध्ये होते. या काळात बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक अजरामर गाणी सैगल यांनी गायली. सैगल १९४१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत आले व ‘रणजित मूव्हीटोन ‘ या चित्रपटनिर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. त्यांपैकी भक्त सूरदास (१९४२) व तानसेन (१९४३) हे चित्रपट खूप गाजले. तानसेनमधील ‘दिया जलाओ’ हे शुद्ध कल्याण रागात त्यांनी गायलेले गीत अविस्मरणीय ठरले. ‘न्यू थिएटर्स’च्या मेरी बहना (१९४४) या चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ व ‘ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे’ ही त्यांची गाणीही लोकप्रिय होती.

सैगल यांचा ‘शाहजहाँ’ हा चित्रपट १९४६मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील ‘गम दिए मुत्त किल’, ‘जब दिल ही टूट गया’ यांसारखी दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. परवाना (१९४७) हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला. सैगल यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गीत भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयाला भिडत. सैगल यांच्या गायकीवर शास्त्रशुद्ध गायकीचेही संस्कार झाले होते. उस्ताद फैयाज खाँ यांची तालीमही काही दिवस त्यांना मिळाली होती. सैगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले. गझला, भजने, ठुमरी, अंगाईगीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने व सफाईने गायिली. गझल व भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार.

‘चाह बरबाद करेगी ‘(शाहजहाँ), ‘ऐ कातिब-ऐ तकदीर’ (मेरी बहना) या त्यांच्या दर्जेदार गझला, तसेच ‘राधेरानी देय डालो ना’ (पूरन भगत), ‘जीवन का सुख आज प्रभू मोहे’ (धूप छाँव) व ‘मैंया मोरी मैं नही माखन खायो’ (भक्त सूरदास) ही त्यांनी गायलेली भजने अविस्मरणीय ठरली. त्यांनी गायलेले ‘सो जा राजकुमारी’ हे अंगाईगीत, तसेच ‘बाबुल मोरा’ ही भैरवीतल्या करूण स्वरांनी बांधलेली रचना यांचाही समावेश त्यांच्या उत्कृष्ट गीतांत केला जातो. मुकेश, महंमद रफी या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगल यांच्या गायनशैलीचा प्रभाव होता. सैगल यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ३६ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी २८ हिंदी वा उर्दू, सात बंगाली व एक तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण १८५ गाणी गायली. त्यांतील १४२ चित्रपटगीते व ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इत्यादी) गीते होती.

बी. एन. सरकार यांनी सैगल यांच्या जीवनावर आधारित ‘अमर सैगल’ हा अनुबोधपट १९५५मध्ये प्रदर्शित झाला. सैगल कीर्तीच्या शिखरावर पोहोचले. तरीही डोक्यात हवा न जाता नम्र आणि साधेच राहिले. एकदा त्यांचा चाहता मुलीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आला. परिस्थितीने गरीब होता. त्याची इच्छा होती, की सैगल साहेबांनी मुलीला लग्नात आशीर्वाद द्यावेत. सैगल साहेबांनी होकार दिला. त्याचदिवशी एका धनिकाने खासगी मैफलीला बोलावले. दहा हजार रुपये बिदागी देण्याचे प्रलोभन दाखवले; पण ते आमंत्रण सैगलनी नाकारले. त्या गरीब चाहत्याच्या मुलीच्या लग्नाला गेले. तिथे बसायला खाटसुद्धा नव्हती. सैगल आनंदाने जमिनीवर बसले. आशीर्वाद दिलेच; शिवाय आपल्या गायनाने जमलेल्यांना आनंदही दिला.

कुंदनलाल सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.

लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात -

तुझ्याच कंठामध्ये अवचित

मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनि

बुलबुल बसले बनात रुसुनि

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते -

अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,

घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..
..........

बेबी शकुंतला
१७ नोव्हेंबर १९३२ रोजी बेबी शकुंतला यांचा जन्म झाला. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़. हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. त्यांचे वडील छापखान्यात नोकरीला होते. प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे बेबी शकुंतला सिनेमात आल्या.

१९५४ साली गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणारी पहिली मराठी अभिनेत्री बेबी शकुंतला अशी ओळख होती. प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभिनय कारकिर्दीस १९४२मध्ये सुरुवात झाली़. त्यानंतर १९४४मध्ये ‘रामशास्त्री’ या चित्रपटात त्यांनी काम केले़. त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़. बेबी शकुंतला यांनी ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांत अभिनय केला आहे. भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, बिमल रॉय आणि बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांत बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनयक्षमतेचा सन्मान करणारी होती. रामशास्त्री, शारदा, मायाबाजार, मायबहिणी, सौभाग्य या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.

बेबी शकुंतला यांच्या ‘अबोली’ आणि ‘चिमणी पाखरे’ या चित्रपटांतील भूमिका अविस्मरणीय आहेत. पी. एल. अरोरा यांनी काढलेल्या ‘परदेस’मध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या. किशोरकुमारची नायिका म्हणून त्या ‘फरेब’ आणि ‘लहरें’मध्ये चमकल्या. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्षे चित्रपटसृष्टी गाजवीत राहिल्या असत्या; पण सुमारे १०० चित्रपटांत कामे करून त्यांनी विवाहानंतर वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी चित्रपट संन्यास घेतला. बेबी शकुंतला यांचे निधन १८ जानेवारी २०१५ रोजी झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZOUCI
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
रामदास पाध्ये, हंसा वाडकर, सुभाष घई, जे. ओमप्रकाश बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, मराठी अभिनेत्री-नृत्यांगना रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर, राज कपूरनंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते जे. ओमप्रकाश यांचा २४ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
डॉ. सतीश धवन, अरविंद देशपांडे, जॉय अॅडम्सन नामवंत अंतराळशास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन, ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे आणि वन्यजीवनाबद्दल लेखन करणाऱ्या लेखिका जॉय अॅडम्सन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
प्रा. मधू दंडवते, शांताराम आठवले समाजवादी नेते, अर्थतज्ज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते आणि नामवंत साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले यांचा २१ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language