१५ हजार पृष्ठांइतकी विपुल साहित्यनिर्मिती करणारे साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि आपल्या अष्टपैलू समीक्षेने ओळखले जाणारे प्राध्यापक डॉ. रा. ग. जाधव यांचा २४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय................................
नरसिंह चिंतामण केळकर
२४ ऑगस्ट १८७२ रोजी पंढरपूर तालुक्यातल्या मोडनिंब गावी जन्मलेले न. चिं. केळकर यांना अवघं जग ओळखतं ते ‘साहित्यसम्राट’ या उपाधीनं! कथा, कादंबरी, इतिहास, निबंध, चरित्रलेखन, तत्त्वज्ञान, नाटकं असं विपुल साहित्यलेखन त्यांनी केलं, ज्याची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या घरात जाते.
१९२१ सालच्या बडोद्याला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. टिळक तुरुंगात असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतर ‘केसरी’ची पूर्ण जबाबदारी केळकरांनी यशस्वीपणे सांभाळली होती. टिळकांचं पहिलं चरित्र त्यांनीच लिहिलं होतं. अॅनी बेझंट यांच्यासह टिळकांनी स्थापन केलेल्या ‘होमरूल लीग’मध्येही त्यांचं योगदान होतं.
अमात्य माधव, कृष्णार्जुनयुद्ध, कोकणचा पोर, चंद्रगुप्त, तोतयाचे बंड, बलिदान, भारतीय तत्त्वज्ञान,
मराठे व इंग्रज, लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), वीर विडंबन, संत भानुदास, समग्र केळकर वाङ्मय - खंड १ ते १२, सरोजिनी, हास्य विनोद मीमांसा, कृष्णार्जुन युद्ध, गतगोष्टी अर्थात माझी जीवनयात्रा, भारतीय तत्त्वज्ञान, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
१४ ऑक्टोबर १९४७ रोजी त्यांचं पुण्यात निधन झालं.
................
प्रा. रावसाहेब गणपतराव जाधव
२४ ऑगस्ट १९३२ रोजी बडोद्यामध्ये जन्मलेले रा. ग. जाधव हे प्रख्यात अष्टपैलू समीक्षक! ते स्वतः अभ्यासू प्राध्यापक होते आणि समीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.
त्यांनी मराठी विश्वकोशाच्या प्रकल्पात मोठं योगदान दिलं. २००४ सालच्या औरंगाबादमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, तसंच टागोर वाङ्मय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
२७ मे २०१६ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.