Ad will apear here
Next
काय डेंजर वारा सुटलाय!
अलीकडच्या काळातील प्रयोगशील नाट्यलेखकांपैकी असलेल्या जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाने अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाट्यलेखन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले होते. या नाटकाचे हे दीर्घ समीक्षण तीन भागांत प्रसिद्ध करत आहोत. त्याचा हा पहिला भाग...
............

काय डेंजर वारा सुटलाय!’ हे नाटक जयंत पवार यांचे असून, ते २०११मध्ये ‘पॉप्युलर प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग नाट्यसंहिता प्रकाशित होण्यापूर्वी म्हणजेच २९ जुलै २०१० रोजी झाला. हे नाटक ‘महाराष्ट्र रंगभूमी’ या संस्थेतर्फे ‘गडकरी रंगायतन’ ठाणे येथे सादर करण्यात आले आणि ते अनिरुद्ध खुटवड यांनी दिग्दर्शित केले होते.

‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटक दोन अंकी असून, नाटकाची भाववृत्ती शोकात्म आहे आणि त्याचा विषय, आशय हा सामाजिक-राजकीय असा मिश्र स्वरूपाचा आहे. प्रस्तुत नाटकात दाभाडे हे पात्र मध्यवर्ती असून, त्याची बायको, त्याचा मुलगा बंटी व त्याची मुलगी चिंगी ही एका कुटुंबातील पात्रे आहेत आणि डॉक्टर, गृहस्थ (उद्योगपती) कशाळकर, मुख्यमंत्री, इन्स्पेक्टर, पुरुष-१, पुरुष-२, मुन्ना, स्त्री, हवालदार, भाईचा माणूस, बाजी प्रभाकर देशपांडे, नाडकर्णी, गुप्ते इत्यादी कुटुंबाबाहेरील पात्रे आहेत.

प्रस्तुत नाटकात मध्यमवर्गीय ‘मराठी’ माणसाची, तसेच सर्वसामान्य गरीब माणसाची मुंबईसारख्या शहरात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, बिल्डर, उद्योगपती व राजकीय शक्ती यांच्या वर्चस्वापुढे चाललेली केविलवाणी धडपड, तसेच त्यांच्यावर होत असलेले अन्याय या वास्तवाचे व सद्य:स्थितीचे दर्शन घडते. राजकारणी, बिल्डर लॉबी आणि उद्योगपती या त्रिसूत्रीभोवती हे नाटक गुंफलेले आहे. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरण व जागतिकीकरण यामुळे मुंबई शहराचा कायापालट किंवा विकास करण्यासाठी येथील मध्यमवर्गीय व निम्नवर्गीय यांना हटवण्याचा चंगच या शक्तींनी मांडलेला दिसतो. हेच वास्तव जयंत पवार यांनी आपल्या ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या नाटकात कल्पकतेच्या पातळीवर मांडलेले आहे. 

‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या नाटकाच्या पहिल्या अंकाची सुरुवात ‘बिल्डररत्न’ अॅवॉर्डच्या एका मेगा इव्हेंटने होते. तसेच दुसऱ्या अंकाची सुरुवातही इव्हेंटच्या पुढे चालू ठेवण्याने आणि नाटकाचा शेवट अॅवॉर्ड प्रदान करण्याच्या इव्हेंटने होतो. नाटकाच्या दोन्ही अंकांत एकूण सात इव्हेंट रंगमंचावरील पडद्यावर दृश्यांकित होतात. प्रस्तुत इव्हेंटमागील राजकारणमिश्रित सामाजिक वास्तवसंदर्भ प्रत्यक्ष रंगमंचावर अभिनीत होतात. प्रस्तुत इव्हेंट प्रत्यक्षात होण्यामागील घटनांचे दृश्यांकित होत जाणे म्हणजेच ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ हे नाटक होय.

जयंत पवारनाटककार जयंत पवार यांनी ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकात सभोवतालच्या वास्तवाच्या आंतरिक व बाह्य अशा दुहेरी बाजू अधिक ठसठशीत करण्यासाठी नाट्यसादरीकरणात अनेक तंत्रे वापरली आहेत. रंगमंचावरील पहिला प्रसंग स्क्रीनवर (पडद्यावर) दृश्यमान होतो. हा प्रसंग ‘बिल्डररत्न’ अॅवॉर्डचे लाइव्ह प्रसारण असते. एका अर्थी हे प्रसारण घरोघरी चॅनेलमार्फत पोहोचलेले असते. त्याचा अनुभव घरोघरचे प्रेक्षक नि:संदर्भपणे घेत असताना नाट्यगृहातील प्रेक्षक त्याचा संदर्भ दुहेरी अनुभव घेत असतो. याचा अर्थ घरोघरचा प्रेक्षक ‘बिल्डररत्न’ अॅवॉर्ड निर्मितीमागील राजकारणापासून अनभिज्ञ असतो. याउलट नाट्यगृहातील प्रेक्षक आभासी सत्य (इव्हेंट) आणि वास्तव सत्य (दाभाडे व त्याच्या कुटुंबाची केली गेलेली वाताहत) या दोहोंचा भयकारी अनुभव घेतो. नाटककार ‘मुंबई’ या एकेकाळच्या औद्योगिक शहराचे सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात होत असलेले रूपांतरण आणि त्यामागील प्रसंगी हिंसेचा, दहशतीचा पाठपुरावा करणारे राजकारण एकसमयावच्छेदेकरून अभिव्यक्त करण्यासाठी दोन माध्यमांचा वापर करून घेतो. ‘इव्हेंट’मध्ये असलेले भव्यदिव्यपण, तेथील नखरेबाजपणा व आभासी सत्याची सुंदरतेखाली दडवलेली उग्रता रंगमंचावर प्रभावीपणे कदाचित अभिनीत होऊ शकली नसती. म्हणूनच नाट्यगत घटनांशी समांतर असलेला इव्हेंट पडद्यावर दाखवणे अपरिहार्य ठरते.

सर्वसाधारणपणे १९८०च्या दशकापासून भारतीय नागरिकाचे सामाजिक जीवन आणि राजकीय जीवन यामधील सीमारेषा इतक्या धूसर झालेल्या आहेत, की जवळजवळ प्रत्येक नागरिकाचे सामाजिक जीवन राजकारणाने प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे बाधित होऊन झाकोळून गेलेले आहे; याचा प्रत्यय प्रेक्षकांना प्रभावीपणे करून देण्यासाठी नाटककार एकमेकांशी साम्य-विरोधात्मक नाते असलेल्या माध्यमाचे उपयोजन करताना दिसतो. एका परीने नाटककार माध्यमांची स्वविशिष्टता बाधित करू पाहतो, असे म्हणता येते.

निवेदक, बबन येलमामे, हवालदार ही पात्रे नाट्यगत वास्तवात वर्तमानातील पात्रे आहेत आणि त्याउलट दाभाडेसह अन्य सर्व संबंधित पात्रे ही भूतकालीन कालावकाशातील पात्रे आहेत. याचा अर्थ दाभाडेंच्या आयुष्यातील नाट्य फ्लॅशबॅक तंत्राने अभिनीत होते. त्यामुळे नाट्यगत वास्तवही दुहेरी पातळीवर राहाते. एक वास्तव दाभाडे या पात्राशी संबंधित, तर दुसरे वास्तव बबन येलमामेशी संबंधित आहे. हक्काचे, कायदेशीर घर असलेल्या दाभाडेचा आणि हक्काचे छत्र नसलेल्या, स्थलांतरित बबन येलमामेचा जो ‘स्व’ अस्तित्व टिकवण्यासाठी लढा चालू आहे, तो या दोघांना (भूतकालीन व वर्तमानकालीन पात्रांना) एका समान पातळीवर घेऊन येतो. राजकारण व अर्थकारण यांच्या महायुतीमुळे निर्माण झालेल्या एका नव्या छुप्या, पण भयंकर संघर्षाचा अनुभव ही दोन्ही पात्रे देतात आणि ती एकाच काळातील नसल्यामुळे या संघर्षामागील दीर्घ कालावकाशाला ही दोन्ही पात्रे एकाच ‘वर्गा’तील नसूनही अधोरेखित करतात.

‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाच्या रंगमंचीय अवकाशात दाभाडे या पात्राच्या विशिष्ट जीवननाट्य सादरीकरणाला दीर्घ कालावकाश प्राप्त झाला आहे आणि बबन येलमामेच्या जीवनसंघर्षनाट्याला कमी कालावकाश प्राप्त झाला आहे. कालावकाशाच्या व्याप्तीचा विचार करताना प्रस्तुत नाटकात दाभाडेंचे विशिष्ट जीवननाट्य हे मुख्य कथानकात मोडते, तर बबन येलमामेच्या जीवननाट्याकडे उपकथानक म्हणून पाहाता येते. बबन येलमामे हे पात्र पहिल्या अंकात तीन, तर दुसऱ्या अंकात चार मिळून सात छोट्या-छोट्या दृश्यांमध्ये प्रेक्षकांसमोर येते. हे पात्र नाट्यगत वास्तवाच्या वर्तमानातील असल्यामुळे त्याचा संवाद आरंभी अनोळखी असलेल्या निवेदकाशी आणि विशिष्ट प्रसंगी हवालदाराशी होताना दिसतो. बबन येलमामेचा, त्याची विशिष्ट भाषा आणि त्याचा आविर्भाव यांसह होणारा प्रवेश हा वरकरणी विनोदाची निर्मिती करू पाहात असला, तरी या प्रवेशातील सदर तीन पात्रांचे वेगवेगळ्या घटनेतील संवाद मात्र जीवनातील गांभीर्य अधोरेखित करतात. परिणामी, नाटकाची भाववृत्ती शोकात्म असल्याचे ठळक होत जाते. वेगवेगळ्या ‘वर्गा’मधील पात्रांचे स्व-अस्तित्वासाठी धडपडणे प्रेक्षकांना गंभीर राहण्यास आणि शोकात्म ताण सोसण्यास भाग पाडते. ‘आनंद व बोध’ देणे हे नाटकाचे मुख्य प्रयोजन परंपरेतून चालत आलेले आहे. प्रस्तुत नाटकाचा प्रयोग पाहताना प्रेक्षकास आनंद होणे शक्य नाही; पण त्यातून प्रकटणारा जो नाट्यार्थ आहे तो नाटककाराची समकालीन कनिष्ठ व मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांशी असलेली बांधिलकी दाखवून देत आहे. त्यामुळे प्रस्तुत नाट्यार्थ प्रेक्षकास ‘आनंद’ देऊ शकतो. परंपरेतून चालत आलेल्या प्रयोजनासंदर्भातील या प्रकारचा प्रेक्षकानुभव अपरिचित व अनोखा म्हणायला हवा. 

- गौतम गमरे

या समीक्षणाचा दुसरा भाग : निवेदक पात्र उमटवते ठसा

..................

रंगवाचा त्रैमासिक
काय डेंजर वारा सुटलाय’ या जयंत पवारलिखित नाटकाचे हे समीक्षण ‘रंगवाचा’ या केवळ रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या फेब्रुवारी २०१७च्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘रंगवाचा’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. रंगभूमीशी संबंधित वैविध्यपूर्ण विषय या अंकात समाविष्ट असतात. एक हजार रुपये भरून या अंकाचे आजीव पालक होता येते. या अंकातील निवडक लेख दर पंधरा दिवसांनी, शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचता येतील. 

संपर्क : वामन पंडित, संपादक (रंगवाचा) - ९४२२० ५४७४४. 
वेबसाइट : http://www.acharekarpratishthan.org/
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZFXBC
Similar Posts
पात्रांच्या संघर्षकाळाची व्यामिश्र गुंफण ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या नाटकात दोन पात्रांच्या संघर्षाच्या काळाची झालेली व्यामिश्र गुंफण नाट्यकथानकाला कलात्मता व सौंदर्यात्मता प्राप्त करून देते. जयंत पवार यांनी लिहिलेल्या या पारितोषिकप्राप्त नाटकाच्या दीर्घ समीक्षणाचा हा तिसरा भाग...
निवेदक पात्र उमटवते ठसा राजकारणी उद्योजक व बिल्डर यांचे असलेले घनिष्ठ संबंध, सर्वसामान्यांविषयी दाखवली जाणारी खोटी सहानुभूती या बाबींचे दर्शन ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकातून घडवले गेले आहे. जयंत पवार यांनी लिहिलेल्या या पारितोषिकप्राप्त नाटकाच्या दीर्घ समीक्षणाचा हा दुसरा भाग...
‘मी डेअरिंग करतो, रिस्क घेतो, म्हणून माझं नेपथ्य वेगळं’ ‘रंगवाचा’च्या संपादक मंडळाने ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांच्या घेतलेल्या विशेष मुलाखतीचा हा तिसरा भाग...
माणूसपणाच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न करणारं नाटक नाटक हे आपल्या भवताली जे जे पेरलं, उगवलं जातं त्याचा परिपाक असतं. मनस्विनीचं ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक आपल्याला असाच काहीसा अनुभव देण्याचा प्रयत्न करतं. ते उसन्या कथेवर बेतलेलं, बेगडी तत्त्वज्ञान सांगणारं, पुस्तकी शिकवण देणारं गोड गोड नाटक नाही. या नाटकाच्या रसास्वादाचा हा दुसरा भाग.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language