Ad will apear here
Next
‘सांगत्ये ऐका’च्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने...
एकाच थिएटरमध्ये १३० आठवडे मुक्कामाचा उच्चांक करणारा चित्रपट
काही चित्रपट आपल्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. ते कितीही वेळा पाहिले, तरी नव्यानं आनंद देतात. मराठीतला असाच एक विलक्षण लोकप्रिय, १३० आठवडे सलग एकाच ठिकाणी चालण्याचा उच्चांक निर्माण करणारा चित्रपट म्हणजे ‘सांगत्ये ऐका’. १९५९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं ६१ वर्षं पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने, ‘किमया’ सदराच्या आजच्या भागात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर लिहीत आहेत त्या चित्रपटाबद्दल आणि काही गमतीशीर आठवणींबद्दल...
.............. 
‘युद्धस्य कथा रम्या’ असं म्हणतात. त्याच चालीवर ‘चित्रस्य कथा रम्या’ म्हटलं तर योग्यच ठरेल. चित्रपटांची निर्मिती, नट-नट्या यांच्याविषयी वावड्या, चित्रपटाचे यशापयश यांविषयी आपल्याला ऐकायला-वाचायला आवडतं. भाषा कुठलीही असो, काही चित्रपट आपल्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. ते कितीही वेळा पाहिले, तरी नव्यानं आनंद देतात. मराठीतला असाच एक विलक्षण लोकप्रिय, १३० आठवडे सलग एकाच ठिकाणी चालण्याचा उच्चांक निर्माण करणारा चित्रपट म्हणजे ‘सांगत्ये ऐका’. सन १९५९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं ६० वर्षं पूर्ण केली आहेत. त्यातल्या ‘बुगडी माझी सांडली गं’ गाण्यानं प्रेक्षक वेडे झाले. अजूनही त्याची गोडी तशीच टिकून आहे. तशी ‘सांगत्ये ऐका’तली सगळीच गाणी सुंदर आहेत.

हा चित्रपट अनेक वेळा बघून झाला. त्याच्या अनेक आठवणी आहेत. नुकताच मुलीकडे दुबईला महिनाभर मुक्काम होता. तिथे ‘गेम ऑफ थ्रोन्स’सह अनेक इंग्रजी-हिंदी चित्रपट आणि मालिका बघितल्या. एक दिवस घरी मराठी मंडळी जमली असताना मुद्दाम ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट लावला. जमलेल्या लोकांना त्याची माहिती होती; पण तो कोणी पाहिलेला नव्हता. ‘प्रिंट’ एकदम कोरी करकरीत होती. मीही बऱ्याच वर्षांनी तो पाहिला. किती उच्च दर्जाची निर्मिती! कृष्णधवल असूनही त्याचं चित्रीकरण, पटकथा-संवाद, दिग्दर्शन, अभिनय याला तोडच नाही. एखादा चित्रपट पाहिल्यानंतर मध्ये काही काळ गेला की पुन्हा तो आवडतोच असं नाही. आपण मधल्या काळात खूप काही वाचलेलं, पाहिलेलं असतं. परंतु ‘सांगत्ये ऐका’ खरोखरच सदाबहार (Joy for Ever) आहे! बाकीच्या लोकांनाही, बळंच का होईना, एक चांगला चित्रपट बघायला मिळाला. त्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद दिले. ‘गेम ऑफ थ्रोन्स’प्रमाणे ‘सांगत्ये ऐका’ला ‘गेम ऑफ पाटील इन ए व्हिलेज’ असं इंग्रजीत म्हणता येईल. जुने निवडक मराठी चित्रपट पुन:पुन्हा बघण्याची मजा काही वेगळीच आहे. त्याला काळाचा अडसर नाही.

इयत्ता आठवी झाली, तेव्हा मी ‘सांगत्ये ऐका’ पहिल्यांदा पाहिला. तोपर्यंत वर्षाला २-३ चित्रपट बघण्याची प्रथा होती. तिकिट फक्त पाच आणि १० आणे असायचं. तरी तेवढी ‘उधळपट्टी’सुद्धा चालत नव्हती. चित्रपटांची आवड तर विलक्षण निर्माण झालेली होती. ‘सांगत्ये ऐका’ बघितला तर पाहिजेच. सहजासहजी परवानगी मिळणार नव्हती. मग एक ‘योजना’ करावी लागली. म्हणजे साधीच, पण यश मिळेल अशी. पुण्यातील आता अनेक वर्षे बंद असलेल्या ‘भानुविलास’ टॉकीजजवळ शंकर भट नावाचा मित्र भेटला. आम्ही भरत नाट्यमंदिराजवळ राहत होतो. मी त्याला म्हणालो, ‘तू पुढे आमच्या घरी जा. आईला सांग की तू आणि तुझा भाऊ ‘सांगत्ये ऐका’ बघायला जाणार आहोत. रवीला पाठवता का?’ आई ‘हो’ म्हणेल याची मला खात्री होती. तसंच झालं. मी आणि माझा लहान भाऊ आणि ते भट बंधू विजयानंद टॉकीजकडे रवाना झालो. पाच आण्यांसाठी रांग लावायला अरुंद लाकडी पिंजरे होते. हळूहळू पुढे सरकत, दिशा बदलत खिडकी गाठायची. हातात तिकिटं पडली की अत्यानंद व्हायचा. हल्ली तो मिळत नाही. गेल्या गेल्या आपण खिडकीशी पहिलेच असतो. तर अशा रीतीने त्या वेळी ‘सांगत्ये ऐका’ पहिल्यांदा बघून भारलेल्या अवस्थेत बाहेर पडलो. वय तेरा, म्हणजे फार लहानही नव्हतो.

‘चेतना चित्र’ने बनवलेल्या त्या चित्रपटामधील सर्वच कलाकार कसलेले, मुरलेले होते. दिग्दर्शक अनंत माने अत्यंत प्रसिद्ध; पटकथा-संवाद व्यंकटेश माडगूळकर; गीते गदिमा; नायिका म्हणून देखण्या जयश्री गडकरचं पदार्पण; चंद्रकांत, सूर्यकांत, दादा साळवी, वसंत शिंदे हे त्या काळातले आघाडीचे कलाकार; सुलोचना आणि हंसा वाडकर यांच्याबद्दल काय बोलायचं! सुलोचनाबाई तर अजूनही कार्यक्रमांना उपस्थित असतात. ‘सांगत्ये ऐका’ याच नावाचं हंसाबाई वाडकरांचं चरित्र खूपच गाजलेलं आहे. एका स्त्री-कलाकाराला जीवनात काय-काय भोगावं लागलं, याची ती कहाणी आहे. चित्रपटाची ‘वन लाइन स्टोरी’ अशी : दादा साळवी एका गावचे पाटील. मुळात चांगले, पण पैसा आणि सत्तेमुळे ‘अंध’ झालेले. बैलगाड्यांच्या शर्यतीवरून चंद्रकांतबरोबर (एक शेतकरी) भांडण होते. पाटील त्याचा काटा काढतात. त्याची बायको-सुलोचना हिला आपल्या वाड्यात आश्रय देतात. पुढे बायको एकदा माहेरी गेली असताना सुलोचनाची अब्रू लुटतात. ती बिचारी वणवण फिरत असताना हंसा वाडकरच्या आश्रयाला जाते. हंसाचा तमाशाचा फड. सुलोचनाला दिवस गेलेले. तिला मुलगी होते; पण त्यातच आई मरते. ती मुलगी मोठी होते (जयश्री गडकर), नाचगाणं शिकते, फडावर उभी राहते. त्यांचे वग आणि गाणी खूपच लोकप्रिय ठरतात. इकडे पाटलाचा मुलगा तरुण होतो (सूर्यकांत). त्याचं लग्न झालेलं असतं; पण त्याला तमाशाची आवड. जयश्री गडकरकडे तो आकर्षित होतो. ते सावत्र बहीण-भाऊ असल्याचं हंसा वाडकर जाणून होती; पण बोलत नाही. तिला पाटलाचा सूड घ्यायचा असतो. वसंतराव पहिलवान चित्रपटात एक रामोशी आहे. हंसा त्याला भाऊ मानत असते. त्याचंही पाटलाशी वैर. शेवटी हंसा पाटलाची कृष्णकृत्यं आपल्या वगातून सांगायचं ठरवते. पाटील तिथे बंदूक घेऊन येतात. रामोशीसुद्धा तुरुंगातून सुटून कुऱ्हाड घेऊन येतो. त्याची कुऱ्हाड पाटलाच्या छातीचा आणि पाटलाची गोळी रामोश्याच्या छातीचा वेध घेते. सूड पूर्ण होतो. जयश्री आणि सूर्यकांतला ते बहीण-भाऊ असल्याची माहिती मिळते आणि ती भावाला अखेरीस राखी बांधते. (‘वन लाइन स्टोरी’ इतक्या ओळींची असते.)

चित्रपटाचं संगीत अप्रतिम आहे. संगीतकार वसंत पवार यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य गोड गाणी दिलेली आहेत. ‘धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा’, ‘झाली भली पहाट’, ‘सांगा ह्या वेडीला’, ‘दिलवरा दिल माझे ओळखा’, ‘काल रात सारी मजला झोप नाही आली’ आणि सर्वांत लोकप्रिय म्हणजे ‘बुगडी माझी सांडली गं.’ राम कदम हे वसंत पवारांचे सहायक होते. ‘बुगडी’च्या संगीतात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, असं म्हणतात. ‘सांगत्ये ऐका’पासून तमाशापटांचं एक नवीन युगच सुरू झालं. ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘एक गाव बारा भानगडी’ आणि इतर बरेच. ‘सांगत्ये ऐका’च्या आधी ‘पुढचं पाऊल’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘जय मल्हार’ हे तमाशावरचे चित्रपट येऊन गेले होते; परंतु ‘सांगत्ये ऐका’चं यश नेत्रदीपक ठरलं. ‘जय मल्हार’मध्ये ललिता पवार नायिका होती, हे बहुतेकांना माहीत नसेल. संगीतकारांमध्ये तीन ‘वसंतां’नी अवीट गोडीची गाणी देऊन आपल्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत. वसंत पवार, वसंत देसाई आणि वसंत प्रभू. त्या वेळी मानधनसुद्धा अत्यंत कमी असे. आता संगीतकार एक-दोन कोटी रुपये घेतात. जुन्या जमान्यात ‘घरचे रेशन भरणे’ असे मानधनसुद्धा असे. काही कथा तर इतक्या विचित्र आहेत, की त्यांचा उल्लेख न केलेला बरा!

‘सांगत्ये ऐका’मधले सगळेच कलाकार समर्थ अभिनेते होते. प्रेक्षकांना चांगले चित्रपट देणे, हेच त्यांचे ध्येय असे. ‘प्रभात स्टुडिओ’ (पुणे) आणि कोल्हापूरला भालजींचा ‘जयप्रभा स्टुडिओ’ हे त्यासाठी प्रसिद्ध होते. कलाकरांना मासिक पगार देण्याची पद्धत त्या वेळी होती. महिना २००, ५०० आणि एक हजार याप्रमाणे योग्यतेनुसार पगार मिळे. चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना, हंसा वाडकर यांनाही तसेच मानधन मिळे.

चंद्रकांत यांच्या संदर्भातील एक मजेशीर गोष्ट इथे सांगावीशी वाटते. त्यांनी हिंदी चित्रपटातही पौराणिक, ऐतिहासिक भूमिका केल्या होत्या. त्यासाठी मुंबईला जावं लागे. अगदी सुरुवातीला त्यांनी ‘रामराज्य’मध्ये रामाची भूमिका केली होती. त्यासाठी बोलणी करायला निर्माते पुण्याला आले. मला वाटतं, ‘पूना गेस्ट हाउस’मध्ये त्यांची चंद्रकांत यांच्याबरोबर भेट झाली. त्या वेळी, समजा, चंद्रकांतना महिना एक हजार रुपये मिळत होते. एका मित्राला बरोबर घेऊन ते ‘वाटाघाटी’साठी गेले. जाताना पक्कं ठरवलेलं होतं की काही झालं तरी महिना दीड हजाराच्या खाली एक रुपयाही मान्य करायचा नाही. झालं! 

‘मानधन किती द्यायचं?’ अशी विचारणा झाल्यावर यांनी सावध चतुरपणे सांगितलं की, ‘आम्हाला हिंदीची फारशी कल्पना नाही. तुम्हीच काय ते सांगा.’ त्यावर निर्माते म्हणाले, ‘तुम्ही नव्यानंच हिंदीत काम करताय. त्यामुळे आम्ही या चित्रपटासाठी तुम्हाला चाळीस हजार रुपये देऊ. पुढच्या चित्रपटाच्या वेळी बघू काय ते. तुमचं काय म्हणणं आहे?’ चंद्रकांत आणि त्यांचा मित्र तो ‘आकडा’ ऐकून उडालेच! ही १९४४ची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आपला ‘पत्ता’ आधी उघडला नाही याचा त्यांना आनंद झाला. गंभीर चेहऱ्यानं ‘थोडा वेळ बाजूला जाऊन विचार करतो,’ असं चंद्रकांत म्हणाले. परत येऊन तो ‘सौदा’ मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मात्र पुढच्या वेळी त्यात वाढ करावी लागेल,’ असंही बजावलं. ते अर्थातच मान्य झालं.

‘बरं, मिशीचं काय?’ निर्मात्यांनी विचारलं.

‘मिशीचं काय म्हणता?’ चंद्रकांत.

‘नाही, रामाच्या भूमिकेसाठी मिशी काढावी लागेल.’

‘मग काढू की!’ चंद्रकांत.

त्या काळी चंद्रमोहन नावाचा घाऱ्या डोळ्यांचा एक कलाकार मिशी काढण्याचे वेगळे पाच हजार रुपये घ्यायचा. आता हे त्यांना ठाऊक नव्हतं. निर्मात्यांचे पाच हजार रुपये तिथे वाचले!

मुंबईत चंद्रकांत यांनी बरेच चित्रपट केले. परंतु, तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. मुंबईवर बॉम्ब पडणार अशी अफवा उठली आणि चंद्रकांत यांच्या वडिलांनी त्यांना उचलून कोल्हापूरला नेलं. नाही तर आपण त्यांच्या अजून खूप चांगल्या भूमिका बघितल्या असत्या.   

‘सांगत्ये ऐका’च्या निमित्ताने याची आठवण झाली. उत्कृष्ट, दर्जेदार कलाकृती सादर करण्यासाठी जुन्या काळातील कलाकारांनी, घरादाराची पर्वा न करता, आपलं सर्वस्व पणाला लावलं. म्हणूनच त्यांचे चित्रपट ‘अजर-अमर’ झाले.

‘सांगत्ये ऐका’ ‘हीरक महोत्सवा’प्रमाणेच ‘शताब्दी’तही तितकाच ताजा, टवटवीत राहील.

- रवींद्र गुर्जर
ई-मेल : rvgurjar@gmail.com

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZUDCA
 आश्चर्य म्हणजे मी हा सिनेमा बघीतलेला नाही. असे सिनेमे बघायला बंदी होती. त्या वेळेस मी बहुतेक चौथीत /पाचवीत असेन. पण आता पाहीन.
 यात एक महत्वाचा उल्लेख राहून गेला तो या चित्रपटाचे लेखक गो. गं. पारखी यांचा. त्यांची मूळ कादंबरी "सांगते ऐका" ही आता पुनः प्रकाशित झाली आहे अक्षर मानव तर्फे
 There is no doubt . Tamasha is a very Important medium of
entertainment . How old is it ? Where did it start ? Where ? When?
It is pure entertainment . A touch of vulgarity is accptinle . Is it
practised all over Mahareshtra ? Are simiar forms active in the
neighbouring regions ?
Similar Posts
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
बहुजन हिताय बहुजन सुखाय - आकाशवाणी १३ फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिन. त्या निमित्ताने, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरात आज लिहीत आहेत ‘आकाशवाणी’बद्दल...
अशी दैवते येथ होणार केवी? ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्राची तीन दैवतेच. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. नुकताच मराठी राजभाषा दिनही होऊन गेला आहे. त्या निमित्ताने, मराठीच्या या तीन दैवतांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
यशस्वी चित्रपटांचे निकष ‘पटकथा लेखनाचा अभ्यास करताना मी गेल्या ८० वर्षांतल्या गाजलेल्या आणि मी पाहिलेल्या सुमारे १०० चित्रपटांची यादी केली. प्रत्येक चित्रपट कोणत्या ‘गुणां’मुळे गाजला, त्याचा विचार केला. त्यावरून ‘यशाचं नेमकं गमक काय?’ हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गणिती सूत्रानं यशस्वी चित्रपटाची निर्मिती करता येत नाही,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language