Ad will apear here
Next
डॉ. लक्ष्मण देशपांडे, वि. स. वाळिंबे, कस्तुरबा गांधी, मधुकाका कुलकर्णी


‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेले डॉ. लक्ष्मण देशपांडे, पत्रकार, संपादक, चरित्रकार वि. स. वाळिंबे, महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि पुण्यातील प्रकाशक दामोदर दिनकर उर्फ मधुकाका कुलकर्णी यांचा २२ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय... 
......... 
प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे
पाच डिसेंबर १९४३ रोजी प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म झाला. त्यांनी एमए, पीएचडी, मास्टर ऑफ ड्रामॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या होत्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून, तर १९६८ ते १९८० स. भू. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाट्यमहोत्सवांचे आयोजन, २००पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका अशी त्यांची नाट्य-चित्रपट कारकीर्द होती. 

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर होता. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीत कमी, प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्ट्य होते. मराठवाड्याच्या ग्रामीण जीवनशैलीशी एकरूप असलेल्या अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाट्यरसिकांना भावला. 

‘गीनिज बुक’मध्ये दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माइक आणि पंचा इतकेच साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८०मध्ये झाली. डॉ. देशपांडे यांनी ‘वऱ्हाड’ लंडन, अमेरिका, कॅनडा, दुबई, मस्कत, ऑस्टेलिया, नायजेरिया, नैरोबी, कतार, कुवेत, थायलंड, सिंगापूर या देशांतही पोहोचवले. 

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ने त्यांच्या या कार्याचा १९९६मध्ये प्रथमत: गौरव केला. तोपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे तीन हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले होते. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री ‘नटसम्राट’चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले. स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नर्गिस कॅन्सर हॉस्पिटल (बार्शी), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. २००३मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले, तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवायही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. 

प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले. 
.............. 
वि. स. वाळिंबे
११ ऑगस्ट १९२८ रोजी वि. स. वाळिंबे यांचा जन्म झाला. विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडित झाले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले. 

प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते. इ. स. १९६२-६३च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते. इतिहास आणि तो घडवण्यात अग्रेसर असणारी मोठी माणसे यांचे जबरदस्त आकर्षण वि. स. वाळिंबे यांना होते आणि तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. पण त्यांचे या विषयांवरचे लेखन कधी इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याच्या भरात क्लिष्ट, कोरडे आणि कर्कश झाले नाही, की इतिहासाला जिवंत, थरारक करण्याच्या नादात भावविवश किंवा भावगौरवात्मकही झाले नाही. वाचनीयता आणि रसवत्ता जराही उणावू न देता अभ्यास आणि कष्ट यांनी निवडून, पारखून दिलेला तपशील उत्तम रीतीने मांडण्याचे कौशल्य वाळिंबे यांच्याजवळ होते.  त्यांच्या लेखणीला ती एक सिद्धीच होती. 

प्रसंगातले नाट्य अचूक टिपण्याच्या त्यांच्या मार्मिकतेमुळे वाचकाला अपूर्व समाधान मिळते. त्यांचा हिटलर किंवा त्यांचे सावरकर किंवा त्यांचे नेताजी वाचताना त्यातले प्रसंगनाट्य अक्षरश: खिळवून ठेवते; पण त्यांच्या लेखणीचे बळ केवळ तेवढेच नाही. घटना-प्रसंगांचे अंत:प्रवाह शोधणाऱ्या त्यांच्या बारकाव्यात ते आहे, मोठ्या पार्श्वपटावर लहान घटना पाहण्याच्या जाणकारीत आहे, संदर्भांची विविधता आणि त्यातून घटना-प्रसंगांना मिळत जाणारी दिशा यांकडे लक्ष पुरवण्याच्या त्यांच्या दक्षतेत आहे आणि व्यक्तीच्या मर्मस्थानांविषयी अतिशय कुतूहल बाळगणाऱ्या त्यांच्या प्रगल्भ जीवनदृष्टीत आहे. 

त्यांनी मोठ्या माणसांच्या मोठेपणाची अनेक अंगांनी उकल करण्याचा प्रयत्न केला. मानवी मर्यादांचे, दौर्बल्याचे, मोहप्रवणतेचे भान ठेवून त्यांनी जागतिक पातळीवरची महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे लेखनविषय केली. चांगल्या जाणत्या, तयारीच्या, बहुश्रुत अशा वाचकाचेही समाधान करणारी गुणवत्ता त्यांच्या लेखनात प्रकट झाली आणि ती शेवटपर्यंत अखंड टिकूनही राहिली. वि. स. वाळिंबे यांचे २२ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले. 
......... 
कस्तुरबा गांधी
११ एप्रिल १८६९ रोजी कस्तुरबा गांधी यांचा जन्म झाला. कस्तुरबा गांधी यांना प्रेमाने ‘बा’ असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या - त्यांना गांधीजींनी लिहा-वाचायला शिकवले. त्या वेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. 

१८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती – मणिलाल, रामदास आणि देवदास. १९०६ साली गांधीजींनी ब्रह्मचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या. 

कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४ ते १९१२ दरम्यान त्या दरबान शहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले. कस्तुरबा गांधी यांचे २२ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले. 
....... 
मधुकाका कुलकर्णी
२३ ऑक्टोबर १९२३ रोजी मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म झाला. मधुकाका नावाने परिचित असणारे दामोदर दिनकर कुलकर्णी हे एक धडाडीचे व आक्रमक प्रकाशक होते. १९४७ ते १९६२ या काळात त्यांनी कॉन्टिनेन्टल प्रकाशन येथे, तसेच १९६२ ते १९६७ या काळात त्यांनी संयुक्त साहित्य या संस्थांमध्ये काम केले. १९६८मध्ये त्यांनी श्रीविद्या प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली. ‘वाळवंटातील चंद्रकोर’ हे त्यांचे पहिले प्रकाशन. त्यानंतर ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. त्यापैकी ‘आंबेडकरी चळवळ’, ‘अक्करमाशी’, ‘उचल्या’, ‘काबूलनामा’, ‘श्री विठ्ठल एक महासमन्वय’,’ मेड इन इंडिया’, ‘लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक’ आदी महत्त्वाची पुस्तके आहेत.

श्रीविद्या प्रकाशनाच्या ‘उचल्या’ या लक्ष्मण गायकवाड लिखित पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. मधुकाका कुलकर्णी यांनी ‘प्रकाशकनामा’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने पुण्यातील प्रभात रोड गल्ली क्रमांक १४ मधील आयकर भवनच्या चौकाला चार फेब्रुवारी २०१८ रोजी मधुकाका कुलकर्णी यांचे नाव देण्यात आले. मधुकाका कुलकर्णी यांचे २२ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले. 

माहिती संकलन : संजीव वेलणकर













 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZPZCJ
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language