मूळचा डोंबिवलीकर आणि सध्या पुण्यात असलेला कौशिक लेले हा तरुण कम्प्युटर इंजिनीअर परदेशी आणि परराज्यातल्या अमराठी नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून मराठी भाषा शिकविण्याचं कार्य करतो आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या कार्याबद्दल................
मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी भाषेच्या इतिहासापासून भवितव्यापर्यंत बऱ्याच विषयांच्या चर्चा ठिकठिकाणी होतात. वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. अर्थात, त्यातले बहुतेकसे उपक्रम मराठी भाषकांसाठीच असतात. मूळचा डोंबिवलीकर आणि सध्या पुण्यात असलेला एक तरुण कम्प्युटर इंजिनीअर मात्र परदेशी आणि परराज्यातल्या अमराठी नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून मराठी भाषा शिकविण्याचं कार्य करतो आहे आणि तेही मोफत. २०१२पासून हा उपक्रम राबविणाऱ्या या तरुणाचं नाव आहे कौशिक लेले.
कौशिकला लहानपणापासूनच वेगवेगळ्या भाषांची आवड. मराठी भाषेबद्दल प्रेम होतंच; पण तो शाळेत असतानाच पुस्तक वाचून तमीळ भाषा शिकला. तसंच मासिकं वगैरे वाचून गुजराती भाषाही शिकला होता. ‘पुढे इंजिनीअर होऊन आयटी कंपनीत काम करायला लागलो, तेव्हा ऑफिसमधले माझे काही सहकारी मराठी शिकण्याचा प्रयत्न करत होते. आपण ज्या प्रकारे दुसऱ्या भाषा शिकलो, तसं कोणाला मराठी भाषा शिकायची असेल, तर काय पर्याय आहेत, हे मी शोधू लागलो. काही पुस्तकं आहेत, पण ती मला सोपी वाटली नाहीत. तंत्रज्ञानविषयक माहिती देणारे वेगवेगळे ब्लॉग्ज मी पाहायचो. त्यातून नवनव्या गोष्टींची माहिती अगदी सहज-सोप्या भाषेत आणि मोफत दिलेली असायची. कारण आपल्याकडे असलेलं ज्ञान शेअर करणं हाच त्या ब्लॉगचालकांचा हेतू असतो. मग अशा प्रकारे माझ्याकडे असलेलं मराठी भाषेचं ज्ञान लोकांना देण्यासाठी मराठी भाषा शिकवणारा ब्लॉग का सुरू करू नये, असा विचार माझ्या मनात आला आणि मी २०१२मध्ये माझा ब्लॉग (
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.com/) सुरू केला. सध्या तंत्रज्ञानाचं युग असल्यानं इंटरनेटवर अशा गोष्टी शोधल्या जाण्याचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे या माध्यमात असं साहित्य उपलब्ध असलं पाहिजे, हा विचार ब्लॉग सुरू करण्यामागे होता,’ असं कौशिकनं सांगितलं.
सुरुवातीला कौशिकनं इंग्रजीतून मराठी शिकविणारा ब्लॉग तयार केला. ठराविक दिवसांनी त्यावर वेगवेगळे मुद्दे शिकविणारे धडे पोस्ट केले. ‘इंग्रजीतून मराठी शिकविणारी काही पुस्तकं किंवा काही साइट्स आहेत; पण त्यात काही नेहमीची वाक्यं देऊन त्यांचं मराठी भाषांतर दिलेलं असतं. त्यामुळे त्यावरून मराठी शिकणाऱ्यांना त्या वाक्यांपलीकडे दुसरी स्वतःची वाक्यं तयार करता येत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन मी माझ्या ब्लॉगमध्ये व्याकरणही सोप्या शब्दांत समजावून सांगून, वाक्यरचनेची उदाहरणंही दिली. त्यामुळे शिकणाऱ्यांना ते सोपं जातं. व्याकरणातला क्लिष्टपणा टाळून अन्य भाषकांना सहज कळेल, अशा प्रकारे मी धडे लिहिले आहेत. त्यामुळे माझ्या धड्यांचा अभ्यास करून मराठी शिकणाऱ्यांना स्वतःची वाक्यं तयार करता येतात, मराठी वाचलेलं समजतं, हे माझ्या ब्लॉगचं वेगळेपण आहे,’ असं कौशिकनं नमूद केलं.
गुजराती आणि हिंदी या भाषांमधूनही मराठी शिकवण्याचे धडे कौशिकनं लिहिले आणि ते ब्लॉगवरून प्रकाशित केले. तसंच, इंग्रजी भाषेतून गुजराती शिकवणारा ब्लॉगही त्यानं सुरू केला. या सर्व ब्लॉग्जना चांगला प्रतिसाद मिळाला आणि मिळतो आहे. शंभराहून अधिक धडे या सर्व ब्लॉगवर आहेत. लंडनस्थित जॉन, चायनीज अमेरिकन असलेला मॅथ्यू चँग, झेक रिपब्लिकमधून पुण्यात संशोधनासाठी आलेला मार्टिन ही कौशिककडून मराठी शिकलेल्यांची प्रातिनिधिक नावं. २५०हून अधिक जणांनी कौशिकला ई-मेल पाठवून ते त्याच्या ब्लॉगवरून मराठी शिकत असल्याचं कळवलं आहे.

शब्दोच्चार कळण्यासाठी या ब्लॉग्जना यू-ट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओची जोड देण्यात आली आहे, जेणेकरून वाचलेले धडे ऐकणं, भाषेचा प्रयोग नेमका कसा केला जातो, ते पाहणं शक्य होऊ शकतं.
‘लर्न मराठी विथ कौशिक लेले’ या त्याच्या यू-ट्यूब चॅनेलला आजच्या घडीला ६२००हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. त्याच्या ब्लॉग्जना १० लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत. इंग्रजीतून गुजराती शिकण्याच्या त्याच्या
यू-ट्यूब चॅनेललाही साडेचार हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
व्हिडिओ चॅटद्वारे संभाषणाचा उपक्रमही कौशिकनं २०१८पासून सुरू केला आहे. गुगल हँगआउटवर प्रत्येक वीकेंडला विविध देशांतील चार-पाच जण भेटतात आणि कौशिककडून आपल्या शंकांचं निरसन करून घेतात.
अन्य उपक्रम
लिंग, वचन, सामान्यरूप आणि अव्यय आदींसह होणारी नामाची विविध रूपं दाखविणारी डिक्शनरीही कौशिकनं तयार केली असून, ती
अॅप आणि
वेबसाइट स्वरूपात उपलब्ध आहे. त्यात सुमारे दोन हजार इंग्रजी, तर साडेचार हजारांहून अधिक मराठी शब्द आहेत. त्यात भर घालण्याचं काम सुरूच आहे.
प्रत्येक क्रियापदाची रूपं काळानुसार, नाम-सर्वनामानुसार किंवा वाक्प्रचारानुसार बदलतात. ती रूपं दाखवणारी
रूपावलीही कौशिकनं ऑनलाइन तयार केली आहे. त्यात एखादं क्रियापद टाकल्यावर त्याची विविध रूपं दर्शवली जातात.
नव्यानंच मराठी वाचायला शिकलेल्यांना सराव करण्यासाठी
मराठीच्या रोपन लिप्यंतरणाची सुविधाही कौशिकनं उपलब्ध करून दिली आहे. तिथं मराठी मजकूर कॉपी-पेस्ट केल्यावर तो रोमन लिपीत रूपांतरित होतो. म्हणजे ‘कौशिक’ असं टाकल्यावर ‘Kaushik’ असं होतं. त्यामुळे ती व्यक्ती याद्वारे मराठी वाचनाचा सराव सहज करू शकते.
इंग्रजी शब्दांना नवे मराठी प्रतिशब्द तयार केले जाण्यासाठी कौशिकनं फेसबुक ग्रुपही तयार केला असून, त्या माध्यमातून मिळालेले नवे शब्द
ब्लॉगवर प्रसिद्ध केले आहेत. विविध प्रकारच्या
पुस्तकांची मराठीतून परीक्षणं लिहिण्याचा उपक्रमही कौशिक राबवत असून, तंत्रज्ञानविषयक माहितीही मराठीतून देतो आहे.
(कौशिकच्या सर्व प्रकारच्या ब्लॉग्जच्या लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
सहकाऱ्यांनाही धडे
कौशिकच्या या उपक्रमाबद्दल अनेकांनी त्याचं कौतुक केलं. पुण्यात कौशिक ज्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो, तिथे त्याचे अनेक सहकारी परराज्यातले आहेत. त्यांना मराठी शिकण्याची इच्छा असल्यानं आठवड्यातून दोनदा अर्ध्या-अर्ध्या तासांची सत्रं घेऊन तो त्यांना मराठीचे धडे देतो. काही सहकाऱ्यांनी त्याला सांगितलं, की ‘इथं हिंदी चालत असल्यानं मराठीवाचून अडत नाही; पण तमिळनाडूसारख्या दक्षिणेकडच्या राज्यात गेलं, तर तिथली भाषा शिकल्याशिवाय पर्याय नसतो.’ त्यांचं हे निरीक्षण मराठी माणसाला माहिती असलेलंच आहे; पण विचार करायला लावणारं आहे.
...म्हणून ‘त्यांना’ मराठी भाषा शिकायची असते.
जगभरातले नागरिक कोणत्या कारणानं मराठी शिकू इच्छितात, असं कौशिकला विचारलं असता तो म्हणाला, ‘कोणा परदेशी नागरिकाचा मराठी व्यक्तीशी विवाह होणार असेल, तर त्याला त्याच्या होणाऱ्या नातेवाईकांशी थोडा तरी संवाद मराठीतून साधण्याची इच्छा असते. काही जण केवळ भाषा शिकायला आवडते, म्हणूनही शिकतात. एका चायनीज-अमेरिकन व्यक्तीला पंजाबी भाषा शिकायची होती; पण त्याला ऑनलाइन काही संदर्भ मिळाले नाहीत. ते शोधताना त्याला माझा ब्लॉग सापडला. त्यामुळे तो मराठी शिकू लागला आणि चांगल्या प्रकारे शिकलाही. इथे फिरायला येणाऱ्या किंवा संस्कृतीचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीही मराठी शिकू इच्छितात, असा माझा अनुभव आहे.’
पुढचं नियोजन...
इथून पुढच्या काळातल्या नियोजनाबद्दल विचारलं असता कौशिक म्हणाला, ‘हे शिकवणं अधिक इंटरॅक्टिव्ह करण्याची मागणी होत आहे. शाळेप्रमाणे प्रत्येक धड्यावर प्रश्न आणि मग त्यांची उत्तरं, अशा स्वरूपातही ब्लॉगवर काही असावं, अशीही मागणी काही जणांनी केली आहे. त्या दृष्टीनं येत्या काळात प्रयत्न करणार आहे. काही जणांनी तर सर्टिफिकेशनबद्दलही विचारलं आहे; पण ते खूप मोठं काम आहे. मी सध्या तरी माझं आहे ते काम सांभाळून हौशी लोकांना शिकवण्याचं काम करणार आहे. एकदा मूलभूत शिक्षण झालं, की ती व्यक्ती अधिकाधिक मराठी वाचून, शब्दसंपदा वाढवून भाषा चांगल्या प्रकारे अवगत करून घेऊ शकते.’
आजच्या जागतिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्याच गोष्टी ‘ग्लोबल’ होत आहेत. त्यामुळे भाषांचीही देवाणघेवाण होण्याची गरज आहे आणि ते शक्यही आहे. इंग्रजीचा प्रभाव सर्वच भाषांवर पडत असल्याचा सूर अलीकडे अनेक ठिकाणांहून ऐकू येतो. त्या पार्श्वभूमीवर, इंग्रजीसह अन्य भाषकांना मराठीचे सूर शिकविणाऱ्या, या भाषेचं बाळकडू पाजणाऱ्या या कौशिकचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे! त्याच्या या उपक्रमाला शुभेच्छा!
संपर्क : learnmarathifast@gmail.com