मुंबई : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतर कोणत्याही भाषेपेक्षा सर्वाधिक म्हणजेच एकूण ३०० महाकाव्यांचे लेखन संस्कृतमध्येच झाले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी संस्कृत भाषा ही संगणकीय भाषा म्हणून मान्यता पावलेली आहे. अशा भाषेला मरण असणे अशक्य आहे,’ असे प्रतिपादन अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे प्रख्यात कवी अभिराज राजेंद्र मिश्रा यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे पाच मार्च रोजी मुंबई विद्यापीठातील संस्कृत भवनात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अभिराज राजेंद्र मिश्रा यांनी संस्कृतसह तीन भाषांमध्ये साहित्यलेखन केले आहे. त्यात कथा, कविता, गझल इत्यादींचा समावेश आहे. संस्कृतमध्ये ‘भग्न पंजर’ या नावाची त्यांची एक लघुकथा आहे. त्यात त्यांनी एका असहाय मुलीची व्यथा मांडली आहे. पहिली संस्कृत गझल लिहिण्याचा प्रयोगदेखील मिश्रा यांनीच केला. ‘मत्तवारिणि’ असे त्यांच्या गझलसंग्रहाचे नाव आहे. प्रेयसीविषयी अथवा प्रियेशी बोलणे या अर्थाचा गझल हा एक अरेबिक शब्द आहे. राजेंद्र मिश्रा यांनी यात गझल या प्रकारचे नियम सांभाळून रचना केल्या आहेत.
त्यांनी ‘अभिराज यशोभूषणं’ या काव्यप्रकाराची निर्मिती करत असताना ३८ नवीन छंदांची निर्मिती केली आहे. इतर अनेक भाषापेक्षा संस्कृत ही भाषा विविध विशेषणांनी परिपूर्ण आहे हे सांगताना त्यांनी भुंग्याची भ्रमर, रोदर, मधुकर ही नावे सांगितली आणि शब्दांचे सौंदर्य उलगडून दाखवले.
संस्कृत भाषा ही सर्व भाषांचे मूळ आहे. जसा काळ बदलतो तसे भाषेतदेखील परिवर्तन घडून येते व त्याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अभिराज राजेंद्र मिश्रा यांचे साहित्य. संस्कृत भाषा ही फक्त देववाणी नसून, ती सर्वसामान्यांची भाषा आहे याची अनुभूती येते.

अभिराज मिश्रा यांनी तरुणांनाही लाजवेल अशा आपल्या खड्या, पण सुमधुर आवाजात व एक कविता सादर केली. त्या कवितेचे शीर्षक ‘न मृता म्रियते न मरिष्यति वा’ असे आहे. या कवितेत संस्कृत भाषेचे गुणगान आहे.
अमृतादधिकं परिपोषकरी
सुकृतादधिकं भवदोषहरी
पदबन्धरसामृतचारुचयै:
चितिनीरसतां रसयिष्यति वा।
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना एका प्रथितयश साहित्यिकाला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. कवींची ओळख डॉ. माधवी नरसाळे यांनी करून दिली आणि आभारप्रदर्शन संस्कृत विभागप्रमुख डॉ. सुचित्रा ताजणे यांनी केले.