
अस्वस्थ तरुणांना पडलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधण्यासाठी, ‘मी’, ‘माझे’ व ‘माझ्यासाठी’ याच्या संकुचित सीमा ओलांडून, त्या पलीकडच्या वास्तवाला भिडण्यासाठी व तरुणांना त्यांच्या आयुष्याचं मिशन ठरवण्यासाठी मदत करण्याकरिता डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी ‘निर्माण’ उपक्रम सुरू केला. गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांवर विचार करायला लावणारं व्यासपीठ म्हणून ‘निर्माण’कडे पाहता येईल. ‘निर्माण’च्या नवव्या शिबिरासाठी सध्या निवड प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षी ‘निर्माण’मध्ये सहभागी झालेली आणि सध्या गडचिरोलीत डॉ. बंग यांच्याच ‘मुक्तिपथ’ प्रकल्पात माध्यम समन्वयक म्हणून कार्यरत असलेली अदिती अत्रे हिचा हा विशेष लेख त्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.........
सिद्धार्थ गौतम जोपर्यंत महालात होता, तोपर्यंत जीवनाबद्दल काही दर्शनही नव्हते आणि प्रश्नही नव्हते. त्याने जेव्हा पहिल्यांदा जीवनातील दु:खे पाहिली, तेव्हा त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, की हीच जर जीवनाची अंतिम फलश्रुती असेल, तर हे जीवन धोकादायक आहे, दु:खमय आहे. तसं असेल, तर मला त्याचा उपाय शोधला पाहिजे. सिद्धार्थाचा शोध तिथून सुरू झाला. आजच्या पिढीच्या युवक, युवतींचा ‘सिद्धार्थ’ होणं आवश्यक आहे, कारण.. त्यातूनच तो बुद्ध होईल.
- डॉ. अभय बंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.
आजच्या सिद्धार्थांनाही समाजातील प्रश्नांवर उपाय शोधता यावेत, त्यांच्यापर्यंत ते प्रश्न पोहचावेत यासाठी पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या संकल्पनेतून ‘निर्माण’ची निर्मिती झाली.
शहरात कट्ट्यावर बसून चहा पिताना सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा होते, अनेक जणांसाठी चर्चेचा विषय चहासोबत संपून जातो; पण एखाद्यासाठी खरा विषय चहाचा कप संपल्यावर, एकटं असताना सुरू होतो. ती चर्चा, ती परिस्थिती हे सगळंच अस्वस्थ करायला लागतं. त्यावरही संताप येतो आणि प्रश्न पडतो, की या सगळ्यात ‘मी’ काय करतोय?’ दुसऱ्या दिवशी मित्र-मैत्रिणींसाठी तो विषय संपलेला असतो; पण त्याच्यासाठी संपलेला नसतो. ‘तो’ तिथेच असतो अडकून, स्वतःला कोसत.. अशा वेळी काय करायचं?
वर्षाला सात आकडी पॅकेज असलेला जॉब लागून वर्ष-दोन वर्षं झालेली असतात. ‘मी’ हे काम का करतोय/करतेय, असा प्रश्न सतावत असतो; पण त्या वाटण्याला फारसा भाव न देता, जॉब करणं आणि समाधान शोधण्याची धडपड सुरू असते. शॉपिंग, वीकेंड डीनर्स, सिनेमा, मॉल, ट्रिप्स या सगळ्या प्रकारांमध्येही आनंद मिळणं बंद होतं. या सगळ्याचा, आसपासच्या लोकांचा आणि त्यांच्या पैसा या गोष्टीकडे बघण्याच्या वृत्तीचा उबग यायला लागतो. ‘मी’ तर इथे मिसफिट आहे, असं वाटायला लागतं.. आता काय करायचं?

प्रत्यक्ष समाजासाठी काही तरी करण्याचा ‘मी’ ज्या प्रकारचा विचार करतो आहे, तो विचार मला समोरच्याला पटवून देणं अवघड जातंय आणि असेच माझा विचारच समजून न घेणारे लोक माझ्या आसपास आहेत. मला माझ्या विचारांची, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विचार आणि काम करणारी माणसं हवी आहेत; पण ती मिळत नाहीयेत. अशा वेळी काय करायचं?
शिक्षण पूर्ण करून एक सेफ जॉब मिळवणं, पैसा कमावणं यापलीकडे आयुष्यात काही करायची इच्छा आहे. समाजात असलेली विषमता, होत असलेलं शोषण यावर संताप येतो. समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी कोणी तरी येईल आणि मग ते प्रश्न सुटतील, असा विचार न करता, स्वतःच ते अंगावर घेण्याची इच्छा आणि हिंमत असलेले, समाजाच्या प्रश्नांवर अस्वस्थ होणारे, स्वतःच्या आयुष्यासाठी मूल्यं शोधणारे तरुण असतात; पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्या हातून सामाजासाठी काही करणं राहून जातं.
अशाच अस्वस्थ तरुणांना पडलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधण्यासाठी, ‘मी’,’माझे’ व ‘माझ्यासाठी’ याच्या संकुचित सीमा ओलांडून, त्या पलीकडच्या वास्तवाला भिडण्यासाठी व तरुणांना त्यांच्या आयुष्याचं मिशन ठरवण्यासाठी मदत करण्याकरिता डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी ‘निर्माण’ची निर्मिती केली. सामाजिक क्षेत्रात बदल घडवण्याची इच्छा बाळगणाऱ्या युवकांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय मिळावं, ‘मी’ कोण?, माझी मूल्ये काय? माझा प्रश्न कोणता? त्यासाठी मी काय करू शकतो? या आणि अशा गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांवर विचार करायला लावणारं व्यासपीठ म्हणून ‘निर्माण’कडे पाहता येईल.
‘निर्माण’च्या परिवारात एक हजारहून अधिक युवकांनी स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील अनेक प्रश्नांवर हे युवक काम करत आहेत. कामातून मिळणारं समाधान अनुभवत आहेत.

गडचिरोलीमधल्या ‘शोधग्राम’मध्ये महाराष्ट्रभरातून व बाहेरूनही अनेक युवक येतात. काही जण स्वतःचा शोध घेत असतात, तर काही जण समाजाला आपल्या कामाच्या रूपाने सेवा देत असतात. जिथे कामाची गरज आहे, तिथे जाऊन काम करायचं, असा निर्णय घेणारे अनेक जण आज ‘निर्माण’ परिवाराचा भाग आहेत. ‘निर्माण’च्या शिबिरांमधून आलेले आणि इंजिनीअर असलेले अमोल, सतीश, गजू; मोठमोठ्या कंपन्यांमधून काम करून आलेले सुयश, जुई; डॉक्टर असलेले आरती, सागर, रितू, रूपेश, अमित, प्रतीक, मौनी; ‘आयआयटी’चा प्रांजल, ‘आयसर’चा स्वप्नील असे युवक-युवती सध्या गडचिरोलीमध्ये काम करत आहेत. ‘मी, माझे व माझ्यासाठी’ यापलीकडच्या वास्तवाला स्वत:च्या बुद्धीच्या, मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारत अनेक ‘निर्माणी’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व बाहेरही काम करत आहेत. त्यांच्या रोजच्या कामाचा अनुभव त्यांना त्यांच्या ‘लाइफ मिशन’च्या अधिकाधिक जवळ नेतोय.
काय आहे ‘निर्माण’?
निर्माण ही शिबिरांची मालिका आहे. सामाजिक बदल करण्याची इच्छा असलेल्या युवकांची ‘निर्माण’तर्फे वर्षभरात तीन शिबिरे घेतली जातात. डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांच्यासोबतच सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या अनुभवी लोकांचे वेगवगेळ्या विषयांवर मार्गदर्शन, विचार करायला भाग पाडतील अशी सेशन्स, गावांना प्रत्यक्ष भेटी आणि भेटीवर विचारमंथन अशा गोष्टी शिबिरात होतात. आपल्या वयाचे, समविचारी, पण भिन्न सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले इतर अनेक भावी ‘चेंजमेकर्स’ इथे भेटतात. आपले अनुभव, स्वप्नं, इच्छा, विचार खुलेपणाने शेअर करणं आणि त्यावर तितक्याच परिपक्वपणे विचारमंथन होणं, यातूनच ‘मी’ समजायला लागतो आणि एका व्यापक समाजाशी जोडलाही जातो.
आज ‘निर्माण’चे अनेक युवक आरोग्य, शिक्षण, पाणी, शेती, अंधश्रद्धा, समाजातील दुर्लक्षितांचे प्रश्न या आणि अशा अनेक समस्यांवर काम करत आहेत. शहर, ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये ‘निर्माण’चे युवक काम करत आहेत.
ध्येयाने, स्वप्नाने पेटणं सहज जमतं; पण त्यातून कृती घडण्यासाठी स्वतःला घडवावं लागतं. प्रश्न दिसावेत, त्यावर विचार व्हावा, त्यावर कृती करावी यासाठी ‘निर्माण’ मदत करतं. आज सामाजिक बदल करणाऱ्या माणसांमध्ये युवक मोठ्या संख्येने दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांची एक नवी फळी बनत आहे. मूल्याधारित निर्णय घेणारे, तांत्रिक – वैचारिक आणि सामाजिकरित्या ‘अपडेटेड’ तरुण सामाजिक कामात पडत आहेत.
तुम्हालाही वाटत असेल, की काठावर बसणं खूप झालं, तर आता उडी घेण्याची वेळ आली आहे. ‘निर्माण’च्या नवव्या शिबिरासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी जरूर अर्ज करा. त्यासाठीची आणि ‘निर्माण’ संदर्भातील अन्य माहिती ‘निर्माण’ची वेबसाइट, फेसबुक पेज आणि यू-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.