Ad will apear here
Next
भारतात सध्या असलेल्या आणि येण्यास उत्सुक असलेल्या चिनी कंपन्या


चीनशी असलेले आपले आर्थिक, व्यापारी संबंध इतके तडकाफडकी संपुष्टात येणार नाहीत. त्यामुळे चिनी कंपन्या भारतात येण्यास उत्सुक असल्याची आणि काही कंपन्या त्या वाटेवर असल्याची चर्चा अजूनही ताजीच आहे. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १४वा भाग...
..........
भारत आणि चीन यांदरम्यान तणावाची स्थिती असली आणि विशेषतः सर्वसामान्यांमध्ये अत्यंत जहाल भावना निर्माण झालेली असली, तरी आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा द्विराष्ट्रीय संबंध एकाएकी ठप्प होत नाहीत. सध्याच्या परिस्थितीतही हेच लागू होते. शत्रू राष्ट्रांनीही एकमेकांशी व्यापार कायम ठेवल्याची अनेक उदाहरणे जगभर आढळतील. त्याचप्रमाणे, चीनशी असलेले आपले आर्थिक, व्यापारी संबंध इतके तडकाफडकी संपुष्टात येणार नाहीत. त्यामुळे चिनी कंपन्या भारतात येण्यास उत्सुक असल्याची आणि काही कंपन्या त्या वाटेवर असल्याची चर्चा अजूनही ताजीच आहे. 

पुणे शहरात आणि आसपास असंख्य जर्मन कंपन्या आहेत. त्या प्रामुख्याने ऑटोमोबाइल व इंजिनीअरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. काही वर्षांनी, पुण्याचा हाच परिसर चिनी कंपन्यांसाठीही नावाजला जावा, असे स्वप्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनेक वर्षांपूर्वी रांजणगावमध्ये एका चिनी कंपनीच्या प्रकल्प उद्घाटनावेळी बोलून दाखवले होते. यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, नवीन रोजगार निर्माण करणे आणि स्थानिक उत्पादनाला चालना देणे, असा त्यांचा हेतू होता. 

भारतात सध्या या चिनी कंपन्या कार्यरत आहेत – सॅनी (क्षेत्र – अवजड उपकरणे), फोटॉन (व्यावसायिक वाहने), वेछाय ग्रुप (ऊर्जाविषयक उपकरणे), हेअर (कन्झ्युमर अप्लायन्सेस), मीडिया ग्रुप (कन्झ्युमर अप्लायन्सेस), फायबरहोम टेक्नालॉजिज (ऑप्टिकल फायबर), हुआवे (टेलिकॉम), योचु इंटरॅक्टिव्ह (गेमिंग), चायना स्टेट कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन, चायना रेल्वेज अँड रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन (नागपूर आणि पुणे मेट्रो).

कंपन्या भारतात येतात म्हणजे त्या इथल्या कंपन्या विकत घेतात, इथल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात किंवा त्यांच्या कंपन्यांची उपकंपनी येथे सुरू करतात. इथे संयुक्त भागीदारी करतात. तसेच, सध्या सुरू असणाऱ्या कंपनीमधील गुंतवणूक, उत्पादनक्षमता, कार्यक्षमता वाढवतात. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट राबवतात.

नवी खरेदी
चीनमधील ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीने याच वर्षी पुण्याजवळच्या तळेगाव येथील जनरल मोटर्सचा प्रकल्प विकत घेतल्याचे जाहीर केले. या प्रकल्पाचे नूतनीकरण करण्यासाठी या चिनी कंपनीने महाराष्ट्र सरकारशी तब्बल एक अब्ज डॉलर, म्हणजे ७६०० कोटी रुपये गुंतवण्याचा परस्पर सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. ही गुंतवणूक झाल्यानंतर पुण्याच्या परिसरात जवळजवळ तीन हजार नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. हा प्रकल्प ऑटोमेटेड असणार आहे. त्यामध्ये, बहुतेकशा उत्पादन प्रक्रियांमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यंदा कंपनीने साधारण हजार कोटी रुपये ओतले आहेत. बाकीची रक्कम टप्प्याटप्प्याने गुंतवली जाणार आहे.

हेअरचे महत्त्वाकांक्षी नियोजन
माजी मुख्यमंत्री फडणवीस ज्या चिनी कंपनीच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते, त्या हेअर कंपनीने आपल्या प्रकल्पात ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. खरे तर कंपनी ४९० कोटी रुपये गुंतवणार होती. नंतर ही रक्कम वाढवण्यात आली. या प्रकल्पामध्ये कन्झ्युमर अप्लायन्सेस म्हणजेच रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, वॉटर-हीटर, एअर कंडिशनर आणि एलईडी टीव्ही अशी उत्पादने बनवली जातात. कंपनीने नव्याने पैसा ओतून प्रकल्पाची उत्पादनक्षमता बरीच वाढवली.



कागद कंपनी उत्सुक
नाइन ड्रॅगन्स पेपर या चीनमधल्या गुआंगतोंग येथील कागद उत्पादक कंपनीला भारतात प्रवेश करायची इच्छा आहे. कंपनीने ओडिशा राज्यातील परादीप येथे प्रकल्प उभारून भारतप्रवेश करायचे नियोजन केले आहे. त्यासाठी कंपनीला २०० एकर जमीन लागणार आहे. कच्चा माल आयात करण्याच्या दृष्टीने कंपनीने परादीपजवळचे ठिकाण निवडले आहे. ही कंपनी लायनरबोर्ड, कोटेड ड्युप्लेक्स बोर्ड, प्रिंटिंग आणि लिखाणाचे कागद बनवते.

चेरी-टाटा पुन्हा एकत्र येणार?
चीनमधील ऑटो उत्पादक चेरी ऑटोमोबाइल्स भारतात प्रवेश करण्यासाठी टाटा मोटर्सशी संयुक्त भागीदारी करण्यासाठी उत्सुक आहे, अशी चर्चा आहे. चीनमध्ये कार निर्माण करण्यासाठी चेरीने जॅग्वार आणि लँड रोव्हर या कारसाठी टाटा मोटर्सशी यापूर्वीच म्हणजेच २०१२मध्ये संयुक्त भागीदारी केलेली आहे. त्यानुसार, चीनमध्ये ऑक्टोबर २०१४मध्ये पहिली असेम्ब्ली लाइन सुरू झाली. आता पुन्हा या कंपन्या एकत्र येतील, अशा अटकळी आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही वर्षांत चीनमधील ऑटो क्षेत्रासमोर विक्री कुठे करायची, असे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. दीर्घ कालावधीमध्ये भारतात चांगली संधी असू शकते, या विचाराने चीनमधील मोठमोठ्या ऑटो कंपन्या भारतात पाय रोवण्याच्या किंवा विस्तार करण्याच्या बेतात आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. चीनमधील एसएआयसी मोटर कॉर्पची संपूर्ण मालकीची उपकंपनी असणाऱ्या एमजी मोटर इंडियाने हेक्टर एसयूव्ही दाखल करून भारतात प्रारंभ करायचे ठरवले आहे. छांगआन ऑटोमोबाइल या सरकारी कंपनीनेही भारतात पाय रोवण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्याचे समजते.

मीडिया कंपनीची वाढीव गुंतवणूक
सुपा-पारनेर एमआयडीसी गेली काही वर्षे चर्चेत आहे. तेथे जपानी व चिनी कंपन्यांसाठी भव्य इंडस्ट्रियल पार्क साकारले जाणार आहे. त्यामध्ये टेक पार्क उभारण्यासाठी चीनमधील मीडिया ग्रुपने पाच वर्षांत १३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यातील निम्मी गुंतवणूक पहिल्या वर्षातच केली जाईल. खरे तर यंदा एप्रिलमध्ये यास मुहूर्त लागणार होता. परंतु, करोनाच्या संकटामुळे आता हे वेळापत्रक काहीसे गडबडणार आहे. ही कन्झ्युमर अप्लायन्सेस कंपनी या प्रकल्पात लाखो युनिटचे उत्पादन करणार आहे. 

याशिवाय, अन्यही काही चिनी कंपन्यांची भारतात प्रवेश करण्याबद्दल किंवा आहे तो व्यवसाय वाढवण्याबद्दल बोलणी, नियोजन सुरू आहे. त्यास मूर्त स्वरूप यायला थोडा वेळ लागेल. 

भारत आणि चीन यांच्यातील नाते ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून विणले जाऊ लागले. २१व्या शतकामध्ये या नात्याने जवळजवळ ८५ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला. आज, आशियातील या दोन्ही बलाढ्य देशांची अर्थव्यवस्था एकमेकांच्या हातात हात गुंफून उभी आहे. चिनी कंपन्या आजही भारतात येण्यात उत्सुक आहेत. करोना व्हायरसच्या ‘कृपे’मुळे मोठा फटका बसला असणारच आहे; पण एकाएकी चिनी कंपन्यांनी भारताशी नाते तोडून टाकले, असे घडणे मात्र असंभव आहे.

- गौरी देशपांडे
ई-मेल : gouri@ewan.co.in

(लेखिका चिनी भाषेच्या तज्ज्ञ असून, पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मँडरिन बिझनेस डाटा अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AXBKCQ
Similar Posts
व्यावसायिकतेची बीजे चीनमध्ये पूर्वीपासूनच रुजलेली... चीनची व्यापारविषयक आकडेवारी, चलनविषयक घडामोडी, तिथल्या कंपन्यांचा विस्तार, गुंतवणूक यावर नजर टाकली, की एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे चीनचे पाय किती विस्तारले आहेत, याची कल्पना येते. इतिहासावर नजर टाकली, तर गेल्या अनेक शतकांच्या इतिहासामध्ये चीन हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अविभाज्य घटक राहिल्याचे लक्षात येते
आफ्रिकेच्या साधनसंपत्तीवर चीनचा डोळा अनेक कारणांनी चीनचा आफ्रिकेवर डोळा आहे. आफ्रिकेचे मोक्याचे स्थान, तेलाचे साठे, दुर्मीळ धातू, मासे या गोष्टी मिळवण्यासाठी चीनला आफ्रिकेला हाताशी धरायचे आहे. तसेच, आफ्रिकेला पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करणे असा मुखवटा चीनने पांघरला असला, तरी चीनला जागतिकीकरणाच्या पुढच्या टप्प्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आफ्रिकेची गरज लागणार आहे
चिनी गुंतवणुकीवरील नियंत्रणासाठी भारताचे नवे एफडीआय धोरण गेले काही महिने जगाला विळखा घातलेल्या आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलेल्या करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारला देशाच्या एफडीआय धोरणामध्ये महत्त्वाचे बदल करणे गरजेचे वाटले. त्यानुसार यंदा एप्रिल महिन्यात सरकारने नवीन धोरण जाहीर केले. भारताने नवे धोरण जाहीर करताना कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही;
युरोपमध्येही ‘मेड इन चायना’ चिनी वस्तू भारताच्या कानकोपऱ्यात पोहोचल्यात... चिनी उत्पादकांनी भारतीय संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करून सणासुदीसाठी लागणाऱ्या इत्थंभूत वस्तू बनवल्यात आणि भारताला निर्यात केल्यात... चायनीजच्या गाड्या अगदी खेड्यापाड्यांतही दिसून येतात... अशी आपली निरीक्षणे आणि अनेकदा तक्रार असते; पण सगळीकडे चिनी छाप असलेला भारत हा एकमेव देश नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language