पुणे : स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनीअरिंग) व स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) अभ्यासक्रमात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पीसीईआरएफ’ अर्थात पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या बी. जी. शिर्के विद्यार्थी पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत १७ जून २०१९ पर्यंत आहे. यंदा पुरस्काराचे पाचवे वर्ष आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यात स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदवी पूर्व विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांचा शेवटच्या वर्षाचा प्रकल्प, तर स्थापत्यशास्त्र शाखेच्या पदवी पूर्व विभागातील विद्यार्थ्यांनी चौथ्या किंवा पाचव्या वर्षाचे ‘अर्बन डिझाईन’ किंवा ‘अर्बन इन्सर्ट’ प्रकल्प पाठवायचे आहेत;तसेच पदव्युत्तर विभागात दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शेवटच्या वर्षाचे प्रकल्प पाठवायचे आहेत. याशिवाय दोन्ही शाखांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या प्रकल्पांसाठी विशेष विभाग ठेवण्यात आला आहे.
पुरस्कार विजेत्यांना रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. याशिवाय बांधकाम उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसमोर प्रकल्प सादरीकरण करण्याची; तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन’च्या कार्यालयाशी ७६६६०५१४०१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.