वन्यजीवनाविषयी अत्यंत ओघवत्या शैलीत उत्कंठापूर्ण लेखन करत, सहजच लाखभर नवीन शब्दांची मराठी वाचकांना ओळख करून देणाऱ्या मारुती चितमपल्ली यांचा पाच नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी.... ........
पाच नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूरमध्ये जन्मलेले मारुती चितमपल्ली हे निसर्ग आणि वन्यजीवन या विषयातले तज्ज्ञ वनाधिकारी आणि त्या विषयांवर अत्यंत रसाळ लेखन करणारे लोकप्रिय लेखक. तेलुगू कुटुंबात जन्म होऊनही त्यांचं शिक्षण मराठीत झालं, बालपण मराठी-गुजराती वस्तीत गेलं. तशात मुस्लीम वस्तीही घराजवळ असल्यामुळे तेलुगू भाषेबरोबरच मराठी, गुजराती आणि उर्दूमिश्रित हिंदीचे संस्कार त्यांच्यावर झाले. पुढे त्यांनी जर्मन आणि रशियन भाषेचा अभ्यास तर केलाच; पण वयाच्या ८४व्या वर्षी संस्कृत शिकण्याची अचाट कामगिरीही केली.
आई, वडील, आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामा यांनी त्यांना रानवाटांवरून नेत प्रचंड माहिती दिली आणि जंगलांविषयी, प्राण्यांविषयी आकर्षण निर्माण केलं. त्या विलक्षण आणि अद्भुत जगताशी ओळख करून घेताना ते कित्येक नवनवीन गोष्टी शिकले. ते सारं आपल्या समर्थ लेखणीतून मराठी वाचकांसमोर आणतानाच अनेक नवनवीन शब्दांशी त्यांनी वाचकांचा परिचय करून दिला. असं मानतात, की त्यांनी आपल्या साहित्यप्रवासात जवळपास लाखभर शब्द मराठी भाषेला बहाल केले आहेत.
२००६ साली सोलापूरमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल त्यांना राज्य पुरस्कार, दमाणी साहित्य पुरस्कार, मृण्मयी साहित्य पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले. तसंच विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, जीवनसाधना पुरस्कार, नागभूषण पुरस्कार, समाजसेवक पुरस्कार, सहकार महर्षी साहित्य पुरस्कार असे इतरही विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
आनंददायी बगळे, चैत्रपालवी, घरट्यापलीकडे, जंगलाचं देणं, जंगलाची दुनिया, केशराचा पाऊस, निळावंती, पाखरमाया, पक्षी जाय दिगंतरा, रानवाटा, रातवा, सुवर्णगरुड, चकवाचांदण, निसर्गवाचन, पक्षीकोश, मृगपक्षीशास्त्र, शब्दांचं धन, नवेगावबांधचे दिवस, आपल्या भारतातील साप, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
(चितमपल्ली यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)