रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे तीन वर्षांपूर्वी आढळलेल्या हत्तीच्या भव्य खोदशिल्पाला रविवारी, २१ जानेवारी रोजी संरक्षक कठडा बांधण्यात आला. संशोधक, सरपंच आणि लोकांच्या सहभागातून या खोदशिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. आता या गावात पर्यटन वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कोकणात प्रथमच ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून या खोदशिल्पाचे संरक्षण केले जात आहे.
रत्नागिरी, राजापूर, लांजा या तीन तालुक्यांतील ४३ गावांत ७१ ठिकाणी ९५० खोदशिल्पे आढळली आहेत. सुमारे १० हजार ते ३५ हजार वर्षांपूर्वीची ही शिल्पे म्हणजे जागतिक वारसा आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने शासनाच्या वतीने पुढाकार घेतला जाणार आहे.
२१ जानेवारीला झालेल्या लोकार्पण सोहळ्यासाठी रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, प्रांताधिकारी अमित शेडगे, ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल विभुते, तसेच खोदशिल्पाचे संशोधक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, समन्वयक ऋत्विज आपटे आदींसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ, तसेच पत्रकार उपस्थित होते. सरपंच मिलिंद खानविलकर व उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी लोकसहभागातून या कातळ खोदशिल्पाला संरक्षक कठडा बांधला. त्याशेजारी चबुतरा बांधला असून, त्यावरून कातळशिल्प व्यवस्थित दिसू शकते.
अनुप सुर्वे यांच्या जागेमध्ये हे हत्तीचे शिल्प आढळले. त्यांनी विनामोबदला ही जागा उपलब्ध करून दिली. तसेच जवळच काशिनाथ देसाई यांच्या जागेमध्ये सुमारे पंधरा खोदशिल्पे आहेत. या शिल्पांची साफसफाई करून तेथेही कठडा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उक्षी गावात पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होईल. उक्षीमध्ये पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठीही गर्दी होते. त्यासोबत कातळशिल्पे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
या शिल्पाच्या अज्ञात शिल्पकाराला घोरपडे यांनी वंदन केले. ‘कातळशिल्प हा जागतिक दर्जाचा ठेवा आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण केलेच पाहिजे. मानवतेचा वारसा जतन करून पर्यटन विकास साधण्याचे काम उक्षी ग्रामस्थांनी केले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. ‘लोकांची एकी नसेल, तर कोणतेही काम होत नाही. परंतु खोदशिल्पासाठी ग्रामस्थांनी एकी दाखवून काम केले आहे. मी हे शिल्प जवळून पाहिले आणि आज चबुतऱ्यावरून पाहिले, तर एक वेगळा अनुभव घेता येतो, याची जाणीव झाली. त्यामुळे हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल,’ असे विभुते यांनी सांगितले. कातळशिल्पासाठी सहकार्य करणाऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
कसे जायचे?
हत्तीचे हे खोदशिल्प उक्षी गावातील प्रसिद्ध धबधब्यापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण मुंबई-गोवा महामार्गापासून २५ किलोमीटर, तर रत्नागिरी शहरातून ते ४० किलोमीटर अंतरावर आहे. कोकण रेल्वेचे स्थानकही उक्षी गावात असल्याने बाहेरील पर्यटकांनाही येथे जाणे शक्य आहे.