पुणे : ‘महाकवी कालिदासाच्या साहित्यातील अभिजातता कालजयी आहे. साधारण चौथ्या शतकात त्याने लिहिलेले हे खंडकाव्य आजही रसिकांना भुरळ घालते. आजही ही कलाकृती अजरामर आहे. अभिजात याचा अर्थच जो मरत नाही असा आहे. अशा एक नव्हे, तर अनेक कलाकृती कवी कालिदासाने निर्माण केल्या आहेत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे यांनी केले.
डॉ. ज्योती रहाळकर यांनी लिहिलेल्या ‘मेघदूत : एक काव्यानुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी (तीन जुलै २०१९) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ‘बुकगंगा’च्या संचालक सुप्रिया लिमये, डॉ. जयेश रहाळकर, धनश्री गणात्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आजपर्यंत अनेक लेखकांना मेघदूताची भुरळ पडली असून, अनेक भाषांमध्ये त्याचे भावानुवाद झाले आहेत. कुसुमाग्रज, शांता शेळके अशा अनेक प्रतिभावान साहित्यकारांनी मराठीत त्याचा अनुवाद केला आहे. डॉ. ज्योती रहाळकर यांनी त्याचा मुक्तछंदातील काव्यानुवाद केला असून, तो सरस झाला आहे,’ असे कौतुकोद्गार डॉ. धोंगडे यांनी काढले.
‘मेघदूत हे रसपूर्ण काव्य आहे. यात मेघाला दूत बनवले आहे, हेच खूप मोठे रूपक आहे. यात विरहातील शृंगार आहे. असा शृंगार इतर कुठल्याही साहित्यकृतीत आलेला नाही. हे काव्य वाचल्यावर डोळ्यापुढे ज्या प्रतिमा उभ्या राहतात त्या दीर्घ काळ टिकतात. त्यामुळे ही साहित्यकृती अजरामर ठरली. प्रतिभेची अशी उंची कालिदासाशिवाय दुसरे कोणीही गाठू शकलेले नाही. त्यामुळे कालिदासाला कविकुलगुरू, कविश्रेष्ठ असे म्हटले जाते,’ असे त्या म्हणाल्या.
‘कालिदासाने मेघदूतासह रघुवंश, मालविकाग्निमित्र, शाकुंतल, ऋतुगंध, रघुवंश अशा अनेक दर्जेदार कलाकृती निर्माण केल्या; मात्र कवी कालिदास समजून घेताना आपण मेघदूतापलीकडे पाहिलेच नाही. त्याच्या इतर कलाकृतींचे मोल समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत,’ अशी खंतही डॉ. धोंगडे यांनी व्यक्त केली.
‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर म्हणाले, ‘कवी कालिदासाची अजरामर कलाकृती असलेल्या मेघदूताचा सर्वांना समजेल अशा भाषेतील काव्यानुवाद प्रकाशित करण्याची, तो सर्व रसिकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आम्हाला मिळाली, ही खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. डॉ. ज्योती रहाळकर यांनी केलेल्या या काव्यानुवादाची अनुभूती अधिक प्रभावीपणे घेता यावी यासाठी आम्ही ती ऑडिओ स्वरूपातही आणली आहे. त्यामुळे मेघदूतासारखी साहित्यकृती आजच्या तरुण पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल. मुद्रित पुस्तकाबरोबरच ई-बुक आणि ऑडिओ बुक अशा तिन्ही स्वरूपांत हा समृद्ध खजिना आता रसिकांसाठी उपलब्ध आहे.’ (डॉ. धोंगडे व मंदार जोगळेकर यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
डॉ. प्रमोद आडकर म्हणाले, ‘महाकवी कालिदासाची मेघदूत ही कलाकृती पाहिल्यानंतर ते केवळ एक कवी नसून, खगोलशास्त्रज्ञ, हवामानतज्ज्ञही असावेत असे वाटते. कुसुमाग्रज, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासह हरिवंशराय बच्चन यांनाही मेघदूताची भुरळ पडली.’
डॉ. ज्योती रहाळकर यांनी या काव्यानुवादामागची भूमिका सांगितली. ‘शालेय जीवनापासून मनात घर करून बसलेल्या या साहित्यकृतीला तब्बल २०-२५ वर्षांनी स्वतःच्या शब्दात मांडण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. अवघ्या पाच दिवसांमध्ये हा काव्यानुवाद साकारला गेला. ही अत्यंत आनंददायी प्रक्रिया होती,’ असे ज्योती रहाळकर यांनी सांगितले.
या वेळी या काव्यानुवादातील काही भागावर आधारित भरतनाट्यम् नृत्याविष्कार सादर करण्यात आला. अरुजा रहाळकर, अनुष्का आणि अन्विता महाजन यांनी हा नृत्याविष्कार सादर केला. ज्येष्ठ नृत्यांगना स्मिता महाजन यांनी याचे दिग्दर्शन केले होते. (या नृत्याविष्काराचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)
डॉ. अभिजित मिसाळ यांनी खुमासदार निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. अरुजा रहाळकर हिने आभारप्रदर्शन केले.
(‘मेघदूत : एक काव्यानुवाद’ हे पुस्तक आणि ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. ऑडिओ बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)