Ad will apear here
Next
भारतीय शेतीमालाच्या निर्यातवाढीला चीनमध्ये मोठी संधी


‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या लेखमालेच्या आजच्या भागात पाहू या भारतीय शेतीमालाच्या, तसेच अन्य क्षेत्रांतील मालाच्या चीनमध्ये असलेल्या निर्यातसंधींबद्दल...
......
भारताच्या देदीप्यमान वाटचालीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘आत्मनिर्भर भारत’ ही घोषणा खरोखरच प्रत्यक्षात आणायची असेल, तर निर्यात हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भारत कृषिप्रधान देश असल्याने इथला शेतीमाल जगभरात निर्यात केला जातो. हापूस आंबा, द्राक्षे, सफरचंद, चहा, कापूस यासारखा उत्कृष्ट दर्जाचा शेतीमाल आपल्याला परकीय गंगाजळी देऊन जातो.

आज भारत ७१ अब्ज डॉलरची आयात चीनकडून करतो. परंतु, भारत चीनला करत असलेल्या निर्यातीचे मूल्य फक्त १६.६ अब्ज डॉलर एवढेच आहे. ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी शेतीमालाची निर्यात हा एक उत्तम पर्याय आहे. शेतकऱ्यांसाठीही ही एक फायदेशीर संधी आहे. त्यासाठी चीन आपल्याला नक्की फायदेशीर ठरू शकतो. अमेरिका व चीन यांच्या व्यापारयुद्धानंतर जागतिक व्यावसायिक समीकरणे बदलली आहेत. त्याचा फायदा आपण घ्यायला हवा.  
आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये भारताने १६.६ अब्ज डॉलर इतक्या किमतीचा माल चीनला निर्यात केला. भारताच्या एकूण निर्यातीपैकी केवळ पाच टक्के इतकी निर्यात चीनला होते. 

आपण चीनला करत असलेल्या निर्यातीमध्ये पुढील उत्पादनांचे प्रमाण जास्त आहे - कॉटन यार्न, टेक्स्टाइल यार्न, मिनरल फ्युएल, कापूस, प्लास्टिक वस्तू, न्यूक्लिअर मशीनरी, मासे, मीठ, इलेक्ट्रिक मशिनरी, लोह व पोलाद, तंबाखू, तेलबिया, धान्य, ताजी व प्रक्रिया केलेली फळे व भाज्या

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाला सुरुवात झाली आणि चीन अमेरिकेला पर्याय शोधू लागला. चीन मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आयात करतो. अमेरिकेने आयातकर वाढवल्यावर चीनने पर्यायी देशांशी संबंध निर्माण केले. यामध्ये भारतातील मध्य प्रदेश सरकार अग्रस्थानी होते. २०१८ या वर्षात, टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये आलेल्या वृत्तानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन, राज्याला या संधीचा फायदा घ्यायचा आहे असे सांगितले. चीनला दर वर्षी ११.५ कोटी मेट्रिक टन इतक्या सोयाबीनची आवश्यकता आहे. परंतु, त्यांची उत्पादनक्षमता फक्त १.५ मेट्रिक टन इतकीच आहे. मध्य प्रदेश राज्य सोयाबीन उत्पादनामध्ये अग्रेसर असल्यामुळे या संधीचे नक्कीच सोने करू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना होता. त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यावर तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधला. ‘मनरेगा’ या यंत्रणेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकेल, असा विश्वास त्यांना होता.



मुंबईमध्ये २०१९च्या या वर्षाच्या पूर्वार्धामध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये एका समिटचे आयोजन केले होते. वाणिज्य मंत्रालयाच्या अपेडा या संस्थेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये, चीनमधून २२ ग्राहकांना आमंत्रित करण्यात आले होते. अपेडा ही यंत्रणा शेतीमाल, फळे व मांस निर्यातीसाठी कार्यरत असून, भारतीय शेतकऱ्यांना व त्यासाठी पूरक उत्पादकांना आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल मदत करण्याचे महत्त्वाचे काम अपेडा करत आहे. २०१९मध्येही ‘अपेडा’ने एक मोठा उपक्रम हाती घेतला होता. सांगली, सातारा आणि नाशिक येथील तीन जिल्ह्यांमधून द्राक्ष बागायतदारांना आणि शेतकऱ्यांना एकत्र आणून, त्यांचा माल चीनला निर्यात करण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न महत्त्वाकांक्षी आणि स्तुत्य होताच, शिवाय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरला, यात शंका नाही. 

असे म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे, बरेचसे शेतकरी व उत्पादक युरोपला माल पाठवत होते. काही जण यूकेला, काही फ्रान्सला, काही दुबईला, तर काही जण अमेरिकेला माल पाठवून वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात करत होते. परंतु, या सर्व देशांबरोबर निर्यात व्यवसाय करण्यात एक महत्त्वाचा अडथळा आहे तो म्हणजे ‘माल परत येणे.’

या सर्व देशांमध्ये निर्यातीचे निर्बंध अत्यंत कडक आहेत. द्राक्षांचा एक घड जरी अपेक्षेपेक्षा कमी दर्जाचा असेल, तर हे देश अख्खाच्या अख्खा कंटेनर परत पाठवतात. त्यामुळे प्रचंड नुकसान होते. शेतकरी आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर नुकसान सोसतो.

याउलट, चीनच्या अपेक्षा कमी आहेत. वाइन बनवण्यासाठी द्राक्षे लागत असल्याने चीन द्राक्षे विकत घेताना फारसे निर्बंध लादत नाही. याचा व्यापाराला नक्कीच फायदा होतो. या सर्व प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात घेऊन ‘अपेडा’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

चिनी आयातदार येणार असल्याने मलाही बोलावण्यात आले होते. मी आणि माझे तीन सहकारी अशी आमची टीम कामाला लागली. एकूण २२ चिनी व्यावसायिक आणि ५०हून अधिक भारतीय शेतकरी अशी एक अनोखी मोट बांधली गेली. असे प्रयत्न सरकारी पातळीवर, कंपन्यांच्या पातळीवर सुरू होणे गरजेचे आहे, जेणेकरून निर्यातीला चालना मिळेल, वित्तीय तूट कमी होईल, शेतकऱ्यांना पैसे मिळतील... असे अनेक उद्देश साध्य केले जातील.

- सोहम काकडे
ई-मेल : soham.kakade@ewan.co.in

(लेखक पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि चिनी भाषेचे तज्ज्ञ आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GXOECP
Similar Posts
राज्यातील पहिला महिला संचालित दुग्ध व्यवसाय मावळमध्ये सुरू मावळ : संपूर्णपणे महिलांनी चालविलेला महाराष्ट्रातील पहिला दुग्ध व्यवसाय पुणे जिह्यातील मावळ तालुक्यात सुरू झाला आहे. टाटा पॉवरच्या सहकार्याने येथील महिलांनी मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून, याद्वारे सर्वसामान्य शेतकरी ते कृषी उद्योजिका असा मोठा टप्पा या महिलांनी पार केला आहे
चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धात भारतासाठी संधी अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय दर्जा साध्य करून, उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून निर्यातीमध्ये चांगलीच वाढ करू शकतो. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धामध्ये भारतासाठी निश्चितच संधी दडलेल्या आहेत. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १३वा भाग..
भारत-चीन संबंध : भावनिक नको, ‘प्रॅक्टिकल’ दृष्टिकोन हवा ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा २०वा म्हणजेच अंतिम भाग.....
चीनचा नवा विस्तारवाद – वन बेल्ट वन रोड शी जिनपिंग नोव्हेंबर २०१२मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष झाले आणि लगेचच मार्च २०१३मध्ये ते चीनचे अध्यक्ष झाले. चीन आधीपासूनच पाहत असलेले विस्तारवादाचे स्वप्न जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर आणखी गडद झाले. त्याबरोबरच, आणखी महत्त्वाकांक्षी स्वप्ने व भौतिक विस्तारवाद साकारण्याचीही तयारी सुरू झाली. ही तयारी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language