Ad will apear here
Next
जिद्दीचा ‘शब्दकोश’
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत... वेध या कार्यक्रमात..

आई-वडील निरक्षर असलेला एक मुलगा केवळ जिद्दीच्या जोरावर एका लहानशा खेड्यात राहून शिक्षणाला सुरुवात करतो. घरची गरिबी, इंग्रजी भाषेचा न्यूनगंड, कम्प्युटर कशाशी खातात याचा गंध नाही, तब्येतीचे अनेक प्रश्न या सगळ्यांशी लढत, अफाट परिश्रम करत सुनील खांडबहाले नावाचा मुलगा आपल्या जिद्दीनं या सगळ्या परिस्थितीवर मात करतो, ऑनलाइन शब्दकोश तयार करतो नि जगावर कसं राज्य गाजवतो, याची प्रेरक गोष्ट... आज ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
............
सुनील खांडबहाले... सिलिकॉन व्हॅलीत...मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स असो वा फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग... या सगळ्यांच्या खांद्याला खांदा भिडवून आज सुनील उभा आहे. आज त्याचा शब्दकोश केवळ मराठीतूनच नव्हे, तर भारतातल्या अनेक भाषांत कम्प्युटरवर उपलब्ध आहे. सुनील आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक दिग्गज मंडळींना भेटला आहे, त्यांच्याशी त्यानं चर्चा केल्या आहेत. इतकंच नाही, तर त्याच्या कामानं त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मानाचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. सकारात्मक विचारांचा, पूर्वग्रहांना आपल्या आसपास फिरकू न देणारा, चांगल्या तेवढ्या अनुभवांना घेऊन पुढे जाणारा, सर्वांविषयी मनात प्रेमभावना बाळगणारा सुनील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून जगातल्या ‘एमआयटी’सारख्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठापर्यंत कसा पोहोचला त्याची ही गोष्ट!

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातल्या पाचशे लोकवस्तीच्या वांजोळे नावाच्या इवल्याशा खेड्यात, उन्हाळ्यात तापणारा नि थंडीत गारठवून टाकणारा पत्रा असलेल्या, उंदीर-घुशींचा सुळसुळाट असलेल्या जागेत सुनीलची पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा भरायची. हे चारही वर्ग एकाच खोलीत भरायचे आणि चारही वर्गांना एकच शिक्षक शिकवायचे अशी परिस्थिती होती. तिथून जवळच असलेल्या महिरवणी नावाच्या गावात सुनीलचं कुटुंब मळ्यामध्ये एका झोपडीत राहायचं. लहानपणी गुरं सांभाळायची, त्यांना नदीवर आंघोळीला न्यायचं, अशी अनेक कामं सुनीलला करावी लागत. चौथीनंतर मात्र सुनीलला तळेगावला, त्याच्या आत्याच्या गावाला शिकायला जावं लागलं. गुरंढोरं सांभाळून, शेतीतली कामं करून तळेगावला रोज १४ किलोमीटर अंतर चालून सुनीलला शाळेत जावं लागत असे. पायात चप्पल नाही, रस्तादेखील वेडावाकडा, काट्याकुट्यांतून, दगड-धोंड्यातून गेलेला. अशा परिस्थितीत ऊन-पाऊस-वारा या सगळ्यांना झेलत सुनील त्या वातावरणात ‘कशासाठी शाळेसाठी, कशासाठी पोटासाठी’ अशा आरोळ्या देत रस्ता कापत असे. 

ग्रामीण भागाशी असलेली नाळ अजूनही सुटलेली नाही...सुनीलला आपले आजी-आजोबा खूप आवडायचे. घरात एवढी गरिबी असूनही, कोणी भुकेला वाटसरू दारात आला, तर ते त्याला प्रेमानं वागवत आणि आग्रहाने जेवायला बसवत. वडिलांनी वारकरी पंथ स्वीकारल्यामुळे प्रत्येक माणसाशी माणुसकीनं वागणं हा घरातल्या प्रत्येकाचा धर्मच बनला होता. सुनीलला आईचा खूप खंबीर आधार वाटायचा. आई निरक्षर होती; पण आपल्या मुलांनी मात्र खूप शिकलं पाहिजे हा तिचा ध्यास होता. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट आपण करू असं तिला वाटायचं आणि म्हणूनच आज सुनीलचा एक भाऊ न्यायाधीश, दुसरा भाऊ डॉक्टरेट मिळवून प्राध्यापक आणि सुनील इंजिनीअर झाला आहे. 

चाहत्यांच्या गराड्यात...खरं तर चित्रकार व्हायचं सुनीलच्या लहानपणी डोक्यात होतं. आपण दहावीची परीक्षा पास झालो, की आपण चित्रकला याच विषयाचं शिक्षण घ्यायचं असं त्यानं ठरवलं होतं. चित्रं काढणं म्हणजे स्वतःमधल्या अनेक गोष्टींची ओळख स्वतःलाच होणं, चित्रं काढणं म्हणजे स्वतःचा दृष्टिकोन विकसित होणं, चित्रं काढणं म्हणजे नवनिर्मितीचा आनंद मिळणं, चित्रं काढणं म्हणजे स्वतःला समृद्ध करत चालणं, असं सुनीलला वाटायचं. सुनील निकालाची वाट बघत होता आणि निकाल लागला. सुनील चक्क गुणवत्ता यादीत आला आणि इथून त्याची सगळीच स्वप्नं त्याला बदलावी लागली. कारण त्याचं यश बघून कोणी त्यानं डॉक्टर व्हावं, तर कोणी इंजिनीअर व्हावं असं बोलायला लागलं. शेवटी इंजिनीअरिंग शाखा निश्चित होऊन सुनीलची एक वाट ठरली. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह सुनील (उजवीकडे)सुनीलचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं. इंग्रजी फारसं चांगलं नव्हतं. इंजिनीअरिंगचा फॉर्म भरताना सुनीलला त्यातलं इंग्रजी कळत नव्हतं. त्यावर एक रकाना होता, मेल आणि फीमेल.... फीमेल शब्दाचं स्पेलिंग मोठं असल्यानं हेच आपलं असणार असं समजून सुनीलनं त्यावर ‘टिक’ केली होती. त्या वेळी फॉर्मकडे बघताना समोरच्या क्लर्कनं सुनीलकडे तीन-तीन वेळा खालून वरपर्यंत बघितलं; मात्र आपण काय चूक केली हे त्या वेळी सुनीलला कळलं नव्हतं. 

खांडबहाले डॉट कॉमइंजिनीअरिंगला गेल्यावर इंग्रजीतून शिकवलेलं काही समजायचं नाही. शिक्षकांना प्रश्न विचारताना कसे विचारायचे ते कळायचं नाही. सुनीलला खूप भीती वाटायची. न झेपल्यामुळे अनेक मुलांनी इंजिनीअरिंग सोडून दिलं होतं. आपण असं केलं, तर आपल्या आई-वडिलांना काय वाटेल याची चिंता सुनीलला वाटायची. शेतात दिवसरात्र कष्ट करणारे आई-वडील त्याला डोळ्यासमोर दिसायचे. अशा वेळी मनातली सगळी भीती, मनातली घुसमट सुनीलनं आपल्या एका प्राध्यापकाजवळ बोलून दाखवली. त्या वेळी त्यांनी सुनीलच्या हाती डिक्शनरीरूपी एक जादूची छडी दिली. त्याच्या समस्येवरचं ते उत्तर होतं... डिक्शनरीचा वापर करणं. सुनीलला डिक्शनरी हे नावदेखील तोपर्यंत ठाऊक नव्हतं. ती कशी वापरायची हा तर फार दूरचा प्रश्न होता. डिक्शनरी कशी वापरायची हे त्या प्राध्यापकांनी सुनीलला नीट समजावून सांगितलं. हळूहळू सुनीलला डिक्शनरीचा वापर करून शिक्षकांनी वर्गात शिकवलेल्या गोष्टी थोड्या थोड्या कळू लागल्या. निकाल लागला, तेव्हा फक्त चारच मुलं पास झाल्याचं सुनीलला कळलं. धडधडत्या अंतःकरणानं सुनीलनं निकाल बघितला. आश्चर्य म्हणजे तो त्या चारांमध्ये पहिला होता. या प्रसंगानं सुनीलचं आयुष्यच बदलून गेलं. आपल्याला आत्मविश्वास देणाऱ्या, यशाचा मार्ग दाखवणाऱ्या या डिक्शनरीची साथ आता कधीच सोडायची नाही, असं त्यानं मनोमन ठरवलं. 

टेड-एक्सचे संस्थापक जॉन वेर्नर यांच्यासमवेत सुनील

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासमवेत...सुनीलला तीन वर्षांत २० हजार शब्द ठाऊक झाले होते. आपल्यासारख्या मुलांना सोयीचं व्हावं म्हणून सुनीलनं शब्दकोश करायचं ठरवलं. सुरुवातीच्या काळात सुनील झेरॉक्स करून आपल्या मित्रांना देत असे. नंतर आपण ते पुस्तकरूपात प्रसिद्ध करावं असं त्याला वाटायला लागलं; पण हे पुस्तक छापणार कोण? यासाठी उपाय होता तो डिजिटल शब्दकोश बनवण्याचा! पण सुनीलला कम्प्युटरचं कुठलंच ज्ञान नव्हतं. मग सुनीलनं एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्यासाठी प्रयत्न केले; पण त्यांची फी सुनीलला परवडणारी नव्हती. आपल्याला काही काम द्यावं आणि त्यातून आपण फी चुकती करू असं सुनीलनं सांगितलं; मात्र त्या संस्थाचालकांनी नकार दिला. आता करायचं काय? सुनीलनं सहा महिने स्वतःला जगापासून तोडून टाकलं. या काळात मित्रानं दिलेला कम्प्युटर आणि कम्प्युटरचं शिक्षण देणारी पुस्तकं इतक्याच गोष्टी त्याच्या साथीला होत्या. आता एकलव्याप्रमाणे त्यालाच त्याचं शिकायचं होतं. पुस्तक वाचायचं आणि त्याप्रमाणे कम्प्युटरवर करून बघायचं असा सुनीलचा दिनक्रम सुरू झाला. 

दिवसातले जवळजवळ २२ तास सुनील काम करू लागला. दिवस-रात्र, तहान-भूक काही काही त्याला कळत नव्हतं. याचाच परिणाम असा झाला, की सततच्या बसण्यामुळे सुनीलला पाठीच्या मणक्यांचा त्रास सुरू झाला. त्याचं अत्यंत अवघड असं ऑपरेशन झालं. डॉक्टरांनी त्याला बसण्यासाठी मनाई केली; पण सुनीलला आपलं काम अर्धवट सोडायचं नव्हतं. त्यानं खुर्चीवर कम्प्युटर ठेवून टेबलावर झोपून काम करायला सुरुवात केली. आणि सहा महिन्यांनंतर कम्प्युटरमधली प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस तो शिकला. स्वप्रयत्नांमधून त्यानं डिक्शनरीचं सॉफ्टवेअर बनवलं. आणि यातूनच तयार झाला जगातला पहिला मराठी बोलता शब्दकोश!

सुनीलनं केलेल्या कामाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. तिथून सुनीलचं सगळं जग बदललं. जगभरातली अनेक माणसं जोडली गेली. भाषातज्ज्ञ आणि अनेक जाणकार लोकांच्या ओळखी झाल्या. त्यांचं आणखी मार्गदर्शन मिळालं. त्यातूनच सुनीलनं इंग्रजी-हिंदी, हिंदी-इंग्रजी असे शब्दकोश तयार केले. आपल्या कामाच्या प्रसाराच्या निमित्तानं सुनीलनं देशभरातल्या सरकारी, खासगी शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. 

२००३ ते २००४ या काळात इंटरनेटचा वापर वाढायला सुरुवात झाली होती. आपला शब्दकोश इंटरनेटवरून लोकांना उपलब्ध होण्यासाठी सुनीलचे प्रयत्न सुरू झाले. त्यानं खांडबहाले डॉट कॉम ही वेबसाइट तयार केली. आता केवळ गाव, राज्य, देशच नव्हे, तर सुनीलचा जगभराशी संपर्क येणार होता. सुनीलनं मराठी, इंग्रजी आणि हिंदी ऑनलाइन डिक्शनरीची सुविधा जगभरातल्या लोकांना उपलब्ध करून दिली. ‘खांडबहाले डॉट कॉम’ची ओळख जगभरातल्या लोकांना होऊ लागली. अतिशय बुद्धिमान लोकांशी संपर्क आल्यानं नवनवीन विचार कळू लागले. यातूनच बहुभाषक शब्दकोश बनवणं गरजेचं आहे ही गोष्ट सुनीलच्या लक्षात आली. अनेक भाषातज्ज्ञांची मदत आणि मार्गदर्शन यातून पुढल्या काही काळातच सुनीलनं गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी, बंगाली अशा एकूण २२ भारतीय भाषांमधली ऑनलाइन डिक्शनरी तयार केली. आज १५० देशांतले १५ कोटी लोक ‘खांडबहाले डॉट कॉम’चा वापर करतात. इंटरनेटवरची भारतीय भाषांसाठीची सर्वोत्तम वेबसाइट म्हणून ‘खांडबहाले डॉट कॉम’नं ख्याती मिळवली. आता तर रोज लाखो लोक या वेबसाइटला भेट देतात. 

‘एमआयटी’चे अॅलन मुलॅली यांच्यासहनंतर सुनीलला वेध लागले ते कम्प्युटरवरचे शब्दकोश मोबाइलमध्ये वापरता येण्यासाठी काय केलं पाहिजे याचे! त्यानं मोबाइलसाठी डिक्शनरी तयार करण्याचं काम २००८मध्ये सुरू केलं. २०१०मध्ये सुनीलनं मराठीतली डिक्शनरी मोबाइलमध्ये आणली. मोबाइलवर ‘गुगल प्ले स्टोअर’मधून उपलब्ध होणारं खांडबहाले डिक्शनरी अॅप लोकांना खूपच आवडलं. 

‘एमकेसीएल’चे विवेक सावंत यांच्यासोबत१४ मे २०१४ या दिवशी फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग याचा वाढदिवस होता आणि त्याच्या तिसाव्या वाढदिवसानिमित्त ‘फेसबुक’मध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पसरलं होतं. संपूर्ण परिसरात सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुग्यांच्या मध्यभागी मार्क उभा होता आणि हे सगळं अगदी जवळून म्हणजे त्याच वातावरणात उपस्थित राहून बघण्याची संधी सुनीलला मिळाली होती. आपण अशा ऐतिहासिक क्षणांचे कधी साक्षीदार होऊ असा विचार त्यानं स्वप्नातही केला नव्हता. आपण चक्क ‘फेसबुक’मध्ये काम करू असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. जागतिक पातळीवरच्या एका वेगळ्या विश्वात त्याला प्रवेश करता आला होता. केवळ फेसबुकच नाही, तर गुगल, ड्रॉपबॉक्स, ऑटोडेस्क, जीई डिजिटल, पेपाल, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, इंटेल आणि ई-बे यांसारख्या आभासी जगातल्या नामवंत कंपन्यांना जवळून अनुभवण्याची संधी सुनीलला मिळाली. या सगळ्याच कंपन्यांमधलं वातावरण खूप मोकळं आणि स्वातंत्र्य देणारं होतं. इथं अनेक सोयी-सुविधांची रेलचेल होती. आणि सुनीलच्या खिशात या कंपन्यांचे नोकरीसाठीचे प्रस्ताव! असं सगळं मोहाचं वातावरण असतानाही सुनीलनं आपल्या मायदेशी परतायचं आणि तिथेच काम करायचं ठामपणे ठरवलं. अशा मोहांना बळी न पडणं ही तरुणपणात अशक्यप्राय असलेली गोष्ट त्यानं करून दाखवली. जगातल्या सर्वोत्कृष्ट अशा बॉस्टनमधल्या एमआयटी (मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या विद्यापीठात सुनीलला शिकायला मिळालं. अनेकदा सुनील स्वतःला चिमटा काढून हे स्वप्न तर नाही ना याची खात्री करून घेत असे. याचं कारण ज्या मुलाचा जन्म भारतातल्या महाराष्ट्र राज्यात एका लहानशा खेड्यात झालाय, तो मुलगा इथपर्यंत जाऊच कसा शकेल?

शिक्षणाच्या बीजानं सुनीलच्या आयुष्यात क्रांती केली. शिक्षणाचा तोच स्पर्श गरजूंना व्हावा यासाठी सुनीलनं ग्रामीण भागात शाळा सुरू केली. त्यानंतर त्यानं तिथल्या अडचणी लक्षात घेऊन या शाळेला फिरत्या शाळेचं स्वरूप दिलं. आज गावोगावी आणि अनेक भागांना भेटी देऊन सुनीलनं शाळा-शाळांमधून प्रात्यक्षिकं देत विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागं केलं आहे. जे जे आपल्याला ठावे ते ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे या ध्यासानं सुनील आजही काम करतो आहे. इतकं मोठं काम करूनही आपण फार काही भव्य-दिव्य केलं असं त्याला वाटत नाही. फेसबुक, गुगलपासून जगभरातल्या तज्ज्ञ लोकांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी सुनीलला मिळाली. त्याचं अनुभवविश्व आणखीनच विस्तारलं. ‘दे रे हरी खाटल्यावरी’ असं घडत नाही, तर आपल्या स्वप्नांना कृतीचे, कष्टाचे, चिकाटीचे आणि सातत्याचे पंख द्यावे लागतात, असं सुनील म्हणतो. त्याच्या आयुष्याकडे पाहिलं, की त्याचं हे वाक्य मनोमन पटतं.

सुनीलची वेबसाइट : http://www.khandbahale.com/

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSLBK
 आपल्याला काही येत नाही म्हणून न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही . हेच या लेखातून स्पष्ट होते . या अॅपच्या माध्यमातून शब्दकोश प्रत्येकाच्या कायम खिशात राहील . बदलत्या माध्यमाचा सकारात्मक उपयोग केला आहे . मलाही याचा उपयोग होईल . बाईटस ऑफ इंडिया ने अॅप जगासमोर आनल्याचा वाचक म्हणून आनंद होतोय .
 चित्रपटात शोभेल अशी खूपच प्रेरणासायी कथा आहे. लेख सद्ध उत्तम लिहिला आहे. मनपूर्वक धन्यवाद.
 Nice
 V V Good and Nice Sunil
 सलाम सुनीलच्या जिद्दीला शब्द पण कमी पडत आहेत त्याच्या कर्तृत्वाचे अभिनंदन करायला खराखुरा जादूगार आहे
 My friend sunil is very great man.
I proud that I am lucky possessing such friend.He is Edison of India.1
Similar Posts
रेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू नाशिक : गीर्वाणवाणी अर्थात देवभाषा संस्कृत शिकण्यात रस घेणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत चालली आहे. श्रवण हा भाषाशिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. ही गोष्ट लक्षात घेऊन १६ ऑगस्ट २०१९ रोजी ‘रेडिओ संस्कृत भारती’ या जगातील पहिल्या संस्कृत इंटरनेट रेडिओचे मोफत प्रसारण सुरू करण्यात आले आहे. विविध भाषांचे
मन में है विश्वास... ज्याला एक लाख रुपयांचं कर्ज नाकारण्यात आलं होतं, त्याच तरुणानं वयाच्या २७व्या वर्षी स्वकर्तृत्वावर बँक उभारली! वीस वर्षांत या बँकेच्या ११ शाखा निर्माण झाल्या असून, बँकेचा व्यवसाय ५०० कोटींवर पोहोचला आहे... स्वतःवर विश्वास ठेवून जिद्दीनं हे यश मिळविणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे विश्वास जयदेव ठाकूर... ‘अनवट
‘मनोहर’ कार्य करणारी ‘मुक्ता’ एखाद्याच्या दुःखानं अश्रूंना मुक्तपणे वाट करून देणाऱ्या, पण अन्यायाच्या विरोधातल्या मोर्चाचं नेतृत्व करताना कणखर, लढाऊ होणाऱ्या, कामगारांच्या हक्कांसाठी त्यांना लढण्याचं बळ देण्यासाठी प्रेरणादायी भाषणं करणाऱ्या आणि समाजाला जागृत करण्यासाठी या साऱ्यांचे प्रश्न प्रभावी लेखनातून मांडणाऱ्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे मुक्ता मनोहर
तो एक ‘राजहंस!’ सेरेब्रल पाल्सीमुळे ज्याचं अवघं आयुष्यच पणाला लागलं होतं, लहानपणी जो पाण्याला घाबरत होता, तो हंसराज पाटील आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जलतरणपटू आहे. स्पर्धा परीक्षेमध्येही उत्तम यश मिळवून तो आज नाशिकचा नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. तो आणि त्याच्या आई-वडिलांनी जिद्दीने अडचणींवर मात करत केलेल्या प्रयत्नांमुळे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language