
‘प्राणायाम करणे’ हे हल्ली अगदी परवलीचे शब्द बनले आहेत. प्राणायाम शिकविणाऱ्या अनेक संस्था व वर्गही निघाले आहेत. श्वास आणि उच्छ्वासाची क्रिया असलेल्या प्राणायामाबद्दलची शास्त्रोक्त माहिती ‘प्राणायाम : ज्ञान आणि विज्ञान’ या पुस्तकातून डॉ. गिरीधर करजगावकर यांनी दिली आहे. मूळचे अॅलोपॅथीचे डॉक्टर असल्याने प्राणायाम शिकताना, करताना प्रत्येक पायरीचा शरीरशास्त्रानुसार काय उपयोग होतो, हे त्यांनी तपासून पाहिले आहे. म्हणूनच वैज्ञानिक कसोट्यांवर आधारित स्वानुभवातून आकाराला आलेल्या या पुस्तकात आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचीन योगशास्त्र या दोहोंमधील आरोग्यततत्त्वांचा समतोल साधत प्राणायामाचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार आजारांची प्रमुख कारणे यात दिली आहेत. आजाराचे मूळ अचूक ओळखून असाध्य व्याधी प्राणायामामुळे कशा बऱ्या होतात, हे यात सांगितले आहे. प्राणायामाची पूर्वतयारी, आवश्यक जीवनपद्धती, आपले इतरांसोबतचे व स्वतःसोबतचे आचरण, वज्रासनाचे महत्त्व या पुस्तकात विशद केले आहे. प्राणायामाचे वर्गीकरणही या पुस्तकात करण्यात आले आहे. तसेच, प्राणायामाचे आध्यात्मिक महत्त्व सांगून, प्राणायामाची प्रात्यक्षिकांचे फोटोही आहेत.
पुस्तक : प्राणायाम : ज्ञान आणि विज्ञान
लेखक : डॉ. गिरीधर करजगावकर
प्रकाशन : विश्वकर्मा प्रकाशन
पृष्ठे : २१५
मूल्य : २८० रुपये
(‘प्राणायाम : ज्ञान आणि विज्ञान’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)