
अनेक झाडे बहुपयोगी असतात. देशी झाडांमध्ये वड, पिंपळ अशी झाडे शतायुषी असतात; म्हणजेच ती दीर्घ काळ उभी असतात. या झाडांची व त्याभोवतालच्या पर्यावरणाची माहिती रूपाली पारखे-देशिंगकर यांनी ‘शतायुषी’ या पुस्तकामधून दिली आहे. याची सुरुवात अर्थातच बहुगुणी वडापासून होते. वडाभोवती गुंफलेली सत्यवान-सावित्रीची कथा सांगून, त्याचे कार्य, वनस्पतीशास्त्रीय नाव, विविध जाती, उपयोग, धार्मिक कार्यातील महत्त्व, औषधोपचारांसाठी उपयोग आदी माहिती पुस्तकात दिली आहे. महावृक्ष वडानंतर बोधिवृक्ष पिंपळ, शंभर टक्के भारतीय औदुंबर अर्थात उंबर, शिस्तबद्ध पद्धतीने वाढणारा आणि आकर्षक फुलांचा कदंब, हिरव्यागार पानांचा आणि गर्द जांभळ्या रंगारी टपोरी फळे धरणारा जांभूळवृक्ष, ताडमाड वाढणारा सरदार ताड, नाजूक सुगंधी फुलांचा बकुळवृक्ष, लोकांच्या जीवनाशी जोडलेला मोह, फळांचा राजा आंबा, वरून काटेरी पण आत मऊ गोड गरे असणारा फणस, तसेच करंज, चिंच, गोरखचिंच अशी दीर्घायुषी झाडांची सळसळ शब्दरूपाने या पुस्तकातून आपल्याला वाचता येते. प्रत्येक झाडाची छायाचित्रेही अत्यंत आकर्षक असल्याने सजावटही खुलून दिसते.
पुस्तक : शतायुषी
लेखक : रूपाली पारखे
प्रकाशक : हिंदुस्तान प्रकाशन संस्था
पृष्ठे : ११२
मूल्य : १७५ रुपये
(‘शतायुषी’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)