Ad will apear here
Next
सर्जनात असतो युगांचा अर्क
कविता काय किंवा चित्र काय, त्या निव्वळ त्या क्षणाची अशी निर्मिती नसते. आपला आणि आपल्या प्राचीन पूर्वजांपर्यंत जगून झालेल्या सगळ्यांच्या संचिताचा काहीएक अंश त्यात येत असतोच. एका अर्थानं सर्जनात युगांचा अर्क असतो. संगीतासारख्या निराकार अनुभवाला दृक् रूपात पाहता आलं पाहिजे. ‘वाचन : चित्रांचं, चित्रपटांचं आणि साहित्याचं’ या गणेश विसपुते यांच्या लेखाचा तिसरा भाग...
....................
लिआनार्दो दा व्हिन्सीचे फ्रान्सेको मेन्झीने काढलेले चित्र. (सौजन्य : विकिपीडिया)एका आयुष्यात आपल्याला हजार गोष्टी कराव्यात असं वाटतं आणि ते शक्य नसतं. म्हणून आपण हजार गोष्टींत आपली आयुष्यं पणाला लावलेली हजार प्रकारची माणसं पाहावीत, वाचावीत, त्यांना समजून घेता आलं तर पाहावं. प्रबोधनकाळात अशी बहुमुखी प्रतिभेची माणसं होती. एकाच वेळी त्यांना खगोलशास्त्रात आवड असे आणि ते गणितज्ञ, संगीतकार आणि तत्त्वज्ञही असत. लिओनार्दो दा व्हिन्सी असा प्रतिभावान होता. तो रेनेसाँचा प्रतीकपुरुषच आहे. एक माणूस साठ-सत्तर-ऐंशी वर्षांच्या एका आयुष्यात काय काय करू शकतो, किती क्षेत्रांत, किती विधांमध्ये आणि किती काम करू शकतो याची चुणूक म्हणजे व्हिन्सीचं आयुष्य आहे. तो मूलतः चित्रकार होताच; पण चित्रकलेतलं अॅनाटॉमीमधलं मूलभूत असं काम त्यानं केलं. मानवी मृत शरीरं फाडून, हाडं, स्नायूंची प्रमाणशीर रेखाटनं त्यानं करून ठेवली. दोन मे १५१९ला मरण पावला तेव्हा त्यानं लिहून ठेवलेलं तेरा हजार पानांमध्ये सामावलेलं त्याचं लेखन विस्मयचकित करणारं आहे. त्याच्या एका नोटबुकमधलं पहिलंच वाक्य आहे की, ज्याला गणितात रस नाही त्यानं माझं काम पाहू नये. याचं कारण तो स्वतः वैज्ञनिक कठोर शिस्तीचा प्रतिभावान असा तत्त्वज्ञ कलावंत होता. त्यानं ज्या विषयांमध्ये काम केलं त्याची यादी पाहा - प्राणिविज्ञान, वनस्पती विज्ञान, भूगोल, नकाशावाचन, ऑप्टिक्स, वास्तवशास्त्र, एरोडायनॅमिक्स, जलविज्ञान, धातुशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पकला, स्थापत्य अभियांत्रिकी आणि आणखी आणखी बरंच. लेखक तो होताच. शिवाय त्यानं संगीतवाद्यं तयार केली, संगीतरचना केल्या, सैन्यासाठीच्या पुलांची संकल्पनं तयार केली, सौर ऊर्जा साठवणीचं तंत्र शोधण्याचा प्रयत्न केला, कॅल्क्युलेटरच्या तंत्राचा अभ्यास केला. तोफा-विमानांची डिझाइन्स बनवली. हलती-चालती खेळणी बनवली. 

मानवी शरीराची अॅनाटॉमी त्याच्या रेखाचित्रांमधून जगाला पहिल्यांदा कळली असेल. त्यासाठी फ्लोरेन्समधल्या दवाखान्यातली मृत शरीरं विच्छेदनासाठी वापरण्याची त्याला परवानगी मिळाली होती. गर्भाशयातल्या गर्भाचं पहिलं शास्त्रीय रेखाटन त्यानं बनवलं. वयाचा मानवी शरीरावर आणि चेहऱ्यांवरच्या हावभावांवर होणाऱ्या परिणामांचा त्यानं अनेक वर्षे रेखाटनांद्वारे अभ्यास केला होता. प्राणी-पक्ष्यांच्या शरीरांची विच्छेदनं करून मानवी शरीररचनेशी त्यांची तुलना करणारी रेखाटनं त्यानं केली. पक्ष्यांच्या उडण्याच्या क्षमतेनं तो सतत प्रभावित राहिला. त्याच प्रेरणेतून त्यानं फ्लाइंग मशिनची, हँग-ग्लायडरची डिझाइन्स बनवली.

लिआनार्दोने काढलेली घोड्याची रेखाटने (सौजन्य : विकिपीडिया)पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या प्रबोधनाच्या काळात, जेव्हा विवेकाला आणि प्रगतीच्या इच्छेला मध्यवर्ती मानलं होतं आणि निसर्गाला तर मूल्याचं अधिष्ठान होतं, त्या काळात व्हिन्सी विवेकाची शास्त्रीय कसोटी वापरून निसर्गाची गुपितं शोधण्यात मग्न होता. कुतूहल हाच त्याचा ध्यास होता. लुडोविको स्फोर्झाकडून त्याला स्फोर्झा मॉन्युमेंट हॉर्सचं काम कमिशन करण्यात आलं होतं. २४ फूट उंचीच्या प्रचंड घोड्याचं ब्राँझ शिल्प प्रत्यक्षात मात्र येऊ शकलं नाही. त्यासाठी त्यानं बराच काळ अभ्यास केला. घोड्यांची हजारो रेखाटनं केली. एवढ्या मोठ्या शिल्पासाठी ओतकाम करायचं, तर वेगळं तंत्र शोधून काढावं लागणार होतं. त्याचाही तो अभ्यास करत होता. फ्रेंचांच्या आक्रमणात हा प्रकल्प गुंडाळावा लागला. या शिल्पाचं लाइफसाइझ क्ले मॉडेल सैनिकांच्या हाती पडल्यावर त्यांनी ते नेमबाजीच्या सरावासाठी म्हणून वापरलं. प्रकल्पासाठी बाजूला काढून ठेवलेलं ब्राँझ नंतर या आक्रमणाच्या दरम्यान सामूहिक शिरकाणासाठी बनवलेल्या शस्त्रांसाठी आणि तोफांसाठी वापरलं गेलं!

आपल्याकडेही ही परंपरा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला-विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रखरपणे मौजूद होती. मी अलीकडे उत्सुकतेपोटी ‘विविधज्ञानविस्तार’चे अंक वाचत होतो. हे नियतकालिक १८६८ ते १९३७ असं सलग (मध्ये एका वर्षाचा अपवाद वगळता) सत्तर वर्षं चाललं. या नियतकालिकाच्या अंकांमधलं लेखन वाचताना लक्षात येतं, की जेव्हा माहितीच्या सुविधांचा अभाव होता, पुरेशा लायब्रऱ्या नव्हत्या, दळणवळणाची साधनं नव्हती, एवढंच कशाला, तेव्हा कागद वगैरे स्टेशनरीही आजच्याइतकी वैपुल्यानं मिळत नसणार. आणि तरीही लोक मौलिक लेखन करत होते. फ्रान्सिस बेकनच्या निबंधांचे अनुवाद होत होते. पाश्चिमात्य साहित्यावर सखोल टीका छापून येत होती. भाषेचा गांभीर्यानं आणि आस्थेनं विचार येत होता. आगरकर समाजकारण-पत्रकारिता-करत होतेच; पण शेक्सपिअरच्या नाटकांची भाषांतरंही करत होते. न्यायमूर्ती रानडे अर्थशास्त्रविषयक मूलभूत लेखन करताना तुकोबाच्या अभंगांसाठी स्वतंत्र स्टडी सर्कल काढून त्यात चर्चा करत होते. भाषेच्या व्युत्पत्तीपासून व्याकरण, कला, इतिहास, धातुशास्त्रापर्यंत असंख्य विषयांवरचं लेखन प्रसिद्ध होत होतं. हा काळ मला फार प्रेरणादायक वाटतो. पुढे तो व्यासंग कमीच होत गेला की काय, असं वाटू लागतं. आज तर अनास्थेची परमावधी आपल्याला दिसते. 

आपलं वाचन आपल्याला हळूहळू निवडता येतं, मराठी संस्कृतीत गाणं सतत कानावर पडत असतंच, रेडिओमुळे किमान सिनेसंगीत, भावगीतं, लोकसंगीत तर असतंच; पण दृक् प्रशिक्षणाची काही सोय आपल्या समाजात नाही. वेगवेगळ्या प्रकारची चित्रं सतत मुलांच्या डोळ्यांसमोर आदळताहेत, सहजपणे गॅलऱ्यांमधून मुलांना चित्रं बघायला मिळताहेत हे लहान गावांमधून शक्य नसतंच. अलीकडेच पुण्यात गुलाम मोहम्मद शेख यांचं भारतीय लघुचित्रकलेचा सविस्तर आढावा घेणारं व्याख्यान झालं. बापट मेमोरिअल लेक्चर म्हणून. आपल्या व्याख्यानात एके ठिकाणी ते म्हणाले, ‘जैसलमेरजवळ एक गाव आहे. त्या गावात परंपरेनंच घरोघरी, घरांच्या भिंतींवर, व्हरांड्यात, दिवाणखाण्यात, स्वयंपाकघरात सगळीकडे चित्रं काढलेली असतात. मोठाल्या भिंतींवर हत्तींपेक्षाही मोठ्या आकाराचे हत्ती रंगवलेले असतात.’ पुढं ते म्हणाले, ‘किती बरंय, त्या गावातली मुलं लहानपणापासूनच फक्त चित्रं आणि आपल्या आयांना पाहत मोठी होत असतील.’ आपल्याकडे काय परिस्थिती आहे? महानगरपालिका चौकाचौकातून टेंडरं काढून फायबरची निर्बुद्ध स्कल्प्चर्स उभी करतात. ब्राँझमधल्या चांगल्या पुतळ्यांना वर्षातून एकदा ‘रंगवतात’! कलेसाठी हानिकारक अशा गोष्टी ‘अनलर्न’ करण्यासाठीही तुम्हाला तुमचीच तंत्रं विकसित करावी लागतात. 

कविता काय किंवा चित्र काय, त्या निव्वळ त्या क्षणाची अशी निर्मिती नसते. आपला आणि आपल्या प्राचीन पूर्वजांपर्यंत जगून झालेल्या सगळ्यांच्या संचिताचा काहीएक अंश त्यात येत असतोच. एका अर्थानं सर्जनात युगांचा अर्क असतो. संगीतासारख्या निराकार अनुभवाला दृक् रूपात पाहता आलं पाहिजे. संगीतात सात स्वर असतात. तसेच रंगही सात आहेत. मधल्या रंगांच्या श्रुती असतात. व्यक्ती आणि समाज यात सतत संघर्ष आणि घर्षण होत असतं. त्या प्रक्रियेत कलावंताच्या कलेतल्या शोधाच्या शक्यता असतात. आपल्या आसपासच्या समाजातली प्रचंड सरमिसळ, सगळ्याच गोष्टींचं झालेलं असमान वाटप, विविध क्षेत्रांतला, विविध रूपांतला भ्रष्टाचार, गॉड्स आणि गॉडफादर्सच्या हातात असलेल्या नाड्या, विखार आणि असहिष्णुता, हिंसा, बदलाच्या अमानुष वेगात संवेदनशील, सामान्य माणसाचं काय होतं, कायदेकानू नसलेल्या, कुठलाच धरबंध नसलेल्या या केऑसमध्ये स्वतःला प्रश्न पडू लागतात. आपण आत पाहू लागतो. तो शोधही सुखाचा नसतो; पण त्यातून आपल्याला कलाकृती सापडते. या संघर्षातून, अनेक टोकांच्या मनोवस्थांमधून, स्मरण-विस्मरणाच्या कोशातून हाती लागलेल्या गोष्टीत सगळ्यांना एकत्र जोडणारा धागा कधीतरी सापडतो. हवं तेवढं चित्रात येतं, कवितेत येतं, फ्रेममध्ये येतं, बाकी ‘ऑफस्क्रीन’मध्ये आपसूक ढकललं जातं.  

चित्रं कशी पाहावीत, या प्रश्नाला तांत्रिक काही उत्तर देता येणार नाही. कारण ते योग्य होणार नाही. आस्वादक आणि कलाकृती यांच्यातला तो संवाद आहे. आपण गाणं कसं ऐकतो? म्हणजे समजून घेऊन गाणं कसं ऐकतो? त्याची एक पूर्वतयारी आपल्या वयानुसार होत गेलेली असते. आपल्या अनुभवसंचितातून मिळत आलेली माहिती वा ज्ञानातून अनेक गोष्टींशी आपण पडताळा घेऊन पाहत असतो. एका माणसातच अनेक माणसं असतात. कबीर ‘बहुरी अकेला’ म्हणतात ना, ते याच अर्थानं. अनुभवलेल्या एखाद्या गोष्टीशी समोर दिसणाऱ्या कलाकृतीत साधर्म्य शोधत असतो. ते कलाकृती समजून घेणं आहे; पण अमूर्तता तुमच्यातल्या अशा गोष्टीला आव्हान देते, जिचं स्पष्ट रूपच तयार झालेलं नाही. त्यामुळे अमूर्तता एक प्रकारे निर्गुण तत्त्वाला जागवण्याचा प्रयत्न करत असते. 

चित्रात काय दिसतं? तर चौकटीत रंग, रेषा, पोत, आकार यांनी तो अवकाश भरून काही एक प्रतिमा तयार केलेली असते. त्या प्रतिमेकडे पाहताना आपण नातं निर्माण करू लागतो. कधी ते जुळतं, कधी जुळत नाही. व्हिन्सेंट व्हान गॉग या डच चित्रकारानं काढलेलं माझं एक आवडतं चित्र आहे. ‘पॉन्त द लांगलां’ किंवा ‘द लांगलां ब्रिज’ हे त्या चित्राचं नाव. व्हान गॉगनं या ‘ड्रॉब्रिज’ची चित्रमालिकाच रंगवलेली आहे. जपानी चित्रशैलीत दिसतो, तसा साधेपणा या चित्रातून लक्षात येतो. रचना एकदम साधी, समतोल सांभाळलेली अशी आहे. पुलाचे उभे पिलर्स, सायप्रसची झाडं, काटकोनात वाहणारी नदी, कपडे धुणाऱ्या स्त्रिया, पुलाच्या मधोमध चित्राचा तोल साधणारी घोडागाडी असे या चित्राचे दृश्य तपशील आहेत. कँटिलिव्हर पद्धतीच्या लाकडी पुलाचे तांत्रिक तपशील यात बारकाव्यानं, नाजूकपणे दाखवलेले दिसतात. पिवळ्या, गुलाबी, आकाशी रंगांनी पुलाच्या मजबूत दगडी भिंती रंगवलेल्या आहेत, तर त्यावर नाजूक उभ्या रेषांमधून पूल आणि त्याच्या दोऱ्या चितारल्या आहेत. पाण्यातल्या वलयांमधून उजेड-सावल्यांचा खेळ दाखवला आहे. काहीही गोंधळ, गडबड नाही, घोडागाडीही जणू स्थिर आहे. १९८८ साली काढलेल्या या चित्रानं श्रेष्ठ जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या ‘ड्रीम्स’ या चित्रपटमालिकेतल्या एका फिल्मची सुरुवात होते. एक तरुण गॅलरीत व्हान गॉगची पेंटिंग्ज पाहत असताना या चित्रासमोर थबकतो. एका क्षणी त्याचा हात अनाहूतपणे चित्राकडे जातो. त्याचं बोट त्या नदीतल्या पाण्यावर टेकताच पाणी हलू लागतं. दुसऱ्या क्षणी तो तरुण त्या चित्रात पोचलेला असतो. तिथल्या कपडे धुणाऱ्या बायकांशी बोलू लागतो. व्हिन्सेन्टची चौकशी करतो आणि त्याच्या शोधात निघतो. एका महान चित्रपट दिग्दर्शकानं महान चित्रकाराला केलेला हा सलाम आहे.

चित्र : अकिरा कुरोसावाकुरोसावानं आपल्या माध्यमातून व्हान गॉगच्या कामाला प्रतिसाद दिलेला आहे. आपल्याकडे ऋत्विक घटक यांनी राम किंकर बैज यांच्यावर एक फिल्म केलेली आहे. किंवा सत्यजित राय यांची रवींद्रनाथ टागोरांवरची फिल्म आपण पाहिली असेलच. अकिरा कुरोसावा स्वतः चित्रकार होते. आपल्या चित्रपटासाठी ते चित्र काढत असत. त्या चित्रांतून त्यांना आपल्या फिल्मसाठी त्या-त्या दृश्यातल्या चौकटीत रंग-उजेड-काळोख आणि पात्रांचा चेहऱ्यावर दिसणारा भाव कसा असेल हे जाणून घ्यायचं असावं. सत्यजित राय आपल्या फिल्मसाठीचं स्क्रिप्ट रेखाचित्रांनी सजवत. ‘पथेर पांचाली’ची अशी रेखाचित्र-संहिता उपलब्ध आहेच. त्यांना रविशंकर यांच्यावरही एक फिल्म करायची होती. त्यासाठी त्यांनी काढलेल्या रेखाचित्रांची वही आता नुकतीच प्रकाशित झाली आहे. ‘सत्यजित रेज रविशंकर :  अॅन अनफिल्म्ड व्हिज्युअल स्क्रिप्ट’ असं या प्रकाशित रेखाचित्रसंहितेचं नाव आहे. रवीबाबूंवर फिल्म करायची हे रेंच्या डोक्यात ‘अपूर संसार’चं काम चालू होतं, तेव्हापासून होतं. त्या वेळी केलेली ही सगळी रेखाचित्रं आहेत. टायटलच्या अक्षरांपासून ते अखेरच्या शॉटपर्यंत. त्यांना बहुधा एक कॉन्सर्ट यात घ्यायची होती. काळ्या जलरंगात इथं पहिल्या फ्रेमपासून काय हवं हे त्यांनी व्हिज्युअलाइज केलेलं दिसतं. रवीबाबू बसलेले आहेत त्या अर्धकाळोखातला प्लॅटफॉर्मचा शॉटच पुढे संध्याकाळच्या आभाळात डिझॉल्व्ह होतो. तबला-सतारीचे, तुंब्याचे, महिरपीचे, भिंतीवरच्या लघुचित्रशैलीतल्या स्त्रीच्या चेहऱ्याचे, रवीबाबूंच्या बोटांचे तपशील या चित्रांमध्ये दिसतात. (क्रमशः)

- गणेश विसपुते 
(लेखक कवी, समीक्षक, अनुवादक, चित्रकार आणि कला व सिनेमांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत.) 

या लेखाच्या अन्य भागांच्या लिंक्स :

भाग एक : वाचन : चित्रांचं, चित्रपटांचं आणि साहित्याचं 

भाग दोन : नभं धुंडाळण्याची आस हवी...

भाग चार : ...त्याहून मोलाचं काही नसतं

......................

काव्याग्रह
हा लेख ‘काव्याग्रह’च्या सप्टेंबर २०१६च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. ‘काव्याग्रह’ हे मराठीतील प्रसिद्ध अनियतकालिक असून, त्याची सुरुवात एप्रिल २०१०मध्ये विदर्भातील वाशिम येथून झाली. विष्णू जोशी हे ‘काव्याग्रह’चे संपादक आहेत. ‘काव्याग्रह’ने आतार्यंत प्रस्थापित कवींच्या कवितांसोबतच नव्या पिढीतील कसदार कवींच्या कविताही सातत्याने प्रकाशित केल्या आहेत. ‘काव्याग्रह’ला उत्कृष्ट अनियतकालिकाचा पहिला गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. काव्याग्रह प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राज्य सरकारच्या बहिणाबाई चौधरी काव्य  पुरस्काराबरोबरच अनेक मानाचे पुरस्कार या पुस्तकांना मिळाले आहेत. लवकरच ‘काव्याग्रह’ हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधूनही प्रकाशित होणार आहे. ‘काव्याग्रह’मधील निवडक लेख आपल्याला दर पंधरा दिवसांनी, शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचता येतील. 

संपर्क : विष्णू जोशी, संपादक, काव्याग्रह 
मोबाइल : ९६२३१ ९३४८०, ७५८८९ ६३२०२
ई-मेल : vishnujoshi@gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZOOBC
Similar Posts
वाचन : चित्रांचं, चित्रपटांचं आणि साहित्याचं चित्रं, चित्रपट, साहित्य या सगळ्या गोष्टी नवी दिशा देतात, नवे विचार देतात आणि बरंच काही देतात. अर्थात, त्यासाठी त्यांचं वाचन चांगल्या पद्धतीनं आणि योग्य प्रकारे करता यायला हवं. त्यासाठी वेगळी दृष्टी लागते. याबद्दल चिंतन आणि भाष्य करणारा गणेश विसपुते यांचा लेख तीन भागांत प्रसिद्ध करत आहोत.
नभं धुंडाळण्याची आस हवी... खूप पाहिलं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. त्यातून पोषण होतं. प्रभाव राहत नाहीत. आपण नव्यानं आपल्यालाच गवसतो. दिलीप चित्र्यांच्या छापल्या गेलेल्या पहिल्याच कवितेची पहिली ओळ आहे – ‘मला आस होती नभं धुंडाळण्याची.’ ही आस प्रत्येक लेखक-कलावंताच्या शोधाचा ‘टेक ऑफ पॉइंट’ असला पाहिजे. ‘वाचन : चित्रांचं,
....त्याहून मोलाचं काही नसतं सुफी कथेतल्या मोजूदच्या वेड्यावाकड्या प्रवासासारखं विस्कळीत असेल; पण कुतूहल जिवंत ठेवत शोषत, टिपत, पचवत गेलो, की जे काही हाती लागतं, त्याहून मोलाचं दुसरं काही नसतं. ‘वाचन : चित्रांचं, चित्रपटांचं आणि साहित्याचं’ या गणेश विसपुते यांच्या लेखाचा चौथा भाग...
मराठी काव्याची इंग्लिश भरारी; ‘काव्याग्रह’चा इंग्रजी अंक दाखल पुणे : ‘अलीकडे इंग्रजी भाषेतील साहित्य मराठीत येण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र मराठीतील साहित्य इंग्रजीत जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’ असा विचार आतापर्यंत अनेक साहित्य संमेलने किंवा व्याख्यानांतून अनेकांनी मांडला आहे पण विष्णू जोशी या तरुण, धडपड्या संपादकाने तो प्रत्यक्षात आणला आहे. अनेक अडचणींतून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language