Ad will apear here
Next
‘‘पुलं’ पुनःपुन्हा आयुष्यात येतात...’

‘अभिनयापासून व्यक्तिगत आयुष्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणात ‘पुलं’ त्यांची पात्रं, त्यांची कला किंवा अन्य सादरीकरणाच्या माध्यमातून परत परत आयुष्यात येत राहतात आणि प्रेरणा देतात...’ सांगत आहे ‘ती फुलराणी’मधली ‘फुलराणी’ साकारलेली गुणी आणि संवेदनशील अभिनेत्री अमृता सुभाष... ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त तिने ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केलेल्या या भावना...
........
‘पुलं’ परत परत आयुष्यात येतात असं मला वाटतं. तसे ते लहानपणापासूनच येत राहिले. लहानपणी ते पुस्तकाच्या रूपाने असायचे. अगदी लहान असताना मी अभिनयाचे जे पहिले धडे गिरवले, ते त्यांच्यामुळेच. विशेष म्हणजे वाचिक अभिनयाचे धडे गिरवताना, ‘पुलं’च्या ‘म्हैस’पासून ते ‘नारायण’पर्यंत ज्या कॅसेट्स निघाल्या होत्या, ज्यात त्यांनी स्वतः वाचन केलं होतं, ते सगळं माझ्या घरी होतं. त्यामुळे त्यांची मी अक्षरशः पारायणं केली होती. ते परत परत ऐकताना खूप मजा यायची. ते वाचन त्यांच्या नकलेसहित मी परत स्वतःशी करून पाहायचे. ‘पुलं’ ज्या पद्धतीने आवाज बदलून प्रत्येक पात्र निर्माण करायचे, अगदी तशीच, त्याच आवाजात नक्कल करण्याचा मी प्रयत्न करत असे. या सगळ्यांतून मी शिकत गेले. कोणत्याही आवाजावर पकड मिळवण्याची, हुकुमत मिळवण्याची त्यांची जी पद्धत होती, जो अभ्यास होता, तो अफलातून होता. अशा पद्धतीने ‘पुलं’ आयुष्यात येत राहिले. 

पुढे ‘ती फुलराणी’च्या निमित्ताने अर्थातच ‘पुलं’च्या भाषेचा खूप अभ्यास झाला. वामन केंद्रे यांच्यासोबत ‘ती फुलराणी’ करत असताना, त्यामध्ये गाणी घेतली जावीत, त्याचा थोडा फॉर्म बदलला जावा, असं वामन केंद्रेंना वाटत होतं. त्यासाठी कवी सौमित्रला बोलावलं गेलं होतं. यामध्ये काही नवीन गाणी किंवा कविता लिहिता येतील का, असं त्याला विचारलं गेलं होतं; पण ‘पुलं’च्या भाषेला मध्येच तोडणं शक्यच होणार नाही, असं तो म्हणाला. नंतर आमच्याही लक्षात आलं, की हे अवघड आहे. तेव्हा मग वामनकाकांनीच यावर एक सुंदर मार्ग शोधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘पुलं’च्या संवादांनाच एक प्रकारची गेयता आहे. एक लय आहे. त्यामुळे त्यातील संवादांनाच चाली लावून फॉर्म बदलला. हे करत असताना वेगळं असं काही लिहावं लागलं नाही. कारण ‘पुलं’च्या भाषेला ती गेयता आहेच, याचा अनुभव घेतला.

‘पुलं’ना ऐकत असताना सगळा ताण, त्रास विसरायला होतो, असादेखील माझा व्यक्तिगत अनुभव आहे. आजारी असताना, तब्येत बरी नसताना त्यांचं सादरीकरण ऐकलं, तर त्या निखळ हास्यातून एक वेगळंच टॉनिक मिळतं हे मी अनुभवलंय. ‘पुलं’च्या असण्यात एक ताकद होती. त्यांच्या विनोदात असलेल्या निखळ हास्याच्या ताकदीमुळे आपल्या आयुष्यातील इतर रेट्याला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. याचा अनुभव वारंवार येतो. अजूनही जेव्हा खूप काम झालं किंवा हताश होण्यासारखं काही घडलं, तर ‘पुलं’च्या डीव्हीडी पाहणं हा या सगळ्यावरचा एक प्रकारचा उतारा आहे असं वाटतं. अशा वेळी तुमचा संपूर्ण मूड बदलून टाकण्याची ताकद त्यामध्ये नक्कीच असते.  

पु. ल. देशपांडेकोणत्याही कलेत टायमिंग साधता येणं, हे खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. ‘पुलं’चं हे टायमिंग साधणं कमाल असायचं. त्यांना आजवर मी जे ऐकलंय, त्यातून अभिनयाच्या बाबतीत सर्वांत मोठी आणि अमूल्य अशी एक गोष्ट मी शिकले ती  म्हणजे संवादाचं टायमिंग साधणं. विनोदाच्याही बाबतीत संवादाच्या टायमिंगला खूप महत्त्व असतं. लहानपणापासून त्यांना ऐकत असताना कुठेतरी कळत-नकळत या सगळ्या गोष्टी आत भिनत गेल्या होत्या आणि मग ‘फुलराणी’च्या वेळी त्या उपयोगी पडल्या. 

खरं तर माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही ‘पुलं’ नेहमीच असतात. आम्ही बऱ्याचदा त्यांच्यावर चर्चा करतो. यातून आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती ‘पुलं’ची सुखी आयुष्याची व्याख्या... ‘पहाटे चार वाजेपर्यंत मैफल रंगलेली आहे. मग छान १० वाजता उशिरा उठलो आहे. बायकोने बनवलेलं छान जेवण जेवलो आहे, परत दुपारी झोप झाली आहे..’ असं सगळं असणं म्हणजेच आजच्या धावपळीच्या आयुष्यात हा थोडा जो निवांतपणा असलेलं ते जे सांगतात, ते भन्नाट आहे. 

‘पुलं’नी रंगवलेली पात्रंही अप्रतिम होती. एखादं पात्र उभं करताना ते सर्व बाजूंनी त्याचा अभ्यास करायचे आणि त्यातून प्रत्येक पात्र जिवंत करायचे. यातून प्रत्येक पात्राचा सूर कसा असला पाहिजे, आवाजाचा टोन कसा असला पाहिजे हे अगदी अचूक लक्षात येतं. आज आम्ही एखाद्या पात्राचा अभ्यास करत असताना त्यांच्या त्या वाचलेल्या पात्रांच्या अभ्यासाचा फायदा होतो. 

अमृता सुभाषमी अभिनयाव्यतिरिक्त नृत्य म्हणजेच भरतनाट्यम् आणि पार्श्वगायक म्हणून जे काही काम आजवर केलं, तिथेही ‘पुलं’चा संदर्भ येत गेला. ‘पुलं’नी एका वेळी अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर काम केलेलं आहे. म्हणजे नाटक, चित्रपट, अभिनय, लेखक अशा विविध गोष्टींमध्ये काम करत असताना ‘पुलं’ प्रत्येक बाबतीत तेवढ्याच सक्षमतेने काम करत गेले. प्रत्येक गोष्टीला त्यांना न्याय देता आला. मी अभिनयाबरोबर नृत्य आणि गायन या दोन्ही क्षेत्रात काम करताना तिथेही याबाबतीत ‘पुलं’ एक आदर्श म्हणून समोर होतेच. 

‘पुलं’च्या हार्मोनियमच्याही खूप कॅसेट्स मी लहानपणी आई-बाबांबरोबर ऐकल्या आहेत. त्यांच्यात इतरही अनेक गुण होते आणि त्या प्रत्येकात ते रमले. सगळ्या कला एकमेकींच्या बहिणी आहेत असं मला वाटतं आणि त्या मग एकमेकींना हातात हात घालून पुढे नेत असतात. अगदी याच न्याचानं ‘पुलं’च्या सादरीकरणात सगळ्या कलांचा समन्वय होता. हे सगळं मला ‘ती फुलराणी’च्या वेळी खूप उपयोगी पडलं. ‘फुलराणी’मध्ये मला तो समन्वय साधायचा होता. त्यात ती अभिनयही करते, गाणंही म्हणते. त्यातही ते विनोदी असल्यामुळे त्याचं योग्य असं टायमिंगही साधायचं होतं. सगळ्या कलांचा समन्वय त्यांनी जसा साधला, तसा तो मलाही साधता यावा, यासाठीची प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळते. 

आयुष्यातील कोणत्याही त्रासदायक गोष्टीकडे विनोदबुद्धीने पाहण्याची ‘पुलं’ची हातोटी होती, ती खूप काही शिकवणारी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी ‘पुलं’कडून शिकले, ती म्हणजे आपल्याला स्वतःवरही हसता आलं पाहिजे. आपण सगळेच स्वतःला नेहमीच अगदी गंभीरतेने घेत असतो; पण आपणही एक माणूस आहोत आणि आपल्यातही अशा काही गमतीशीर गोष्टी आहेत हे समजलं पाहिजे आणि त्यावरही आपल्याला हसता आलं पाहिजे. हे सगळं ‘पुलं’नी त्यांच्या लिखाणातून केलं आहे. स्वतःलाही अनेकदा कोपरखळ्या मारल्या आहेत. ही त्यांची गोष्ट खरंच निराळी आहे.  

त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना मी सलाम करेन. खरंच आपण सगळे त्यांचे ऋणी आहोत. आपल्याला त्यांना बघायला, ऐकायला मिळालं. त्यामुळे आपण खरंच भाग्यवान आहोत, असं वाटतं.  

(शब्दांकन : मानसी मगरे)

('ती फुलराणी' नाटकातील एका प्रसंगाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZVFBI
Similar Posts
‘पुलं’चे कर्तृत्व हा राज्याचा सांस्कृतिक इतिहास कुडाळ : ‘‘पुलं’चे जीवन आणि कलाकर्तृत्व हा महाराष्ट्राचा अर्धशतकी सांस्कृतिक इतिहास आहे. लेखक, नट, नाटककार, संगीतकार, एकपात्री नट, पटकथाकार, संवादिनीवादक, निर्माता, संगीतकार, दशसहस्रेषु वक्ता आणि कर्णासारखा दाता मराठी मनाने केवळ ‘पुलं’मध्ये पाहिला,’ असे उद्गार ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी काढले
‘पुलं’च्या स्मृतिदिनानिमित्त गप्पा-आठवणी-गाण्यांची ऑनलाइन मैफल (व्हिडिओ) पुणे : पुण्यभूषण पुरस्कारासाठी सात-आठ नावे भाईंनी सुचवली होती... ‘‘पुलं’मुळेच माझे वक्तृत्व बहरले,’ असे तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी सांगितले होते... ‘‘पुलं’ची ओळख मी करून देणार,’ असं सांगण्यासाठी कवयित्री शांताबाई शेळके यांनी निनावी फोन केला होता.... पु. ल. देशपांडे यांच्या अशा अनेक आठवणींना
रवींद्रनाथ टागोरांच्या नोबेलला १०७ वर्षे बंगाली साहित्य आणि संगीत आणि एकंदरीतच भारतीय कलांना नवा आकार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांच्या ‘गीतांजली’ या रचनेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्याच्या घटनेला १० डिसेंबर २०२० रोजी १०७ वर्षे पूर्ण झाली. १० डिसेंबर १९१३ रोजी त्यांना हे पारितोषिक देण्यात आले होते. नोबेल
‘‘पुलं’ची भाषा साधी-सोपी’ ‘मी ‘पुलं’च्या पुस्तकांची लहानपणापासूनच पारायणं केली आहेत. ‘पुलं’ची भाषा अत्यंत साधी-सोपी आहे आणि विनोदही अगदी साधा-सोपा आहे, असं वाचताना वाटतं; पण जेव्हा ते सादर करायला जातो, तेव्हा त्याचा अभ्यास केल्याशिवाय करता येत नाही,’ अशी भावना ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये नारायणाची भूमिका साकारणारे अभिनेते संदीप

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language