जन्म. १५ सप्टेंबर १९३५ अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव येथे.
दया पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. त्यांना न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन दगडू मॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्याच्या मामाने आणि आईने त्यांना धीर दिला आणि ऑक्टोबरच्या परीक्षेला बसवले.
बोर्डिंगच्या अधिकार्यांनीही दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून दगडू बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागले. इतका अभ्यास केला की दया पवार यांना इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळाले.
१९५६ मध्ये मुंबईतील पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी लेखनिक व प्रयोगशाळा सहायक म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९६७ मध्ये अस्मितादर्श मध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. दलित साहित्य चळवळीच्या कार्यात १९६८पासून त्यांचा सक्रिय सहभाग होता.
१९६९मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान मुखपत्रात त्यांचा दलित साहित्यावर लिहिलेला लेख पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. श्रीलंकेत कोलंबोमध्ये १९७५ला भरलेल्या जागतिक बुद्ध परिषदेलाही ते हजर होते. दया पवार यांनी विपुल लिखाण केले. त्यांपैकी बलुतं हे १९७८मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. दलित जीवनाची एक वेगळी ओळख त्यांनी यातून करून दिली.
१९७९मध्ये राज्य शासनाचा पुरस्कारही त्याला मिळाला. १९८१मध्ये बलुतंची हिंदी आवृत्ती प्रकाशित झाली. त्या आधी कोंडवाडा (१९७४) या त्यांच्या काव्यसंग्रहालाही १९७५मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. १९८२मध्ये फोर्ड फाउंडेशन ची शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झाली. त्यासाठी ते अमेरिकेला गेले होते.
१९८४ला जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे भरलेल्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये दलित साहित्यावर त्यांनी एक शोधनिबंध सादर केला होता. १९८८ ते १९९४ या कालावधीत ते बालभारती पाठ्यपुस्तक समितीचे सदस्य होते. १९८७ ते १९९४ या दरम्यान महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. १९९०मध्ये दया पवार यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १९९३मध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते.
याशिवाय विटाळ कथासंग्रह (१९८३), बलुतं एक वादळ (१९८३), चावडी स्फुटलेख (१९८३), पासंग(१९९३) व जागल्या स्तंभलेखन, पाणी कुठंवर आलं गं बाई काव्यसंग्रह, कल्लपा यशवंत ढाले यांची डायरी (१९८४), धम्मपद पाली भाषेतील धम्मपदांचा मराठी अनुवाद (१९९१) असे आजवर त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झाले. फिल्म डिव्हिजनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील लघुपटाचे कथालेखन (१९९३) त्यांनी केले. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपटाच्या पटकथा लेखनातही त्यांचा सहभाग होता. १९९४-९५मध्ये ते परिवर्तन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते.
भारत सरकारने दया पवार यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. दया पवार यांच्या कन्या प्रज्ञा या एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहेत. दया पवार यांचे २० सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
संजीव_वेलणकर
दया पवार यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.
https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5342484469278336722