Ad will apear here
Next
हार्मोनिअमवादक पं. गोविंदराव टेंबे
ऑर्गनच्या भरदार आवाजाच्या साथीनं संगीत नाटकाची ‘नांदी’ सुरू झाली, की एक वेगळाच माहौल तयार होत असे. या ऑर्गनवादकांच्या यादीतलं पहिलं महत्त्वाचं नाव म्हणजे पं. गोविंदराव टेंबे. ‘संगीतातल्या विविध विषयांचा व्यासंगी विद्वान’ अशी त्यांची ओळख होती. स्वतंत्र हार्मोनिअमवादन करणारे महाराष्ट्रातले ते पहिले हार्मोनिअमवादक. ‘सूररंगी रंगले’ सदरात मधुवंती पेठे आज लिहीत आहेत पं. गोविंदराव टेंबे यांच्याबद्दल...
.........
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या इतिहासात, मराठी रंगभूमीवर एक सोनेरी पान उलगडलं गेलं. ते म्हणजे संगीत नाटक. १८४३पासून महाराष्ट्रात या दिशेने काही ना काही प्रयोग चालू होते. आद्य संगीत नाटककार विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ हे पहिलं संगीत नाटक १८४३ साली रंगभूमीवर आणलं; पण १८८० साली अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेलं ‘संगीत शाकुंतल’ हे संगीत नाटक मराठी रंगभूमीवर आलं आणि या नवीन अध्यायाला खरी सुरुवात झाली. 

पाश्चात्य रंगभूमीवर प्रचलित असलेल्या ‘म्युझिकल ऑपेरा’ या प्रकाराशी या संगीत नाटकाची तुलना केली गेली. अगदी अल्पावधीतच हा नवीन नाट्यप्रकार रसिकांच्या पसंतीस उतरला आणि संगीत नाटकांची लोकप्रियता वाढू लागली. गद्य आणि पद्य (गीतं) यांचा समन्वय साधत, उलगडत जाणारी पौराणिक कथानकं रसिकांना आवडू लागली. तोपर्यंत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत रसिकांच्या परिचयाचं झालं होतं. संगीत नाटकांच्या पदांमधून ते ललित रूपात रंगमंचावर आलं. विविध रागांवर आधारित असणारी संगीत नाटकांमधली गीतं (नाट्यगीतं) रसिकांचं मन आकर्षित करू लागली. संगीत नाटकांतल्या पदांच्या रूपात सादर होणाऱ्या विविध राग-रागिण्या रसिकांना जास्त भावल्या.

या संगीत नाटकांमुळे रसिकांना एका नवीन वाद्याचा परिचय झाला, ते म्हणजे ऑर्गन. नाटकात काम करणारा नट स्वत:च ही पदं गात असे. त्यामुळे नाटक चालू असताना गायक नटाला स्वर-तालाची साथ आवश्यक असे. गायक नट आणि त्याला लागणारी स्वरसाथ यामध्ये पाच-सहा फुटांचं अंतर असल्यानं ऑर्गनसारख्या दमदार स्वराचा भरणा देणाऱ्या वाद्याचा उपयोग या संगीत नाटकांसाठी आवश्यक होता. ऑर्गनच्या भरदार आवाजाच्या साथीनं संगीत नाटकाची ‘नांदी’ (नटेश्वराची प्रार्थना) सुरू झाली, की एक वेगळाच माहौल तयार होत असे.

या ऑर्गनवादकांच्या यादीतलं पहिलं महत्त्वाचं नाव म्हणजे पं. गोविंदराव टेंबे. त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाला संगीत क्षेत्रात मानाचं स्थान होतं. ‘संगीतातल्या विविध विषयांचा व्यासंगी विद्वान’ अशी त्यांची प्रतिमा होती. सिनेमा आणि नाटक या दोन्ही माध्यमांत त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं. ते संगीतज्ञ, लेखक, गीतकार, गायक नट होते. तसेच पहिल्या मराठी बोलपटाचे नायक होते. चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक, संगीतकार, निर्माता, संकलक, नट अशा विविध प्रकारे त्यांनी आपली कामगिरी केली होती. 

गोविंद सदाशिव टेंबे हे कोल्हापूरचे. १८८१ ते १९५५ हा त्यांच्या आयुष्याचा कालावधी. हार्मोनिअमवादक, ऑर्गनवादक म्हणून प्रसिद्ध असलेले गोविंदराव प्रत्यक्षात हार्मोनिअम कुणाकडे शिकले नव्हते. स्वत:च्या प्रयत्नानं ते हार्मोनिअमवादक झाले. ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांना ते मैफलीत साथ करत असत. अनेक वर्षं मैफलीत साथ करता करता, गोविंदरावांनी भास्करबुवांची शैली आत्मसात केली होती. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचा प्रभाव त्यांच्यावर अधिक होता. तसेच जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेब यांनाही ते गुरू मानत असत. 

साथसंगतीबरोबरच गोविंदराव स्वतंत्र हार्मोनिअमवादनही करत असत. स्वतंत्र हार्मोनिअमवादन करणारे महाराष्ट्रातले ते पहिले हार्मोनिअमवादक. हार्मोनिअमसारख्या साथीच्या वाद्याला मैफलीत स्वतंत्र वादनाचं वाद्य म्हणून प्रस्थापित करण्याचं श्रेय पं. गोविंदराव टेंबे यांना दिलं जातं. स्वतंत्र वादनासाठी त्यांनी विचारपूर्वक खास तंत्र (टेक्निक) तयार केलं होतं. त्यांच्या वादनातली सौंदर्यदृष्टी रसिकांना भारून टाकायची. स्वत: बालगंधर्वांनी त्यांना गुरू मानलं होतं. 

पं. भास्करबुवांचे शिष्य बालगंधर्व, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, पं. बापूराव केतकर. भास्करबुवांनी शास्त्रीय संगीताची शिस्तबद्ध तालीम तिघांनाही दिली; पण ती देताना भास्करबुवांनी वेगवेगळ्या प्रकारे त्या तिघांना घडवलं. त्यामुळे तिघांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी केली. बालगंधर्वांनी संगीत रंगभूमी गाजवली, तर मास्तर कृष्णरावांनी भारतभर गायनाच्या मैफली करून लोकप्रियता मिळवली. पं. बापूराव केतकर हे विद्यादान करणारे गुरू झाले. या तिघांचंही संगीत रंगभूमीवरचं योगदान फार मोलाचं आहे. पुढे पं. राम मराठे, पं. ए. पी. नारायणगावकर या त्यांच्या शिष्यांनी गायक नट व संगीतकार होण्याची परंपरा कायम ठेवली. 

हार्मोनिअमवादक, ऑर्गनवादक म्हणून प्रसिद्ध असलेले गोविंदराव टेंबे यांची संगीतकार म्हणूनही कामगिरी मोठी आहे. १९१३ साली सुरू झालेल्या गंधर्व नाटक कंपनीमध्ये ते पार्टनर होते. तिथे त्यांनी बालगंधर्वांच्या काही नाटकांना संगीत दिलं. त्यांनी संगीत दिलेल्या ‘संगीत मानापमान’ नाटकातली सर्वच गाणी लोकप्रिय झाली होती आणि अजूनही आहेत. त्या नाटकात गोविंदरावांनी गायक नट म्हणून भूमिकाही केली होती. 

कालांतराने गोविंदरावांनी ‘शिवराज नाटक कंपनी’ नावाची स्वत:ची नाटक कंपनी काढली. त्यासाठी नवीन नाटकं लिहिली, पदं रचली, संगीतही दिलं. 

१९३२ साली ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट निघाला. त्याला गोविंदरावांनी संगीत दिलं होतं आणि त्यात नायकाची भूमिकाही केली. पुढे अग्निकंकण, सिंहगड, मायामच्छिंद्र या मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं.
म्हैसूर संस्थानच्या युवराजांबरोबर १९३९ साली त्यांनी युरोप दौरा केला. तेव्हा त्यांनी पोपच्या समोर कार्यक्रम केला होता. तसंच युरोपमध्ये इतर ठिकाणीही कार्यक्रम केले. त्यानंतर एक वर्ष लंडनच्या वास्तव्यात अनेक कार्यक्रम केले. त्या काळी परदेशात जाऊन संगीताचे असे कार्यक्रम करणं याचं खूप अप्रूप होतं. 

या सर्व कामगिरीनंतरही पं. गोविंदराव टेंबे यांचं नाव रसिकांच्या मनात कायम राहिलं ते एक उत्तम हार्मोनिअमवादक म्हणूनच.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZYGCF
Similar Posts
ऑर्गनवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या आठवणी ३० जानेवारी हा नामवंत ऑर्गनवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘सूररंगी रंगले’ सदरात मधुवंती पेठे आज लिहीत आहेत त्यांच्या आठवणी...
नाट्यसंगीत : नाट्य आणि संगीत यांचा समतोल पूर्वी संगीत ऐकण्याची इतर कोणती माध्यमं उपलब्ध नसताना रसिक केवळ संगीत ऐकण्यासाठी नाटकाला येत असत, त्यामुळे लांबलेल्या पदांसहित सहा-सहा तास नाटकं चालायची, मात्र आता संगीत आणि नाट्य यांचा समतोल राखला गेला नाही, तर ते आताच्या नाट्यरसिकांना आवडत नाही. त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवूनच प्रयोग सादर केला गेला पाहिजे
हिंदुस्थानी वाद्यसंगीताचा वटवृक्ष - आचार्य बाबा अलाउद्दीन खाँ कलकत्त्याचे उस्ताद अलाउद्दीन खाँ अर्थात आचार्य बाबा अलाउद्दीन खाँ यांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक मोठमोठे कलाकार घडवले. त्यांचे सुपुत्र उस्ताद अली अकबर खाँ आणि कन्या अन्नपूर्णादेवी, तसेच जावई रविशंकर यांनी त्यांची मैहर घराण्याची शैली आत्मसात करून, हिंदुस्थानी वाद्यसंगीताची परंपरा चालू ठेवली आणि जगभर लोकप्रिय केली
२१व्या शतकातील संगीत नाटक : ‘सूर माझे सोबती’ संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचं खास वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी अजरामर केलेला तो मखमली पडदा, दुसऱ्या कोणत्याही भाषिक रंगभूमीला लाभला नाही. त्याची गोडी अवीट आहे. फास्टफूडच्या जमान्यात कितीही इंन्स्टंट पदार्थ आले, तरी पुरणपोळीची गोडी जशी वेगळीच आहे, तसंच काहीसं संगीत नाटकाचं आहे. म्हणूनच सव्वाशे वर्षांची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language