Ad will apear here
Next
मुंबई पर्यटन : माहीम, सायन, धारावी
माहीम किल्ला‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात मुंबईतील दादर, परळ वगैरे भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या माहीम, सायन (शिव) आणि धारावी.
........
माहीमचे इतिहासकालीन नाव होते महिकावती. महिकावती ही राजा भीमदेवाची राजधानी होती. तेराव्या शतकात या भागावर त्याची सत्ता होती. त्याचा राजवाडा येथे होता. प्रभादेवी येथील एका न्यायालयाचे आणि बाबुलनाथ देवळाचेही बांधकाम त्याच्या कारकिर्दीत झाले. महिकावती देवीचे प्राचीन मंदिर अजूनही तेथे आहे. काहींच्या मतानुसार रामाला आणि लक्ष्मणाला अहिरावण आणि महिरावण या दोघांनी या देवळात बंदी केले होते असा उल्लेख रामायणात आहे, हनुमानाने त्यांची येथून सुटका केली होती, असे म्हणतात. येथे कोळी लोकांची वस्ती आहे. 

माहीम किल्ला

माहीम किल्ला :
माहीम नावाचे दोन किल्ले आहेत. एक पालघरजवळील केळवे येथे व मुंबईमधील माहीममध्ये. हा किल्ला माहीमच्या खाडीजवळ झोपडपट्टीत आहे. अतिक्रमणांनी वेढला आहे. त्यामुळे तो दुर्लक्षित राहिला आहे. या किल्ल्याचे बांधकाम नक्की कोणी केले व कधी केले याची माहिती उपलब्ध नाही. हा किल्ला इ. स. १५१६मध्ये पोर्तुगीज अधिकारी दॉम होआव दे मोनो याने जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये सतत खूप चकमकी होत होत्या. अखेर पोर्तुगीजांनी यावर इ. स. १५३४मध्ये बस्तान बसविले. हाच किल्ला पुढे इ. स. १६६१मध्ये पोर्तुगीजांनी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला दिला. माहीम खाडीचे संरक्षण आणि मुंबईची उत्तरेकडील चौकी असा दुहेरी उपयोग या किल्ल्याचा इंग्रजांना झाला. या किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे; मात्र आत कोणतीही वास्तू उभी नाही. 

माहीम हलवामाहीम हलवा : काही ठिकाणे अशी असतात, की त्या ठिकाणच्या एखाद्या खाद्यपदार्थाची चव जिभेवरती रेंगाळते. तसाच माहीमचा गोड हलवा. माहीम हलवा हे नाव ठेवले गेले. कारण माहीमचे ‘जोशी बुधाकाका’ यांनी तो तयार केला व माहीम हलवा म्हणून प्रसिद्ध झाला. हा पदार्थ तूप, मैदा (किंवा बारीक रवा), साखर, बदाम-पिस्त्याचे काप आणि वेलची दाणे, खाण्याचे रंग, मँगो पल्प आणि आवडीप्रमाणे चॉकलेट सिरप घालून दूध घालून ढवळून, गुठळ्या मोडून, उकळून थंड करून तुपावर लाटलेला असतो. 

शीतलादेवी मंदिरमाहीमचे शीतलादेवी मंदिर : साधारण १२५ वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. कोळी बांधवांनी सन १८९० ते ९५च्या दरम्यान हे मंदिर बांधले. सिंधी बांधव लहान मुलांचे जावळ काढण्यासाठी दसऱ्याला येथे येतात. मंदिरातील देवीची मूर्ती पाषाणात घडवलेली असून, तिच्यावर चांदीचा मुखवटा चढवला आहे. अश्विन महिन्यातील नवरात्रौत्सवात अष्टमीला हवन केले जाते. माघ नवरात्रौत्सवात देवीला सोन्याचा मुखवटा चढवून नवचंडिका यज्ञ, अभिषेक इत्यादी कार्यक्रम केले जातात. 

मंदिराशेजारील विहिरीतील पाणी कोळी समाजातील लोक विवाह समारंभात शुभ शकुन म्हणून घेऊन जातात. नवरदेवाच्या अंघोळीसाठीही हे पाणी नेतात. येथे जवळच खोकला देवीचे मंदिर आहे. या देवीच्या दर्शनाने खोकला बरा होतो, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. म्हणून खोकला देवी हे नाव पडले. 

दरगाह हज़रत मखदूमदरगाह हज़रत मखदूम : माहीम समुद्राच्या बाजूला हजरत मखदूम अली यांचा दर्गा आहे. सन १३७२ ते १४३१ या दरम्यान ते होऊन गेले. ते धार्मिक लेखक होते. त्यांनी सुमारे १००हून अधिक मुस्लिम ग्रंथ लिहिले. त्यातील १० उपलब्ध आहेत. गुजरातच्या सुलतान अहमद शाहच्या बहिणीशी त्यांचे लग्न झाले होते. गुजरातचा सुलतान, मुझफ्फरीद राजघराण्याचा अहमद शहा यांनी त्याची शहराचा काझी म्हणून नेमणूक केली होती. 

सेंट मायकेल चर्च : हे मुंबईतील सर्वांत जुने कॅथोलिक चर्च आहे. एल. जे. रोड आणि माहीम कॉजवेच्या छेदनबिंदूवर हे चर्च आहे. मूलत: पोर्तुगीजांनी सन १५३४मध्ये हे चर्च बांधले होते. या चर्चचे बऱ्याचदा नूतनीकरण झाले आहे. शेवटचे नूतनीकरण सन १९७३मध्ये केले गेले. 

माहीम बीच : हिंदुजा हॉस्पिटलच्या उत्तरेला माहीम बीच असून, जवळच डॉ. कै. रामहरी धोटे उद्यान आहे. कोळी पुतळा माहीम एस. व्ही. रोडवर आहे. स्वामी विवेकानंद उद्यानही त्याच रस्त्यावर आहे. 

धारावी घरगुती उद्योग

धारावी :
जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्येचे ठिकाण म्हणून धारावीची ओळख आहे. धारावीचे क्षेत्रफळ २.१ चौरस किलोमीटर आहे. धारावीमध्ये असंख्य घरगुती उद्योग चालू असतात. सॅक, चामडे, कापड, प्लास्टिक, होजिअरी, कुंभारकाम आणि कापडावरचे ब्लॉक प्रिंटिंग व्यवसाय असे अनेक उद्योग येथे चालतात. येथील एकूण वार्षिक उलाढाल अंदाजे एक अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त आहे. धारावीतील झोपड्यांची किंमतसुद्धा २५ लाखांच्यावर आहे. अनेक झोपड्या या टीव्ही, एसीसह असतात. 

धारावी किल्लाधारावी किल्ला : याला काळा किल्ला असेही म्हणतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या समोर असलेल्या बस डेपोच्या पूर्वेकडील भिंतीला अगदी लागून हा ‘काळा किल्ला’ उभा आहे. बस डेपोच्या कंपाउंड वॉलला लागून असलेल्या तीन-चार फुटाच्या बोळातून थेट या किल्ल्याकडे जाता येते. 

साधारण त्रिकोणी आकाराच्या या किल्ल्याला दरवाजा नाही; पण किल्ल्यात प्रवेश करायचा झाल्यास शिडीवरून अथवा एके ठिकाणी तुटलेल्या तटबंदीवरून आत प्रवेश करता येतो. किल्ल्याची तटबंदी मजबूत असून, अजूनही शाबूत आहे. तटबंदीच्या दर्शनी भागावर ‘सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन १७३७मध्ये बांधला’ अशी दगडात कोरलेली पाटी आहें. या किल्ल्यात एक भुयार असल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. 

रिवा किल्ला

रिवा किल्ला :
इ. स. १७३७ च्या आसपास हा किल्ला बांधण्यात आला. रिवा किल्ला सायन रेल्वे स्टेशनला बिलगून असलेल्या टेकडीवर आहे. किल्ल्याची ओळख सांगण्यासाठी फक्त एक गोल बुरुज शिल्लक आहे. रिवा किल्ल्यावर काही इमारतींचे अवशेष दिसून येतात. 

शीव किल्ला

शीव किल्लाशीव किल्ला : या किल्ल्याचे अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत. येथे चौकोनी आकाराची एक मोठी विहीर (हौद) आहे. हा किल्ला दक्षिण-उत्तर असून, तटबंदी, बुरूज, इमारतीचे अवशेष आणि प्रवेशद्वारे यांवरून किल्ल्याच्या वैभवाची प्रचिती येते. किल्ल्याची दारे तोफ झाल्यावर बंद होत असत. सरकारचे पुरातत्त्व सर्वेक्षण कार्यालय येथे आहे. त्याच्या मागे दोन तोफाही आहेत. येथे एक छोटा धबधबा, तसेच किल्ल्याभोवती उद्यान केल्यामुळे पर्यटकांची पावले वाळू लागली आहेत. 

माटुंगा : मुंबई शहराच्या मध्यभागी माटुंगा आहे. असे म्हटले जाते, की महिकावतीच्या राजाचा माटुंगामध्ये हत्तीखाना होता. हत्तींना म्हणजे संस्कृतमध्ये मातंगा असा शब्द आहे. त्यावरून या भागाला माटुंगा असे नाव पडले असावे, असे मानले जाते. तमिळी व इतर दाक्षिणात्य लोकांची वस्ती येथे आहे. माटुंगा येथे नव्याने विकसित झालेल्या जागेचा लाभ घेण्यासाठी पहिल्यांदा गृहनिर्माण सहकारी संस्था तयार करण्यात आल्या. दादरमधील पारशी आणि हिंदू वसाहती आणि माटुंगामधील तमिळ वसाहती अशा प्रकारे विकसित केल्या गेल्या. माटुंगा येथे विविध धर्मीयांची असंख्य मंदिरे आहेत. मल्याळी आस्तिक समाज अतिक समाज (१०), दक्षिण भारतीय भजन समाज [११], श्री शंकर मठम [१२], श्री कन्यका परमेश्वरी मंदिर, दी चर्च ऑफ मेरी व डॉन बॉस्को चर्च ख्रिश्चन मदत [१३], किंग्ज सर्कलमधील जैन मंदिरे आणि मारुबाई मंदिर. माटुंग्यामध्ये अनेक सांस्कृतिक केंद्रे आहेत, ती म्हणजे म्हैसूर असोसिएशन, गुजराती सेवा मंडळ आणि माटुंगा वेस्टमधील कर्नाटक संघ हॉल. माटुंग्याची फुलांची बाजारपेठ दक्षिण भारतीय फुलांसाठी प्रसिद्ध आहे

डॉन बॉस्को मॅडोनाडॉन बॉस्को मॅडोना : पाच उद्यानाजवळ (फाइव्ह गार्डन) हे सुंदर चर्च आहे. सन १९५४मध्ये हे चर्च उभारले गेले. मेरीची १२ फूट उंचीची सोन्याची मुलामा असलेली मूर्ती मुख्य घुमटाच्या शिखरावर उभी आहे. हे बॉम्बे कॅथोलिकांचे श्रद्धास्थान म्हणजे जुन्या काळातील धर्माचे प्रतीक आहे. 

मंचरजी जोशी उद्यान : मंचरजी जोशी यांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी हे उद्यान विकसित केले. हे ठिकाण दादर, परळ, वडाळ्यापासून जवळ आहे. सकाळी व संध्याकाळी अनेक लोक येथे चालण्याचा व्यायाम करण्यासाठी येतात. या बागेत लहान मुलेही खेळायला येतात. या बागांपैकी एक बाग मैदानामध्ये रूपांतरित झाली आहे. तेथे आउटडोअर व्यायामशाळा आणि खेळाचे मैदान आहे. स्पोर्ट्स ग्राउंड आंतर कॉलनी सामन्यांचे केंद्र असताना फिट राहण्यासाठी सर्व वयोगटातील लोक व्यायामशाळेत येतात. मुलांसाठी एक खास बाग आहे, ज्यामध्ये एक लहान फेरिस व्हील आणि शूटिंग बूथ आहे. 

मंचेरजी जोशी उद्यानमाहेश्वरी उद्यान किंग्ज सर्कल : छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या डॉ. आंबेडकर रोडवर (व्हिन्सेंट रोड) सात रस्ते मिळणाऱ्या मोठ्या चौकातच हे उद्यान आहे. किंग्ज सर्कल स्टेशनच्या अगदी जवळ असलेले दक्षिण भारतीय एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मुंबईतील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक आहे. कोळीवाडा, वडाळा किंवा सायन, दादर आणि सी. जी. एस. यांसारख्या ठिकाणीही किंग्ज सर्कल मध्यभागी आहे. येथे भव्य उड्डाण पूल आहे. कसे जाल माहीम, शिव, धारावी भागात?
या भागात जाण्यासाठी माटुंगा, माटुंगा रोड, वडाळा या उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून जावे लागते. मुंबईच्या सर्व भागांतून येथे बेस्ट बस सेवा उपलब्ध आहे. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZSXCF
Similar Posts
मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.
मुंबई पर्यटन : मरीन ड्राइव्ह परिसर ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईचा पूर्व किनारा म्हणजेच बंदरे असलेल्या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील भागाची म्हणजेच मरीन ड्राइव्ह परिसराची....
दक्षिण मुंबईतील विविध बाजार ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण माहिती घेऊ या दक्षिण मुंबईतील विविध बाजारांची. त्यात मनीष मार्केटपासून बुक स्ट्रीटपर्यंत आणि चोरबाजारापासून जव्हेरी बाजारापर्यंतच्या विविध बाजारांचा आणि परिसरातील मंदिरांचा समावेश आहे.
मुंबई पर्यटन : वांद्रे परिसर ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात मुंबईतील वांद्रे परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language