Ad will apear here
Next
सूर-तालांच्या बहारदार आविष्काराने रंगला ‘आर्ट सर्कल’ संगीत महोत्सव
१३व्या वार्षिक उत्सवाची सांगता


रत्नागिरी :
इतिहासाच्या आठवणी सांगणाऱ्या आणि कलेचा समृद्ध वारसा असलेल्या भव्य थिबा राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ख्यातकीर्त कलाकारांनी सूर-तालांचा बहारदार आविष्कार सादर केला आणि तीन संध्याकाळी रसिक रत्नागिरीकर एका वेगळ्याच विश्वात रमून गेले. २४ जानेवारीला डॉ. कनीनिका निनावे आणि पूजा भालेराव यांच्या भरतनाट्यम् नृत्यकीर्तनाने सुरू झालेल्या या महोत्सवाची २६ जानेवारीला रात्री पं. उल्हास कशाळकर यांनी सादर केलेल्या ‘जमुना के तीर’ या भैरवीने सांगता झाली. हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीताचा आनंद यात रसिकांना घेता आला. 

‘आर्ट सर्कल’तर्फे थिबा राजवाड्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला संगीत महोत्सव २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रंगला. रत्नागिरीसह कोकणाचे नाव सांस्कृतिक विश्वात देशपातळीवर नेलेल्या या महोत्सवाचे यंदा तेरावे वर्ष होते. महोत्सवाच्या स्थळाला कै. शंकरराव टेंकशे नगरी असे नाव देण्यात आले होते.

२४ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. कनीनिका निनावे आणि पूजा भालेराव यांच्या भरतनाट्यम नृत्यकीर्तनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. डॉ. कनिनिका आणि पूजा या दोघींनी कीर्तन, नृत्य, संगीत यांचा अनोखा मेळ साधून नृत्यकीर्तन सादर केले. या नृत्यकीर्तनामध्ये सरस्वती सुब्रह्मण्यम यांनी गायनसाथ, अतुल शर्मांनी बासरीसाथ, तर सतीश कृष्णमूर्तींनी मृदंगसाथ केली. नृत्यकीर्तन हा वेगळा प्रकार रसिकांना भावला.

नृत्यकीर्तनानंतर लगेचच झालेली कै. शंकरराव टेंकशे स्मृती मैफल रंगवली ती जयपूर अत्रौली घराण्याच्या अध्वर्यू असलेल्या विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांनी. अजय जोगळेकर यांनी त्यांना संवादिनीची, तर मंगेश मुळ्ये यांनी तबल्याची साथ केली. या मैफलीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही मैफल आसमंत बेनवोलन्स यांच्या सहयोगाने पार पडली.

मुग्धा वैशम्पायन म्हटले, की लिटिल चॅम्प असे आपल्या डोळ्यांसमोर येत असले, तरी तिची ओळख आता तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ती शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नवीन पिढीतील आश्वासक कलाकार आहे. तिची तयारी किती उत्तम आहे, याचा अनुभव रत्नागिरीकरांना संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (२५ जानेवारी) घेता आला.  दुसऱ्या दिवसाची सुरुवात मुग्धाच्या शास्त्रीय गायनाने झाली. सुरुवातीला राग कामोद आणि नंतर अवघड अशी रागमाला सुरेल पद्धतीने सादर करून मुग्धाने आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध वादक अनंत जोशी यांनी मुग्धाला संवादिनीची, तर स्वप्नील भिसे यांनी तबल्याची साथ केली.

अत्यंत सुंदर रंगलेल्या या मैफलीनंतर बहरली ती संतूर आणि बासरीची जुगलबंदी. संतूरवादक संदीप चॅटर्जी आणि बासरीवादक संतोष संत यांच्या या जुगलबंदीला तबलावादक पं. रामदास पळसुले यांची समर्थ साथ लाभली आणि एक वेगळ्याच, प्रसन्न वातावरणात दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.

तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ जानेवारीला समारोपाच्या दिवशीची मैफल सुरू झाली ती स्त्री ताल तरंग या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने. कर्नाटक संगीतातील घटमसारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर प्रभुत्व मिळवलेल्या देशातील पहिल्या स्त्री घटमवादक सुकन्या रामगोपाल यांच्या घटमवादनाचा आनंद रसिकांना घेता आला. वेगवेगळ्या श्रुतीचे सहा ते सात घटम एकत्र ठेवून त्यातून अप्रतिम तालनिर्मिती करणारा घटतरंग हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार रसिकांना भावला. या मैफलीतील सर्व वादक स्त्री कलाकार होत्या. सौम्या रामचंद्रन (व्हायोलिन), लक्ष्मी पिल्लई (मृदंग), वाय. जी. श्रीलता (वीणा) आणि भाग्यलक्ष्मी (मोर्चिंग) यांचा त्यात समावेश होता. सर्वांच्याच अप्रतिम सादरीकरणाने रसिक भारावून गेले. प्रत्येक वादकाची आपापल्या वाद्यावर असलेली हुकूमत आणि वादन करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा आनंद यांमुळे साहजिकच रसिकांनाही त्या मैफलीचा आनंद पुरेपूर लुटला आला.

हंसध्वनी रागातील रचनेने सुरुवात झाल्यानंतर त्यांनी ‘मॅजिक ऑफ सेव्हन’ हा प्रकार सादर केला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या वादन मैफलीची सांगता ‘वंदे मातरम्’ने झाली. वंदे मातरम् सादर करणार असल्याचे रामगोपाल यांनी सांगताच रसिक प्रेक्षकवर्ग उत्स्फूर्तपणे उठून उभा राहिला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तिरंगी प्रकाशव्यवस्थेने झळाळून निघालेल्या थिबा राजवाड्याच्या भव्य कॅनव्हासच्या पार्श्वभूमीवर या स्त्री वादकांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’मुळे एक वेगळाच माहौल तयार झाला. ‘मोर्चिंग’ या वाद्याबद्दल अनेकांना उत्सुकता असल्याने वादक भाग्यलक्ष्मी यांनी त्या वाद्याबद्दल आणि ते कसे वाजविले जाते, याबद्दल शेवटी थोडक्यात माहिती दिली. 

महोत्सवाच्या समारोपाची मैफल रंगवली दोन पद्मश्रींनी. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अशा तीनही घराण्याची गायकी आत्मसात केलेले नामवंत गायक पं. उल्हास कशाळकर यांनी राग भूपालीतील विलंबित तिलवाडातील रचना सादर करून या मैफलीची सुरुवात केली. त्यांना तबल्याची साथ केली तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी. कृष्णा मुखेडकर यांनी संवादिनीची साथ केली, तर कौस्तुभ नाईक आणि रत्नागिरीकर कलाकाल अभिजित भट यांनी तानपुऱ्याची साथ केली. ‘जमुना के तीर’ ही भैरवी गाऊन पं. कशाळकर यांनी महोत्सवाची सांगता केली.  

शेवटच्या दिवशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सपत्नीक कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पं. उल्हास कशाळकर यांचा गौरव करण्यात आला. मैफलीच्या सुरुवातीला पं. कशाळकर यांनी रत्नागिरीशी असलेल्या आपल्या जुन्या ऋणानुबंधाबद्दल सांगितले. ‘१९८३-८४च्या दरम्यान मी इथे रत्नागिरी आकाशवाणीत होतो. त्यामुळे हा परिसर माझ्या ओळखीचा आहे. इथल्या अनेक आठवणी आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीत येणं झालं आणि जुन्या मित्रांच्या भेटी-गाठी झाल्या. मी होतो त्या वेळी इथे असे शास्त्रीय संगीताचे महोत्सव होत नव्हते. आता ते होत आहेत, याबद्दल ‘आर्ट सर्कल’चे कौतुक आहे. हा महोत्सव असाच कायम सुरू राहावा,’ असे मनोगत पं. कशाळकर यांनी व्यक्त केले. 

या वर्षीच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे इनसिंक (Insync) हे फक्त शास्त्रीय संगीताला वाहिलेले चॅनेल यंदाच्या महोत्सवाचे टेलिकास्ट पार्टनर होते. ‘टाटा स्काय’वर ८३३ नंबरला हे चॅनेल मोफत उपलब्ध आहे. यंदाच्या महोत्सवाचे रेकॉर्डिंग ‘इनसिंक’च्या टीमने केले असून, नंतर तो चॅनेलवरून दाखविला जाणार आहे. 

या वर्षी सुमारे २० रसिक वेगवेगळ्या शहरांतून या महोत्सवासाठी रत्नागिरीत आले होते. दर वर्षीप्रमाणेच मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महोत्सवासाठी थिबा राजवाड्याच्या सुशोभीकरणाची जबाबदारी सांभाळली होती.

कला जत्रा वेगळ्या रूपात
दर वर्षी या संगीत महोत्सवादरम्यान थिबा राजवाड्यात कला-जत्राही भरवण्यात येत होती; मात्र प्रत्येक कलेला योग्य न्याय मिळावा या हेतूने विविध कलाकृतींचे प्रदर्शन एकत्रित न भरवता स्वतंत्रपणे करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी या प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे. रसिकांना प्रत्येक चांगल्या कलाकृतीचा आस्वाद घेता येईल आणि जास्तीत जास्त कलाकारांना सामावून घेणे शक्य होईल, या हेतूने प्रत्येक कलाप्रकारासाठी एक प्रदर्शन अशा पद्धतीने वर्षभरात काही प्रदर्शने आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस आहे. विविध कलाप्रकारातील कलाकारांनी आर्ट सर्कल संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, २६ जानेवारीला रत्नागिरीतील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात तबलावादक पं. रामदास पळसुले यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हाभरातील मुले या शिबिरात सहभागी झाली होती. तसेच, रत्नागिरीतील नामवंत तबलावादकही पं. पळसुले यांच्यासमोर शिष्य म्हणून बसले होते. 

(रत्नागिरीतील लेन्सआर्ट या फोटोग्राफर्सच्या ग्रुपचे सदस्य उपेंद्र बापट, विवेक सोहनी, वल्लभ नाटेकर आणि सिद्धेश वैद्य यांनी महोत्सवातील कलाकारांच्या भावमुद्रा अत्यंत सुंदर पद्धतीने टिपल्या आहेत. ते फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZJTCI
Similar Posts
रत्नागिरीतील आर्ट सर्कल संगीत महोत्सवातील कलाकारांच्या भावमुद्रा २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या प्रांगणात तेरावा आर्ट सर्कल संगीत महोत्सव पार पडला. त्यात विविध नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली. रत्नागिरीतील लेन्सआर्ट या फोटोग्राफर्सच्या ग्रुपमधील सदस्यांनी या कलाकारांच्या टिपलेल्या भावमुद्रा येथे प्रसिद्ध करत आहोत. उपेंद्र बापट,
‘आर्ट सर्कल’चा कला संगीत महोत्सव २४ जानेवारीपासून; थिबा राजवाडा प्रांगणात ख्यातकीर्त कलाकारांचे सादरीकरण रत्नागिरी : केवळ रत्नागिरीचेच नव्हे, तर कोकणचे नाव सांस्कृतिक विश्वात देशभरात पोहोचवणारा, ‘आर्ट सर्कल’तर्फे आयोजित केला जाणारा कला संगीत महोत्सव २४, २५ आणि २६ जानेवारी २०२० रोजी ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात होणार आहे. दर वर्षीप्रमाणेच प्रतिभावान आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार यात आपली कला सादर करणार आहेत
आर्टिस्ट्री : कोवळ्या कलाकारांच्या प्रगल्भ कलेचं प्रदर्शन ‘आर्टिस्ट्री २०१९’ नावाचं कलाप्रदर्शन सध्या रत्नागिरीत भरलं आहे. हे प्रदर्शन भरविणारे कलाकार आहेत १७ ते २२ या वयोगटातले; पण वयाने लहान असले तरी त्यांची कला मात्र अत्यंत दर्जेदार आणि प्रगल्भ आहे, हे त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून दिसतंय. त्या प्रदर्शनाविषयी...
पुलोत्सव तरुणाई पुरस्कार अनघा मोडक यांना; सामाजिक कृतज्ञता सन्मान ‘सुहित जीवन ट्रस्ट’ला रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांतर्फे रत्नागिरीत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुलोत्सवा’तील यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अचानकपणे दृष्टी गमावल्यानंतरही खचून न जाता संघर्षमय प्रवास करून निवेदक म्हणून प्रभावी कामगिरी करणाऱ्या अनघा मोडक यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्कार जाहीर झाला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language