रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांतर्फे रत्नागिरीत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुलोत्सवा’तील यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अचानकपणे दृष्टी गमावल्यानंतरही खचून न जाता संघर्षमय प्रवास करून निवेदक म्हणून प्रभावी कामगिरी करणाऱ्या अनघा मोडक यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्कार जाहीर झाला आहे. मतिमंदांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या ‘सुहित जीवन ट्रस्ट’ या पेणमधील संस्थेला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता सन्मान जाहीर झाला आहे. आठ आणि नऊ नोव्हेंबर २०१९ रोजी हे पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.
मुंबईतील अनघा मोडक यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन केली असून, पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. याव्यतिरिक्त अस्मिता चित्र अॅकॅडमीमधून नाट्यशास्त्र आणि तसेच छायाचित्रणकलेतील पदवी संपादन केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. सध्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर मुलाखतकार म्हणून, आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवर रेडिओ जॉकी म्हणून आणि मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर निवेदिका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक औद्योगिक संस्थांसाठी आवाज कला व आवाज शास्त्र यासाठी त्या मार्गदर्शक म्हणूनही कार्य करतात. सावरकरांच्या चारित्र्याचा आढावा घेणारे ‘गुणांकित सावरकर,’ संवादाचे महत्त्व आणि संवादकला या विषयावरील ‘बोलू ऐसे बोल,’ अध्यात्मातील विज्ञानावर आधारित ‘ज्ञानियांचा विज्ञानु’ आदी विषयांवर त्या व्याख्याने देतात. ज्ञानप्रबोधिनीच्या छात्र प्रबोधन मासिकाच्या त्या सहसंपादिका होत्या. दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमांसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्या काम करतात.
विविध स्तरावरचे अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ‘यंग अचीव्हर’ हा पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. एका आजारात डोळे गमावल्यानंतर त्यांनी केलेला संघर्षमय प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या कामांमध्ये या कमतरतेचा कोणताही बाऊ न करता अत्यंत काटेकोरपणे आणि निष्ठेने काम करणे हे अनघा मोडक यांचे गुणवैशिष्ट्य आहे. यंदाचा पुलोत्सव तरुणाई सन्मान त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय यशासाठी प्रदान करण्यात येणार आहे.
पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता सन्मान रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील सुहित जीवन ट्रस्ट या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. मतिमंद व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणारी ही संस्था २००४ सालापासून कार्यरत आहे. मतिमंदांना कार्यात्मक शिक्षण, जीवनात्मक कौशल्ये, व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम सुहित संस्था गेली १५ वर्षे करत आहे. मतिमंद विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक एकात्मिकरण, स्वावलंबन आणि समाज आधारित पुनर्वसन ही ध्येये ठेवून संस्था झटत आहे.
‘पुलं’नी अनेक सामाजिक संस्थांना देणग्या दिल्या. त्यांच्या या दातृत्वाच्या पैलूला अभिवादन करण्यासाठी देण्यात येणारा हा पुरस्कार यंदा सुहित जीवन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे.
आठ तारखेला पुलोत्सवाची सुरुवात
‘पुलं’च्या जन्मशताब्दीच्या दिवशी, आठ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात यंदाच्या ‘पुलोत्सवा’ची सुरुवात होत आहे. ‘स्वरांकित मैत्र’ या कार्यक्रमाने या उत्सवाची सुरुवात होणार आहे. अभिषेक काळे आणि आदित्य मोडक आपल्या दमदार आवाजामध्ये ‘पुलं’चे मैत्र असलेले वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व आणि भीमसेन जोशी यांसारख्या मातब्बर गायकांची गाणी सादर करणार आहेत. ज्येष्ठ वादक पं. विश्वनाथ कान्हेरे गुरुजी त्यांना ऑर्गनवर साथ देणार आहेत. रामकृष्ण करंबेळकर यांची तबलासाथ असेल. अनघा मोडक या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध आहेत.
न ऐकलेल्या कवितांची मुक्त मैफल नऊ नोव्हेंबरला सादर होणार आहे. ‘इर्शाद’ असे त्या कार्यक्रमाचे नाव असून, संदीप खरे आणि वैभव जोशींच्या कविता त्यात सादर होणार आहेत. समारोपाच्या दिवशी, १० नोव्हेंबर रोजी ‘निरूपण’ हे संगीत नाटक सादर होणार आहे.