रत्नागिरी : सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नाटे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे एक आणि दोन फेब्रुवारी २०२० रोजी होणार आहे. राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले असून, यंदा ते नाटे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने होत आहे. ‘वस्त्रहरण’ या प्रसिद्ध नाटकाचे लेखक आणि ९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. माध्यमकर्मी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घुंगुरकाठी या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
राजापूर आणि लांजा तालुक्यांमधील पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ गेली पाच वर्षे ग्रामीण भागात साहित्य संमेलनांचे आयोजन करत आहे. त्या निमित्ताने त्या त्या भागातील संस्कृतीचा आणि विकासाचा जागर व्हावा, अशी त्यामागची कल्पना आहे. पहिले ग्रामीण साहित्य संमेलन तळवडे (ता. लांजा) येथे झाले होते. त्यानंतर पाचल, लांजा, ताम्हाणे आणि
कोट या गावांमध्ये संमेलने झाली. या वर्षीचे संमेलन सहावे असून, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाटे येथील यशवंतगडाच्या पायथ्याशी होणार आहे.
‘नाटे गावाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि यशवंतगड या ऐतिहासिक वास्तूचा अधिकाधिक पर्यटकांना परिचय व्हावा, यासाठी हे संमेलन येथे आयोजित करण्यात आले आहे,’ अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी दिली.
नाटेनगर विद्यामंदिर आणि कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला ३१ जानेवारी रोजी संमेलनाच्या निमंत्रणाची क्रांतिज्योत दिंडी तळवडे गावातून सुरू होणार असून, ती लांजा, पाचल, ताम्हाणे आणि कोट या पूर्वीच्या संमेलनांच्या ठिकाणाहून नाटे येथे दाखल होईल. शनिवारी, एक फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडीने या संमेलनाचा प्रारंभ होईल. यशवंतगड ते नाटेनगर विद्यामंदिर या मार्गावर ग्रंथदिंडी काढली जाईल.
पहिल्या दिवशी अध्यक्षीय भाषणासह विविध परिसंवाद, पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी मान्यवरांचा सत्कार आणि जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होईल. राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या कार्याचा आढावा आणि ग्रामीण संमेलनाचा हेतू स्पष्ट करणारी स्मरणिकाही या वेळी प्रकाशित केली जाणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर (साहित्यातील साचलेपणाची कोंडी फुटू दे), प्रा. डॉ. राहुल मराठे (ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज), वृंदा कांबळी (कथाकथन : तंत्र आणि मंत्र), शिवशाहीर रविराज पराडकर (शिवछत्रपती आणि तळकोकण) यांची व्याख्याने संमेलनात होणार आहेत. तसेच प्रा. डॉ. अलका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. त्याशिवाय विविध प्रदर्शने, लोककलादर्शन, पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रमही या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. संमेलनस्थळाला दत्ताराम केशव पावसकर साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे.
संमेलन यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, अशोक कांबळे, सरचिटणीस स्नेहल आयरे, विजय हटकर, नाटे गावाच्या सरपंच योगिता बांदकर, तसेच आबा सुर्वे, संदेश पाथरे, मनोज आडविरकर, संमेलन संयोजक गणेश चव्हाण,
गणपत शिर्के, किरण बेर्डे, महेंद्र साळवी, महादेव पाटील, प्रकाश हर्चेकर, नाटे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुरेश पाटील, नित्यानंद पाटील, राजेंद्र खांबल आदी प्रयत्न करत आहेत. संमेलनाच्या या उपक्रमात राजापूर आणि लांजा तालुक्यातील जनतेने, तसेच जिल्ह्याच्या अन्य भागांतील आणि कोकणातील साहित्यप्रेमींनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन लाड यांनी केले आहे.
(गेल्या वर्षी कोट या झाशीच्या राणीच्या गावी झालेल्या संमेलनाचा वृत्तांत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)