ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका विद्या बाळ यांचं ३० जानेवारी २०२० रोजी निधन झालं. स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. ‘मिळून साऱ्याजणी’ हे त्यांनी चालविलेलं मासिक हा त्याच कार्याचा एक भाग होता. या मासिकाचा तिसावा वाढदिवस १७ ऑगस्ट २०१९ रोजी पुण्यात साजरा झाला होता. त्या वेळी या मासिकाच्या वेगळ्या मुखपृष्ठांची कहाणी सांगणारा लेख विद्या बाळ यांनी बाइट्स ऑफ इंडियावर लिहिला होता. त्यांची संपादकीय भूमिका आणि विचारधारा यांचे दर्शन या लेखातून होते. आज तो लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. .........
‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिकाचं नाव स्त्रियांसाठीच्या मासिकांच्या रूढ नावापेक्षा काहीसं वेगळं आहे. इतरांच्या तुलनेत या मासिकाच्या निर्मितीमागची भूमिकाही अशीच वेगळी आहे. वेगळेपणाच्या अनेक अंगांपैकी एक महत्त्वाचं आणि पहिलं वेगळेपण या मासिकाच्या मुखपृष्ठात आहे. अंक हातात घेतला की आधी भेट होते ती मुखपृष्ठाचीच.
सामान्यतः एखाद्या सुंदर स्त्रीचा चेहरा किंवा तिची प्रतिमा मुखपृष्ठासाठी वापरणं ही सर्वांत लोकप्रिय पद्धत आहे. मग ते मुखपृष्ठ स्त्रियांच्या, कुटुंबासाठीच्या किंवा पुरुषांसाठीच्या नियतकालिकाचं असो. जाहिरातीचं मूळ तत्त्व हेच आहे, की To arrest attention project a woman. हे खरंच आहे, की अशा सुंदर चेहऱ्याकडे आपलं सहज लक्ष वेधलं जातं. मलाही ते सौंदर्य बघायला आवडतं. छान वाटतं; पण वाटतं, ते एकदा पाहून झाल्यावर पुढे काय? म्हणूनच ‘मिळून साऱ्याजणी’ची मुखपृष्ठं विचारपूर्वक निवडली जातात. आपलं मासिक पाहून, वाचून वाचकांनी विचार करायला प्रवृत्त व्हावं, अशी आमची धारणा आहे. गेली तीस वर्षं आमचा असा कसोशीचा प्रयत्न राहिला आहे, की ते सुंदर तर असावंच; पण अर्थपूर्णही असावं. सुंदर स्त्री सुंदर तर ‘दिसतेच;’ पण ती सुंदर ‘असायलाही’ हवी. तिचं सौंदर्य व्यापारी पद्धतीनं बाजारात विकायला काढता कामा नये असं वाटतं. याच भूमिकेतून आम्ही विश्वसुंदरी स्पर्धेलाही विरोध केला आहे...
...या विचारातून शोध घेताना आजवर ‘मिळून साऱ्याजणी’च्या मुखपृष्ठासाठी कितीतरी सुंदर चित्र, फोटो, पेंटिंग्ज, कविता, आंदोलनांमधल्या घोषणा आम्ही मिळवल्या आहेत. या सगळ्याची सुरुवात म्हणजे ‘मिळून साऱ्याजणी’च्या पहिल्या अंकाचं मुखपृष्ठ. यावर लाल, हिरव्या अशा रंगांच्या कापडाच्या तुकड्यापासून बनवलेल्या गोधडीचं चित्र आहे. वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे, पोताचे हे कापडाचे तुकडे धाग्यांनी टाके घालून एकत्र जोडलेले असतात. त्यातल्या काही तुकड्यांशी काही आठवणीही बिलगलेल्या असतात. या साऱ्यांना घेऊन एक छानसं उबदार पांघरूण तयार होतं. ‘मिळून साऱ्याजणी’ या नावाला साजेसं हे एक प्रतीक. ‘साऱ्याजणी’नं प्रथमपासूनच हे निश्चित ठरवलं होतं, की या मासिकात शहरी आणि ग्रामीण जीवनामध्ये सतत एक सेतू असला पाहिजे. त्या दृष्टीनंही ही गोधडी ग्रामीण जीवनाला जवळ घेणारी होती. त्यानंतर पाठोपाठ येणाऱ्या मुखपृष्ठांवर अशाच सुंदर गोष्टी अर्थ सोबत घेऊन येत राहिल्या. उदा. ऋतुमानातल्या बदलानुसार वसंत ऋतूत मोहोरानं साऱ्या पानांनाही झाकून टाकणारं आंब्याचं झाड, लाल फुलांच्या लिपीतून बोलणारा लालबुंद गुलमोहर, लिंबाच्या पिवळ्या धमक रंगाची अमलताशाची किंवा बहाव्याची झुंबरं, ओल्या जमिनीवर रांगोळी रेखणारी पारिजातकाची फुलं, उन्हाची काहिली शांतावणारी मोगऱ्याची फुलं, तर कधी या झाडाफुलांच्या सोबतीनं येणारे पक्षी, त्यांची घरटी, त्यांची घरट्यातून माना उंचावून बघणारी सानुली पिल्लंही ‘मिळून साऱ्याजणी’च्या मुखपृष्ठावर विसावली आहेत.
या मन मोहून टाकणाऱ्या निसर्गदृश्यांबरोबरच पाण्यासाठी केवढी तरी वणवण करत हंड्यावर हंडे घेऊन पाणी भरणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्याबरोबर पाणी भरणाऱ्या शाळेच्या गणवेशातल्या मुलीही आम्ही दाखवल्या आहेत. एकदा तर आमचा मित्र अभिजित वर्दे याला एक मुलगा खांद्यावर कळशी घेऊन पाणी भरताना दिसला. हे दुर्मीळ दृश्य त्यानं टिपून आम्हाला पाठवलं आहे. दारिद्र्याचं दर्शन घडवणारी एक बाईही अशीच त्याच्या नजरेनं टिपली आहे. तिच्याकडे एकच लुगडं आहे. आंघोळ करून थोडं अंगावर घेऊन उरलेलं लुगडं तिनं वाळूवर पसरलं आहे वाळवण्यासाठी...
आमचा मित्र रमेश धानोकर चित्रकार आहे. अक्षरनंदन शाळेतल्या मुलांना चित्रकला शिकवताना एकदा त्यानं मुलांना कविता वाचून चित्र काढायला सांगितलं. त्या चित्रांचं एक सुंदर कोलाज आमच्या एका मुखपृष्ठावर आहे. एकदा एका मैत्रिणीचा फोन आला. ती सांगत होती, की तिचा पाच-सहा वर्षांचा मुलगा जमिनीवर बसून चित्र काढत होता. ‘काय काढतो आहेस?’ असं विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘मिळून साऱ्याजणी’च्या मुखपृष्ठासाठी चित्र काढतो आहे.’ त्याच्या वयाला साजेसं चित्र या हकीगतीसह ‘मिळून साऱ्याजणी’ने प्रसिद्ध केलं होतं.
पुण्याच्या सात स्त्रियांनी दक्षिणेकडे कायनेटिकवरून शेकडो किलोमीटरचा यशस्वी, थरारक प्रवास केला. त्या साऱ्या जणी परत आल्यावर अर्थातच त्यांनी आमच्या मुखपृष्ठावर जागा पटकावली. अशीच काही मुखपृष्ठं काही सुंदर स्त्रियांनी सजवली आहेत. त्यातल्या एक होत्या जुन्या पिढीतल्या साहित्यिक आनंदीबाई शिर्के. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या खानदानी व्यक्तिमत्त्वाचं चित्र हा आमच्या मुखपृष्ठाचा विषय होता. तसंच ‘आई रिटायर होतेय’ या नाटकाची मुखपृष्ठकथा असलेल्या अंकावर भक्ती बर्वे या सुंदर अभिनेत्रीचा फोटो होता. एकदा तर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर त्यांच्या सहकारी आंदोलकांसह मुखपृष्ठाचा विषय झाल्या. कारण तेव्हा त्या साऱ्यांनी जलसमाधी घेण्याचं पाऊल उचललं होतं. अशा आणखीही काही ‘सुंदर असणाऱ्या’ स्त्रियांना स्थान देताना आम्हाला अतिशय अभिमान वाटला आहे.
लक्षात राहिलेल्या अशा किती तरी कहाण्या आणि आठवणी मुखपृष्ठाशी जोडलेल्या आहेत. अशी मुखपृष्ठं आवडणाऱ्या अनेकांनी अधूनमधून अशी सूचना केली आहे, की एकदा सगळ्या मुखपृष्ठाचा अनुभव एकत्रित पुढे ठेवणारं एक प्रदर्शनच भरवा. ती सूचना अजून तरी प्रत्यक्षात आलेली नाही; पण हा लेख ही त्याचीच एक छोटीशी झलक आहे. अगदी सुरुवात केली तेव्हा मनात एक विचार पक्का होता. पैसे कितीही कमी असले, तरी मुखपृष्ठ रंगीतच असायला हवं. ते आवडलं, आकर्षक वाटलं तर लोक अंक हातात घेतील आणि मग वाचतील. म्हणून अंकाचं मुखपृष्ठ तर सुंदर दिसायलाच हवं; पण अंकाचं अंतरंगही सुंदर असल्याचा अनुभव वाचकांना यावा, असा आमचा आजवर प्रयत्न राहिला आहे.
(‘मिळून साऱ्याजणी’चे ऑगस्ट १९८९पासून डिसेंबर १९९७पर्यंतचे सर्व अंक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. १९९८पासून आतापर्यंतचे अंकही लवकरच ई-बुक स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. मासिकाच्या तिसाव्या वाढदिवशी ई-बुक लोकार्पण करण्यात आले. त्या कार्यक्रमाला प्रतिभावंत अभिनेत्री नंदिता दास आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर उपस्थित होते. त्या कार्यक्रमाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)