Ad will apear here
Next
सुमती गुप्ते, ज्योत्स्ना भोळे, स्मिता तांबे


नामवंत अभिनेत्री सुमती गुप्ते, प्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना भोळे, तसेच अभिनेत्री स्मिता तांबे यांचा ११ मे हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
...... 
सुमती गुप्ते
११ मे १९१९ रोजी वाई येथे सुमती गुप्ते यांचा जन्म झाला. मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सुमती गुप्ते. वाईत जन्मलेल्या सुमतीबाईंचे बालपण बडोद्यासारख्या कला-संस्कृतीच्या माहेरघरात व्यतीत झाले. साहजिकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषत: सिनेमाकडे ओढा होता. पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘प्रभात’मध्ये दाखल झाल्या. तिथे ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात त्यांना पहिले काम मिळाले. त्यानंतर त्यांना बाबासाहेब तोरणेंच्या ‘नवरदेव’ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. 

त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भालजी पेंढारकरांनी त्यांना ‘थोरातांची कमळा’ या ऐतिहासिक चित्रपटात कमळेची मध्यवर्ती भूमिका दिली. त्यापाठोपाठ त्यांच्या ‘सूनबाई’नेही रौप्यमहोत्सवी यश मिळविले आणि सुमतीबाईंचे नाव एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वतोमुखी झाले. पुढे त्यांनी मा. विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’ यासारखे काही चित्रपट केले. दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांच्याशी त्यांनी लग्न केले होते. वसंतराव जोगळेकर यांच्या साथीने त्यांनी मीरा पिक्चर्स या संस्थेची स्थापना करून त्या बॅनरखाली ‘शेवटचा मालुसरा’, ‘जानकी’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपटांची निर्मितीही केली. 

‘ऊन-पाऊस’, ‘थोरातांची कमळा’, ‘चिमुकला संसार’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ यांसारखे मराठी चित्रपट, तसेच ‘मौसी’, ‘उर्वशी’, ‘हमारा संसार’, ‘वक्त’, ‘एक मंझिल, दो राहें’ इत्यादी हिंदी चित्रपटांतून आणि ‘संशयकल्लोळ’, ‘उद्याचा संसार’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘लग्नाची बेडी’, ‘विकारविलसित’ आदी नाटकांतून सुमती गुप्ते यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. सुमती गुप्ते यांना ‘रसरंग’चा दादासाहेब फाळके पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी-सखी-माता पुरस्कार, शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’ जीवनगौरव पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले होते. 

चंदा, मधुश्री व मीरा या त्यांच्या कन्या. मीरा यांनी १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘एक कली मुस्कायी’ या चित्रपटात जॉय मुखर्जी यांच्या बरोबर अभिनय केला होता. मीरा या व्यावसायिक अजित गुलाबचंद यांच्या पत्नी व नाटककार अच्युत वझे हे त्यांचे जावई आहेत. सुमती गुप्ते यांचे ३१ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले. 
.............
ज्योत्स्ना भोळे
११ मे १९१४ रोजी ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म झाला. ‘बोला अमृत बोला...’, ‘आला खुशीत समिंदर...’ ‘क्षण आला भाग्याचा...’ यांसारख्या मधाळ गीतांनी एके काळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती. ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला. ज्योत्स्नाबाईंना अभिनयाप्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. 

वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी प्रथम ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकात भूमिका केली. या नाटकाचा प्रथम प्रयोग एक जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. या नाटकात त्यांनी नायिकेची म्हणजेच बिंबाची भूमिका केली. या नाटकाचे मुंबई व पुणे येथे शंभराहून अधिक प्रयोग झाले. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. विवाहानंतर १९३३ साली त्यांचे पती केशवराव भोळे यांनी ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था काढली. या संस्थेने अनेक नाटकांचे प्रयोग केले. 

‘अलंकार’ नाटकात वत्सलेची, ‘आराधना’त देवकीची, ‘आशीर्वाद’मधील सुमित्रा, ‘एक होता म्हातारा’तील उमा, ‘कुलवधू’ मधील भानुती, ‘कोणे एके काळी’ मधील कल्याणी, ‘धाकटी आई’मधील वीणा, ‘भूमिकन्या सीता’मधील सीता, ‘रंभा’तील सुगंधा, ‘राधामाई’मधील राधा, तर ‘विद्याहरण’मधील देवयानी अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. या नाटकातील पदे त्यांनी गाऊन अजरामर केली. 

एक मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी शिवाजी पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीत गाऊन एक इतिहासच रचला. या गीताला शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केले. या गीताने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण भारावले. 

ज्योत्स्नाबाईंना अभिनय, गायन याबरोबर साहित्याचीही आवड होती. त्यांनी ‘आराधना’ या नाटकाचे लेखन केले. त्या अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’च्या अध्यक्षा होत्या. १९९९ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’, तर पुणे महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले. अनुबंध प्रकाशन या संस्थेने त्यांचे आत्मचरित्र ‘तूचि ज्योत्स्ना भोळे’ या नावाने प्रकाशित केले आहे. ज्योत्स्ना भोळे यांचे निधन पाच ऑगस्ट २०११ रोजी झाले. 
..........


स्मिता तांबे
११ मे १९८३ रोजी सातारा येथे स्मिता तांबेचा जन्म झाला. स्मिता तांबेने आपले शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबेने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. २००९ साली तिने जोगवा हा चित्रपट साकारला आणि या क्षेत्रात तिने आपला जम बसवला. ह्यानंतर तिने स्वतःच प्रॉडक्शन हाउस उभारलं. त्यात तिने अनेक मराठी शॉर्ट फिल्म्सचं दिग्दर्शन केलं. अनेक बालचित्रपटही साकारले. ‘७२ मैल’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुकही केले.

मध्यंतरी बरेच दिवस ती या क्षेत्रापासून थोडीशी बाजूला झाली असल्याचे दिसले. परंतु स्मिताने नंतर तिचा मोर्चा निर्मिती क्षेत्राकडेही वळविला आहे.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
.............
प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचा ११ मे हा स्मृतिदिन. (त्यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
अभिनेत्री पूजा बेदीचा ११ मे हा वाढदिवस.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZVECM
Similar Posts
आज अभीनेत्री स्मिता तांबे चा वाढदिवस जन्म.११ मे १९८३ सातारा येथे. स्मिता तांबे म्हणजे अष्टपैलू अभिनेत्री. मालिका असो वा चित्रपट स्मिता तांबेने नेहमीच आपल्या अभिनयाने त्या भूमिकेवर छाप उमटवली आहे. आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. स्मिता तांबेचा जन्म महाराष्ट्रात
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language