Ad will apear here
Next
स्वातंत्र्याची मोठी किंमत कलावंताला द्यावी लागते : रत्नाकर मतकरी
छायाचित्र : सौरभ महाडिक (सौजन्य : ratnakarmatkari.com)

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे नोव्हेंबर १९९८मध्ये भरलेल्या मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांनी भूषविले होते. त्या वेळी डॉ. सुधा जोशी यांनी मतकरी यांची घेतलेली मुलाखत त्या संमेलनाच्या ‘अमृतघन’ या स्मरणिकेत प्रकाशित झाली होती. त्यानंतर नवचैतन्य प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘रत्नाक्षरं’ (रत्नाकर मतकरी - व्यक्ती आणि साहित्य) या पुस्तकात ती पुनर्प्रकाशित करण्यात आली होती. मतकरी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, त्या मुलाखतीचा काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत. 
......
रत्नाकर मतकरी हे एक चतुरस्र कलावंत आहेत. १९५५ ते आजतागायत अशी त्यांची प्रदीर्घ, सातत्यपूर्ण आणि समृद्ध कलाकारकीर्द आहे. साहित्यिक, संपूर्ण रंगकर्मी, दूरदर्शन, चित्रपट या माध्यमांतील लेखक-दिग्दर्शक-निर्माते, स्वयंशिक्षित चित्रकार असे त्यांच्या कलावंत व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत. 

नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललित लेख अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले. मराठी रंगभूमीवरील नव्या पर्वाच्या जडणघडणीतले एक शिल्पकार असे त्यांचे सार्थपणे वर्णन करता येईल. व्यावसायिक, प्रायोगिक आणि बालनाट्य अशी रंगभूमीची तिन्ही दालने हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले. तिथली त्यांची कामगिरी नाट्यलेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि संगीत यांचे संकल्पन, वेशभूषा-रेखाटन, अभिनय, तसेच निर्मिती अशी सर्वांगीण स्वरूपाची आहे. ‘बालनाट्य’, ‘सूत्रधार’ आणि ‘महाद्वार’ या आपल्या नाट्यसंस्थांच्या द्वारे त्यांनी रंगभूमीच्या क्षेत्रात केलेले निरपेक्ष, निष्ठापूर्ण कार्य लक्षणीय आणि मोलाचे आहे. त्यांचे चित्रकार असणे ही गोष्ट साहित्य, रंगभूमी आणि इतर कलामाध्यमे यांतील त्यांच्या निर्मितीच्या संदर्भातही फलदायी ठरलेली दिसेल. 

प्रयोगशीलता, निर्मितीची अथक ऊर्जा, उपक्रमशीलता, तसेच अंतर्मुखता आणि समाजाभिमुखता यांचे संतुलन, हे मतकरींच्या कलावंत-व्यक्तिमत्त्वाचे खास विशेष आहेत. कमीत कमी साधनांच्या आधारे निर्मिती करणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हेही त्यांच्या सर्जनशीलतेचे एक मर्म आहे. 

कलावंत मतकरींना आजवर अनेक पुरस्कार व मानसन्मान लाभलेले आहेत. तथापि मराठी रसिकांनी (आणि इतर भाषांत अनुवादरूपाने साहित्य पोहोचल्यामुळे अन्यभाषक रसिकांनीही) मतकरींच्या साहित्यावर जो लोभ केला तो त्यांना मिळालेला सर्वाधिक मोलाचा पुरस्कार म्हणता येईल. 

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या सन्मानाच्या निमित्ताने या सर्व रसिकांच्या वतीने मतकरी यांच्याशी साधलेला संवाद म्हणजेच ही मुलाखत.... 

- गेली अनेक वर्षे तुम्ही सातत्याने लिहीत आलात. वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळलेत. लेखनातली सहजता - Facile Pen - हे तुमचं वैशिष्ट्य आहे. लेखनातल्या या अस्खलितपणाची कधी अडचण वाटते? सराईतपणा येईल अशी शंका वाटते? मागे वळून पाहताना काय जाणवतं? 

मतकरी : मी वेगळ्याच कुठल्यातरी अनुभवातून जात असताना, मध्येच मला स्वत:च्या वाङ्मयीन आणि अवाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाविषयी काही सत्यं नव्यानं गवसतात किंवा काहींचा पुन्हा एकदा पुरावा मिळतो. परंतु हे अचानक होतं. मुद्दाम स्वत:विषयी विचार करायला बसलो की मी ब्लँक होतो. याचं एक कारण, मी त्या क्षणी आधीचं सारं पुसून टाकलेलं असतं आणि तो क्षण नव्यानंच अनुभवायला लागलेलो असतो. आधी लिहिलेल्याचं काहीच ओझं या क्षणावर नसतं. बऱ्याचदा मी आधीचं सगळं विसरूनच गेलेला असतो. लिहिलेलं ढोबळमानानं आठवतं. तपशील फारसा आठवत नाही. कारण पूर्ण झालेलं लिखाण किंवा बसवलेलं नाटक मी डोक्यातून साफ काढून टाकतो - out of system - आणि कोऱ्या मनानं नव्या गोष्टीकडे वळतो. नुसता विषयच नाही, तर फॉर्मही माझ्या डोक्यातून गेलेला असतो. तीन कादंबऱ्या लिहूनही अजून मला वाटतं - कादंबरी? कशी काय लिहायची ती? प्रत्येक नाटक लिहितानाही, हातातला विषय या फॉर्ममध्ये कसा बसेल याची धाकधूकच असते. मग मी जसा काही धीर गोळा करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारांनी लिहून पाहायचं ठरवतो. म्हणजे तपशीलविरहीत विचार, थीम म्हणा, फक्त रूपरेषा म्हणा, असं काही, पण सुदैवानं, बहुतेक वेळा, एकदा लिहायला लागलो, की आपोआप तपशील येतो. पात्रांचे स्वभाव रेखीव होऊ लागतात, ती हालचाली करू लागतात, लिखाण सहजपणे आकाराला येऊ लागतं, हळूहळू त्यात निर्मितीचा आनंदही वाटू लागतो. क्वचित असं होत नाही, तेव्हा ते लिखाण मी बाजूला ठेवून देतो. त्याच्यावर जबरदस्ती करीत नाही. 

- एक कलावंत-माणूस म्हणून जगताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची आंतरिक निकड जाणवते? काय मूलभूत महत्त्वाचं वाटतं?

मतकरी : महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याची गरज. मला प्रस्थापित साहित्यिकांनी, पूर्वी, म्हणजे माझ्या तरुण वयातही हेव्यानं म्हटलं आहे, की तुम्ही सुदैवी. तुम्हाला तुमची नाटकं घेऊन दुसऱ्याच्या दारावर जावं लागत नाही. तुम्ही ती स्वत:च करू शकता. हे खरं आहे की ‘प्रेमकहाणी’ ‘आरण्यक,’ ‘लोककथा ७८’ यांची निर्मिती मी स्वत:च केली म्हणून झाली. मला हवी तशी निर्मिती करता आली, हेही खरं; पण या स्वातंत्र्याची किंमत मी वेळाच्या, शक्तीच्या आणि पैशाच्या हिशेबात किती मोठी दिली! अर्थात स्वातंत्र्याची किंमत मोजण्यापलीकडे असते. ते मात्र मी जन्मभर मिळवलं यात शंका नाही. (मला स्वतंत्र राहू देण्यात प्रतिभाचाही मोठा वाटा आहे. तिनं माझ्या प्रयोगांना कधीही विरोध न करता साथच दिली.) मला हवं तेव्हा मी हवं ते लिहिलं. फायद्यातोट्याचा विचार न करता ते रंगभूमीवर आणून पाहिलं. मी पैसा जमा केला नाही; पण हवं तेव्हा हव्या त्या नाटकाची निर्मिती करण्याची चैन केली. कुठल्याही बाह्य दडपणाशिवाय राहता येणं म्हणजे श्रीमंतीच, नाही का? व्यावसायिक रंगभूमीवरही मी हे स्वातंत्र्य मिळवलं, मला हवीत ती नाटकं मी लिहिली. एखाद-दुसरा अपवाद सोडला, तर निर्मात्यांनी सुचवलेल्या विषयावर लिहिलं नाही. अमुक एका नटासाठी, असं नाटक लिहिलं नाही. माझा स्वभाव थोडा माझ्या वडिलांवर गेला आहे. दादांचा इंग्लिश, मराठी संस्कृत, गणित अशा अनेक विषयांचा व्यासंग होता. त्या काळात ते एम. ए., एल. एल. बी., बी. टी. होते; पण त्यांनी जन्मभर त्यांना त्या त्या वेळी जे चांगलं वाटलं ते केलं. ‘संस्कृत स्वाध्याय माला’ (पं. सातवळेकर), ‘सुंदरकांड’ यांचं संपादन करण्यापासून ते कुणालाही शिलालेख वाचायला मदत करणं, पंडिता क्षमा राव यांचं संस्कृत लिखाण सुधारून देणं, इथपर्यंत त्यांना वर्थव्हाइल वाटेल ते कसल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता ते करीत. स्वतंत्र, मुक्त स्वावलंबी राहण्याच्या माझ्या वृत्तीमुळेही असेल; पण रंगभूमी, साहित्य या क्षेत्रांतल्या व्यावसायिक जीवनात मला फारसा जिव्हाळा मिळाला नाही, अर्थात कामापुरते संबंध चांगले राहिले; पण आपल्याकडे माणसांना अंकित करून घेण्याची एक गरज सर्वच क्षेत्रांतील सत्ताधाऱ्यांना वाटत असते. ती मान्य न केल्यामुळे मी सर्वांचा असूनही कुणी मला आपलं मानलं नाही. स्वातंत्र्याची ही मोठीच किंमत कलावंताला द्यावी लागते. 

- असं दिसतं, की स्वातंत्र्याचं मूल्य हे तुमच्या लेखक-दिग्दर्शक-निर्माता म्हणून केलेल्या वाटचालीतलं एक महत्त्वाचं सूत्र आहे. तुमच्या कलाकारकिर्दीतल्या स्थित्यंतरक्रमातलं तुम्हाला जाणवलेलं सूत्र कोणतं? 

मतकरी : निर्मितीतील साधेपणाकडे वाटचाल असं मी म्हणेन. आशय पोहोचवण्याच्या शैलीतील संयतता, काटकसर याचाही मी उल्लेख करीन. रिडक्शनचा एक नमुना म्हणजे ‘लोककथा ७८’साठी वापरलेला पांढरा पडदा. न रंगवता सांगणे, किमान रेषांत चित्रण करणे या अर्थाने शैलीत सोपेपणा, साधेपणा आणण्याकडे कल हे सूत्र सांगता येईल. बदलण्याची क्षमता असणं मी महत्त्वाचं मानतो. आशयाच्या संदर्भात स्थूलमानानं असं म्हणता येईल, की सुरुवातीला मानवी भावसंबंधांवर केंद्रित असं माझं लेखन होतं. नंतर सामाजिक संदर्भांवर भर येत गेला; पण माझा basic moral stand बदलला आहे, असं म्हणता येणार नाही. 

(‘रत्नाक्षरं’ या पुस्तकात प्रकाशित झालेल्या या मुलाखतीचा हा अंश नवचैतन्य प्रकाशनाच्या परवानगीने येथे प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही संपूर्ण मुलाखत ‘रत्नाक्षरं’ या पुस्तकात वाचता येईल. त्या पुस्तकाच्या खरेदीची लिंक खाली दिली आहे.)

हेही जरूर वाचा... 






 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZRGCM
Similar Posts
भयकथा आणि गूढकथा रत्नाकर मतकरी हे मराठीतील नामवंत गूढकथालेखक. डॉ. कृष्णा नाईक यांनी ‘सावल्यांच्या प्रदेशात’ या पुस्तकातून रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथेची समीक्षा केली आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला कथा या साहित्यप्रकाराची जडणघडण, तसेच गूढकथा आणि अन्य कथाप्रकारांचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
आर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language